कर्जवसुली भाग १

कर्जवसुली भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०

कर्जवसुली भाग १ –

टळटळीत दुपारच्या वेळी विसुनानाच्या घरासमोर पांढऱ्या रंगाची सुमो उभी राहिली. आपल्याकडे कोण आले असेल असा विचार करत विसुनाना जेवण अर्धवट टाकून बाहेर आला. तो हात धूत असतानाच त्याला गाडीतून चारजण उतरताना दिसले. त्यांच्या पेहरावावरून ते कुणीतरी अधिकारी असावेत. त्या चौघांपैकी एकजण पुढे झाला. त्याच्या हातात सुटकेस होती. कुरळे केस, गव्हाळ वर्ण, गोलमटोल चेहरा, पुढे आलेली ढेरी आणि अंगावरील सफारी सूट यावरून तो इतर तिघांचा साहेब असावा हे नानानं ताडलं.(कर्जवसुली भाग १)

“विश्वास बडाख तुम्हीच का?” साहेबानं प्रश्न केला.

“व्हय जी… पन म्या वळीखलं नाई तुमास्नी.” नानाच्या चेहऱ्यावर अनोळखी भाव उमटले.

“हं… असंच असतं… जो पर्यंत कर्जाचा पैसा हातात येत नाही तोपर्यंत सगळ्या ओळखी शाबूत राहतात. एकदा का पैसा हातात आला की मग ओळखी विसरल्या जातात…” रुक्षपणे साहेब उत्तरला.

“काय बोलून ऱ्हायले सायेब? समजन असं बोला की…” नाना पुरता गोंधळला.

“आम्ही बँकेकडून आलोय… कर्जवसुलीसाठी…” उरलेल्या तिघांपैकी एकानं उत्तर दिलं. बँकेचं नाव ऐकताच नानाचा चेहरा ओशाळला. बँकेचे अनेक हप्ते थकले होते. क्रूर निसर्गाने केलेली थट्टा नानासारख्या अनेक शेतकऱ्यांना पुरता कंगाल करून गेली होती. घरात दोनवेळच्या तुकड्याचा प्रश्न निर्माण झाला होता आणि बँक मात्र कर्जवसुलीसाठी नोटीस वर नोटीस पाठवीत होती. आणि आता तर डायरेक्ट माणसेच घरापर्यंत आली होती.

“या… सायेब… आत या…” कसबसं स्वतःला सावरत नानानं त्यांना आत बोलावलं. चौघेही कपाळावरील घाम पुसत घरात शिरले.

“अगं ये… बँकेचे सायेब आले हायेत शराहून… आदी पानी आन त्यास्नी… अन चाचं बग…” घाईघाईतच नानानं त्याच्या बायकोला, शांताला वर्दी दिली आणि लगोलग साहेबांना बसायला खुर्ची दिली. तसेच भिंतीच्या लगत इतरांना बसण्यासाठी चादर अंथरली. साहेब खुर्चीवर आणि इतर तिघे अंथरलेल्या बैठकीवर स्थानापन्न झाले. नाना मात्र खोलीच्या एका कोपऱ्यात आदबीने उभा राहिला. शांतानं सगळ्यांसाठी पाणी आणून ठेवलं. पाणी पिताना चौघांचीही नजर घरभर फिरत होती. बऱ्याच वर्षांपासून घराची डागडुजी झाली नसावी हे कुणाच्याच नजरेतून सुटलं नाही. खरं तर त्याला घर म्हणनं सुद्धा काहीसं धाडसाचंच होतं.

“बोला सायेब…” शांतता असह्य झाल्यानं नानानंच सुरुवात केली.

“एकच प्रश्न… कर्ज कधी फेडता?” साहेबाचा तोच रुक्ष आवाज घरात घुमला.

“—-“ ज्या प्रश्नाला नाना घाबरत होता तोच प्रश्न साहेबानं विचारला होता.

“बोला ना…! आम्ही इथं चहापाणी पिण्यासाठी नाही आलोत…” साहेबाचा कठोर आवाज पुन्हा एकदा वातावरणात घुमला.

“काय सांगू सायेब म्या? हितं दोन येळचा तुकडा म्हाग झालाय…” आता आपल्याला बोलणं भागच आहे हे लक्षात घेवून नाना उत्तरला.

“ते काही मला माहिती नाही… तुमच्या प्रॉब्लेमचे बँकेला काहीही देणेघेणे नाहीये. कर्ज घेताना बरे वाटते आणि हप्ते भरताना जीवावर येते होय?” साहेबाचा आवाज अधिकाधिक कठोर होत होता.

“तसं नाई सायेब, पन तुमीच बगा ना… ह्यो निसर्ग लई कोपलाय आमावर…” अगदी काकुळतीला येवून नाना म्हणाला.

“हे पहा, मला ते काहीही माहिती नाही. तुम्ही लोकं कर्ज काढतात, हातात पैसा आला की तो वाट्टेल तसा उधळतात आणि नंतर हात वर करून मोकळे होतात, हे सगळं पाठ झालंय आम्हाला. तुम्हाला इतक्या नोटीसा पाठवल्या, पण एकाचेही उत्तर तुमच्याकडून आले नाही. शेवटी आम्हाला यावे लागले. पुढच्या वेळेस आम्ही नाही तर पोलीस येतील दारात मग बँकेला दोष देऊ नका…”

“दया करा सायेब… येवढ्या येळेला घ्या सांबाळून…” पोलिसांचं नांव ऐकताच नानाच्या पायात गोळे आले.

“काय सांभाळून घ्या? आम्हालाही वर रिपोर्ट द्यावा लागतो त्याचं काय?” साहेबाचा आवाज चढला.

“समदं खरं हाये सायेब, पन…” बोलता बोलता नाना थांबला. नानाची मोठी मुलगी गौरी सगळ्यांसाठी चहा घेऊन बाहेर आली. तिचं ते गावरान सौंदर्य साहेबाच्या नजरेतून बिलकुल सुटलं नाही. साहेब तिच्याकडे एकटक पाहू लागला. त्याच्या नजरेतील वासना उफाळून वर आली. तिच्या हातून कपबशी घेताना त्यानं तिला चोरटा स्पर्श केला. त्या स्पर्शामागील भावना न कळण्याइतपत ती लहान नसल्यानं तिनं पटकन आपला हात मागे घेतला आणि ती स्वयंपाकघरात दिसेनाशी झाली. साहेब मात्र तीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच होता. त्याची ही कृती जरी नानाच्या लक्षात आली नाही, तरी त्याच्या बरोबर आलेल्या तिघांच्याही नजरेतून सुटली नाही. त्यांच्या चेहऱ्यावर नकळत एक नापसंतीची छटा उमटली.

“ही कोण?” अनवधनानं साहेबानं प्रश्न केला.

“माही पोर हाये…! गौरी..!! कालेजात जाती…!!!” नानानं सांगितलं.

“हं…” इतकं बोलून साहेब गप्पं बसला पण आता त्याची नजर फक्त स्वयंपाकघराच्या दारावर खिळली होती. काही वेळ शांततेत गेल्यावर परत साहेबानं सुरुवात केली.

“हे पहा बाबा… तुमचे प्रॉब्लेम मला समजत नाही असे थोडेच आहे? पण आम्हाला देखील वर जबाब द्यावा लागतो. त्यामुळे काही वेळेस काही कठोर गोष्टीही बोलाव्या लागतात…” साहेबाचा आवाज आता खूपच मवाळ बनला होता.

“व्हय जी… ठाव हाये मला…” केविलवाण्या सुरात नाना म्हणाला.

“ठीक आहे… आता आम्ही निघतो… पाहतो काही करता येते का ते… तुम्ही नका काळजी करू…” असे बोलत साहेब उठून उभा राहिला त्याबरोबर इतर तिघेही उठून उभे राहिले.

“लई उपकार हुतील सायेब…” नानानं हात जोडले. त्याला हातानेच ‘ठीक आहे’चा इशारा करत साहेब गाडीकडे चालू लागला. तिघेही त्याच्या मागेच होते. काही वेळातच गाडी जशी आली तशी दिसेनाशी झाली.

“आवं… काय म्हनत हुते सायेब?” शांतानं काळजीच्या स्वरात विचारलं.

“काई नाई… कर्ज कदी फेडता म्हनून इचारीत व्हते…”

“आता वं? कुडून आनायचा पैसा? व्हतं नवतं ते समदं ग्येलं अन ह्ये आता पैशे मागून ऱ्हायले…” तिचा स्वर कापरा बनला. आपला नवराही गावातील इतर काही शेतकऱ्यांसारखा या समस्येला घाबरून आत्महत्या तर करणार नाही ना, असा एक ओझरता विचार तिच्या मनात आला आणि ती चरकली.

“आवं… म्या काय म्हन्ते… काय बी झालं तरी तुमी येडं वाकडं काय करनार नाई असं वचन द्या मला…” नानाचा हात हातात घेवून तिनं वचन मागितलं. नानाला मात्र काय बोलावं हेच समजत नव्हतं.

“बोला ना…!!!” तिनं जोरात नानाला हलवलं आणि नाना ताळ्यावर आला.

“तू म्हनू ऱ्हायली पर म्या वचन तरी कसं दिवू? म्या जीव दिला त सरकारकून काई पैश्ये मिळतीन… त्यात पोरीचं लगीन हुईल, कर्ज बी फिटंल आन पोराला शाळेत बी जाता यीन…” शून्यात पहात नाना म्हणाला.

“गप बसा..!!! दोन मैन्यापुर्वी सकाभाऊनी जीव दिला… काय उपेग झाला त्येचा? त्याची बायकू आजूकबी सरकारी हापिसात पोर कड्यावर घीवून हेलपाटे घालून ऱ्हायली. सकाभाऊ व्हता तवर उद्याची आस व्हती… आता तीबी ऱ्हायली नाई. आन पैश्ये भेटले तरी तिनं आता घराकडं पायचं का शेताकडं पायचं का पोराकडं पायचं? त्यो ग्येला सुकासुकी… पर त्याचे पोरं नी बायकू बसलीया भोग भोगत हितंच…” शांताचा आवाज चढला तसा नानानं चमकून शांताकडे पाहिलं. तो शांताला पहिल्यांदाच असे त्याच्यावर डाफरताना पहात होता. अर्थात ती जे काही बोलली त्यात काहीही वावगे नव्हते. सरकारी कामे कशी असतात हे त्याने कर्ज घेतानाच चांगले अनुभवले होते.

“बरं बाई… उगा काऊ नगंस माह्यावर…! म्या काय बी आसं करनार नाई… दिलं वचन…!!!” नानानं वचन दिलं आणि शांताचा जीव भांड्यात पडला.(कर्जवसुली भाग १)

कर्जवसुली भाग १

गावाहून आल्यापासून साहेबाच्या नजरेसमोरून नानाची पोरीगी काही केल्या जात नव्हती. कसेही करून हा मासा हातचा सुटू द्यायचा नाही हे त्यानं मनाशी पक्कं ठरवलं. त्यादृष्टीने त्याच्या प्रयत्नांना सुरुवातही झाली. जे करायचे होते ते अगदी युद्ध पातळीवर करावे लागणार होते. सरकारने दुष्काळ जाहीर केला आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तर त्याचे सगळे मनसुबे मनातल्या मनातच राहणार होते.

“राजू ऽऽऽ” साहेबाने बसल्या जागेवरूनच आवाज दिला आणि बाहेर बसलेला राजू धावतच केबिनमध्ये शिरला.

“जी???”

“पवारला आत पाठव…!”

“ठीके सायेब…” म्हणत राजू बाहेर पडला. दुसऱ्याच मिनिटाला पवार साहेबासमोर हजर होता.

“पवार, विश्वास बडाखची फाईल घेवून ये…” साहेबानं हुकुम सोडला.

“हो सर…” म्हणत पवार माघारी वळला. बाहेर आल्या बरोबर इतर सहकाऱ्यांनी पवारला आवाज दिला.

“काय रे? कशाला बोलावलं होतं?” एकानं प्रश्न केला.

“काही नाही रे… हरामखोरांनं शिकारी भवती पाश आवळायला सुरुवात केलीये…” आपला राग आवरत पवार बोलला.

“साला… किडे पडून मरेल हा. किमान गरिबाला तरी सोड म्हणावं… त्या पोरीकडं हा ज्या पद्धतीनं पहात होता ना… वाटलं त्याला तिथंच रेमटवावं…” पवारचा दुसरा सहकारी उद्गारला.

“हो ना… बेण्याच्या हातात माझं प्रमोशन आडकलंय म्हणून शांत बसावं लागतंय… नाहीतर याला कधीच चेपला असता मी…” पवारचा चेहरा संतापाने लाल बनला होता.

“यार पण आताच काही केलं नाही तर एक कुटुंब याच्या वासनेला हकनाक बळी पडेल, याचेच वाईट वाटते आहे.” पहिल्या सहकाऱ्याच्या चेहऱ्यावर असहाय्य असल्याचे भाव दिसून येत होते.

“अरे असं कर… फाईल लपव ती… आणि विचारलं तर सांग… फाईल सापडत नाही म्हणून… बहुतेक ८/१० दिवसात शासनानं दुष्काळ जाहीर केला तर किमान एक कुटुंब तरी वाचंल याच्या तावडीतून…” तिसऱ्या सहकाऱ्यानं आयडिया दिली आणि सगळ्यांनाच ती पसंत पडली.

“ओ पवार सायेब… सायेब बोलावताहेत तुम्हाला…” राजूने परत एकदा आवाज दिला.

“पवार… काय झालं फाईलचं? कुठाय फाईल?” पवारला केबिनमध्ये आलेला पाहताच साहेबानं प्रश्न केला.

“अं… पाहतोय सर…!!! पण…” पवारने वाक्य अर्धवट सोडलं.

“पण काय?” साहेब भडकला…

“सॉरी सर… पण… फाईल सापडत नाहीये… मी तीच शोधतो आहे…” पवार हळूच म्हणाला आणि साहेब उखडलाच.

“मिळत नाही म्हणजे काय? तुम्ही इथे कामं करायला येतात की गोट्या खेळायला? ते काही नाही… मला आत्ताच्या आत्ता फाईल माझ्या टेबलवर पाहिजे, नाहीतर मी तुझ्याबद्दल वर रिपोर्ट करेन…” साहेबानं दम भरला.

“पाहतो साहेब..!!!” म्हणत पवार केबिनमधून बाहेर पडला. पवार बाहेर कधी पडतोय याची जणू सगळेजण वाटच पहात होते. पवार दिसताच त्यांनी त्याला खुणेनेच ‘काय झाले?’ म्हणून विचारले आणि उत्तरादाखल पवारचा चेहरा हसरा बनला.

दोन तास उलटूनही फाईल टेबलावर आली नाही हे पाहून साहेब चरफडला. अर्थात तो यापेक्षा जास्त काहीच करू शकत नव्हता. सरकारी कामे कशी होतात हे काही त्याच्यासाठी नवीन थोडेच होते?

दोन दिवस उलटूनही फाईल मिळत नाही हे पाहून साहेबानं शेवटी वेळ न दवडण्याचा निर्णय घेतला आणि तो एकटाच विसू नानाच्या गावी हजर झाला.

क्रमशः कर्जवसुली भाग १.

मिलिंद जोशी, नाशिक…

कर्जवसुली सर्व भाग 

Leave a comment