जागर भाग ४

जागर भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

जागर भाग ४ –

शुद्धीवर आल्यावर किसन दोघींशी काहीसा फटकूनच वागत होता. आम्माचे शब्द काही केल्या त्याच्या डोक्यातून जायला तयार नव्हते. अगदीच उरकायची म्हणून त्यानं अंघोळ उरकली. दोन घास पोटात ढकलले आणि घरातून बाहेर पडणार तोच शिरपा दारात उभा राहिला.(जागर भाग ४)

“माह्या बरुबर येतूस का?” शिरपानं विचारलं.

“कुडं?” किसनचा स्वर बराचसा त्रासीक होता.

“तालुक्याला… येक काम हाये… धा मिंटाचं… लगीच वापस…” शिरपानं सांगितलं. आदल्या दिवशीच्या प्रकाराबद्दल मात्र त्याने चकार शब्दही काढला नव्हता. काही न बोलता किसन त्याच्याबरोबर निघाला. रस्त्याने जातानाही किसन जास्त काही बोलला नाही. येताना मात्र शिरपाने विषय काढला.

“कायाचा इचार करू ऱ्हायला येवडा?” शिरपाने प्रश्न केला.

“कायाचा नाई…” परत किसनचे तुटक उत्तर.

“अरे मंग बोलून का नाई ऱ्हायला?”

“काई नाई…”

“नाई कसं… कवां धरनं पौ ऱ्हायलोना म्या…”

“—” यावरही किसन गप्पचं.

“म्या काय म्हनतो… मानसानं ज्ये काय मनात असंल त्ये बोलून टाकावं… आपल्या मानसापासनं काय बी लपवू नाई…” किसनच्या चेहऱ्यावर आपली नजर रोखत शिरपा म्हणाला.

“आता हायेच कोन ज्याला आपलं म्हंता यील? जी व्हती; ती गेली नव्हं मला येकल्याला सोडून..!!!” शून्यात नजर लावत किसन बोलला.

“आरं असं कसं? तुही आय हाय, भैन हाय…” शिरपाने गोंधळून विचारले पण किसन मात्र त्यावर काहीच बोलला नाही.

“मला एक सांग, आम्माकडं गेल्ता का?” शिरपानं प्रश्न बदलला.

“हां… गेल्तो…”

“मंग? काय म्हन्ली ती?”

“ती म्हन्ली माह्यावर करनी केल्यीये…”

“करनी? कुनी केली?” शिरपानं गोंधळून विचारलं.

“बयीनं…!!! माह्या बायकूवरबी तिनंचं करनी केलथी…” हे सांगताना किसनचा स्वर रडवेला झाला.

“आरं तिच्या मारी… काय सांगून ऱ्हायला?” शिरपानं गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाखाली उभी केली. किसनचे डोळे भरून आले होते.

“मला आम्मानं समदं दावलं…” हे सांगताना किसनच्या डोळ्याला धार लागली.

“आरं कायतरी चुकू ऱ्हायलं… ती कशाला तुह्यावर करनी करंल?” शिरपा पुरता गोंधळला.

“त्ये काय मला म्हाईत नाई, पन अग्नीदेवानंबी त्येच सांगितलं… म्या सोताच्या डोळ्यानं पायलं…” या वेळेस किसनच्या डोळ्यात विश्वासघात होत असल्याची भावना स्पष्ट दिसत होती.

“आत्तारं देवा..!!!” शिरपा पुरता गोंधळला. त्यानं किसनचा हात हातात घेतला आणि काही न बोलता त्याला सांत्वना देण्याचा तो प्रयत्न करू लागला. किसननं ही स्वतःला सावरलं. काही वेळ दोघेही गप्पं बसून होते. काय बोलावे हेच मुळी समजत नव्हते.

“किसन… येक सांगू?” शिरपानं शांतता तोडत किसनच्या खांद्यावर हात ठेवला.

“हं…”

“मला काय ह्ये पटत नाय गड्या… म्या लई दिसापास्नं वळीखतो तुह्या आईला… ती त्यातली बाई नाय. आम्माचं कायतरी चुकून ऱ्हायलं… आन आता त चार सा मैन्यात तुही भैनबी लगीन हून जाईल सासरला… मंग तूच तिच्यावाला आधार. शानं मानुस सोता बसलेली फांटी तोडतं व्हय? ” समजावणीच्या सुरात शिरपा बोलला. त्यावर किसन मात्र गप्पंच होता. त्याची मती गुंग झाली होती. शिरपा जरी विचारपूर्वक बोलत होता तरी शेवटी तो पडला सामान्य माणूस आणि आम्मा काय, अग्निदेव काय किंवा भैरुबा काय… या सगळ्या असामान्य शक्तीच. त्या कशाला खोटं बोलतील? त्यात त्यांचा काय फायदा असणार? किसनच्या डोक्यातील विचारचक्र अतिशय वेगाने फिरत होते… परंतु उलट्या दिशेने. त्यामुळे तो गप्पच होता.

“आम्मा काय म्हन्ली उजूक?” किसनकडे रोखून पहात शिरपानं पुढचा प्रश्न केला. बहुतेक याचे पर्यावसन कोणत्या गोष्टीत होणार याची त्याला जाणीव झाली होती.

“काय जास नाय… आता समदं तीच पघनार हाये…” रुक्ष स्वरात किसन बोलला आणि शिरपाच्या काळजात चर्र झालं. आपण कुठून याला त्या आम्माकडे नेलं असं त्याला राहून राहून वाटू लागलं.

“किसन… येक सांगतो तुला… काय बी झालं तरी काय वंगाळ करू नगंस. ती तुही आय हाय… तिच्यामुळं तुला ह्ये जग दिसलंय… आपन रामाला द्येव म्हन्तो… कामून? कारन त्याच्या सावत्र आयनं त्याला जंगलात धाडला… बायकू सकट… पर त्यानं तिडून आल्यावर बी तिला माफ क्येलं. ही त तुजी सक्की आय हाय. देव माफ करायला शिकिवतो, सूड घ्यायला नाई. मंग त्यो भैरुबा का आसना…!!!” किसनला समजावत शिरपानं गाडीला किक मारली आणि दोघे गावाच्या रस्त्याला लागले. त्यानंतर शिरपा एकेक उदाहरणे देत किसनला समजावत होता पण किसनला मात्र त्याची कोणतीही गोष्ट समजत नव्हती. किसनच्या विचारांची कवाडे आम्मानं कधीच बंद करून घेतली होती.

पुढचे दोन दिवस किसन आई आणि बहिणीबरोबर अगदीच तुटक वागत होता. त्याच्या वागण्यातील बदल दोघींच्याही लक्षात आला, पण त्याच्या मनस्थितीचा विचार करून दोघींनीही त्याकडे दुर्लक्ष केले. त्या समोर दिसल्या रे दिसल्या किसनच्या डोळ्यासमोर आम्माच्या झोपड्यातील प्रसंग उभा रहात असे. शेवटी हे सगळे असह्य होऊन त्याने आपल्या मनाशी निर्णय पक्का केला आणि तो आम्माच्या झोपडीची वाट चालू लागला.

“लई उशीर क्येला पोरा?” किसनला दारात आलेला पाहून आम्माने प्रश्न केला. खरे तर ती त्याची कधीपासून वाटच पहात होती. तिच्या प्रश्नांचे काहीही उत्तर न देता तो तिच्या पुढ्यात जावून बसला.

“ह्ये बग पोरा… देवापुडं कुनाचं चालत न्हाई. वंगाळ वागलं तं शिक्शा हुनार… मंग त्यो कुनी बी आसंना… आदी ती तुजी आय व्हती, पन आता ती चेटकीन हाये.” आम्मा सांगत होती. किसन फक्त ऐकत होता. त्याच्या मेंदूचा ताबा कधीचं आम्मानं घेतला होता.

“दोन दिसांनी पुर्निमा हाये. त्याच दिशी त्या दोघींलाबी संपवाया लागंन. न्हाईतर त्या दोघी आदी तुहा अन मंग येकेक करून समद्या गावाचा नास करतीन.” आम्माचे शब्द ऐकून परत एकदा किसनच्या एका मनाने त्याला यातून माघार घेण्यास सांगितले पण आम्माचे प्रत्येक वाक्य त्याला आता माघार घेण्यापासून रोखत होते.

काही वेळानंतर आम्माने डोळे मिटले. काही अस्पष्ट मंत्र पुटपुटत हाताची मुठ वळली आणि किसनला हात पुढे करायला सांगितला. त्याच्या हातावर थोडेसे भस्म टाकत त्याला त्याची पुडी बनवायला सांगितली.

“ह्ये बग पोरा… याची पुडी करून ती सोताजवळ ठिव. म्हंजी त्या दोघींला तुह्या बद्दल काय बी समजनार न्हाई. आता दोन दिस त्यांच्यासंग नीट वागायचं नाटक कराया लागंन. त्यांला काय बी संशय याया नगं. न्हाईतर तू जित्ता ऱ्हानार नाईस. बाकी समदं म्या पघून घीन” आम्माने त्याला भीती घालून वाटी लावले.

क्रमशःजागर भाग ४,जागर भाग ४.

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a comment