कर्जवसुली भाग ६ –
“आई… दोन दिवस मला मैत्रिणींबरोबर ट्रीपला जायचे आहे. तू बाबांना विचार ना त्याबद्दल.” नीताने आईच्या गळ्यात हात टाकत म्हटले.
“तू का नाही विचारीत स्वतःच?”
“नाही गं… मला बाबांची अशा बाबतीत खूप भीती वाटते. तुला तर माहितच आहे ना, किती संशयी आहेत ते…”
“अगं तो संशय नाही… तुमच्या बद्दलची काळजी असते… जेव्हा तू आई होशील तेंव्हा समजू शकशील…” आईने नीताला समजावण्याचा प्रयत्न केला.
“अं… असेल… पण तरीही तू विचार ना..!!!”
“ठीक आहे… आज रात्री त्यांना विचारते मी…” मुलीचा हात आपल्या गळ्यातून काढत तिची आई म्हणाली.
साहेबाच्या बायकोने रात्री मुलीच्या ट्रिपचा विषय काढला.
“अहो… मी काय म्हणते… नीता दोन दिवस ट्रीपला जायचं म्हणत होती.”
“नाही… आधी अभ्यास कर म्हणावं… एकतर मला हे असले मुलींचे थेरं बिलकुल आवडत नाहीत. तिथे काही वेडंवाकडं झालं तर आपण समाजात काय तोंड दाखवणार?” साहेबाने सुरुवातच नाही पासून केली.
“अहो… माझा माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ती असं काहीही करणार नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते…” तिने आपल्या नवऱ्याचा मुद्दा खोडून काढला.
“पण तरीही मी परवानगी देणार नाही…”
“अहो… जरा विचार करा… अति धाकानेही मुले बिघडू शकतात. आणि दोन दिवसांची तर गोष्ट आहे. इथे आहे तो पर्यंतच हौस मौज आहे. उद्या तिचे लग्न झाल्यावर तिला सासर कसे मिळेल काय माहित? एकतर बाईचा जन्म… त्यातून नवरा संशयी मिळाला तर तिला घरातून बाहेर पडणेही अवघड असेल…” काहीसे स्वगतच तिने आपले म्हणने मांडले. एका दृष्टीने ते खरेही होते.
“हं… तिच्या बरोबर कोण कोण मैत्रिणी असणार आहेत हे आधी विचारून घे… मग बघू…” म्हणत साहेबाने विषय संपवण्याचा प्रयत्न केला. हे सगळे संभाषण नीता दुसऱ्या खोलीतून ऐकत होती. आपल्या वडिलांचा आपल्यावर इतकाही विश्वास नाही याचे तिला काहीसे वाईट वाटले.
“का गं… मिळाली का परवानगी?” नीता कॉलेजला आल्या बरोबर तिच्या मैत्रिणींनी तिला विचारले.
“अजून नाही गं… माहित नाही मिळेल का नाही ते…” तिने काहीसे खिन्न स्वरात सांगितले.
“असे काय गं तुझ्या घरचे? कधीच परवानगी देत नाहीत तुला…” एक मैत्रीण म्हणाली.
“तसे काही नाही… त्यांना माझी काळजी आहे त्यामुळे ते नाही म्हणतात. पण उद्या देतील मला परवानगी… मला खात्री आहे.” काहीशा ठाम स्वरात नीता म्हणाली.
“आणि नाहीच दिली तर?” दुसऱ्या मैत्रिणीने विचारले.
“तर? मग मी येणार नाही. कारण मला कधीच त्यांना दुखवायला आवडणार नाही.” काहीशा रागातच ती म्हणाली आणि मग वादाची वेळ येऊ नये यासाठी सगळ्यांनी विषय बदलला.
सगळे लेक्चर्स संपून जेव्हा ती घरी जाण्यास निघाली त्यावेळेस तिला सारखे कुणीतरी आपला पाठलाग करीत आहे असे जाणवले. तिने दोन तीन वेळेस मागे वळूनही पाहिले पण तिला कुणीच दिसले नाही. अगदी घरात येईस्तोवर तिला हेच जाणवत होते. ती सुरक्षित घरात आली आणि आपल्याला उगाचच भास झाला असे वाटून तिने या गोष्टीचा विचार करणे सोडून दिले.
“आई… आज परत एकदाच विचारून पहाशील का बाबांना?” तिने आईला विचारले.
“अगं पण ते नाही म्हणताहेत.”
“प्लीज प्लीज प्लीज… एकदाच… फक्त एकदाच विचारून पहा… जर ते नाही म्हणाले तर मग मी नाही जाणार ट्रीपला…” तिने काकुळतीने म्हटले.
“ठीक आहे… पण त्यांनी नाही म्हटले तर मात्र मी परवानगी देणार नाही.” आईने फायनल सांगितले.
साहेब अगदी एकेक दिवस, एकेक तास मोजत होता. त्याच्या डोळ्यासमोरून गौरीची मूर्ती काही केल्या जात नव्हती. त्याच विचारात असताना नीताच्या आईने ट्रिपचा विषय काढला.
“अहो… नीताला जाऊ द्यायचं ना ट्रीपला?”
“काय कटकट आहे तुझी? डोक्यात आपल्या एक विचार असतो आणि तुमचे आपले वेगळेच…” आपली तंद्री भंग पावल्यामुळे साहेब काहीसा वैतागला.
“अहो… जाऊ द्या ना तिला…”
“ठीके… होऊ द्या तुमच्या मनासारखं… कधी जाणार आहे ती?” आपल्या विचारात भंग नको म्हणून त्याने परवानगी देण्याचे ठरवले.
“परवा… आणि तेरवा परत येईल…”
“परवा? अगं पण त्या दिवशी मीही बाहेरगावी जाणार आहे. बँकेच्या कामानिमित्त… मग तिला कसे जाता येईल?” त्याने परत खुसपट काढले.
“तुम्ही जाणार? कुठे?”
“हेड ऑफिसमधून फोन आला होता. त्यामुळे मला हेडऑफिसला जावे लागेल.” त्याने खोटेच सांगितले.
“असू द्या… एका दिवसाचा तर प्रश्न आहे. मी घेईन सांभाळून…” तिने सांगितले आणि साहेब परत एकदा स्वप्न रंगविण्यात मग्न झाला.
एका दिवसात बबन्याला मात्र खूपच धावपळ करावी लागली. त्याने मनात योजलेली गोष्ट कुणाच्या तरी मदतीशिवाय शक्य होणार नव्हती. आणि त्याने आता आपल्या मित्रांची मदत घेण्याचे ठरवले. त्यातील एक होता सागर… जो ग्यारेजवर काम करायचा. घरचा गरीब पण गावात त्याला अगदी साधा सरळ म्हणून ओळखले जायचे. दुसरा होता आकाश. श्रीमंत बापाचा एकुलता एक पोरगा. घरची जवळपास शे सव्वाशे एकर बागायती जमीन. पण गावाच्या दृष्टीने निकम्मा. त्याच्या मागेपुढे सतत चार सहा जण असायचेच. तिघेही एकाच गावात राहूनही आता त्यांची मैत्री फक्त रामराम पुरती उरली होती. एकेकाळी हे तिघेही खूपच घनिष्ठ मित्र होते. तिघांचे क्षेत्र बदलले, सवयी बदलल्या, त्यानुसार मित्रही बदलले आणि मग त्यांच्यातील मैत्रीही कमी होत गेली. तिघेही तीन तऱ्हेचे, हेही एक कारण होतेच म्हणा. तसे बबन्याला मित्र कमी होते असे नाही. पण त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवावा याबद्दल तो साशंक होता. आणि या दोघांवर तो डोळे झाकूनही विश्वास ठेऊ शकत होता.
क्रमशःकर्जवसुली भाग ६.
मिलिंद जोशी, नाशिक…