जागर भाग ५

जागर भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

जागर भाग ५ –

भर दुपारच्या रणरणत्या उन्हात दोन जण निलमाती गावाच्या दिशेने पायी चालत होते. कधी डोंगराची चढण, कधी माळरान तर कधी काटेरी झुडपे; जे मध्ये येईल त्याला तुडवत दोघांचे मार्गक्रमण चालू होते. दोघांमधील एकजण पूर्णतः नाथ सांप्रदायिक वेशभूषेत होता तर दुसरा सर्वसाधारण वेशभूषा केलेला. पहिल्या व्यक्तीपेक्षा वयाने बराच लहान. बहुतेक आसपासचा गावकरी असावा. ज्या प्रमाणे स्वामींची पाऊले झपाझप पडत होती, त्यांच्याशी जुळवून घेताना मात्र त्याची दमछाक होताना दिसत होती.(जागर भाग ५)

“म्हाराज… वाईज दम खावा.!!!” शेवटी आपले दोन्ही हात गुढग्यावर ठेवत, धापा टाकीत त्या तरुणाने स्वामींना हाक दिली. त्याची हाक ऐकताच स्वामीजी थांबले.

“बेटा… इतक्यातच थकलास?” त्याच्याकडे स्मितहास्य करत स्वामींनी विचारले.

“—” स्वामींच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हे न समजल्यामुळे तो फक्त स्वामींकडे पहात राहिला.

“चल… ते समोर झाड दिसते आहे. सावलीत थोडा आराम करू…” एका झाडाकडे बोट दाखवून स्वामीजी त्या दिशेने चालू लागले. तसेही उन्हात थांबण्यापेक्षा सावलीत काही वेळ आराम करणे जास्त योग्य, असा विचार करून तोही स्वामींच्या मागोमाग चालू लागला. काही वेळातच दोघेही झाडाच्या सावलीत आले. तिथेच एक काहीशी योग्य जागा पाहून स्वामींनी पद्मासन घातले.

“म्हाराज… येक इचारू?” काहीसा दम खाल्ल्यावर त्या तरुणाने सुरुवात केली.

“हो… विचार की…”

“आपन कुटं जाऊन ऱ्हायलो?”

“जिकडं ही पावलं नेतील तिकडं…” मंद स्मित करत स्वामींनी उत्तर दिले.

“पन म्या काय म्हन्तो… तुमी काय तरी ठरीवलं आसनचं ना?” काहीशा अविश्वासानं पहात, गोंधळून त्याने परत प्रश्न केला.

“नाही… मी ठरवणारा कोण? तो जे काही ठरवेल त्याप्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न करतो इतकेच.” आकाशाकडे बोट दाखवत स्वामींनी उत्तर दिले. त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित अजूनही तसेच होते.

“न्हाई… तुमाला समदं ठावं हाय, पन सांगून न्हाई ऱ्हायले तुमी…” स्वामींनी दिलेले उत्तर न पटल्याने तो तरुण बोलून गेला आणि स्वामींना जास्तच हसू आले.

“बरं तर मग… ऐक… आपण त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत…” त्याला समजवण्यासाठी स्वामींनी उत्तर दिले.

“हंग अस्सं… आदीच सांगायचं ना मंग… म्या तुमाला चांगला रस्ता दावला अस्ता… येकदम टाररोड… असं जंगलातून जायची कायबी तकलीप पल्डी नस्ती.” डोक्यावर हात मारून घेत तरुण उद्गारला.

“मला काय माहित, तुला त्रंबकेश्वराचा रस्ता माहिती आहे म्हणून?” काहीशा मिश्किलपणे स्वामी उत्तरले.

“बरं मी तुला काही विचारू का?”

“हां… इचारा की… काय बी इचारा…”

“आता मला काही तुझ्याबद्दलही सांग. तुला माझ्या बरोबर यावेसे का वाटले?” स्वामींनी मुद्द्यालाच हात घातला.

“काय सांगू तुमास्नी… माहं नांव रमेश. म्या ल्हान व्हतो तवाच माजी आय ग्येली… माह्या बापानंचं मला ल्हानाचा म्होटा केला. माहा बाप मजुरी करायचा अन ज्ये काय मिळनं त्यात आमचं पोट भरायचा. म्या धाव्वी पोतूर शाळंत ग्येलो, मंग बापाबरुबर रोजंदारीवर जाया लागलो. उल्शिक पैकाबी गाठीला बांधला, पन माह्या बापानं आथरून धरलं. व्हतं नवतं समदं ग्येलं अन चार सा दिसात बाप बी ग्येला. मागं ठिवलं फकस्त येक खोपटं. त्ये बी सरकारच्या जाग्येवर… पुडं कवां सरकारी मानसं येतील अन त्ये बी तोडतीन म्हाईत नाई.” शून्यात नजर लावून रमेश बोलत होता.

“कालच्याला तुमी आमच्या गावात आला… मारतीच्या देवळात ऱ्हायला. तुमच्याकडं सामान म्हनून फकस्त येक झोळी अन येक काठी. अंगावर जास कपडे नाय की पायात चपला नाय. सकाळ झाली की लोकांच्या दारात जायचं. त्ये जे काय देतील त्ये खायचं अन पूडं जायचं. काय बी टेन्शन नाय. मागं काय झालं ध्यानात ठीवायचं नाय, अन पूडं काय हुईल याचा इचार करायचा नाय…” हे बोलून रमेश स्वामी काय म्हणतात याकडे बारकाईने पाहू लागला.

“असं होय… यासाठी तुला माझा शिष्य व्हायचे आहे तर?” त्यांनी हसत हसत प्रश्न केला.

“हां… ह्ये बी हाय अन आजूक येक…”

“हं… बोल ना मग…”

“गावचे लोकं म्हनत व्हते… तुमी काय बी करू शकता. लैच पावरबाज हायेत तुमी… मला बी शिकायचं हाय त्ये…” काहीसे चाचरत रमेशनं सांगितलं आणि स्वामींना हसू आलं.

“पण तुला वाटते तशी पावर माझ्यात नसेल तर?” स्वामींनी पुढचा प्रश्न केला आणि रमेश विचारात पडला.

“तर? तुमी मला कायतरी त शिकवशान ना? आन तसं बी या दिसात कुडं काम बी नाय भेटत. तुमच्यासंग देवाचं दर्शन बी हुईल अन चारदोन गोष्टी शिकाया मिळतीन.”

“ठीक आहे… जशी त्र्यंबकेश्वराची इच्छा… आधी त्र्यंबकेश्वरला जाऊ, महादेवाचं दर्शन घेऊ आणि नंतर ठरव तुला काय करायचे ते… आता आपण पुढच्या प्रवासाला निघालो तर चालेल ना?” असे म्हणत स्वामी उठून उभे राहिले.

“हां… चला…” म्हणत रमेशही उठला आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले. जसजसे ते गावापासून दूर जात होते तसतशा मनुष्यवस्तीच्या खुणा कमीकमी होत होत्या. समोरच एक टेकडी होती. ती पार केली कि मुख्य डोंगराची चढण चालू होणार होती.

दोघेही टेकडीवर आले. टेकडीवरून गांव खूप छान दिसत होते. उन्हाळ्याचा उकाडा असला तरी आजूबाजूला असलेल्या झाडांच्या गर्द सावलीमुळे तो अजून तरी जाणवत नव्हता. चालताचालता स्वामींचे लक्ष काही दूर अंतरावर मांडलेल्या पुजेकडे गेले आणि स्वामी थांबले. त्यांनी आजूबाजूला पाहिले, पण त्या दोघांखेरीज इतर कुणीही मनुष्य आजूबाजूला दिसेना. मग मात्र स्वामी मांडलेल्या पूजेच्या दिशेने चालू लागले. काही पावलातच दोघेही पूजा मांडलेल्या ठिकाणी आले.

पूजेच्या एका टोकाला दक्षिण दिशेला तोंड करून एक मोठा दगडी वरवंटा उभा करून ठेवला होता. त्याला पूर्ण बुक्क्याने माखले होते. कुंकू आणि बुक्का याचा वापर करून त्याला डोळे काढण्यात आले होते. दोन्ही डोळ्यांच्या थोडे वर कुंकवाचा मळवट भरण्यात आला होता. तोंडाच्या जागी कुंकवाचा वापर करून बाहेर आलेली जीभ काढली होती. समोरची जागा साफ करून तिथे खोलगट असे वर्तुळ काढण्यात आले होते. त्या वर्तुळात हळद भरून त्यावर एक कणकेचा दिवा ठेवण्यात आला होता. वर्तुळाच्या बाहेर कणकेच्या ७ मनुष्याकृती बाहुल्या बनवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यांनाही कोरून डोळे, नाक, तोंड काढण्यात आले होते. त्या सगळ्यांवर हळद, कुंकू, गुलाल, बुक्का वाहण्यात आला होता. एकूणच मांडलेली पूजा अघोरी प्रकाराकडे बोट दाखवत होती. हे सगळे पाहून स्वामींच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली.

“म्हाराज… आवं काय ओ ह्ये? कसली पूजा म्हनायची ही?” काहीशा आश्चर्याने रमेशने प्रश्न केला.

“ही अघोरी साधना आहे. या साधनेसाठी नरबळी दिला जात असतो. अजून तरी इथे तशा खुणा दिसत नाहीत. बहुतेक उद्याची पोर्णिमा साधून बळी दिला जाण्याची शक्यता आहे.” पुजेकडे निरखून पहात स्वामी बोलत होते.

“आं??? नरबळी?” रमेशची पाचावर धारण बसली.

“हो… नरबळीच… आपल्याला हे रोखायला हवे.” रमेशकडे पहात स्वामी उद्गारले.

“म्हंजे? आपन काय करनार?” गोंधळून रमेशने विचारले.

“आज आपल्याला इथेच राहावे लागेल. ही पूजा सुरु केल्यावर किमान ३/४ तास तरी लागतात. आणि पूजेच्या शेवटी बळी दिला जातो. त्यामुळे उद्या दुपारी आपण इथे येऊ. पूजा सुरु झाल्याबरोबर तू जवळच्या पोलीस स्टेशनला जा आणि पोलिसांना घेवून ये. मी इथेच थांबतो आणि तुम्हाला येण्यास उशीर झाला तर तो पर्यंत मी यांना शक्य तितके रोखायचा प्रयत्न करतो. चल आता, आजचा आपला मुक्काम याच गावात होणार आहे.” असे म्हणून स्वामी माघारी वळले.

क्रमशःजागर भाग ५,जागर भाग ५.

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a comment