कर्जवसुली भाग ९

कर्जवसुली भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०

कर्जवसुली भाग ९ –

बराच अंधार पडला होता. हळूहळू रात्र चढत होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वाढत असलेला ताण ठळकपणे दिसून येत होता. इतका वेळ सगळ्यांना धीर देणारी शांता देखील आता तणावाखाली वावरत होती. शांताने गौरीला आधीच बबन्याच्या घरी पाठवून दिले होते. नीताच्या अंगावर गौरीचे कपडे दिसत होते. नीताच्या मनात जे विचारांचे काहूर माजले होते त्याची कल्पना करणेही शक्य नव्हते. प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार विचारात गढला होता. बबन्या, सागर आणि आकाश विसुनानाच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर, काहीशा अंधारात रस्त्यावरच गप्पा मारत बसले होते. एरवी ८ पर्यंत जेवण उरकणाऱ्या विसुनानाच्या परिवारातील सदस्यांच्या पोटात ९ वाजल्यानंतरही अन्नाचा एक कणही गेला नव्हता. आणि मुख्य म्हणजे त्यांना तशी जाणीवही झाली नव्हती.

जवळपास साडेनऊच्या वेळेस घराबाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला आणि नानाच्या पोटात धस्स झाले. काही वेळ होतो न होतो तोच गाडीचे दार बंद झाल्याचा आवाज आला आणि पुढच्याच मिनिटाला साहेब दारात हजर झाला.

“आहेत का?” साहेबाने प्रश्न केला. विसुनाना पलंगावर बसला होता. शांता आणि नीता आतल्या खोलीत थांबल्या होत्या. साहेब पूर्णतः नशेत होता. त्याचे डोळे काहीसे लालसर झाले होते. आवाज अडखळत होता. त्याच्या सफारी सूटवर मारलेल्या सेंटचा उग्र वास संपूर्ण खोलीत पसरला. नानाने एकवार साहेबाकडे पाहिले आणि त्याचे डोके भडकले. त्याला असाच जमिनीवर पाडून तुडवावा असे नानाच्या मनात आले पण मोठ्या मुश्किलीने त्याने आपला विचार बदलला.

“ओ… विश्वासराव… अहो बोला काहीतरी…!” परत एकदा साहेबाचा आवाज आला.

“XXX.., तू काय बोलायला ठिवलंय का?” नानाचा कडवट स्वर खोलीत घुमला आणि साहेबाच्या चेहऱ्यावर स्मित झळकले.

“आज काय पण बोला मला तुम्ही… मला नाही वाईट वाटणार…” शांतपणे मंदस्मित करत साहेब म्हणाला आणि नानाचा तोल सुटला. त्याने एकदम पुढे होऊन साहेबाच्या कानाखाली खेचली. आधीच नशेत असलेला साहेब मागे कोलमडला. हा आवाज ऐकून शांता जवळपास धावतच बाहेर आली आणि तिने आपल्या नवऱ्याला आवरले. एक जळजळीत कटाक्ष तिने साहेबाकडे टाकला. हा हल्ला साहेबासाठी अनपेक्षित होता.

“तुझ्या ह्या फटक्याची शिक्षा तुला नाही, तुझ्या पोरीला मिळणार…” धडपडत उठत खुनशी स्वरात साहेब म्हणाला आणि पुन्हा एकदा नानाचा संताप अनावर झाला पण शांताने त्याला आवरले.

“चला बाहेर व्हा…!” साहेबानं हुकुम सोडला आणि नानाला काहीसे ओढतच शांता बाहेर घेऊन गेली. तो पर्यंत बबन्या आपल्या मित्रांसह घराबाहेर येऊन उभाच राहिला होता.

“ए… बाहेर ये… आन मला खुश कर…” साहेबाने आतल्या खोलीत डोकावत हुकुम सोडला आणि नीताला आपल्या बापाचा तिटकारा आला.

“ए… उठ… ये इकडं… आणि वाईट वाटून घेऊ नकोस… तू खरी भाग्यवान आहेस.. तू तुझ्या बापाला मदत करते आहेस हे लक्षात ठेव… त्याचं कर्ज माफ होईलच पण त्याच्या गाठीला काही पैसेही मी देणार आहे…” काहीसे अडखळत साहेब बोलत होता आणि नीता मात्र आपल्या जन्मदात्या पित्यामधील सैतान आज पहात होती.

“अहो… मी तुमच्या मुलीसारखी आहे… किमान तो तरी विचार करा..!!!” न राहवून तिने म्हटले. साहेबाला हा आवाज ओळखीचा वाटला. पण दारूने आणि वासनेने साहेबाच्या विचारशक्तीवर आधीच अंमल बसवला होता.

“ए… गप… तिचं नांव इथं घेऊ नको… तिचा बाप, तुझ्या बापासारखा हतबल नाहीये… चल पुढं ये मुकाट्यानं…” म्हणत तो पलंगावर जाऊन बसला आणि गौरीची वाट पाहू लागला. आता मात्र गौरीच्या पेहरावातील नीता दारात आली.

“अरे… पदरानं तोंड का झाकलंय तू? तुला सांगितलं ना… तुझ्या बापाचं कर्ज माफ करणार म्हंजे करणार…” काहीशा लाडिक स्वरात तो म्हणाला. नीता मात्र आहे तिथेच उभी होती. शेवटी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागणार हे लक्षात येऊन साहेब पुढे झाला. त्याने आपल्या हाताने नीताच्या चेहऱ्यावर असलेला पदर बाजूला केला आणि जितक्या वेगाने तो पुढे आला होता तितक्याच वेगाने मागे सरकला. दारूच्या नशेत असल्यामुळे त्याला आपला तोल सांभाळता आला नाही आणि तो मागे असलेल्या पलंगावर काहीसा आदळलाच.

“आं… तू?” त्याने आपले डोळे चोळत विचारले. हा धक्का त्याच्यासाठी खूप मोठा होता. आपली पोटची पोर आपल्या समोर अशा पद्धतीने येऊ शकेल हा त्यांने स्वप्नातही विचार केला नव्हता.

“हो… आश्चर्य काय त्यात?” अगदी कडवट सुरात नीता उत्तरली. तिच्या डोळ्यात अंगार फुलत होते आणि चेहऱ्यावर तुच्छतेचे भाव होते.

“तू इथं कशी?” स्वतःला काहीसे सावरत त्याने विचारले. त्याच्या मनात आता संताप उफाळून येत होता.

“बाबा… ही देखील तुमचीच कृपा… तुम्ही त्यांच्या मुलीला टार्गेट केलं आणि त्यांनी तुमच्या मुलीला.” नीता म्हणाली. त्यावर काय बोलावे हेच साहेबाला समजेना.

“आणि हो… गौरी खरंच भाग्यवान आहे… कारण तिला असे आईबाप लाभले, जे भलेही गरीब असतील पण त्यांनी आपल्यातील माणुसकी सोडली नाही. मला पळवून आणल्यानंतर रागाच्या भरात ते काहीही करू शकत होते पण त्यांनी मलाही त्यांच्या पोटच्या मुलीप्रमाणे वागवले. आणि मी मात्र खूपच भाग्यहीन आहे… कारण मला तुमच्यासारखा जन्मदाता लाभला. जो वासनेच्या आहारी जाऊन पशु बनतो आणि मग त्याला वयाची, नात्याची, समाजाची आणि इतरांच्या दुःखाचीही चाड रहात नाही. या लोकांच्या वाऱ्यालाही उभी रहाण्याची तुमची लायकी नाही. हे लोक शत्रूच्या मुलीलाही पोटची मुलगी मानतात आणि तुम्ही? छी… लाज वाटतेय मला तुमची. आणि तुम्ही समाजात तोंड दाखवण्याच्या बाता करता? आता तुमच्या ह्या गोष्टी समाजात समजल्या तर काय तुमचा मान वाढणार आहे?” नीता बोलत होती आणि साहेब मान खाली घालून फक्त ऐकत होता. त्याला ज्यावेळेस तिचे बोलणे असह्य झाले त्यावेळेस त्याने दरवाजा गाठला. दाराला लावलेली कडी काढून दार उघडले. विसुनाना, शांता, बबन्या, सागर आणि आकाश बाहेरच त्यांचे बोलणे ऐकत उभे असलेले त्याला दिसले. विसुनानाच्या डोळ्यात त्याला तुच्छता साफ दिसून आली. त्याने आपली नजर खाली वळवली आणि तो तडक आपल्या कारमध्ये जाऊन बसला.

शांता जवळपास धावतच घरात शिरली.

“पोरी..!!!” म्हणत तिने नीताला कवटाळले आणि नीताच्या अश्रूंचा बांध फुटला. काही वेळातच कपडे बदलून नीताही गाडीत जाऊन बसली आणि काहीशी वेगातच साहेबाची कार अंधारात दिसेनाशी झाली.

क्रमशःकर्जवसुली भाग ९,कर्जवसुली भाग ९.

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a comment