कर हर मैदान फतेह

By Bhampak Book Review Sunil Shedage 2 Min Read
कर हर मैदान फतेह

कर हर मैदान फतेह –

‘कर हर मैदान फतेह’ हे मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांचं नवं पुस्तक. परवा प्रजासत्ताकदिनी ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’तर्फे हे पुस्तक प्रकाशित झालं. योगायोग म्हणजे साताऱ्यातील नगरवाचनालयाच्या पाठक हाॅलमध्ये सध्या मेहता हाऊसचं पुस्तक प्रदर्शन सुरु आहे. त्यातून या पुस्तकाची नवीकोरी प्रत अगदी दोन दिवसांत माझ्या हाती आली. दोन-चार बैठकांत ती वाचून पुरी झाली.

विश्वास नांगरे- पाटील हे युवावर्गाचे आयडाॅल. तरुणांचे रोल माॅडेल. सकल जनांचे प्रेरणास्थान. त्यांचं ‘मन में है विश्वास’ हे पहिलं पुस्तकही विलक्षण गाजलं. लाॅकडाउन काळात मी सलग 50 दिवस भावलेल्या पुस्तकांविषयी लिहिलं. त्यात ‘मन में है’ हेदेखील होतं. बहुतेकांना ते स्मरत असेलच.

‘कर हर मैदान फतेह’ हा जणू ‘मन में है’चा पुढचा भाग असावा. मागील पान उलटत आपण पुढच्या पानावर जात आहोत, इतकी सलगता आपल्याला त्यात जाणवत राहते. प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर पुढचा जीवनप्रवास या पुस्तकात रेखाटला आहे. तो रंजक अन् वाचनीय आहे. विशेषतः युवावर्गासाठी प्रेरणादायी आहे. अर्थात केवळ स्पर्धा परीक्षेची स्वप्नं पाहणाऱ्या युवकांपुरतं हे पुस्तक मर्यादित नाही. माणसाचं जगणं, त्यातील चढउतार, ताणतणाव, व्यक्तिमत्त्व, त्याचा विकास अशा कितीतरी गोष्टींना ते स्पर्श करतं.

त्यातून वाचकाच्या जगण्याचा अवकाशही समृद्ध बनतो. त्याला समृद्ध बनवितो.

मसुरीच्या ‘लबास्ना’मधलं खडतर प्रशिक्षण, तिथले चित्तथरारक अनुभव, पुढं हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीमधलं 54 आठवड्यांचं ट्रेनिंग, तिथल्या तन अन् मन कणखर करणाऱ्या आउटडोअर अॅक्टिव्हिटी, इनडोअर प्रोग्रामिंग हे सारं अगदी विस्तारानं आपल्याला वाचावयास मिळतं.

पोलिसी सेवेसारख्या धकाधकीच्या, धावपळीच्या क्षेत्रात कार्यरत असताना रोज येणारे नित्यनूतन अनुभव, त्यातून शिकायला मिळणारे नवे धडे, नेतृत्वगुण, संवाद कोैशल्य, सांघिकता, शरीराबरोबर मनाचं आरोग्य, सुजाण पालकत्व अशा अनेक बाबी पुस्तकात सोदाहरण येतात.

स्मार्ट पोलिसिंग, त्याला साह्यभूत करणारं तंत्रज्ञान, सिक्स सिग्मा, कायझेन आधुनिक प्रणाली, झिरो पेन्डन्सी, निर्भया पथक अशा उपक्रमांविषयीही लेखक लिहितो. ते करताना जागोजागी येणारे किस्से, प्रसंग, अनुभव, सुभाषितं, वचनं, इंग्रजी कोट्स वाचकास खिळवून ठेवतात.

विश्वास नांगरे- पाटील यांंच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर ‘कर हर मैदान फतेह’ म्हणजे एका ग्रामीण युवकाचं एका अधिकाऱ्यामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. वाचकासाठी तो नक्कीच भावणारा ठरतो. त्याच्या मनात स्फूर्तीचं स्फुलिंग जागं करतो, हे नक्कीच!

सुनील शेडगे। नागठाणे ता. सातारा

Leave a comment