जागर भाग ६

जागर भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

जागर भाग ६ –

दोन दिवसांपासून किसन घरी खूपच चांगला वागत होता. काशीबाई देखील आपला मुलगा परत माणसात आला म्हणून खुशीत होती. हौसाचे हात पिवळे झाले आणि किसनचे दुसरे लग्न लावून दिले की आपली जबाबदारी संपली असे तिला वाटत होते. रखमा गेल्यापासून घरातील हरवलेले सुखाचे क्षण काही प्रमाणात परत मिळाले याचेच समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.(जागर भाग ६)

“बयी… आज सांच्याना पूज्या बांधली हाये. आपल्या समद्यांना तितं जायाचं हाये.” किसननं काशीबाईला सांगितलं.

“पूज्या? कायाची पूज्या?” काशीबाईनं विचारलं.

“आपल्या समद्यांचं लै भलं हुईल त्यानं… काय बी दोष ऱ्हानार नाय..!!!” काशीबाईकडे रोखून पहात किसन उत्तरला. यावेळेस मात्र काशीबाईच्या मनात चर्र झालं. किसनची नजर तिला जरा वेगळीच भासली. पण हा आपल्याच मनाचा खेळ आहे असे समजून तिने मनातील सर्व विचार बाजूला सारले.

“बरं बरं… तुजं समदं यवस्थित हुनार आसंल त येक काय धा पूज्या बांधू आपन…” काशीबाई म्हणाली. ती बोलत असताना किसन खूप बारकाईने तिच्या चेहऱ्याकडे पहात होता. त्यात त्याला कुठेच नाटकीपणाचा लवलेशही दिसला नाही. आपण चूक तर करत नाही ना? हा विचार परत एकदा त्याच्या मनात आला. ज्या आईने आपल्याला जन्म दिला ती आपल्या जीवावर उठू शकेल? तसाच शिरपा म्हणाला तसे आपल्याला मारून तिला असा काय फायदा होणार आहे? एक ना दोन असे अनेक प्रश्न त्याच्या मनात पुन्हा एकदा फेर धरू लागले. आपण नक्कीच काहीतरी चूक करत आहोत असे त्याचे मन त्याला सांगू लागले. पण परत त्याला आम्माचे शब्द आठवले, भैरूबाबाचा कौल आठवला आणि त्याच्या मनातील विचारांवर अविवेकाने पुन्हा एकदा मात केली.

स्वामी आणि रमेश कधीचेच पूजा मांडलेल्या जागेपासून वरच्या बाजूला एका झाडाच्या आडोशाला येवून बसले होते. अशा पूजा सहसा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री केल्या जातात पण तरीही स्वामी रमेशला घेवून भर दुपारीच तिथे आले होते. काही वेळाने त्यांना पूजा मांडलेल्या ठिकाणी काही लोक येताना दिसले. ते एकूण ७ जण होते. त्यात चार स्त्रिया आणि ३ पुरुष होते. आल्या-आल्या दोन स्त्रियांनी तेथील जागा साफ करायला सुरुवात केली. एका स्त्रीने पूजेच्या समोर फतकल मारली आणि पूजेला सुरुवात झाली.

“बेटा… अजून काही तास आपल्या हातात आहेत. पूजेच्या शेवटीच बळी दिला जाईल. त्याच्या आधी आपल्याला पोलिसांना बोलावले पाहिजे. जर तुम्हाला उशीर झाला तर मात्र मी पुढे होऊन पूजा थांबवण्याचा प्रयत्न करेल.” स्वामींनी रमेशला आपली योजना सांगितली.

“पन म्हाराज… तुमच्या जीवाचं काय बरंवाईट झालं मंग?”

“अरे आपण प्रयत्नच केले नाहीत तर यश कसे मिळेल? बाकी त्या परमात्म्याची इच्छा… जा… आता वेळ करू नकोस.” असे म्हणत स्वामींनी त्याला पाठवून दिले.

वेळ हळूहळू पुढे सरकत होती तसे पूजेचे स्वरूप जास्तच भयंकर होत होते. आम्माचे मंत्र आता जास्तच मोठ्या आवाजात वातावरणात घुमत होते. असेच जावे आणि ही पूजा इथेच थांबवावी असे दोन तीन वेळेस स्वामींच्या मनात आले. पण नक्की कुणाचा बळी दिला जाणार हे अजूनही स्पष्ट झालेले नव्हते. त्यामुळे त्यांनी अजूनही फक्त बघ्याची भूमिका घेतली होती.

“बयी ह्ये कुकू घ्ये… आन सोताच्या आन हौसाच्या डोक्याला लाव…” किसनने आम्माने दिलेले कुंकू काशीबाईच्या हातात देत म्हटले.

“आरं… काय वंगाळ बोलू ऱ्हायला? म्या कुकू कसं लावू?” तिने गोंधळून विचारले. काशीबाईचा नवऱ्याला या जगाचा निरोप घेऊन १०/१२ वर्ष झाले होते. या काळात तिच्या कपाळावर हळद आणि कुंकवाचा स्पर्शही झाला नव्हता. आणि आज आपला मुलगा आपल्याला हे काय विपरीत सांगतो आहे याचेच तिला आश्चर्य वाटत होते.

“ये बाई… गुमान सांगितलं त्ये कर… न्हाई त माह्याशी गाठ हाय…” आम्माचा तीक्ष्ण स्वर वातावरणात घुमला.

“आवं पर…” हौसानं बोलण्याचा प्रयत्न केला पण आम्माची नजर तिच्याकडे वळली आणि तिची पाचावर धारण बसली.

“नाई… म्या नाय असं काई करनार…” एक रागीट कटाक्ष किसनकडे टाकत काशीबाई म्हणाली मात्र आणि आम्माच्या साथीदारांनी मोर्चा सांभाळला.

“ये पोरां… बघतूस काय? बांध यांचे हातपाय… आता जास उशीर करून चालायचं नाय. येळ निघून ग्येली त या चेटकिनींची ताकत वाढल आन मंग तुलाच काय पन समद्या गावाला ह्या खाऊन टाकतीन…” आम्माचा आवाज आला आणि किसन हातात दोर घेऊन पुढं झाला. आता कुठे दोघींच्या डोक्यात प्रकाश पडला. आपल्या पोटच्या पोरानं आपल्याला बळी देण्यासाठी इथे फसवून आणले आहे ही गोष्टच काशीबाईच्या पायाखालची जमीन सरकवून गेली.

“ये भाड्या… सोताच्या आई भैनीचा जीव घ्याया निगाला व्हय रं… लई वाट्टूळं व्हयील तुजं…” हौसाच्या डोळ्यात रक्त उतरले होते. पण आम्माच्या एका साथीदारांनं तिला जखडून ठेवल्यामुळे ती काहीही करू शकत नव्हती.

“पोरां… पैले हिलाच बांध… आन तोंड आवळ तिचं…” आम्माने बसल्या जागेवरूनच हुकुम सोडला आणि किसनने आपला मोर्चा हौसाकडं वळवला. हौसाने जीवाच्या आकांताने प्रतिकार केला पण दोन पाशवी माणसांपुढे तिचे प्रयत्न तोकडे पडले आणि काही वेळातच तिचे हात पाय आणि तोंड आवळण्यात आले.

“द्येवा… अशा पोराला जलम देन्याआदीच मला का नाई उठीवलं? ज्याला मी जलम दिला त्यो मानुस न्हाई… याच्यापरीस राक्षस बरे… त्यांनी समद्यास्नी तरास दिला… पन सोताच्या आईचा जीव घ्येतला असं नाई ऐकलं कुटं !!!” काशीबाईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. पण किसन माणसात होताच कुठे? जी गत हौसाची झाली तीच गत काशीबाईची झाली.

क्रमशःजागर भाग ६,जागर भाग ६.

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a comment