जागर भाग ३ –
किसन घरी आला तो विमनस्क स्थितीतच. डोक्यात सारखे वेगवेगळे विचार येत होते. त्याने जे पाहिले त्यावर त्याचे मन विश्वास ठेवायला तयार नव्हते. पण डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट खोटी कशी असेल? त्यातून ती गोष्ट देवाचा कौल लावून सिद्ध झालेली होती. कमकुवत माणसाच्या मनात एकदा का संशयाच्या भुताने प्रवेश केला की मग त्यात तो गुरफटतच जातो. अगदी तसेच किसनच्या बाबतीतही घडायला सुरुवात झाली. त्याला एकेक गोष्टी आठवत होत्या. त्यावेळेसचे त्या गोष्टींचे अर्थ; फक्त संदर्भ बदलला म्हणून पूर्णतः विरुद्ध बनले होते. काशीबाई आणि रखमा यांच्यातील प्रेम त्याला नाटकी वाटू लागले. काशीबाईने देवाजवळ रखमाच्या आरोग्यासाठी केलेली प्रार्थना त्याला तिच्या मरणाची कामना वाटू लागली. राखमासाठी हौसानं बनवलेले औषधी काढे / चाटण त्याला विषारी वाटू लागले. मधूनच त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या लहान मुलाचा चेहरा येई, तर मधूनच त्याला आपल्याशी रखमा बोलते आहे असा भास होई. रखमा आपल्याला तिच्या मरणाचा बदला घेण्यास सांगते आहे असाही त्याला भास होऊ लागला. त्याचे एक मन अजूनही त्याला सचेत करत होते. या सगळ्या गोष्टी खोट्या असतात. कोणतीच आई आपल्या मुलाचे अहित होऊ देत नाही असेही विचार त्याच्या मनात येत. पण लगेचच परत त्याला लिंबातून पडणारे रक्त, उदबत्तीच्या साह्याने अग्निदेवाने दिलेला इशारा, भैरुबाबाने दिलेला कौल या गोष्टी डोळ्यासमोर येत आणि त्याच्या मनातील आधीचे विचार कुठल्या कुठे विरघळून जात. त्याचे डोके भणाणून गेले. त्याला आता एकटे राहणे अगदी असह्य झाले आणि तो घरातून बाहेर पडला.(जागर भाग ३)
किसनची पावले ज्या वाटेने चालली होती, त्या वाटेने जाणाऱ्या अनेकांना त्याने आजपर्यंत परत फिरवले होते. गावाची हद्द मागे पडली. किसन मात्र आपल्या तंद्रीतच चालत होता. काही वेळातच तो एका झोपडीजवळ आला. झोपडीच्या दारावरतीच दुकानाची पाटी लावण्यात आली होती – ‘गमभूलाव देशी दारूचे दुकान’. एकवार त्याने त्या नावाकडे पहिले. त्याची पावले काही वेळ थबकली. आज पर्यंत कैक वेळेस तो या भागात आलेला होता, पण त्याचे लक्ष कधीच त्या नावाकडे गेले नव्हते. आत जावे की जावू नये? अशी त्याच्या मनाची चलबिचल झाली आणि काही क्षणातच मनाचा निर्धार पक्का झाला. दुकानाचे नाव आता त्याला तारणहार वाटू लागले. त्या अवस्थेतच त्याने झोपडीत प्रवेश केला. आत शिरल्याबरोबर देशी दारूचा उग्र दर्प त्याच्या नाकाला झोंबला. एकवार त्याने समोर नजर टाकली आणि तो एका रिकाम्या बाकड्यावर जावून बसला. काही वेळातच त्याच्या समोर एक लहान मुलगा येऊन उभा राहिला.
“येक बाटली दे…” वर न पाहताच किसनने फर्मावले.
“देतो… पर..?” मुलगा आडखळला. त्याने आजपर्यंत किसनला फक्त नशेतील लोकांना सांभाळून घरी घेऊन जाताना पाहिले होते. त्याच्या मते किसन आपल्या गावातील सगळ्यात देवमाणूस होता. पण तोच देवमाणूस आज त्याच्याकडे दारूची मागणी करत होता.
“ए बेण्या.., गिऱ्हाईक काय बोलून ऱ्हायलं ते समजून नाई ऱ्हायलं का तुला?” मालकाचा आवाज आला आणि तो मुलगा भानावर आला. काही क्षणातच त्याने एक छोटी बाटली आणि ग्लास किसन बसलेल्या बाकड्यावर ठेवला. अगदी क्षणाचाही विलंब न करता किसनने ग्लासात दारू ओतली आणि तितक्याच तत्परतेने त्याने ग्लास तोंडाला लावला. दारूचा तो उग्र वास आणि ती चव त्याला बिलकुल आवडली नाही. पण यावेळेस हीच दारू त्याला औषधाप्रमाणे कडू पण त्रासापासून मुक्तता देणारी वाटली. याच नशेच्या आमलाखाली तो किमान काही वेळासाठीतरी सगळ्या भयानक विचारांपासून मुक्त होणार होता.
एकामागून एक असे किती पेग त्याने रिचवले हे त्याचे त्यालाच समजले नाही. एकतर आधीच डोके भाणाणलेले आणि त्यात दारूचा अंमल, काही वेळातच तो तिथेच घेरी येवून पडला.
“ए पोऱ्या… याच्या खिशातून बाटलीचे पैशे काढून घे, अन फेक भायेर याला…” दुकानाचा मालक किसनकडे एक तुच्छतेचा कटाक्ष टाकत कडाडला. अगदी नापसंतीनेच त्या पोराने दारूचे पैसे किसनच्या खिशातून काढून घेतले आणि त्याला झोपडीबाहेर आणून टाकले.
संध्याकाळ झाली तरी किसन घरी आला नव्हता. काशीबाई आणि हौसा नुकत्याच घरात आल्या आणि तेवढ्यात शेजारचा शाळकरी पोरगा ओरडत आत आला.
“मावशे… किसन तिडं दारू पिवून पडेले..!!!” त्याने सांगितले मात्र आणि काशीबाईच्या पायाखालची जमीन सरकली.
“काय बोलून ऱ्हायला? त्यो कामून दारू पिन?” काशीबाईने अगदी अविश्वासाने विचारले.
“त्ये मला काय ठाव? पन त्यो किसनच हाये… रस्त्यानं येत हुतो तवा त्यो मला दिसला. कोन वळखीचा असलं तर पघावं म्हनून म्या जवळ ग्येलो, त त्यो किसनच हुता.!!” त्याने एका दमात सगळे सांगण्याचा प्रयत्न केला.
“आरं माह्या करमा..!!! आता ह्ये बी बगायचं व्हतं का नशिबात..?” म्हणत काशीबाईने जागीच फतकल मारली. आज ना उद्या आपला मुलगा दुःखातून बाहेर येईल अशी तिची अपेक्षा होती पण त्यालाच त्या लहान शाळकरी मुलाच्या बोलण्यातून सुरुंग लागला होता.
“तिडं म्हंजी कुडं?” एका हाताने आपल्या आईला सावरत हौसानं विचारलं.
“त्यो दारूचा गुत्ता हाय नव्हं, तिडं…” मुलाने एका हाताने गुत्त्याच्या दिशेने हात दाखवत सांगितले.
“बयी..! सबुरीनं घ्ये..!! म्या घिवून येते त्याला..!!!” म्हणत हौसा बाहेर पडली. बरोबर त्या शाळकरी मुलालाही घेतले आणि तडक शिरपाचे घर गाठले. शिरपा घरातच होता. अगदी थोडक्यात तिने आणि तिच्या बरोबर आलेल्या मुलाने शिरपाला सगळे सांगितले.
“असं कर.., तू जा घरला… म्या आनतो त्याला…” असे सांगून शिरपाने हौसला घरी पाठवले आणि मुलाला बरोबर घेवून तो गुत्याकडे निघाला.
नशेमध्ये असलेल्या किसनला पाहून शिरपाचे काळीज हेलावले. त्याने कधी ही अपेक्षाच केली नव्हती. किसन पूर्णतः दारूच्या अमलाखाली होता. त्याला कसलीच शुद्ध नव्हती. शेवटी काहीसे फरफटतच त्याने किसनला घरी आणले.
“मावशे… किसन सुद्दीवर आल्यावर त्याला कायबी बोलू नगंस, म्या बोलन त्याच्याशी.” इतकेच सांगून शिरपा किसनच्या घरातून बाहेर पडला. काशीबाई मात्र किसनच्या डोक्याशी बसून राहिली.
क्रमशःजागर भाग ३,जागर भाग ३.
मिलिंद जोशी, नाशिक…