कर्मभोग भाग १२

कर्मभोग भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

कर्मभोग भाग १२ –

स्वामीजी संदिपच्या घरी पोहोचले तो पर्यंत निलेशला रेवा घेऊन सुद्धा गेली होती. घराचे दार सताड उघडे होते. संदिपने टाहो फोडलेला होता आणि मनाली तिथेच एका बाजूला दगड होऊन बसलेली होती.

“अलख निरंजन…” स्वामीजींनी आवाज दिला.

स्वामीजींना पाहताच तिने धावत जाऊन त्यांचे पाय धरले.

“स्वामी… स्वामी… मी चुकले… मी खरंच चुकले. तुमच्या वाक्याचा अर्थ आज मला समजला आहे आणि कुठेतरी माझ्या नवऱ्याच्या पापात मीही सहभागी होत आहे की काय याची बोच मला छळते आहे. आता ज्या ज्या वेळेस मी माझ्या नवऱ्याकडे पाहील त्या त्या वेळेस मला फक्त हेच जाचत राहील.” अगदी तुच्छतेने आपल्या नवऱ्याकडे पहात ती बोलली.

“मुली… प्रत्येक स्त्री आपला संसार वाचावा यासाठी जितका होईल तितका प्रयत्न करते. तुही तेच केलेस, त्यात तुझी काहीच चूक नाही. पण आता इथे थांबून तसा काहीच उपयोग नाही. ती बंधनातून सुटली हेही मला लगेचच समजले होते पण तरी मी इथे आलो कारण ती उद्या परत इथे येईल. तुझ्या नवऱ्याला मारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल पण तिला याच गोष्टीपासून मला परावृत्त करायचे आहे.” मनालीची समजूत काढत स्वामींनी आपल्या झोळीत हात घातला. त्यातून काही विभूती हातात घेऊन मंत्र म्हटला आणि सगळ्या खोलीभर उधळली.

“मुली… उद्या ती इथे आल्यानंतर परत बंदिस्त होईल. पण आता तिला कुणीही सोडवू शकणार नाही. मी येईलच परत…” तिला धीर देत स्वामीजी म्हणाले.

“तुला जर जिवंत राहायचे असेल तर घराबाहेर पडू नकोस. नाहीतर मीच काय कुणीही तुला तिच्यापासून वाचवू शकणार नाही.” संदिपकडे एक तुच्छ कटाक्ष टाकत स्वामीजी म्हणाले आणि अलख निरंजनचा घोष करत ते बाहेर पडले.

त्यानंतर तिने संदिपशी पूर्ण अबोला धरला. संपूर्ण घरात भयाण शांतता पसरली होती. दोघांपैकी कुणीही टीव्ही लावण्याच्याही फंदात पडले नव्हते. दोघेही आपापल्या विचारात मग्न होते. एक प्रकारचा तणाव सगळ्या खोलीत भरला होता. रेवाने आता इथे येऊ नये असे मनालीला वाटत होते तर रेवा इथे आल्यावर स्वामीकडून तिचा नाश व्हावा आणि आपण कायमसाठी मुक्त व्हावे असे संदिपला वाटत होते. यात रात्र कधी झाली हे दोघांनाही समजले नाही. रात्रीचे जेवण घेण्याची सुद्धा कुणाला इच्छा नव्हती. संदिप तर सोफ्यावरून उठला सुद्धा नाही. मनाली मात्र रात्र वाढली तशी आपल्या बेडरूममध्ये आली, पण तिच्या डोळ्यावर अजिबात झोप नव्हती. तिच्या डोळ्यासमोर कधी संदिप तर कधी तिची मुलगी सोनू येत होते. तर कधी रेवाचा तो मोहक चेहरा येत होता. रेवाचा चेहरा आठवला की तिचे मन अपराधी भावनेने भरत होते. ज्या रेवाला तिने बांधले होते त्या रेवाने बंधनमुक्त झाल्यावर सुद्धा तिच्याबद्दल कोणताही राग व्यक्त केला नव्हता. यातूनच रेवाच्या स्वभावातील चांगलेपणा मनालीला जाणवला होता. आणि उद्या रेवा आल्यावर परत बांधली जाणार आणि तिचा बदला पूर्ण होण्याच्या आधीच स्वामीजी तिचा नाश करणार याचे तिला राहून राहून दुःख वाटत होते. या विचारात कधी झोप लागली हे तिचे तिलाच समजले नाही.

दुसरा दिवस उजाडला. दोघांच्या मनावरील ताण अजूनही कमी झालेला नव्हता. तसा एक दोनदा संदिपने मनालीशी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला मनालीकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. त्याला बाहेर सुद्धा पडता येत नव्हते कारण जो पर्यंत आपण घरात आहोत… सुरक्षित आहोत… हे त्याला चांगलेच उमजले होते.

दारावरची बेल वाजली. इतक्या सकाळी कोण आले असेल? मनाली विचार करत होती. रेवा तर नसेल? कारण सगळ्यात पहिल्यांदा रेवा अशीच बेल वाजवून घरात आली होती. संदिपने सुद्धा बेलचा आवाज ऐकला होता पण त्याला दार उघडण्याचे धारिष्ट्य झाले नाही. शेवटी मनालीने जाऊन दार उघडले. दारात प्रिया उभी होती. मनालीने आधी ओळखलेच नाही त्यामुळे ती फक्त प्रियाकडे पाहत राहिली, तिच्या चेहऱ्यावरील अनोळखी भाव प्रियाला लगेच जाणवले.

“मला ओळखलं का? मी प्रिया… आपण १०/१२ दिवसांपूर्वी भेटलो होतो.” प्रियाने मनालीला आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. अर्थात मनालीला सुद्धा हे आठवले होते पण घरातले वातावरण पाहता तिला दारातूनच परत पाठवावे या उद्देशाने ती दारातच उभी राहिली…

“हो… ओळखलं…” तिनं उत्तर दिलं पण हे म्हणताना तिच्या चेहऱ्यावर असलेलं टेन्शन प्रियाला लगेच जाणवलं.

“मी आत येऊ का?” मानली आपल्याला बहुतेक दारातूनच कटवायच्या विचारात आहे असे पाहून प्रियाने विचारले.

“अं… हो… हो… येना…” आता मात्र ही घरात आल्याशिवाय राहणार नाही हे जाणून ती दारातून बाजूला होत म्हणाली.

“असं करू… आपण माझ्या बेडरूम मध्येच बसू… काय?” बाहेरच्या सोफ्यावर संदिप बसला होता. त्याच्याशी ओळख करून देणे नको म्हणून मग मनाली प्रियाला म्हणाली आणि प्रिया सुद्धा संदिपकडे पूर्ण दुर्लक्ष करत मनालीच्या मागे बेडरूम मध्ये शिरली.

“बोल प्रिया… आज इकडे कशी?” आपण अगदी मोकळेपणाने बोलतो आहोत असे भासवत मनालीने विचारले.

“मी भेटायला आले आहे…” प्रियाने अगदी मोघम उत्तर दिले.

“भेटायला?” मनाली पूर्ण गोंधळली.

“हो… मला माहिती नाही मी जे सांगणार आहे त्यावर तू कशी रीअॅक्ट होशील… पण… मी रेवाला भेटायला आले आहे.” मनालीने प्रियाचे शब्द ऐकले आणि परत तिचे विचारचक्र सुरु झाले. आपल्या नवऱ्याने हिला सुद्धा फसवले तर नसेल? किंवा ही सुद्धा रेवा सारखी? हा विचार आला आणि ती मनातून कचरली. पण लगेच तिने स्वतःला सावरले.

“रेवाला? तुला कसे माहित ती इथे येणार आहे म्हणून? तू सुद्धा……” प्रश्न विचारात असतानाच मनाली थांबली, पुढचे बोलणे अर्धवट टाकून जागेवरून उठू लागली. तिची ही स्तिथी लक्षात यायला प्रियाला बिलकुल वेळ लागला नाही आणि तिला त्याही परिस्थितीत हसू आले.

“ए… नाही… नाही… मी जिवंतच आहे…” मनालीचा हात धरत प्रिया म्हणाली.

“पण मग तुला रेवाबद्दल कसे माहिती? आणि ती इथेच येणार हे तुला कुणी सांगितले?”

“हे मला माझ्या वडिलांनी सांगितले… आणि काल तू जे रेवाला बांधले होतेस त्या वेळेस तिची सुटका सुद्धा त्यांनीच केली….” आणि मग एकेक करत प्रियाने मनालीला सगळे सांगून टाकले. अगदी रेवाची गाठ कशी पडली, तिने कशी मदत केली इथ पासून ते या क्षणापर्यंत. त्यांचे बोलणे चालू होते इतक्यात त्यांना बाहेर रेवाचा आवाज ऐकू आला.

“संदिप… बघ… आले मी तुला न्यायला. आणि हो… तुझ्या त्या मित्राने… तो रहात असलेल्या इमारतीवरून उडी मारली. बिचारा… जागच्या जागी गेला. आता आपण सुद्धा जाऊ… चल… तयारी करून ठेवली आहेस ना?” असे म्हणत ती संदिपच्या जवळ जसजशी जाऊ लागली तसतशी तिला आपण बांधले जात आहोत अशी जाणीव होऊ लागली. तेवढ्यात मनाली आणि प्रिया बाहेरच्या खोलीत आल्या. रेवा बांधली गेली तरी कधीही मोकळी होऊ शकते हे संदिपने आदल्या दिवशीच अनुभवले असल्यामुळे तो मात्र भीतीने थरथरत होता.

“ताई…“ प्रिया रेवाच्या दिशेने धावतच गेली.

“प्रिया… अगं तुला इथे यायची काय गरज होती? मी येणारच होते की तिकडे…” प्रियाला पाहताच रेवा उद्गारली. आणि तेवढ्यात बाहेर “अलख निरंजन” चा गजर ऐकू आला. मनाली दाराकडे गेली. बाहेर स्वामीजी उभे होते. तिने धावत जावून त्यांचे पाय पकडले.

“स्वामी… रेवाला शिक्षा करू नका हो…” तिने स्वामींना विनंती केली.

“मुली… मी रेवाला शिक्षा करण्यासाठी नाही तर तिचं भलं करण्यासाठी आलो आहे. चल…” असे म्हणत स्वामीजी आत आले. रेवाला बांधणारे स्वामी हेच आहेत हे प्रियाने ताडले आणि तिने त्यांचे पाय धरले.

“स्वामी… माझ्या ताईला सोडा हो… तिची काहीच चूक नाही… हवे तर तिच्या ऐवजी मला शिक्षा करा…”

“मुली… ऊठ… स्वतःच्या कर्माचे भोग स्वतःलाच भोगावे लागतात.” तिला उठवत स्वामी म्हणाले आणि त्यांनी रेवाकडे नजर वळवली.

“मुली… तुझ्या मनातील सुडाची भावना सोडून दे. सुडाची भावना फक्त घात करते. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही.” त्यांनी रेवाला समजावण्याचा प्रयत्न केला.

“नाही… तुम्ही माझ्या मध्ये येऊ नका… मी याला असा सोडणार नाही. आज जर हा सुटला तर उद्या इतर मुलींचा घात करायला हा मागेपुढे पाहणार नाही. सोडा मला… सोडा…” रेवा चवताळून म्हणाली.

“मुली शांत हो… कुणीच कर्मभोगापासून अलिप्त नाही… प्रत्येकाला तो भोगावाच लागतो. कर्मभोगापासून त्रिदेव सुद्धा सुटले नाहीत तर याची काय कथा? याला याच्या पापाची शिक्षा जरूर मिळेल. पण त्यासाठी तू तुझा पुढचा प्रवास दुष्कर करू नकोस. याने जे केले ती एक वृत्ती आहे. आणि माणूस मेला म्हणून वृत्ती मरत नाही. त्यासाठी हा पर्याय नाही. एक लक्षात ठेव… आग विझवण्यासाठी कधीच आगीचा वापर केला जात नाही. त्यासाठी शीतल पाणीच लागते. याने एक पाप केले आणि त्याचा सूड म्हणून आपण दुसरे पाप करणे योग्य नाही. आज तू याला मारशील, त्याने तुला क्षणिक समाधानही मिळेल, पण उद्या परत असाच एखादा माणूस तयार होणार नाही याची काही खात्री आहे का? मग अशा किती जणांना तू मारू शकशील? आणि फक्त अशा लोकांना मारण्यासाठी तू याच पिशाच्य योनीत खितपत पडणार? हे फक्त इतरांना अवलक्षण व्हावं म्हणून स्वतःचं नाक कापून घेण्यासारखं आहे. याचा नीट विचार कर.”

“हो ताई… ही सुडाची भावना सोडून दयावीस असेच मलाही वाटते.” प्रियाने स्वामीजींच्या बोलण्याला दुजोरा दिला.

“प्रिया… तुलाही असेच वाटते? ठीक आहे. पण एक लक्षात ठेव, मी जरी याला तसे सोडत असले तरी मी याला माफ केलेले नाही… करणारही नाही…” काहीसे शांत होत रेवा म्हणाली.

“हाहाहा… हाहाहा… हाहाहा…” संदिपचा स्वर वातावरणात घुमला… तो मोठमोठ्याने हसायला लागला. सगळ्यांनी त्याच्याकडे पहिले. त्याच्या डोळ्यात आता वेडाची झाक दिसू लागली होती. तो तसाच पळत सुटला आणि समोर असलेल्या भिंतीवर डोके आपटून घेतले. मनाली तिथे धावत जाईपर्यंत त्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागली आणि तो भोवळ येऊन खाली पडला.

“मुली…” मनालीकडे पहात स्वामीची बोलले. स्वामीजी आपल्याशी बोलत आहेत असे लक्षात आल्यावर मनालीने त्यांच्याकडे पाहिले.

“तू जेव्हा माझ्याकडून दुसरा आशिर्वाद मागून घेतलास त्यावेळेस मी तुला म्हटले होते… कधी कधी मागून घेतलेला आशिर्वाद हा शाप ठरू शकतो… ते यासाठीच. तुझा नवरा बिलकुल मारणार नाही. पण ज्या ज्या वेळेस तो शुद्धीवर येईल त्या त्या वेळेस काही वेळच तो ठीक असेल त्यानंतर परत त्याला असाच झटका येईल आणि तो आपल्या शरीराला त्रास देण्याचा प्रयत्न करेल. हे सगळे तुला त्याची बायको म्हणून फक्त सहन करावे लागेल. अगतिकपणे…” स्वामींच्या बोलण्यातील धग आता मनालीला जाणवू लागली होती.

हळूहळू रेवाला आपली सगळी बंधने सुटत आहेत असे लक्षात आले. तिने लगेच स्वामींच्या समोर जाऊन त्यांना प्रणाम केला.

“मुली… तू खूप सोसलं आहेस. पण काही गोष्टी या पूर्वकर्मामुळे आपल्या वाट्याला येत असतात. त्यासाठीच आपले कर्म नेहमी चांगले ठेवावे. असो… तुला मी आता पुढची गती देत आहे. या पिशाच्य योनीतून तुझी सुटका करून…”

“स्वामीजी… मला प्रियाला आणि मनालीला काही सांगायचंय…” असे म्हणून तिने स्वामींची परवानगी घेतली.

‘प्रिया… तुझा आणि माझा कोणताही रक्ताचा संबंध नसताना तू माझी लहान बहिण बनलीस, काकांनी माझ्यासाठी सगळे अर्जित पुण्य पणाला लावले आणि वडिल मुलीसाठी काय करू शकतात हे दाखवून दिले. इतके दिवस मला आईवडील, भावंडे नाहीत याचे खूप वाईट वाटायचे पण आज मात्र मी हे सगळे नाते माझ्या बरोबर घेवून जाणार आहे. आज मला लहान बहीणही आहे आणि आईवडीलही.” बोलता बोलता तिचे डोळे भरून आले. प्रियाच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहू लागल्या. नंतर ती मनाली समोर आली.

“मनाली… मी तुझी अपराधी आहे. कारण माझ्या या सुडाने तुझा संपूर्ण संसार उध्वस्त झाला. याबद्दल मी तुझी माफी मागते. मला क्षमा कर…” रेवाने मनालीपुढे हात जोडले. तिचे हात लगेचच मनालीने आपल्या हातात घेतले.

“नाही रेवा… माफी मागायची काहीच गरज नाही. स्त्रीचा अपमान करणाऱ्या प्रत्येक राक्षसाचा अंत झालाच पाहिजे… मग तो आपल्याला अगदी जवळचा असला तरी…”

नंतर प्रियाला जवळ बोलावत रेवाने दोघींकडे पाहत म्हटले.

“तुम्हा दोघींना माझी विनंती आहे. स्वामीजींनी सांगितले तसे स्त्रीवर अत्याचार करणे ही एक प्रवृत्ती आहे आणि आता त्याविरुद्ध उभं राहण्याची गरज आहे. तुम्हा दोघींना जितके शक्य होईल तितके लहान मुलांना संस्कारित करण्यासाठी कार्य करा. स्त्री आणि पुरुष हे समान नाहीत तर पूरक आहेत हे लहान मुलांप्रमाणेच त्यांच्या पालकांवर सुद्धा ठसवा. सांगा… करालं ना इतकं माझ्यासाठी?” आणि दोघींनीही होकार दर्शवला.

“चला… येते मी…” असे म्हणत ती स्वामींपुढे जावून उभी राहिली. स्वामींनी आपल्या झोळीत हात घातला. त्यातून थोडीशी विभूती आपल्या हातावर घेतली. त्याची मुठ वळून तो हात आपल्या उजव्या छातीकडे नेला आणि डोळे मिटून मंत्र म्हणायला सुरुवात केली. मंत्र पूर्ण झाल्यावर त्यांनी हात पुढे घेऊन वळलेली मुठ सोडली. वाऱ्याच्या झुळूकेबरोबर हळूहळू ती विभूती उडत होती आणि त्याच बरोबर रेवाचा देह वातवरणात विलीन होत होता. पण जातांना मात्र तिच्या चेहऱ्यावर एक स्मित होते… समाधानाचे स्मित… आणि प्रिया… तिच्या डोळ्यात मात्र अश्रू होते… सगळ्यात जवळच्या व्यक्तीच्या वियोगाचे.

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a comment