कापालिक भाग १३

कापालिक भाग १,2,३,४,५,६,७,८,९,१०,११

कापालिक भाग १३ –

आता मात्र सगळ्यांना आदिनाथ हा एकच तारणहार वाटू लागला. सगळे त्या खोलीतून बाहेर येतात न येतात तोच सूर्याचे ऊन जास्तच कडक भासू लागले. प्रत्येकाच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. क्षणापूर्वी पडलेल्या गारांच्या पावसाने ओले झालेले गवत क्षणार्धात कोरडे झाले. साचलेल्या पाण्याची वाफ होऊ लागली आणि हळूहळू आता आजूबाजूची झाडे कोमेजून जाऊ लागली. उन्हाचा उकाडा इतका असह्य झाला की प्रत्येकाच्या अंगाची आग आग होऊ लागली. कुणीतरी आपल्याला जिंवत जाळतो आहे असा प्रत्येकाला भास होऊ लागला. आदिनाथाने काही सांगायच्या आधीच सगळ्यांनी परत एकदा पडक्या वाड्याच्या खोलीचा आसरा घेतला. बाहेरचे वातावरण एकदम बदलले होते. गवताने आपोआप पेट घेतला होता. सगळीकडे आगीचे तांडव दिसत होते. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त आगीच्या ज्वाळाच काय त्या दिसत होत्या. हळूहळू ती आग आता वाड्याच्या दिशेने पसरू लागली. प्रत्येकाला आपल्या अंगावरील कपडेही नकोसे वाटू लागले. सगळेजण हाताने, कापडाने पंखा हलवून वारे घेण्याचा प्रयत्न करत होते, पण येणारे वारेही पूर्णतः गरम होते. इतक्या आगीत होणारी जीवाची उलघाल कुणालाच सहन होत नव्हती.(कापालिक भाग १३)

बाहेर दिसणारा डोंगर पूर्ण आगीने पेटलेला दिसत होता. सगळ्यांनी वणवा पेटणे म्हणजे काय हे ऐकले होते, काहींनी पाहिलेही होते, पण पेटलेल्या वणव्यात अडकलेल्या जीवांचे काय हाल होतात हे मात्र सगळेजण पहिल्यांदाच अनुभवत होते. सगळे जण असे वेगवेगळे विचार करत असताना मात्र आदिनाथ झोळीतील विभूती दोन बोटांच्या चिमटीत धरून मंत्र म्हणण्यात मग्न होता. खरं तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत देखील तो इतका स्थितप्रज्ञ कसा राहू शकतो याचेच आहिरेंना आश्चर्य वाटत होते. काही वेळा नंतर परत एकदा वातावरणात आदिनाथाचा आवाज घुमला. वातावरणात अलख जागवला गेला आणि हवेतील उकाडा एकदम कमी झाला.

जसजसे एकेक अडथळे येत होते तसतसा संगीताच्या आईचा धीर सुटत चालला.

“स्वामीजी… वाचेल ना हो माझी मुलगी? तुम्हीच आता तिचे तारणहार. तिला वाचवा हो…” संगीताच्या आईने अगदी दीनवाणीने आदिनाथाला साकडे घातले.

“काळजी करू नको माई… माझ्या जीवात जीव असे पर्यंत तुझ्या मुलीला मी काहीही होऊ देणार नाही. विश्वास ठेव. तुझी गुरुदेवांवरील श्रद्धाच तुझ्या मुलीचे सुरक्षा कवच आहे हे विसरू नकोस…” आदिनाथाने धीर देण्याचा प्रयत्न केला.

संगीताच्या आईचे ते शब्द ऐकून सब. इन्स्पेक्टर आहिरेच काय तर इतर हावलदारांच्या ही पोटात गलबलून आले. आहिरेंनी आतापर्यंत जरी अनेक केसेस पहिल्या होत्या तरी अशा पद्धतीची ही पहिलीच केस होती. इथे त्यांची सगळी हुशारी, धाडसी वृत्ती आणि सहनशक्ती या सगळ्यांचाच थिटेपणा त्यांच्या लक्षात आला होता. माणूस सगळ्या गोष्टींचा सामना करतो, पण जर अमानवीय गोष्टी घडायला लागल्या तर मात्र तो हतबल होतो. त्याचाच प्रत्यय सगळे घेत होते.

आता अजून कोणते नवीन संकट येते याचा विचार सगळे करत असतानाच एकाएकी पायाखालची जमीन हादरायला सुरुवात झाली. वाड्याच्या इतक्या जाड भिंती पण त्याचे दगडही एकेक करून निखळू लागले. आता इथे थांबलो तर सगळ्यांचा कपाळमोक्ष होणार यात काहीच संशय उरला नाही. त्यामुळे सगळे पटापट पटांगणात आले. डोंगराच्या बाजूने देखील एकेक दगड खाली घरंगळत येऊ लागले. इतकी जाड किल्ल्याची तटबंदी पण त्यालाही चिरा जाऊ लागल्या. परत एकदा सगळ्यांनी आशेने आदिनाथाकडे पाहिले. आदिनाथाच्या चेहऱ्यावर जरा देखील काळजीचे भाव नव्हते. त्यांने परत एकदा गुरुदेवांचे स्मरण केले आणि मंत्र जागवला. क्षणार्धात हलणारी पृथ्वी पूर्वपदावर आली. सगळीकडे शांतता पसरली आणि सगळयांनी परत एकदा सुटकेचा निश्वास सोडला.

सगळ्यांचे जरी चेहरे खुलले होते तरी त्याच्या विपरीत आदिनाथाच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली होती. आता पर्यंत त्याने वायू, आप, तेज आणि पृथ्वी या तत्वांवर जय मिळवला होता, पण उरलेले पाचवे तत्व आकाश. यावर जय मिळवणे मात्र अवघड काम होते. याचे मुख्य कारण म्हणजे ज्या चार तत्वांवर त्याने जय मिळवला होता त्या सगळ्यांचे एक अस्तित्व होते. त्यांना जसा उगम होता तसाच अंतही होता. पण आकाश हे तत्व मात्र असे होते कि ज्याला उमग नाही आणि अंतही नाही. जिथे फक्त शून्य आहे. ज्याचे अस्तित्व सगळीकडे असूनही कुठेच नाही. ज्याचे अस्तित्वचं नाही त्यावर जय मिळवायचा हे त्याच्या शक्तीच्या बाहेरचे काम होते. आणि लवकरच त्याला त्याचा प्रत्यय येण्यास सुरुवात झाली. त्याच्या बरोबरचे सगळे लोकं हळूहळू विस्मरणात जाऊ लागले. त्याला सुद्धा आता त्याचे मंत्र नीटसे आठवेनात. कुणीच कुणाला ओळखेनासे झाले आणि त्याने मोठ्याने गुरुदेवांना हाक मारली.

लांबून आदिनाथाला एक व्यक्ती येताना दिसली. डोक्याला भले मोठे पागोटे, अंगात बंडी, दुटांगी धोतर नेसलेली आणि हातात एक काठी घेतलेला शेतकरी आदिनाथाजवळ आला आणि येताच त्याने आदिनाथाला विचारले.

“तू कोण? तुझा परिचय काय? कुठून आलास आणि कुठे चाललास?”

आदिनाथाला आता डोक्याला खूप ताण द्यावा लागत होता. त्याला कोणत्याच गोष्टी काही केल्या आठवेनात. त्याच्यावर आता आकाश तत्वाने आपला प्रभाव टाकायला सुरुवात केली होती. शेवटी कसे तरी करून त्याने गुरुदेवांचे स्मरण केले आणि त्या आलेल्या शेतकऱ्याला उत्तर दिले.

“मी ही तूच, आणि तूच माझा परिचय, मी तुझ्याकडूनच आलो आणि तुझ्याकडेच निघालो आहे.” आदिनाथाच्या उत्तराने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक स्मित उमटले.”

“म्हणजे तू शून्य आहेस तर…”

“हो… मी शून्यच आहे. माझे स्वःत्व मी केव्हांच तुझ्यात मिसळले आहे. आता मी असून नसून सारखाच…”

आदिनाथाचे हे उत्तर त्याच्या मुखातून बाहेर पडले मात्र आणि आता त्याला एकेक गोष्टी आठवू लागल्या. त्याचे सगळे मंत्रही त्याला आठवू लागले. इतर मात्र अजूनही आपण कोण आणि आपण इथे कशासाठी आलो आहोत हे सगळे विसरून भ्रमिष्ट बनलेले होते.

“आदिनाथा… अरे आकाश तत्व म्हणजे शून्य. कोणतीच गोष्ट नसणे. कोणतेच अस्तित्व नसलेले ठिकाण आणि त्यावर जय मिळवायचा तर माणसाला स्वतःचे अस्तित्व सोडावे लागते. जर तू तुझा परिचय आदिनाथ असा करून दिला असतास तर मात्र तुला आकाश तत्वावर कधीच विजय मिळवता आला नसता. भौतिक जगात “मी” महत्वाचा आणि आध्यात्मिक जगात “तू” महत्वाचा. ज्या वेळेस तुम्ही “मी” चा त्याग करतात त्याच वेळेस तुम्ही आणि परमात्मा यांच्यातील द्वैत भाव जाऊन त्यांच्यात अद्वैत भाव प्रकट होतो आणि हेच तुला आता पुढील जीवनात सर्वात उपयोगी पडणार आहे. एका परीक्षेत तर तू पास झालास अजून एका परीक्षेत तू पास झालास तर तुला तुझ्या जीवनाचे ध्येय सांगितले जाईल.”

आदिनाथ फक्त हात जोडून ऐकत होता. शेतकऱ्याने सगळ्यांच्या चेहऱ्यासमोरून हात फिरवला मात्र आणि सगळ्यांना आता ते कोण आहेत, का आले आहेत या सर्व गोष्टी आठवू लागल्या. तेवढ्या वेळात तो शेतकरी झपझप पावले टाकत नाहीसाही झाला होता.

कापालिकाने इकडे मुख्य पुजेची तयारी सुरु केली. कितीही मोठा योगी असला तरी पंचतत्वांवर विजय मिळवणे शक्य नाही हेच तो समजून चालला होता. बळी द्यायचा तरी तो एका विशिष्ट पद्धतीनेच द्यावा लागणार होता. आणि त्याचीच सगळी तयारी करण्यात तो गढून गेला होता. कापालिकाच्या चेहऱ्यावरील संताप बराच कमी झाल्यामुळे संगीताच्या शरीरातील हडळीने परत किंचाळायला आणि वर खाली होण्याचा खेळ खेळायला सुरुवात केली होती. तसेही कापलिकाला आता तिच्याकडे लक्ष द्यायला वेळच होताच कुठे?

एकाएकी दालनाचा दरवाजा उघडला गेला आणि आदिनाथासह पोलीस आणि संगीताचे आईवडील तिथे येवून पोहोचले.

दालनात खूपच अंधुक प्रकाश असल्यामुळे ते दालन आहे त्यापेक्षा जास्त मोठे वाटत होते. कापालिकाचे ते तळघर, ती देवीची मूर्ती, मांडलेली पूजा, एका बाजूला ठेवलेले ते खड्ग आणि वरखाली झोके घेणारी, अगदी पंढरी फटक पडलेली संगीता यांच्याकडे पाहून सगळ्यांचेच धाबे दणाणले. संगीताची आई जोरात “संगीता…” म्हणत तिच्याकडे धावली आणि जेव्हा तिची नजर संगीताच्या नजरेला भिडली त्याबरोबर ती घाबरून चार पावले मागे सरली. तिचे ते घाबरणे संगीताच्या शरीरात बंदिस्त झालेल्या हडळीला खूप छान वाटले आणि तिने एक विकट हास्य केले.

“कापालिका… थांबव तुझे अघोरी कृत्य, मी तुला आदेश देतो आहे” आदिनाथाचा स्वर दालनात घुमला. आदिनाथाच्या या आदेशाने कापालिक उभा पेटला.

“जोगड्या… तू कोण मला आदेश देणारा… बऱ्या बोलानं इथनं निघून जा. माझ्या मार्गात येशील तर फुका प्राणाला मुकशील.” दातओठ खात कापालिक ओरडला.

“हरामखोरा… तुझी नाटकं लगेच बंद कर, नाहीतर परिणाम वाईट होतील.” कापालिकावर पिस्तुल ताणत आहिरे ओरडले.

“ए…. गप बस शिपूरड्या… तुझे ते खेळणे मला काहीही करू शकणार नाही. पाहिजे तर प्रयत्न करून पहा.” अगदी तुच्छतेने आहीरेंकडे पहात कापालिक ओरडला.

कापालिकाचे असे शब्द ऐकून आहीरेंचा राग अनावर झाला आणि त्यांनी कापालिकाच्या दिशेने पिस्तुल झाडले. पण गोळी कापालिकापासून थोड्या अंतरावर थोडी थांबली आणि खाली पडली. खरं तर आहिरे त्यामानाने कोणताच निर्णय असा तडकाफडकी घेणाऱ्यातील नव्हते, त्यामुळे त्यांचे कापालिकावर गोळी झाडणे हे त्यांच्या बरोबर नेहमी राहणाऱ्या सावंतला देखील कुठेतरी खटकले. आपला आपल्या मनावरील ताबा इतका कसा ढासळला ह्याचे नवल आहिरेंनाही वाटत होते. पण आपण झाडलेल्या गोळीचा कोणताच परिणाम कापालिकावर झाला नाही ही गोष्ट त्यांना सगळ्यात जास्त अचंब्यात टाकत होती.

परत एकदा आदिनाथचा आवाज घुमला…

“कापालिका… अजूनही वेळ गेलेली नाही… तुझे उद्योग थांबव.”

“अरे हट… मी तुझ्या बोलण्याला भिक घालत नाही.” असे बोलून त्याने हातात काळी हळद घेतली आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत आदिनाथाच्या दिशेने फुंकली. आता आदिनाथ जागचा हलू शकणार नाही असेच कापालिकाला वाटत होते, पण आदिनाथावर मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. परत त्याने दुसरा मंत्र म्हणत अशीच पूड पुन्हा एकदा आदिनाथाच्या दिशेने फुंकली आणि तीही आदिनाथावर निष्प्रभ ठरली. आता मात्र कापालिक पुरता चवताळला आणि बाजूला ठेवलेले खड्ग घेवून आदिनाथावर धावून गेला. तेवढ्यात आदिनाथाने स्तंभन मंत्राचा प्रयोग करत कापालिकाला जगाच्या जागी खिळवून ठेवले. कापालिकाचे हातपाय आता जडावल्या सारखे झाले. धरती मातेने आपले पाय धरून ठेवले आहेत असा त्याला भास होऊ लागला.

“जोगड्या… तुला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.” आता मात्र कापलीकाच्या डोळ्यातून अंगारे बाहेर पडत होते. कापालिकाची ही स्थिती पाहून सगळेच अवाक झाले होते. कापालिकाने तेवढ्यात कालिकेचा जयजयकार केला आणि आदिनाथाने केलेल्या स्तंभनातून स्वतःची मुक्तता करून घेतली. कापालिकाने मोकळे झाल्या बरोबर हातातील खड्ग आदिनाथाच्या दिशेने भिरकावले पण आदिनाथाचा अलख सगळ्या दालनात घुमला आणि त्याचाकडे येणारे खड्ग जगाच्या जागी थांबले. आता मात्र कापालिकाला बांधणे गरजेचे होते. आदिनाथाने झोळीत हात घातला, झोळीतून चिमुटभर भस्म बाहेर काढले आणि “आदेश” म्हणत कापालिकाच्या दिशेने फुंकले. कापालिक पुन्हा एकदा बांधल्या सारखा झाला. पण आता त्यातून मुक्त होण्याचा कोणताच मंत्र त्याला काही केल्या आठवेना. त्याच्यातील सगळ्या शक्ती लोप पावल्या होत्या आणि चरफडण्याखेरीज इतर काहीच त्याला करता येत नव्हते.

“कापालिका… मुक्तीच्या मार्गातील सगळ्यात मोठा अडसर म्हणजे सिद्धी मिळणे. तू तुझ्या साधनेने तिथपर्यंत पोहोचलास पण सिद्धी मिळताच अहंकारी झालास. याच अहंकारामुळे तू पथभ्रष्ट झालास. या सिद्धींचा वापर जर तू लोकं कल्याणासाठी केला असतास, तर तुझे खरे कल्याण झाले असते. पण तू त्याचा वापर भौतिक जगातील स्वतःच्या स्वार्थासाठी केलास. तुला जगातील सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती व्हायचे होते. पण आज तू शक्तिहीन झाला आहेस. स्वतःच्या इच्छेने तू एक पाऊल देखील टाकू शकत नाहीस. पृथ्वीवर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही मर्यादा असतात, काही मर्यादा पाळाव्या लागतात. पण तू मात्र त्या सगळ्या गोष्टी आपल्या सिद्धीच्या अहंकारात पायदळी तुडवल्यास. प्रत्यक्ष भगवंतांनी अवतार घेतल्या नंतर त्यांनाही मरण चुकले नाही तर ते तुला चुकेल असे तू समजलासच कसे? तुझ्या ह्या कृत्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. पण तो अधिकार माझा नाही. पोलीसच तुला ती शिक्षा देतील. त्यानंतर तू ज्यावेळेस शिक्षा भोगून परत येशील त्यावेळेस तुला तुझ्या सिद्धी काही प्रमाणात परत मिळतील. पण त्याचा वापर तू फक्त इतरांसाठीच करू शकशील. स्वतःसाठी तुला तो कधीच करता येणार नाही. आणखी एक… अजूनही वेळ गेलेली नाही. लोकंकल्याण करून स्वतःचे कल्याण साधून घे.” कापालिक फक्त चरफडत आदिनाथाकडे पाहण्यावाचून काहीच करू शकत नव्हता.

“इन्स्पेक्टर… कापालिकाला ताब्यात घ्या. आता तो काहीच करू शकणार नाही.”

“चल… तुला आता पोलिसी खाक्या दाखवतो मी…” आहिरेंनी पुढे होऊन कापालिकाच्या हातात बेड्या घातल्या. त्याला हावलदारांच्या स्वाधीन करून ते आदिनाथाकडे वळले.

“स्वामीजी… मला एक प्रश्न पडला आहे. पण विचारावे की नाही हेच समजत नाहीये…” काहीसे घोटाळत ते आदिनाथाला म्हणाले.

“मला माहिती आहे इन्स्पेक्टर… तुम्ही मला काय विचारणार आहात ते… हेच ना… एरवी अपराध्याच्या अंगावर हात टाकतानाही दहा वेळेस विचार करणारे तुम्ही, एकदम कापालिकावर पिस्तुल कसे चालवले?”

“हो… हो… हाच प्रश्न मला सतावतो आहे.” काहीसे अधीर होत आहिरे म्हणाले.

“त्याचे कारण म्हणजे सध्या या जागेवर असुरी शक्तींचा प्रभाव आहे, त्यामुळे तुमच्यातील राग, द्वेष हे तामस गुण लगेच उफाळून आले. माणसातील अशा गुणांवर नियंत्रण ठेवण्याचेच काम दैवी शक्ती करत असतात.” हे संभाषण चालू असेपर्यंत सगळ्या हावलदारांनी कापालिकाच्या मुसक्या बांधल्या थोड्या अंतरावर संगीताच्या शरीरात बंधन केलेली हडळ थरथरत उभी होती. कापालिकाला पोलीस घेवून जात आहेत हे पाहून ती जवळजवळ ओरडलीच…

“कापालिका… मला मुक्त कर…”

“तो आता स्वतःला मुक्त करू शकत नाही, तुला काय मुक्त करणार?” हावलदार सावंत बेफिकीरीने म्हणाला आणि संगीताच्या आईने पुन्हा एकदा आदिनाथाचे पाय पकडले.

“स्वामीजी… माझ्या मुलीला वाचवा हो.”

“उठ माई. काळजी करू नकोस. गुरुदेव दत्ताचे आशिर्वाद आहेत हिच्या पाठीशी.”

नंतर आदिनाथाने संगीताकडे एकवार पाहिले, झोळीतून चिमुटभर भस्म बाहेर काढले आणि मंत्र म्हणत संगीताच्या दिशेने फुंकले मात्र आणि संगीताच्या शरीरात बंदिस्त असलेले वासनाशरीर बाहेर पडले. त्याबरोबर संगीता भोवळ येऊन खाली पडली. संगीताची आई आणि वडील धावतच संगीताजवळ पोहोचले.

ते वासनाशरीर आता सगळ्यांना दिसत होते.

“स्वामी… माझ्यावर कृपा करा. मलाही या पीडेतून सोडवा…” आदिनाथाकडे पहात ते वासना शरीर उद्गारले. परत एकदा आदिनाथाने गुरुदेवांचे स्मरण केले आणि कसलासा मंत्र म्हटला. त्यानंतर तो त्या वासनाशरीराला उद्देशून म्हटला…

“जा आता… गुरुदेवांच्या आदेशाने मी तुला पुढची गती देतो आहे.” आदिनाथाचे वाक्य पूर्ण होते न होते तोच हळूहळू वासनाशरीराचे अस्तित्व संपुष्टात येऊ लागले आणि काहीवेळाने ते पूर्णपणे दिसेनासे झाले. आदिनाथाने एकदा त्या तळघरातील कालिकेच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार केला आणि सगळे जण तिथून बाहेर पडले.

तळघरातून बाहेर येताच सगळ्यांनी आदिनाथाचे आभार मानले. माचीपर्यंत सगळे बरोबरच होते पण नंतर सगळे ओतुरकडील रस्त्याला लागले. आदिनाथ मात्र सरळच चालत राहिला. इखाऱ्याच्या दिशेने. थोड्याच अंतरावर त्याला परत त्याच्या गुरुदेवांचे शेतकऱ्याच्या रुपात दर्शन झाले. आदिनाथाने लगेच पुढे जावून त्यांच्या पायावर डोके ठेवले.

“उठ आदिनाथा!!! या परीक्षेतही तू पास झालास. कापालिकाला शिक्षा करणे तुला बिलकुल कठीण नव्हते, पण तरीही तू मनात आकस न धरता करुणा ठेवलीस आणि त्याची शक्ती त्याने इतरांना त्रास देण्यासाठी वापरू नये इतकीच तजवीज करून बाकी सगळे त्या परमेश्वरावर सोडलेस. तुला हिच गोष्ट यापुढेही करायची आहे. जे जे संकटात असतील त्यांना त्यातून सोडवणे हेच तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट आहे… जा तुझे कल्याण होईल…”

“जशी आज्ञा गुरुदेव… आदेश…” इतके बोलून आदिनाथाने गुरुदेवांना प्रणाम केला आणि तो पुढच्या प्रवासाला लागला.

***** समाप्त… *****

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a comment