जागर भाग ७

जागर भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

जागर भाग ७ –

रमेशला जावून जवळपास तीन तास झाले होते. पूजा संपत आली होती. काशीबाई आणि हौसा यांचे हातपाय बांधण्यात आले. त्यांना त्यांचे मरण अगदी समोर दिसत होते. ज्या मुलाला आपण जन्म दिला त्याच मुलाच्या हातून आपले मरण आहे असे समजल्यावर काशीबाईची अवस्था तर अगदी बिकट झाली. काही वेळातच सूर्यास्त होणार होता आणि त्या बरोबर काशीबाई अन हौसा यांच्या जीवनाचा सूर्यही मावळणार होता. आम्माचे मंत्र आता मोठमोठ्याने सुरु झाले. किसनचे एक मन त्याला अजूनही माघार घेण्याबद्दल सांगत होते. आम्माची मदतनीस भेदरलेली दिसत होती तर उरलेले दोन पुरुष मधूनच उठून कुणी येत नाही ना याबद्दल चहुबाजूला नजर ठेवत होते. जसजसा वेळ पुढे पुढे सरकत होता तसतशी दोन निष्पाप स्त्रियांच्या जीवनाची दोरी लहान होत होती. आता मात्र स्वामींना समोर येणे भाग होते.(जागर भाग ७)

“थांबा… बंद करा हा खेळ…” स्वामींचा आवाज वातावरणात घुमला. सगळ्यांनी चमकून आवाजाच्या दिशेने पाहिले. काही अंतरावर स्वामी उभे होते. मध्येच हा कोण जोगडा आपल्या साधनेत विघ्न आणायला आला हे पाहून आम्मा भडकली.

“जोगड्या… आमच्या मधी येवू नगंस. फुकाचा मरशीन…” आम्मा कडाडली आणि स्वामींच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. हा जोगडा आपल्याला खिजवतो आहे असे वाटून आम्माने आपल्या बरोबर आणलेल्या दोघा व्यक्तींना स्वामींना पकडण्याची आज्ञा केली.

दोघेही स्वामींच्या दिशेने येऊ लागलेले पाहताच स्वामींनी आपल्या झोळीतून विभूती काढली. त्याची चिमुट आकाशाकडे धरून डोळे मिटले. तोंडातल्या तोंडात एक मंत्र पुटपुटला आणि मग त्या चिमटीतली विभूती आपल्या कपाळाला लावून परत डोळे उघडले.

“खबरदार… ज्याला जीव गमवायचा असेल त्यानेच माझ्या अंगाला हात लावा…” स्वामींचे शब्द वातावरणात घुमले मात्र, पुढे येणारे दोघेही जागीच थबकले. तोंडावर इतके तेज असेलला साधू कुणीतरी पोहोचलेला असणार याची जणू त्यांना खात्रीच झाली.

“अरे… बघून काय ऱ्हायले? व्हा पुढं अन पकडा त्याला…” आम्माचा स्वर परत वातावरणात घुमला. काशीबाई आणि हौसाला तर स्वामीजी म्हणजे कुणीतरी देवदूतच असावेत असा भास झाला. किसन मात्र जागेवरच खिळल्यासारखा झाला. आम्माचा आवाज कानी आला पण तिच्या माणसांची पुढे येण्याची काही हिम्मत झाली नाही.

“खबरदार जागचे हलाल तर. गोळी घालीन एकेकाला.” वातावरणात इन्स्पेक्टर रावतेंचा आवाज घुमला. रमेश अगदी वेळेवर पोलिसांना घेवून आला होता. धावत जावून दोघा हवलदारांनी काशीबाई आणि हौसा यांना मोकळे केले. पोलिसांना पाहताच आम्माच्या साथीदारांनी पळायचा प्रयत्न केला पण तेवढ्यात दोन हवलदार पुढे झाले आणि त्यांनी त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या. रावतेंबरोबर आलेल्या महिला पोलिसांनी आम्माला ताब्यात घेतले. एका हवलदाराने किसनच्या मुसक्या आवळल्या.

इतके होईस्तोवर स्वामीही पुढे आले.

“काय चालू होते हे?” रावतेंनी कडक आवाज प्रश्न केला. आम्माची बोलती पूर्णतः बंद झाली होती.

“सायेब… म्या सांगते…” म्हणत हौसा पुढे झाली. तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि राग दोन्ही गोष्टी दिसत होत्या.

“हां… बोला…” काहीशा सौम्यपणे रावतेंनी विचारले.

“ह्यो… माह्यावाला भाऊ… याला मी इतकी वर्स राखी बांधली… अन ह्योच आमच्या जीवावर उटला…” हे बोलत असताना तिचा स्वर अतिशय कडवा झाला होता. बोलता बोलताच ती किसनच्या पुढ्यात गेली आणि तिने त्याच्या गालावर एक सणसणीत चपराक लगावली. तिथे उभ्या असलेल्या महिला हवलदारांनी तिला बाजूला घेतले, पण तिच्या त्या जळजळीत नजरेला नजर देण्याचे धैर्य काही केल्या किसनला झाले नाही. काशीबाईला तर काय बोलावे हेच सुचत नव्हते. ती एका बाजूला डोक्याला हात लावून अश्रू गाळत होती.

“कारे ए XXX, स्वतःच्या आईला आणि बहिणीला बळी द्यायला निघालास?” रावतेंनी आपला मोर्चा किसनकडे वळवला. किसनच्या पुढ्यात येताच रावतेंचा एक जबरदस्त फटका किसनच्या गालावर पडला आणि किसन कोलमडला.

“XXX… चल तुला आता पोलिसी खाक्याच दाखवतो.” म्हणत असतानाच रावतेंची सणसणीत लाथ पडलेल्या किसनच्या पाठीत बसली आणि किसन कळवळला.

““इन्स्पेक्टर… जरा थांबा…” स्वामींचा आवाज आला.

“काय आहे?” रावतेंनी त्यांच्याकडे त्रासिकपणे पहात विचारले. हा जोगडाही यांच्या सारखाच असणार असे त्यांना वाटले.

“इन्स्पेक्टर… अशा घटनेत माणसाला शिक्षा नाही तर समुपदेशन गरजेचे असते. ही माणसे गुन्हेगार नसून फक्त वाट चुकलेले असतात. यांना जर नीट समजावले तर हे नक्कीच सुधारतात. कारण गुन्हेगारी हा यांचा पिंडच नसतो.” सौम्य स्वरात स्वामींनी समजावले.

“आणि ह्या लोकांचं काय?” आम्माकडे बोट दाखवत रावतेंनी रागातच विचारले.

“यांना मात्र शिक्षाच हवी…” एक तुच्छतापूर्ण कटाक्ष आम्माकडे टाकत स्वामीजी उत्तरले.

“इन्स्पेक्टर… तुमची हरकत नसेल तर मी या माणसाशी काही बोलू शकतो का?” स्वामींनी रावतेंना विचारले.

“ठीक आहे… बोला… आम्हालाही याचा जबाब महत्वाचा आहे.” रावतेंनी परवानगी दिली.

“बेटा… ज्या माउलीने तुला हे जग दाखवले तिचाच बळी द्यायला तू कसा तयार झालास?” स्वामींनी किसनला प्रश्न केला. किसन मात्र तोंडातून चकार शब्द काढेना. शेवटी पुढे येत रावतेंनी किसनच्या परत एक सणसणीत चपराक लगावली. त्याच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले.

“ही माही आय नाय… चेटकीन हाय…” त्याने तोंड उघडले. आपल्या आई बद्दलचे हे विचार एकून हौसा भडकली आणि परत एकदा त्याला मारायला धावली पण महिला हवलदारांनी तिला मागे खेचले.

“चेटकीण? तुला कुणी सांगितले हे?” स्वामींनी पुढचा प्रश्न केला आणि मग किसनने आम्माला भेटल्यापासून घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या.

“पाहिलंत इन्स्पेक्टर… या मुलाला शिक्षेच्या आधी शिक्षणाची जास्त गरज आहे.” रावतेंकडे पहात स्वामी उद्गारले आणि त्यांनी परत आपला मोर्चा किसनकडे वळवला.

———————

“अरे मुर्खा… किती ही अंधश्रद्धा? हे असले लोकं तुमच्या अडाणीपणाचा फायदा घेतात आणि त्याची फळे तुम्हाला भोगावी लागतात. या बाईने केलेल्या सगळ्या गोष्टी हातचलाखी होत्या रे. बाजारात असेही पदार्थ मिळतात ते सुरीला लावून लिंबू कापले की रसाचा रंग लाल होतो आणि हे त्याला रक्त म्हणतात. आता तुझ्या बाबतीत ज्याला तू अग्निदेवाचा कौल म्हणतो तीही अशीच एक हातचलाखी. तांदळावर अर्ध्या तोडून खोवलेल्या उदबत्तीच्या मुळाशी चमचाभर पाणी टाकले तर ती फिरतेच. त्याच्यामागे कोणताही चमत्कार नाही. हे तू घरीही करून पाहू शकतोस. बरे ज्याला तू भैरोबाचा कौल मानले ती सुद्धा हातचलाखीच. आडव्या ठेवलेल्या शंखावर कोणत्याही टोकदार वस्तूने दाब दिला तर शंख फिरू लागतो. त्यामागेही कोणताच चमत्कार नाही. हेही तुला घरी करता येईल.” स्वामी बोलत होते आणि किसनला आपल्या कृत्याबद्दल अपराधी वाटू लागले.

“कोणताही देव बळी मागत नाही. आपण बळी द्यायचा असतो तो आपल्या अभिमानाचा, आपल्या स्वार्थाचा. पण आपण बळी देतो प्राण्यांचा. जे पूर्णतः चूक आहे. तुझे मुल दगावले ते कुपोषणाने. तुझेच नाही तर या भागातील अनेकांची मुले अशी कुपोषणाने दगावली आहेत. तुझी बायको गेली ती मुल दगावल्याचा मानसिक धक्का सहन झाला नसेल म्हणून. या भागात फक्त तीनच भुते आहेत. ती भुते म्हणजे अज्ञान, अंधश्रद्धा आणि गरिबी. आणि या भुतांपासून तुम्हाला कोणताच भगत, तांत्रिक, मांत्रिक, स्वामी, बुवा, आम्मा सोडवू शकत नाहीत. तुमचीच मेहनत तुम्हाला या भुतांपासून वाचवू शकते. आणि मला सांग… अशी कोणती आई असेल जी आपल्याच एकुलत्या एक मुलाचा बळी घेईल? तेही आयुष्याच्या संध्याकाळी?” स्वामींनी हा प्रश्न विचारला आणि किसन रडू लागला. आपण भोंदू बाईच्या नादी लागून किती मोठी चूक केली हे त्याच्या चांगलेच लक्षात आले, पण वेळ निघून गेली होती.

“बयी…, बयी म्या चुकलो… म्या पाप केलं… हौशे… लई चुकलं माह्यावालं… देव सुदिक मला माफ करायचा नाई…” आपल्या आईकडे आणि बहिणीकडे हात जोडत किसननं टाहो फोडला.

“बेटा… सावर स्वतःला… अजूनही वेळ गेलेली नाही. देवानं तुला पाप करण्यापासून वाचवलं असं समज आणि केलेल्या कर्माची शिक्षा भोगून परत माणसात ये…” स्वामींनी किसनला समजावलं. नंतर आपला मोर्चा काशीबाई आणि हौसा यांच्याकडे वळवला.

“तुम्ही दोघीही याला माफ करा… एका चुकीला तर देवही माफ करतो… हा फक्त वाट चुकलेला माणूस आहे आणि तो शिक्षा भोगून आल्यानंतर नक्कीच चांगला माणूस म्हणून जगेल याची मला खात्री आहे. देव सगळ्याचं कल्याण करो…”

काही वेळातच सगळ्या आरोपींना घेवून पोलीस निघून गेले. आपल्या मुलाने आपला बळी देण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट काही केल्या काशीबाईच्या डोक्यातून जात नव्हती पण नंतर स्वामींनी त्यांना उपदेश करून घरी पाठवले. सगळ्या गोष्टी आटोपताच रमेश आणि स्वामी पुढच्या प्रवासाला निघाले.

“म्हाराज… ह्या लोकांमधी लैच अंधश्रद्धा हाये…” चालता-चालता रमेश म्हणाला आणि स्वामी त्याच्याकडे पाहून हसले.

“कामून हसू ऱ्हायला तुमी?” रमेशनं गोंधळून विचारलं.

“अरे… त्यांच्यातच नाही तर तुझ्यातही आहेच की अंधश्रद्धा…”

“माह्यामधी? कशी वो?”

“आता हेच पहा ना… माझा वेश पाहिलास आणि मला पावरबाज ठरवून मोकळा झालास. पण खरच माझ्यात तशी शक्ती आहे की नाही हे पाहण्याचा प्रयत्न तरी केलास का? लोकांनी काही म्हटले आणि तू विश्वास ठेवलास. ही देखील अंधश्रद्धाच झाली ना?” हसत-हसत स्वामी म्हणाले.

“हां… असं कसं? म्या पायलं ना… तुमी आदी झोळीतून खाक काढली, मंग मंत्र म्हन्ला अन मंग ती खाक सोताच्या कपाळाला लावली अन मंग म्हन्ले… फुडं आले तर मरश्याल…” रमेशनं पाहिलेली गोष्ट सांगितली आणि स्वामींना परत हसू आले.

“अरे… ते सगळे मी त्यांच्या पासून वाचण्यासाठी केले. ते घाबरावे म्हणून. मी तसे केले नसते तर त्यांनी मला बदडून नसते का काढले?” स्वामींनी हसत सांगितले आणि रमेश विचारात पडला.

“हां… पन…”

“बरे माझ्यात जर तशी शक्ती असती तर मी तुला पोलिसांना बोलवायला कशाला पाठवले असते?”

“हां… ते बी हायेच म्हना…” रमेश डोके खाजवू लागला.

“आता मला सांग… काय ठरवलं आहेस तू? अजूनही माझ्याबरोबर येणार आहेस?” स्वामींनी प्रश्न केला आणि रमेश गोंधळला. काय उत्तर द्यावे हेच त्याला समजेना. या बाबाकडे आपण समजतो तशी शक्ती नाही हे तर नक्की, पण हा बाबा काही भोंदू वाटत नाही हे त्याच्या मनाला जाणवले.

“म्हाराज… मला काय बी समजून नाई ऱ्हायलं. आता तुमीच सांगा काय करायचं त्ये.”

“ठीक आहे. आता त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परत घरी जा. या परिसरातील अज्ञानी लोकांच्या अंधश्रद्धा जमेल तितक्या दूर करायचा प्रयत्न कर. आधी हे तुला अवघड वाटेल पण नंतर हेच कार्य तुझ्या आयुष्याला एक वेगळे वळण लावेल. एक लक्षात ठेव. देव सुद्धा त्यांचीच मदत करतो जे स्वतः प्रयत्न करतात. सगळीकडे पायी फिरून अशा गोष्टी दिसल्या तर त्या रोखणे हे माझे कर्म आहे आणि अंधश्रद्धेचा अंधार दूर करून शिक्षणाचा जागर करणे हे आता तुझे कर्म असेल.”

“समदं खरं हाये तुमचं पन, म्या ना जास शिकेल, ना अडानी, मंग?” रमेश गोंधळाला.

“अरे शिक्षणाचं महत्व सांगण्यासाठी तुम्ही खूप शिकलेले असले पाहिजेत असे कुणी सांगितले? उलट न शिकलेल्या माणसाला काय काय अडचणी येतात हे अनुभवाने माहिती असते. त्यामुळे तो शिक्षणाचे महत्व जास्त चांगल्याप्रकारे लोकांना समजावून सांगू शकतो. आणि ज्ञान तुम्हाला कुठेही मिळू शकते फक्त तुमची ते शिकण्याची इच्छा असली पाहिजे. पूर्वीचे संत शाळेत न जाता देखील ज्ञानी होतेच ना? तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेतून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळतेच, आणि हेच ज्ञान तुम्हाला जास्त उपयोगी पडू शकते. अशा ज्ञानाचा प्रकाशच अंधश्रद्धेच्या अंधाराला दूर करू शकतो. या भागातील अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर झाली तर गरिबी दूर व्हायलाही वेळ लागणार नाही.”

स्वामी बोलत होते आणि रमेश मन लावून ऐकत होता. त्याच्या जगण्याला एक नवीन दिशा मिळत होती. आज खऱ्या अर्थाने त्र्यंबकेश्वर रमेशला भेटला होता.

——— समाप्त ——–

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a comment