कर्जवसुली भाग ८ –
आज दोघे जण एकदम खुशीत होते. एक म्हणजे नीता… आज पहिल्यांदाच ती मैत्रिणींबरोबर दोन दिवसांच्या ट्रीपसाठी बाहेर पडली होती आणि दुसरा साहेब… आज त्याचे इप्सित साध्य होणार होते.
“आई… येते गं मी..!!!” म्हणत नीता बाहेर पडली. आजही परत तिला कुणी तरी आपला पाठलाग करत आहे असे जाणवले. कॉलेजला सुट्टी असल्यामुळे तो रस्ता काहीसा निर्जन होता. त्यामुळे तिने आपल्या चालण्याचा वेग वाढवला. पण तरीही तिचे मन आशंकेने भरले होते. यापूर्वी कधीही तिला असे काही वाटले नव्हते. तिने मनातल्या मनात देवाचा धावा सुरु केला. थोडे पुढे जाऊन रस्ता वळण घेत होता. इतक्यात एक कार तिच्या जवळून पुढे जाऊन उभी राहिली. त्यातून एक जण दार उघडून बाहेर पडला. हातात कसलासा लहान कागद घेऊन अनोळखी नजरेने आजूबाजूला पाहू लागला. त्याच्या वागण्यावरून बहुतेक तो या शहरातील नसावा हे तिने लगेच ओळखले. इतक्या निर्मनुष्य रस्त्यावर कुणीतरी माणूस दिसला याचाच तिला आनंद झाला. चला… आपण काही एकटेच या रस्त्यावर नाही आहोत हेच तिच्या मनाला सुखावून गेले.
“येक मिंट ताई…” कार मधून उतरलेल्या मुलाने तिला हटकले. ती काहीशी गोंधळली.
“ह्यो पत्ता कुडंलाय? कवांधरनं फिरू ऱ्हायलो..!!!” त्यांच्या बोलण्यातून तो खूपच वैतागलेला वाटत होता. तिने त्या मुलाच्या हातून कागद घेतला आणि तो पत्ता वाचण्यासाठी तिने त्यावर नजर वळवली. पण इतक्यात तिच्या नाकावर कुणीतरी रुमाल ठेवला आहे असे तिला जाणवले, डोके गरगरले आणि काही समजण्याच्या आतच तिची शुद्ध हरपली.
जवळपास एक तास वाट पाहूनही नीता पोहोचली नाही. नक्कीच तिला घरून परवानगी मिळाली नसणार असा तिच्या मैत्रिणींचा समज झाला. तसेच तिचे वडील खूप विचित्र आहेत हे माहिती असल्यामुळे कुणी तिच्या घरी जाऊन तिला घेण्याच्याही फंदात पडले नाही.
ती जेंव्हा शुद्धीवर आली त्यावेळेस बाहेर अंधार पडू लागला होता. तिचे डोके खूपच गरगरत होते. तिने उठण्याचा प्रयत्न केला पण तिचे हातपाय ओढणीने बांधलेले तिला जाणवले. तिला फक्त आपल्याला कुणीतरी पत्ता विचारला आणि आपण थांबलो इतकेच आठवत होते. तिने आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला. खोलीचे दार उघडेच होते. बाहेर कुणाचे तरी बोलण्याचे आवाज येत होते. पण खूपच हळू. खोलीत अंधार पडायला सुरुवात झाली होती. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता. इतक्यात तिच्याच वयाची एक मुलगी तिच्या बाजूला येताना तिला दिसली. तिने आल्याआल्या घरातील लाईट लावला. खोलीत सगळीकडे पिवळसर प्रकाश पडला. त्या मुलीला जसे नीता उठल्याचे जाणवले… तिने आईला हाक मारली आणि त्याच बरोबर एक मध्यमवयीन बाई हातात पाण्याचा पेला घेऊन तिथे हजर झाली.
“आदी पानी पी… आन घाबरू नगंस… तुह्या केसाला बी हितं धक्का लागायचा नाई…” तिने नीताच्या तोंडाला पाण्याचा पेला लावत म्हटले. नीताच्या घशाला कोरड पडलेली असल्यामुळे तिने तो संपूर्ण पेला एका दमात संपवला. आता तिला बरीच हुशारी वाटू लागली.
“मला इथे का आणलं आहे?” नीताने प्रश्न केला.
“तुह्या बापाला धडा शिकविन्यासाठी…” दारातून आत येत बबन्या म्हणाला आणि नीताने त्याच्याकडे पाहिले. तिच्या समोर तोच मुलगा होता, ज्याने तिला पत्ता विचारला होता. त्याला पाहताच तिचा संताप अनावर झाला.
“तू??? हलकट, नीच माणसा..!! ताई म्हणून मला फसवलंस? त्या शब्दाचा अर्थ तरी तुला माहिती आहे का?” तिने हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत म्हटले.
“हा… ठावं हाय मला… आन तुमाला म्या ताई म्हन्ल ते बी खरंच हाय…” तितक्याच शांतपणे बबन्या म्हणाला आणि त्यावर काय बोलावे हेच नीताला समजेना.
“बबन्या… गप ऱ्हा…! आन आदी भायेर जा..!!!” शांतानं हुकुमच सोडला आणि बबन्या आला तसा बाहेर पडला.
“अहो मावशी, मला वाचवा हो..!!!” नीताच्या डोळ्यात पाणी तरळले.
“घाबरू नगं… म्या हाय ना?” असे म्हणत असतानाच शांताने गौरीला डोळ्यांनी खुणावले तसे गौरीने पुढे होऊन नीताचे हात सोडवले.
“मला खरंच काही समजत नाहीये हो… मी कुठे आहे? मला इथे का आणले आहे? तुम्ही काय करणार आहात माझ्या बरोबर?” एकानंतर एक असे तिचे प्रश्न चालू होते.
“पोरी… समदं सांगत्ये… सबुरीनं घ्ये…” नीताच्या डोक्यावरून हात फिरवत शांता म्हणाली. तो स्पर्श तिला प्रेमळ भासला. त्यानंतर तिने नीताला एकेक करून सगळ्या गोष्टी सांगितल्या. स्वतःच्या वडिलांचे हे असले प्रताप तिला पहिल्यांदाच समजत होते. तिच्या मनात विचारांचे काहूर माजले. आपले वडील असे करू शकतात? ही माणसे आपल्याला खोटे तर सांगत नाहीयेत ना? पण किमान अजून तरी या माणसांचा कोणताही दुष्टपणा आपल्याला दिसला नाहीये. अगदी ज्याने आपल्याला पळवून आणले त्या मुलानेही तुला मी अजूनही बहिणच मानतो असे दर्शवले आहे. पण काय सांगता येते? उद्या आपल्या वडिलांनी यांची मागणी मान्य केली नाही तर? आपल्याला हे लोक काही दगाफटका तर करणार नाहीत? आईला माझ्या अपहरणाची बातमी समजली तर तिची काय अवस्था होईल? एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात एकामागून एक येत होते.
“पोरी… तू आमाला उल्शिक मदत क्येली त लैच उपकार हुतील…” दारातून आत येत विसुनाना म्हणाला आणि त्याच्या एकंदर चेहऱ्याकडे पाहून नीताने किमान त्यांचे म्हणने शांतपणे ऐकून घेण्याचे ठरवले.
“कसली मदत करायची मी?” तिने काहीसे शांत होत विचारले. आणि बबन्या परत एकदा आत आला आणि त्याने आपली योजना तिला समजावून सांगितली. पण काही केल्या ती या गोष्टीला तयार होईना.
“ये पोरी… लई झालं आता… म्या तुला भैन म्हन्ल म्हनून तुज्या केसाला सुदिक धक्का लागायचा नाई… पन आता तुजा बाप हितं यील… तू म्या म्हन्तो तसं केलं नाई त तुज्या डोळ्यादेखत त्याचा मुडदा पडंल. म्या फासावर जाईल पर त्यो बी जित्ता ऱ्हायचा नाई…” बबन्या भडकला. त्याचा तो अवतार पाहून गौरीच काय पण शांताही शहारली. आता पर्यंत तिने फक्त बबन्या रागीट आहे हे ऐकले होते. आज प्रत्यक्ष पहात होती. क्षणार्धात वातावरण तापलं होतं. आवाज मोठा होताच बाहेर थांबलेले त्याचे मित्र सागर आणि आकाश आत आले आणि आपल्याला यांच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याशिवाय गत्यंतर नाही हे नीताला समजून चुकले. किमान आपल्या वडिलांचा जीव वाचावा यासाठी तरी तिला त्यांचे म्हणने मान्य करणे भाग होते.
क्रमशःकर्जवसुली भाग ८,कर्जवसुली भाग ८.
मिलिंद जोशी, नाशिक…