कर्जवसुली भाग १०

By Bhampak Story 9 Min Read
कर्जवसुली भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०

कर्जवसुली भाग १० –

आपली मुलगी आणि नवरा आज घरी येणार नसतानाही असे अपरात्री घरी कसे आले? दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी गेले असतानाही एकत्र कसे? याचेच नीताच्या आईला आश्चर्य वाटत होते. तिने याबद्दल साहेबाला विचारण्याचा प्रयत्न केला पण तो काहीही न बोलता तडक आपल्या रूमकडे गेला. त्यामुळे तिने आपला मोर्चा नीताकडे वळवला.

“नीता… तू तरी सांग… तुम्ही एकत्र कसे?”

“आई… आज मी खूप मोठ्या संकटातून वाचले…” हे वाक्य तिने उच्चारले मात्र आणि तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिला पुढील शब्द उच्चारणेही अवघड होऊ लागले.

“नीता… आधी शांत हो… आणि मला नीट सांग… काय झाले?” नीताच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या आईने विचारले.

“आई… बाबा… खूप विचित्र आहेत…” तिने रडत रडत सुरुवात केली.

“म्हणजे?” आईने प्रश्नार्थक दृष्टीने तिच्या कडे पाहिले आणि तिने मग ती घरातून बाहेर पडल्यापासून घरी पोहोचेपर्यंतची सगळी हकीकत जशीच्या तशी आईला सांगितली. साहेबाचे हे रूप नीताच्या आईसाठीही नवीनच होते. ज्याला ती कडक शिस्तीचा आणि कायद्याचे काटेकोर पालन करणारा जबाबदार अधिकारी समजत होती, तो असा अगदी खालच्या पातळीवर जाऊन नरपशू बनणारा अधम आहे हे समजल्यावर तर तिच्या पायाखालील जमीनच सरकली.

ही घटना घडून गेल्यावर जवळपास आठ दिवसांनी शासनाने दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीची घोषणा केली आणि विसुनानाच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली. साहेबाच्या घरातील धुसफूस अजूनही शमलेली नव्हती. आणि याच दरम्यान बबन्या साहेबासमोर हजर झाला.

“रामराम सायेब…” त्याने साहेबाला रामराम घातला. साहेब मात्र आपल्या कामात मग्न असल्यामुळे त्याने बबन्याकडे न पाहताच त्याला बसण्याची खुण केली.

“काय काम आहे?”

“उल्शिक बोलायचं व्हतं !!!” साहेबासमोरील खुर्चीत ठिया देत बबन्या म्हणाला आणि साहेबाने वर पाहिले. हा चेहरा त्याने कुठेतरी पाहिला होता.. पण कुठे? हे त्याला नीटसे आठवत नव्हते. त्यामुळे त्याचा चेहरा प्रश्नार्थक बनला.

“तुमी वळीखलं नाय वाटतं…” काहीसे छद्मीपणे हसत बबन्या उत्तरला.

“अं… चेहरा कुठेतरी पाहिलाय… पण लिंक लागत नाहीये…” हे बोलताना साहेब आपल्या मेंदूवर खूप ताण देत होता.

“असंच ऱ्हातं… तुमी म्होटे लोकं, गरीबास्नी कामून ध्यानात ठीव्नार?”

“मुद्द्याचं बोला… माझ्याकडे फालतू गोष्टी बोलायला वेळ नाहीये.” साहेब भडकला आणि बबन्याच्या चेहऱ्यावरील स्मित आणखीनच वाढले.

“हंग अस्सं… माह्याकडं बी येळ नाई, तवा डायरेक्ट बोलून टाकतू…” बेरकी लहेजात बबन्या उत्तरला. त्याच्या चेहऱ्यावरील बेरकीपणाचा साहेबाला चांगलाच राग आला.

“चला… बोला पटकन…” साहेब वैतागला.

“आदी तुमी ह्ये पघा…” असे म्हणत बबन्याने आपला मोबाईल साहेबापुढे धरला. ज्यात आठ दिवसांपूर्वीचा गावातील प्रसंग रेकॉर्ड केला होता. ते पाहताच साहेबाच्या कपाळावर घाम साठू लागला. त्याची बोलतीच बंद झाली.

“काई तरी बोला सायेब…!!!” हातातील फोन आपल्या खिशात ठेवत त्याने म्हटले. आता कुठे साहेबाला हा चेहरा कुठे पाहिला आहे ते आठवले. ज्यावेळेस तो विसुनानाच्या घरातून बाहेर पडला, त्यावेळेस बाहेर जी काही माणसं उभी होती, त्यात हाही एकजण होता. याचाच अर्थ यावेळेस जाळ्यात शिकार नाही तर शिकारीच अडकला होता. आणि हे अगदी थंड डोक्याने आणि सगळ्या गोष्टींची व्यवस्थित आखणी करून करण्यात आले आहे हेही त्याने ओळखले.

“काय पाहिजे तुम्हाला?” आपल्या कपाळावरील घाम पुसत साहेबाने विचारले. आणि उत्तरादाखल बबन्या पुन्हा एकदा छद्मीपणे हसला…

“काय हाय ना सायेब… म्या काई तुमच्यावानी हलकट नाई… याच्या बदल्यात तुमच्या पोरीची मागनी करायला. आन तसा बी तुज्या पापाची शिक्शा तिला कशाला?” एकेका शब्दावर जोर देत बबन्या म्हणाला.

“अहो… चूक झाली माझी… मला माफ करा… पुन्हा माझ्याकडून अशी कोणतीही गोष्ट घडणार नाही…” साहेबाने गयावया करायला सुरुवात केली.

“ए xxx, त्ये त मला बी ठावं हाय. पन तू आदी केलेल्या पापाचं काय?” बबन्याचा स्वर कडवट बनला.

“सांगा… सांगा… तुम्ही द्याल ती शिक्शा भोगायला मी तयार आहे… पण…” साहेब बोलता बोलता थांबला.

“शिक्शा येकच… तू केलेली समदी पापं आक्ख्या दुनिये म्होरं कबूल करायची… आनी नाय केली तर म्या ह्यो हिडीओ टीवीवाल्यांना दील… मंग ना तुजी नोकरी ऱ्हानार, ना इज्जत…” खुर्चीवरून उठत बबन्या म्हणाला.

“ओ… पाया पडतो मी तुमच्या… पण असं नका करू…” आपल्या जागेवरून उठत साहेबाने बबन्याचे पाय पकडले.

“ये सोड… नडलेले लोकं बी अश्येच तुजे पाय पकडत व्हते… तवा तू त्यांवर दया दावली का? चल… तुला इचार करायला दोन दिसांची मुदत देतो. आनी तवर काई झालं नाई त मंग ह्यो हिडीओ तुला टीवीवर दिसंल…” त्याला पायानेच दूर ढकलत बबन्या केबिनमधून बाहेर पडला.

आता मात्र साहेबापुढे भविष्यातील सगळे चित्र दिसू लागले. त्याने स्वतः सगळे कबूल केले तर नोकरीवर गदा येणार, समाजातील सगळी इज्जत, प्रतिष्ठा धुळीस मिळणार आणि इतकेच नाही तर तो दाण्यादाण्याला मोहताज बनणार. आणि समजा कबूल केले नाही तर? तर तो गाववाला मिडीयात ही क्लिप देईल आणि त्याचा परिणामही हाच.

हे दोन दिवस साहेबाला नीट झोपही लागली नाही. घरीही त्याची बायको आणि मुलगी त्याच्याशी गरजे इतपतच बोलत होत्या. त्यातून नीताच्या समोर तर त्याला जाण्याचीही लाज वाटत होती. तिची नजर त्याला नेहमी त्याच्या पापाची आठवण करून देत होती. आता त्याला यातून सुटण्याचा फक्त एकच मार्ग दिसत होता. स्वतःचे नरकसमान बनलेले जीवन कायमचे संपवणे.

सूर्य इतका वर आला तरी आपला नवरा अजून कसा उठला नाही याचे काहीसे आश्चर्य वाटून नीताच्या आईने साहेबाला हलवले. पण त्याचे संपूर्ण शरीर थंड पडले होते. त्याच्या शरीरातून प्राण कधीचेच निघून गेले होते. तिने घाबरून नीताला हाक मारली. नीता धावतच बेडरूममध्ये आली.

“नीता… हे पहा… हे काहीच हालचाल करत नाहीयेत…” तिने घाबरतच नीताला म्हटले. नीताने तातडीने डॉक्टरांना फोन केला. अगदी १० मिनिटाच्या अवधीत त्यांचे फॅमिली डॉक्टर हजर झाले. त्यांनी साहेबाचा हात हातात घेतला आणि साहेब आता या जगात नाहीत हे जाहीर केले. रात्रीच्या वेळेस कधीतरी त्यांना झोपेत हृदयविकाराचा झटका आला असावा आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा असे डॉक्टरांनी निदान केले.

ही गोष्ट घडून जवळपास १५ दिवस झाले होते. नीता रोजच्या प्रमाणे कॉलेजला जात होती.

“येक मिंट ताई…” मागून आवाज आला. तिने आवाजाच्या दिशेने पाहिले. बबन्या उभा होता. तिने त्याला तत्काळ ओळखले.

“आता काय आहे?” तिने काहीसे नापसंतीनेच विचारले.

“मला तुमची माफी मागायची हाये…”

“माझी माफी? ठीक आहे… मी तुम्हाला माफ केलंय. तुम्ही जे काही केलं ते तुमच्या बहिणीसाठी केलं…” काहीसे रुक्ष स्वरात तिने म्हटले आणि ती पुढे चालू लागली.

“नाई… म्या त्याबद्दल नाई बोलू ऱ्हायलो…” त्याने मान खाली घालून म्हटले.

“मग?” नीता गोंधळली.

“सायबानं माह्यामूळं जीव दिला… त्यानं जीव द्यायच्या आदी म्या त्याच्या बँकेत गेल्तो.”

“काय? कशासाठी?” बबन्याचे शब्द ऐकून मात्र ती भडकली. आणि मग बबन्याने तिला सगळे सांगितले. त्याच बरोबर तिच्या हातात एक सीडी दिली.

“हे काय?”

“ह्ये समदे माह्या इरुद्धचे सबूत हायेत. आता याचं काय करायचं त्ये तुमी ठरवा. सायबानं हलकटपना क्येला पन म्या बी तुमचा गुन्हेगार हायेच. म्या तुमाला भैन म्हन्लं, आन तुमच्या बापाइरुद्ध तुमचाच वापर क्येला. हे म्या कदीबी इसरू नाई शकत. आता मला शिक्शा करायची का माफी द्यायची ह्यो तुमचा प्रश्न…” असे म्हणत बबन्याने तिच्यासमोर हात जोडले आणि पुढच्याच क्षणाला तेथून दूर झाला. आता मात्र नीताच्या मनात द्वंद्व चालू झाले. ती तशीच माघारी वळली. तिला असे परत आलेली पाहून तिच्या आईला आश्चर्य वाटले.

“काय गं !!! परत का आलीस?” आईने विचारले आणि तिने काहीही न लपवता सगळ्या गोष्टी आईला सांगितल्या.

“नीता !!! मला वाटतं आता आपण हा विषय इथेच संपवावा. त्या मुलाला शिक्षा झाली तरी तुझे वडील काही परत येणार नाहीत. तसेही त्यांनी जे कर्म केले, त्याचे फळ त्यांना यापेक्षा काय वेगळे मिळणार होते? आणि त्या मुलानेही जे काही केले ते त्याच्या बहिणीसाठी केले. इतकेच काय पण त्याने तुला फक्त एकदा ताई काय म्हटले, तो त्या शब्दाशी इमान राखतो आहे. अशी माणसे या जगात खूप कमी असतात. जी स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी जगतात. आणि आपल्यामुळे अशा व्यक्तीला शिक्षा झाली तर आपण स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही…. आण ती सीडी इकडे…” असे म्हणत नीताच्या आईने तिच्याकडून सीडी घेतली आणि एकदा हार घातलेल्या साहेबाच्या फोटोकडे नजर टाकत सीडीचे दोन तुकडे केले.

विसुनानाचे तर कर्ज माफ झाले होते, पण साहेबाने आपल्या कर्माने जे कर्ज स्वतःवर निर्माण केले होते त्याची वसुली मात्र नियतीने साहेबाचा जीव घेऊन केली होती.

समाप्त.

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a Comment