कर्मभोग भाग १३ –
संदीप जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा रेवा तिच्या सौम्य रुपात तिथेच बसलेली होती.
“संदीप…! आता कसं वाटतंय?” तिने त्याच्याकडे पहात विचारले आणि संदीपने मोठ्याने टाहो फोडला. रेवा तिथेच बसून मोठमोठ्याने हसत होती. थोड्या वेळात ती उठली.
“संदीप… आता तुझ्या बायकोलाही एकदा भेटून घेते. आणि हो तुझे ते हलकट मित्र… त्यांनाही भेटायचे राहिलेच आहे की. आधी त्यांना आपल्यासाठी खोली बुक करायला पाठवते आणि मग तुला घ्यायला येते. तो पर्यत तू निवांत रहा. अशीच पार्टी कर. मित्रांशी भेटून घे. आणि हो, जी काही इस्टेट तुझ्या नावावर असेल आधीच बायकोच्या, मुलीच्या नावावर करून ठेव हो. मी जाते आता. येत जाईन तुला भेटायला. रोज..! न चुकता..!! काय आहे ना, मला तरी कोण आहे रे तुझ्याशिवाय? तुझ्याशिवाय इतके दिवस मी कसे काढले हे माझे मलाच माहित..! तू आता आराम कर हं..!!!” इतके बोलून अट्टाहास करत ती दिसेनासी झाली.
संदीप मोठमोठ्याने रडतच होता. त्याची नशा कधीच उतरली होती. ज्याच्यामुळे अनेक मुलींना रडण्याची वेळ आली होती तोच आज मोठमोठ्याने रडत होता आणि त्याच्या जवळ हे ऐकण्यासाठी कुणीही नव्हते. रेवा सुद्धा नाही.
मनाली, संदीपची बायको घरी आली त्यावेळेस घराचा अगदी अवतार झालेला होता. संदीपने दार उघडले आणि अस्ताव्यस्त पडलेल्या दारूच्या बाटल्या पाहून ती भडकली.
“काहो..! मी एक दिवस तुमच्या पासून दूर काय गेले. तुम्ही अगदी घराचा बार बनवला?” सगळ्या पसरलेल्या बाटल्या एकत्रित करत ती म्हणाली. एरवी तिच्या अशा बोलण्यावर संदीप भडकला असता किंवा मग अगदी लाडीगोडीत तरी आला असता, पण आज तसे काहीच घडले नाही याचे तिला काहीसे आश्चर्य वाटले.
“तरी बरं मी सोनुला आजीकडे ठेवून आले. तिने हे सगळे पाहिले असते तर मी तिला पसारा घालू नको असे कोणत्या तोंडाने बोलू शकले असते?” एकीकडे तिची बडबड आणि एकीकडे तिचे आवरणे चालूच होते. इतके बोलूनही आपला नवरा आज इतका शांत कसा म्हणून तिने त्याच्याकडे पाहिले.
“ओ… बोला ना काहीतरी… असे गप्प का? काय झाले ते तर सांगा…” तिने विचारले आणि तिच्या जवळ येत आणि तिच्या खांद्यावर डोके टेकवत संदीप ओक्साबोक्सी रडू लागला. आपल्या नवऱ्याचे हे रुप तिने या आधी कधीही पाहिले नव्हते. तो चिडत होता, संतापत होता, आपल्या शब्दांनी इतरांना दुखावत, त्यांना रडायलाही लावत होता पण तिने कधी त्याच्या डोळ्यात अश्रूंचा थेंबही पाहिला नव्हता. आता मात्र तिच्या मनात धस्स झाले.
“ओ… अहो बोला ना काहीतरी… काय झालेय? असे रडताय का? व्यवसायात मोठा तोटा झाला का? की आपल्या नातेवाईकांचा कुणाचा काही वाईट निरोप आला? काय झालेय ते तर सांगा आधी…” ती अगदी घाबऱ्या आणि काळजीच्या स्वरात एकावर एक प्रश्न करू लागली.
“ती… ती परत आलीये…” स्वतःवर काहीसे नियंत्रण मिळवत संदीप बोलला.
“ती? कोण ती? आणि परत आलीये म्हणजे?” मनालीला संदीप काय बोलतोय याचा काहीच उलगडा होईना.
“ती… रेवा… रेवा परत आलीये…” त्याने अडखळत अडखळत सांगितले.
“रेवा? ही कोण बया? तुमचं काही लग्नाआधी लफडं होतं की काय?” त्याला आपल्यापासून बाजूला करत तिने विचारले. काय बोलावे हे आधी संदीपला सुचेना पण लगेचच त्याने स्वतःला सावरले.
“अगं… नाही गं… मी आतापर्यंत तुझ्याशिवाय कोणत्या स्त्रीकडे पाहिलेही नाहीये. रेवा आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो. त्यावेळेस मी तिला आवडायचो. तिने ते मला बोलूनही दाखवले होते. पण मी तिला स्पष्ट नकार दिला आणि तिने नंतर ते कॉलेज सोडले. त्यानंतर तिचे काय झाले हे मला माहिती नाही. पण काल ती इथे आली होती आणि आता मी तुला घेवून जाणार हे सांगून गेली आहे.” संदीपने पूर्ण थाप मारली.
“अहो… मग त्यात रडण्यासारखं काय आहे? आपण पोलिसात जाऊ. माझ्या भावाच्या बऱ्याच ओळखी आहेत.” त्याचे सांत्वन करत ती म्हणाली.
“मनू…! त्याने काही फायदा होणार नाही गं. तिने मध्यंतरी आत्महत्या केली आणि आता ती मला घेवून जाणार असे म्हणते आहे. ती जिवंत नाहीये. ते भूत आहे भूत.” आणि परत एकदा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एरवी तिला कुणी असे सांगितले असते तर तिचा यावर बिलकुल विश्वास बसला नसता. अगदी संदीपने सांगितले असते तरीही. पण संदीपची ती स्थिती पाहून त्यातील गांभीर्य तिला जाणवले.
“अरे देवा…” म्हणत ती खाली बसली. क्षणभर तिचे विचारच खुंटले. सगळ्यात पहिला विचार तिच्या मनात मुलीचा म्हणजे सोनूचा आला आणि ती जास्तच हळवी बनली.
“अहो… पाहिजे तर मी तिच्यापुढे पदर पसरते. तिच्याकडूनच माझ्या सौभाग्याचं दान मागते…” तिच्याही डोळ्यात अश्रू होते.
“नाही गं..!! त्याचाही काही उपयोग होईल असे वाटत नाही. ती मला सांगून गेली आहे. ती तुला भेटून माझ्याविषयी खोटंनाटं सांगणार आहे. म्हणजे तुही मला सोडून देशील…” त्याने परत दुसरीही थाप मारली.
“नाही हो नाही… तीच काय पण अगदी ब्रम्हदेव जरी आला आणि त्याने मला तुमच्याबद्दल काही विचित्र सांगितलं तरी मी त्यावरही विश्वास ठेवणार नाही.” ती त्याला जवळ घेत म्हणाली आणि त्याही स्थितीत त्याला जरा हायसे वाटले.
“मला माहिती आहे मनू… तू मला नेहमीच साथ देशील…”
“आता ऊठा… देवावर पूर्ण विश्वास ठेवा. तो कधीच असत्याची बाजू घेणार नाही. आधी खोली आवरू…” असे म्हणत ती उठली आणि डोळे पुसून परत खोली व्यवस्थित करायला लागली.
दुपारी संदीप ऑफिसला गेला होता. मनालीचंही काम चालू होतं आणि दारावरील बेल वाजली. मानलीनं दार उघडलं. दारात एक २५/२६ वर्षाची मुलगी उभी होती. सलवार कमीज घातलेली आणि हसतमुख चेहऱ्याची.
“कोण पाहिजे?” मनालीने विचारले.
“आत येऊन बोलू का?” तिच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळत त्या मुलीने प्रतिप्रश्न केला.
“हो… ये ना… पण मी ओळखलं नाही…” तिला आत घेत मनाली म्हणाली.
“माझ्याबद्दल तुम्हाला तुमच्या नवऱ्याने सांगितलेच असेल ना?” ती मुलगी हसत हसत म्हणाली.
“माझ्या नवऱ्याने? तुमच्या बद्दल?” मनाली हे म्हणताच मनात विचार करू लागली आणि सकाळचा प्रसंग तिला आठवला. म्हणजे ही रेवा तर नाही? आणि ही इथे आपल्याला काय सांगायला आली आहे? एकामागून एक विचार तिच्या मनात येत होते आणि ती रेवाचे बारकाईने निरीक्षण करू लागली. एका क्षणाला तर तिच्या मनात हाही विचार आला की अशा सुंदर मुलीचे प्रेम धुडकावून लावणारा आपला नवरा म्हणजे अगदीच बावळट आहे. पण नंतर आपल्या समोर उभी असलेली मुलगी जिवंत नसून एक भूत आहे हा विचार आला आणि ती काही पावले मागे सरकली.
क्रमशःकर्मभोग भाग १३.
मिलिंद जोशी, नाशिक…