इर्षा आणि मत्सराचे मूळ

bhampak-banner

इर्षा आणि मत्सराचे मूळ –

आपल्याला हवी असणारी गोष्ट, आपल्याला न मिळता दुसऱ्याला मिळाली, तर माणसाचे मन उगीचच अस्वस्थ होते. आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी अचूक आणि अथक प्रयत्न करणे गरजेचे असते. यात कुठेतरी आपण कमी पडलो, तर हवे ते मिळत नाही किंवा ते मिळणे लांबणीवर पडते.

आपल्या अगोदर दुसऱ्याला ते मिळाले, तर ते आपल्याला सहन करणे खूप अवघड जाते, ही इर्षा असते. इर्षा मत्सराला जन्म देते आणि जीवनात आपल्याकडून होणारे वाद हे बहुतेक अशा आपणच निर्माण केलेल्या इर्षेतून जन्माला येतात.

आपल्या जीवनात अन्यायाच्या विरोधात सतत आवाज उठत असतो, कधी तो व्यक्त असतो, तर कधी तो अव्यक्त असतो, पण अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला नाही असा एकही जीव नसतो. आपल्यावर झालेला अन्याय आपल्याला कधीच सहन होत नाही आणि तो दाबूनही ठेवता येत नाही, त्याचा उद्रेक आपल्या आचार, विचार आणि देहबोलीतून प्रगट होत असतो. अशी माणसे बंडखोर होतात आणि अशा बंडातून कधी चांगले, तर कधी वाईट, आपल्या वृत्तीनुसार आणि कृतीनुसार परिणाम दिसत असतात.

इर्षा आणि मत्सर यातून निर्माण होणारे वाद, नेहमी द्वेष व कपट अशा विकारांनी भरलेले असतात, त्यामुळे अशा वादाचे परिणाम हे नेहमी भयानक असतात. जीवनात शक्यतो हे वाद टाळणे आपल्या हिताचे असते. सर्वतोपरी प्रयत्न करून आपल्या अंतःकरणात इर्षा व मत्सर निर्माणच होणार नाहीत यासाठी माणसाने नेहमी दक्ष असावे.

वास्तविक माणसाला जगण्यासाठीच्या गरजा खूप मर्यादित आहेत, परंतु त्याला वागण्यासाठीच्या गरजा अमर्याद आहेत.* या अमर्याद गरजाच माणसाच्या जीवनात इर्षा निर्माण करतात. जीवन जितके बहिर्मुखी असेल तितक्या आपल्या गरजा वाढत जातात, तितकीच आपली इर्षा आणि मत्सर वाढत जातो व हेच विकार आपल्या जीवनातील सुख-शांतीला संपवून टाकतात.

आपले जीवन अंतर्मुख असेल, तर आपल्या जीवनातील गरजा आपोआप मर्यादित होतात, खरेतर गरजच शिल्लक राहत नाहीत. जेथे गरज संपते, तेथे स्पर्धा, इर्षा, मत्सर आपोआप नाहीशी होतात. अशा व्यक्तीच्या जीवनातील वाद कायमचा संपतो, उरतो तो फक्त संवाद ! या व्यक्तीसारखा सुखी- समाधानी आणि तृप्त जगात दुसरा माणूस असू शकत नाही. श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत सांगतात, हा माझा सर्वात आवडता भक्त आहे.

सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः l मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ll

हवे ते मिळवण्यासाठी जीवाचे रान करणे, हा संसार आहे आणि मिळवण्याची हावच संपणे, हा परमार्थ आहे. म्हणून तुलना केली असता संसारापेक्षा परमार्थ सोपा आहे, परंतु सहज आणि सोपे स्वीकारणे माणसाला आवडत नाही, अवघड आणि कठीणाच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावून, त्याची प्राप्ती करण्यात माणसाला का आवडते ? हे एक कधीच न उलगडलेले कोडे आहे.

फलकट तो संसार l येथे सार भगवंत ll
ऐसे जागवितो मना l सरसे जनासहीत ll

डॉ आसबे ल.म.

Leave a comment