कापालिक भाग १.
रोज पेक्षा आज स्मशानात जरा जास्तच वर्दळ होती. एरवी संध्याकाळी साडेसात आठ वाजता निर्मनुष्य होणारा स्मशानाचा परिसर रात्रीचे साडेदहा वाजूनही माणसांनी गजबजलेला होता. त्याला कारणही तसेच घडले होते. गावातील पाटलाची सून एकाएकी गेली होती. आणि त्याच कारणाने सगळे स्मशानात जमले होते. काहींच्या मते पाटलानेच सुनेला मुलगा देत नाही म्हणून मारले होते, तर काहीच्या मते एवढ्यात मुल नको म्हणून सुनेने कसलासा काढा घेतला आणि त्याचे विष तयार होऊन तिला जीवाला मुकावे लागले होते. तर काहींच्या मते अघोरी सिद्धी प्राप्त व्हाव्यात यासाठी तिचा बळी देण्यात आला होता.(कापालिक भाग १)
सतरा जणांची सतरा मते. पाटीलही तिच्या अशा अचानक जाण्याने हबकले होते. पण आपणच खचलो असे दिसले तर मुलाला धीर कोण देणार? हा विचार करून ते कसेतरी स्वतःला सावरून मुलाला धीर देत होते. चितेची सगळी तयारी झाल्यावर अग्नी देण्याची वेळ आली. पाटलाच्या मुलाचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते. पण हे कर्तव्यही पार पाडणे गरजेचेच होते. रात्रीची वेळ असल्यामुळे मंत्राग्नी ऐवजी भडाग्नी देण्यात येणार होता. शेवटी स्वतःवर ताबा मिळवत त्याने थबथबल्या डोळ्यांनी चितेला अग्नी दिला आणि चितेने धडधडत पेट घेतला. जसजसा अग्नीचा भडका वाढू लागला, तसतसे लोकं पाटलाला आणि पाटलाच्या मुलाला सांत्वना देत काढता पाय घेऊ लागले. अर्थात थंडीचे दिवस असल्यामुळे ते योग्यही होते. तसेही तिथे उभे राहून काहीच उपयोग नाही असे वाटल्याने पाटीलही मुलाला घेवून घरी निघाले. जवळपास १५/२० मिनिटानंतर जवळपास सगळीच मंडळी साश्रू नयनाने घरच्या वाटेला लागली.
या सगळ्या गोष्टी लांब उभा राहून कापालिक पहात होता. त्याच्या मनात अघोरी विचार उमटत होते, आणि ते पूर्ण करून घेण्यासाठी त्याला तिथे उभे राहणे गरजेचेच होते. पाटलाच्या घरची सगळी मंडळी स्मशानाच्या दारातून बाहेर पडली आणि कापालिक हळूहळू अंधाराचा आडोसा घेत चितेकडे सरकू लागला. खरं तर त्याला घाई करावी लागणार होती, पण कुणी पाहिले तर सगळ्या गोष्टीवर पाणी फिरेल या एका विचाराने तो आपले प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलत होता. जसजसा माणसांचा आवाज दूरदूर जाऊ लागला तसतसा कापालिक चितेच्या जवळ येऊ लागला. आता त्याला चितेच्या झळया चांगल्याच जाणवू लागल्या. इतका वेळ अंधारात गुप्त झालेली कापालिकाची आकृती चितेच्या उजेडात उठून दिसू लागली.
अंगात काळ्या रंगाचा पायघोळ, त्यावर पोवळ्यांच्या, रुद्राक्षांच्या आणि कवड्यांच्या माळा, सहा साडेसहा फुट उंची असलेली आडदांड शरीरयष्टी, काळे कुळकुळीत केस, गडद काळा रंग, कपाळाला काळा टिळा, मोठे आणि लालसर डोळे, खांद्याला काळ्याच कापडाची झोळी आणि एका हातात लोखंडाचा चिमटा असा कापालिक चितेच्या लालसरपिवळ्या प्रकाशात अगदी भेसूर वाटत होता. एखाद्याने कापालिकाला त्याठिकाणी असे पाहिले असते तर नक्कीच तो एखादा राक्षस पाहतोय असे वाटून भोवळ येवून पडला असता. क्षणाचाही विलंब न करता कापालिकाने हातातील चिमटा चितेत खुपसला. खरे तर सामान्य माणसाला अशा धडधडत्या चितेच्या इतके जवळ जाणे सहन होत नाही, पण कापालिकाच्या चेहऱ्यावर उष्णतेचा त्रास होणारे कोणतेच भाव नव्हते. काही पळातच त्याने चितेची लाकडे पलीकडील बाजूला लोटली आणि तोंडाने कसलासा मंत्र पुटपुटत त्याने ते अर्धवट जळालेले प्रेत ओढून बाहेर काढले. प्रेताचे केस पूर्ण जळाले होते, काही ठिकाणी त्वचा भाजून हाडांना चिकटली होती. चिमटयाच्या साह्यानेच प्रथम त्याने प्रेताची कवटी व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली आणि त्याच्या चेहऱ्यावर अघोरी हास्य उमटले.
तसा आता तिथे इतर कुणी माणूस येईल याची शक्यताच नसल्यामुळे त्याने आपला वेग थोडा मंदावला. चितेच्या त्या प्रकाशात अर्धवट जळलेले ते प्रेत महा भयानक दिसत होते. चुलीत भाजलेले भरताचे वांगे जसे नंतर लिबलिबीत होते अगदी तशीच त्या प्रेताची अवस्था झाली होती. कापालीकाने परत एकदा सगळीकडचा कानोसा घेतला आणि आपल्या झोळीत हात घातला. त्याचा हात झोळीतून बाहेर आला तेंव्हा त्याच्या हातात कसलीशी बाटली होती. त्याने ती बाटली डाव्या हातात घेवून त्यातील द्रव उजव्या हाताच्या ओंजळीत घेतले. एरवी लाल असणारे ते रक्त आता बरेचसे काळपट पडले होते. हातातील बाटली खाली ठेवून त्याने एकदा हातातील रक्तावर नजर टाकली आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली.
मंत्र पूर्ण होताच त्याने ते रक्त त्या प्रेतावर डोक्याकडून पायाकडे सडा शिंपडावा तसे तीन वेळेस शिंपडले आणि नवीन अघोरी मंत्र पुटपुटत झोळीतून धारदार सुरा बाहेर काढला. सुऱ्याचे पाते त्या चितेच्या प्रकाशात लक्ख चकाकत होते. नंतर त्याने प्रेताच्या हनुवटी पासून चार बोटांचे अंतर मोजले आणि सुरा असलेला हात हवेत उचलला गेला. या वेळेस त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या असुरी भावात कुठेच कमतरता नव्हती. त्याचा हात खाली आला त्यावेळेस प्रेताचे शीर धडापासून एक फुट अंतरावर वेगळे होऊन पडले होते. अतिशय बीभत्स असे ते कृत्य कापालिकासाठी अगदीच किरकोळ होते. त्यानंतर त्याने ते शीर विरहित धड परत अर्धवट विझत चाललेल्या चितेवर टाकले आणि मातीत पडलेले शीर थंड झाल्याची खात्री करून आपल्या झोळीत टाकले. आपल्या कार्यात कुठलेच विघ्न आले नाही हे पाहून त्याचा चेहरा अघोरी समाधानाने फुलला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेतल्या आहेत याची खात्री करून, काहीसा अट्टाहास करीत तो लांब टांगा टाकत अंधारात गायब झाला.
क्रमशः कापालिक भाग १.
मिलिंद जोशी, नाशिक…