जागर भाग १

जागर भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

जागर भाग १ –

निलमाती गांव हे डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटंसं गांव होतं. गांव कसलं… आदिवासी पाडाचं. गावात अगदी बोटावर मोजण्याइतकी घरं होती. तीही विखुरलेली. तिथंच एका झोपड्यात किसन आपली आई काशीबाई, बहिण हौसा आणि बायको रखमा सोबत रहात होता. किसनची परिस्थिती जरी हलाखीची असली तरीही तो मिळेल ते काम करून रोजच्या गरजा मात्र भागवत होता. तशा होत्या तरी किती त्याच्या गरजा? दोन वेळचा तुकडा, अंगावर कपडा आणि रात्रीच्या निवाऱ्याला जागा मिळाली की बसं… आणि या गरजा अजून तरी पूर्ण होत होत्या. नाही म्हणायला त्याला काळजी नव्हती असं नाही. हौसाचं लग्न करायचं होतं. त्यासाठी खूप नाही तरी किमान दहा बारा हजार खर्च होणारच आणि त्यासाठीच त्याला पैसे जमवायचे होते. रोजंदारीवर काम करताना जे काही मिळत होते ते सगळे रोजच्या गरजा भागविण्यासाठीच खर्च पडल्यामुळे बचत मात्र काहीच होत नव्हती.

“आवं… म्या काय म्हन्ते !!!” काहीसे लाजत रखमाने सुरुवात केली.

“काय म्हंते?”

“तुमी…” म्हणत ती काहीशी घोटाळली.

“ये बाई… आता सांगू ऱ्हायली का? येळ हु ऱ्हायला…” किसान वैतागला.

“आवं… म्या पोटुशी हाय…” तिनं लाजत लाजत सांगितलं.

“हां….!!! आं..?? खरं का काय?” किसनला आधी नीट लक्षात आलं नाही… आणि मग मात्र त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने तिच्या गळ्यात हात टाकले मात्र आणि ती लाजत मागे हटली.

“आवं… दूर व्हा… बयी बघ्तीन…”

“बघू दी… म्या माह्या बायकूसंग त हाये…” आधी बाहेरचा कानोसा घेत किसन म्हणाला.

“हां… पर म्होट्या मानसांची चाड ठीवावी लागती बाई मानसाला…!!!” असे म्हणत तिने त्याला स्वतःपासून दूर सारले. तो पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याला बाहेरची चाहूल लागली आणि त्याने तिथून काढता पाय घेतला. इतक्यात काशीबाई आत आली. तिच्या अनुभवी डोळ्यांनी रखमाचा चेहरा केंव्हाच वाचला होता. तिची आणि रखमाची नजरानजर झाली आणि रखमा लाजली. तिच्या त्या लाजण्याचे कारण काशीबाईने लगेच ओळखले.

“लई गुनाची बाय ती !!!” रखमाच्या चेहऱ्यावरून हात फिरवून तिने आपल्या कानशिलावर बोटे मोडली.

“द्येवा… लई उपकार झालंत बगं !!!” तिने आकाशाकडे पहात म्हटले आणि मग रखमाला उराशी कवटाळले.

तो लवकरच बाप बनणार होता. ही बातमी ऐकून त्याचा आनंद गगनात मावेना. आपल्या बायकोला किती जपू आणि किती नाही असे त्याला झाले, पण परत इथेही प्रश्न होता पैशाचा. जसजसे दिवस पुढे सरकत होते, त्याची काळजी वाढत होती. एकीकडे बाप होणार असल्याचा आनंद, तर दुसरीकडे खर्च वाढणार याचे टेन्शन. काशीबाई आणि हौसा जितकी होईल तितकी रखमाची काळजी घेतच होत्या. रखमाला काशीबाई आपल्या आईप्रमाणेच वाटत होती. एकंदरीत घरात जरी पैसा अगदीच कमी असला तरी सगळं ठीकठाक चालू होतं.

पण म्हणतात ना… दिवस कधी बदलतील हे सांगता येत नाही. अगदी तसेच झाले. रखमाची तब्बेत दिवसेंदिवस ढासळू लागली. अशक्तपणा वाढतच चालला. त्यातच दोन जीवांची बाई. सहन तरी किती करणार? तिच्या आजारपणात सासू आणि नणंद तिची ज्या पद्धतीने काळजी घेत होत्या ते पाहून रखमा सुखावत होती. काही दिवसांनी रखमाने मुलाला जन्म दिला. घरातील सगळ्यांनाच आकाश ठेंगणे झाले. पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. आठ दिवसातच मुल दगावलं. एकतर ढासळलेली प्रकृती, बाळंतपण आणि त्यात हा नवीन आघात रखमा सहन करू शकली नाही आणि पुढच्या १०/१२ दिवसात तिनेही जगाचा निरोप घेतला. एकापाठोपाठ झालेल्या या आघाताने किसन पुरता खचला. दिवस दिवस तो एखाद्या झाडाखाली नुसता बसून राही. सतत एकच एक विचार. काशीबाईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. दोघीही इतरांच्या शेतात कष्ट करून दोन वेळचा तुकडा मिळवत होत्या हीच काय ती समाधानाची बाब.

एक दिवस किसन असाच पारावर बसलेला असताना त्याचा मित्र शिरपा तिथे आला.

“आरं कामून बसला हितं?”

“—“ किसननं त्याच्याकडे एकदा नजर टाकली पण बोलला काहीच नाही.

“आरं!!! सांग की… कामून बसला हितं?”

“काई नाई…”

“तुई म्हतारी बोल्ली मला… कुड काम बी करत नाईस…” त्याने एकदम मुद्द्यालाच हात घातला. किसन गप्पंचं. शेवटी शिरपा त्याच्या शेजारी बसला.

“तुले काय वाटून ऱ्हायलं त्ये काय मले ठावं नाय व्हयं? पन मले येक सांग… कुनाला चुकलंय का ह्ये? तुया म्हतारीचं वय झालंय. तुई भैन बी लगीन करून जाईल. मंग कसं व्हायचं रं?” किसनच्या खांद्यावर हात ठेवत समजावणीच्या सुरात शिरपा म्हणाला.

“मंग काय करावं म्या?” किसन वैतागला.

“जास काय नाय… माह्या बरुबर चल.” शिरपा त्याला बळेच उठवत म्हणाला. अगदी नाईलाजानंच किसन उठला.

ते दोघे जिथे आले ती एक थोडीशी मोठी अशी झोपडीच होती. मध्ये एक भिंत घालून त्यात दोन खोल्या बनवल्या गेल्या होत्या. दर्शनी भिंतीवर अनेक फोटो लावण्यात आलेले होते. त्यातील २/३ कोणत्यातरी साधूंचे आणि बाकी इतर देवादिकांचे होते. त्या भिंतीच्या पुढे हिरवी नऊवारी नेसलेली आणि मळवट भरलेली बाई तोंडाने काहीतरी पुटपुटत बसली होती. तिच्या चेहऱ्यावरून ती चाळीशीची असावी. काळासावळा वर्ण, बरेचशे किडलेले दात, खोल गेलेले डोळे पण तरीही भेदक नजर ती कुणीतरी मांत्रिक असणार याची ग्वाही देण्यास पुरेसे होते. तिला सगळे आम्मा म्हणतात हे हळूच शिरपाने किसनला सांगितले. तिथेच अजून एक दुसरी बाई होती. वयाने आम्मापेक्षा लहान. बहुतेक तिची मदतनीस असावी. दोघेही आम्माच्या समोर जाऊन बसले.

“कामुन आलास?” आम्माने शिरपाकडे भेदक नजरेने पहात प्रश्न केला.

“ह्यो माहा दोस्त… लैच प्राब्लेममधी हाये… १ महिन्याआदी याची बायकू अन पोरगं मेलं. आता काय काम बी हुईना झालंय याच्याकून…” शिरपा एकेक सांगत होता. किसन फक्त बसून होता.

“कोन कोन हाय घरी?” आम्माने पुढचा प्रश्न विचारला.

“आता ह्यो, याची भैन अन म्हतारी आई… येवडेच.” उत्तर परत शिरपानेच दिले.

म्हाताऱ्या आईचे आणि बहिणीचे नाव निघताच आम्माचे कान टवकारले. कित्येक दिवसांपासून ती तिच्या साधनेसाठी नरबळीच्या शोधात होती आणि इथे तिला दोन बळी दिसले. पोरालाच भडकावले तर तिचे ईप्सित साध्य होण्यास काहीच बाधा होणार नव्हती. तिची नजर जरा जास्तच भेदक बनली. आता फक्त तिला वातावरण निर्मिती करायची होती. हे काम तर तिच्या अगदी डाव्या हाताचा मळ. शिरपा जसा बोलायचा थांबला तसे तिने अभिनयाला सुरुवात केली. अगदी हलकेच डोळे मिटले. बुबुळे आकाशाकडे नेली. तोंडाने परत काहीतरी पुटपुटायला सुरुवात केली. दोन एक मिनिटाने हात आकाशाकडे नेला. हाताची मुठ वळली. मग वर नेलेला हात हळूहळू खाली घेत तो मागील भिंतीवर लावलेल्या एका साधूच्या तस्वीरीपुढे आणला. हाताची मुठ अजूनही वळलेलीच होती. तोंडाने कसलेसे शब्द पुटपुटत तिने त्या हाताच्या वळलेल्या मुठीवर फुंकर मारली आणि मग ती मुठ किसनच्या पुढ्यात उघडली. त्यामध्ये एक छोटासा तावीज होता.

“ह्यो तावीज घे. तुज्या घरामंदी ठिव. उद्या सांच्याला ह्यो पुना आन… जा आता…” तावीज किसनच्या हातात देत आम्माने पुन्हा डोळे मिटले.

दोघेही झोपडी बाहेर आले. किसन काहीसा जास्तच अंतर्मुख झालेला होता. आम्माने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी किसन परत तिथे पोहोचला. आपल्या जवळील ताईत काढून त्याने तो आम्माच्या हातात दिला. चेहऱ्यावर कोणतेही भाव येवू न देता तो तिने आपल्या समोर पिठाने काढलेल्या चांदणीच्या मधोमध ठेवला. त्यानंतर तिथेच ठेवलेले एक लिंबू आपल्या हातात घेवून तेही त्या चांदणीच्या मध्ये ठेवले. नंतर डोळे बंद करून आणि तोंडाने कसलेसे मंत्र पुटपुटत जवळपास २/३ मिनिटानंतर तिने आपले डोळे उघडले. त्यानंतर ते लिंबू आपल्या हातात उचलून घेत तिथेच ठेवलेल्या एका सुरीच्या सहाय्याने त्याचे दोन उभे काप केले. लिंबू जसजसे कापले जात होते तसतसा त्यातून रक्तासारखा लाल रस खाली पडत होता. ते पाहून किसनच्या छातीत धस्स झालं. आम्माचा चेहरा मात्र अधिकच गंभीर दिसू लागला.

“पोरा… तुह्यावर करनी क्येली हाय कुनीतरी.” तिने आपल्या स्वरात चिंता दर्शवत सांगितले.

“करनी?” किसनच्या आवाजात भीतीमिश्रित आश्चर्य होते.

“हा… करनी… पन भिवू नगसं… म्या हाय..!!!” किसनला धीर देत तिने पुढचे काम चालू केले. आपल्या मदतनीस बाईला सांगून तिने तांदूळ मागवले. ताईतावर त्या तांदळाच्या दाण्यांची रास रचली. नंतर एक उदबत्ती हातात घेवून ती मधोमध तोडली. पण त्याचे दोन वेगळे तुकडे होणार नाहीत याची काजळी तिने आधीच घेतली होती. मग ती उदबत्ती पेटवून तिची खालची बाजू तांदळात खोवली. किसन हे सगळे आ वासून पहात होता. नंतर तांदळाच्या राशीच्या एका बाजूला कुंकू टाकले आणि दुसऱ्या बाजूला बुक्का टाकला.

“पोरा… आता पघच तू… तुह्यावर कुनी करनी केली ते आपल्याला अग्निदेव सांगनार हाये. त्यो मानुस घरचा हाय की भायेरचा ते लगीच समजन.” आम्मा बोलत होती आणि किसन अगदी टक लावून पहात होता. त्याच्यासाठी हा सगळा प्रकार नवीनच होता. आम्माने तिथेच एका तस्वीरीसमोर ठेवलेले पाण्याचे भांडे हातात घेतले. त्यावर काहीसा मंत्र पुटपुटला आणि मग पळी पळी पाणी त्या तांदळाच्या राशीवर उदबत्ती खोवली होती तिथे टाकायला सुरुवात केली. आता उदबत्तीचे तुटलेले टोक एका दिशेने फिरायला सुरुवात झाली. ५/६ पळी पाण्यातच उदबत्तीचे टोक कुंकू टाकलेल्या दिशेकडे झुकले होते. आता मात्र त्या बाईच्या चेहऱ्यावरील गांभीर्य कमालीचे वाढले.

“पोरा… तुह्यावर करनी करनारे लोकं तुह्या घरामंदीच हायेत.” अगदी गंभीर आवाजात तिने सांगितले. हे ऐकून किसन भडकलाच.

“आम्मा… असं कसं आसंन? माह्या घरामंदी म्या, माजी आय अन भैन ऱ्हातो. अन त्या कामून करनी करतील माह्यावर?” जवळपास आम्मावर ओरडतच त्याने प्रश्न केला. असा प्रसंग घडेल याची बहुतेक आम्मालाही खात्री असावी. त्यामुळे तिने आपला चेहरा शक्य तितका शांत ठेवला.

“पोरा… माह्यावर कामून वरडून ऱ्हायला? ह्ये म्या नाई अग्निदेव सांगून ऱ्हायले ना? अन देव कदी खोटं बोलत न्हाईत. तरीबी तुला इश्वास वाटत नसंन तर आजूक येक परीक्सा घेवू आपन.” आपला स्वर शक्य तितका सौम्य ठेवत आम्माने किसनला समजावण्याचा प्रयत्न केला. नंतर तिथेच देवाच्या तस्वीरीसमोर ठेवलेले दोन शंख हातात घेतले. त्यातील मोठा शंख ताईत ठेवलेल्या पिठाच्या चांदणीसमोर ठेवला. ताईतावरील तांदळाच्या राशीतील काही दाणे आपल्या हातात घेवून अभिमंत्रित केले आणि ते त्या खाली ठेवलेल्या शंखावर वाहिले. नंतर भैरवाचा जयघोष करत आपल्या हातातील दुसऱ्या शंखाचे खालचे टोक ठेवलेल्या शंखावर टेकवले.

“भैरुबाबा… कौल दे… या पोरावर त्याच्या आई आन भैनीने करनी क्येली असंन तर कौल दे…”

आम्माचे वाक्य पूर्ण होते न होते तोच खाली ठेवलेला शंख गरगर फिरू लागला. हे पाहून मात्र किसन पुरता गोंधळला. त्याचे मन त्याला हे सगळे खोटे आहे असे सांगत होते, पण त्याचे डोळे मात्र त्याला वेगळेच दाखवत होते. त्याची विचारशक्ती कुंठीत होऊ लागली. डोके बधीर झाले. काय चूक, काय बरोबर हेच त्याला समजेना. आम्माने दोन्ही शंख एकमेकांपासून बाजूला करताच फिरणारा शंख लगेच थांबला. किसन हे सगळे डोळे विस्फारून पहात होता. तेवढ्यात आम्माचा स्वर त्याच्या कानी आला.

“भैरुबाबा… याला काय करावं लागंन?”

परत एकदा हातातील शंख खाली ठेवलेल्या शंखावर टेकवला गेला आणि परत पहिल्यासारखाच मोठा शंख गरगरा फिरू लागला. यावेळेस मात्र आम्माची भेदक नजर किसनवर खिळली होती.

“पोरा… तुला पटनार न्हाई पन आता त्यांला शिक्षा करावीच लागंन. न्हाई तर ज्ये तुह्या पोराचं झालं, तुह्या बायकूचं झालं त्येच धा बारा दिसात तुह बी हुईल.” हे सांगताना मात्र आम्मा आपला प्रत्येक शब्द तोलून मापून बोलत होती. किसनचे डोके सुन्न झाले. काहीही न बोलता किसन उठला आणि आम्माच्या झोपडीतून बाहेर पडला. आम्मा मात्र किसनच्या पाठमोऱ्या आकृतीकडे रोखून पहात होती.

क्रमशः- जागर भाग १.

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a comment