कर्मभोग भाग १६

कर्मभोग भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

कर्मभोग भाग १६ –

“मी ठरवलं असतं तर तुला तुझ्या घरीही गाठू शकले असते. पण त्याने संदिपला कसं कळलं असतं? मग विचार केला. तुमची मैत्री इतकी गाढ आहे तर दोघांनाही एकाच वेळेस भेटावं. मग आले इथेच…” रेवाच्या चेहऱ्यावरील निर्विकार भाव बिलकुल ढळलेला नव्हता.

“का अशी छळतेस मला? एकदाचा जीव घे आणि हो मोकळी…” संदिपचा तोल सुटला आणि तो मोठ्यांने ओरडला. निलेश तर अगदी गप्पच बसला होता. कारण एकतर रेवाला कुणी घाबरावे अशी ती बिलकुल दिसत नव्हती. तिचा चेहराही अगदीच निर्विकार होता. आणि ती एका कोपऱ्यात अगदी शांत उभी होती. पण संदिपचा आवाज मनालीच्या कानावर पडला आणि ती हादरली. पण फक्त काही क्षणच. तिने लगेचच स्वामींनी दिलेली विभूती हातात घेतली आणि ती काहीशी धावतच बाहेर आली. आल्या आल्या तिने हातातील विभूती रेवाच्या दिशेने उधळली आणि रेवाला आपण बांधले जात आहोत हे जाणवू लागले. तिच्या चेहऱ्यावरील शांत भाव आता बदलत जावू लागले आणि तिचा चेहरा संतापाने लाल झाला. आता ती त्या जागेवरून जरा देखील हलू शकत नव्हती.

“मनाली… तू हे बिलकुल चांगले केले नाहीस. तू या दोघांना वाचवून यांच्या पापात भागीदार होते आहेस. पण लक्षात ठेव मी फार वेळ बंधनात राहणार नाही. जो पर्यंत मी यांचा सूड घेत नाही तो पर्यंत बिलकुल शांत बसणार नाही.” रेवा चवताळून म्हणाली.

“रेवा… तुला मी आधीच सांगितले होते. तुझ्या आणि संदिपच्या मध्ये मी आहे म्हणून. आता त्याचा जीव घेणे दूरच, पण त्याचा केसही तू वाकडा करू शकणार नाहीस. काही वेळातच स्वामीजी येतील आणि तुला चांगली अद्दल घडवतील. पहाच तू…” मनालीने रेवाला जशास तसे उत्तर दिले. संदिप आणि निलेश हे सगळे अगदी घाबरून पहात होते. पण जशी रेवा बांधली गेली तसे दोघेही शूर झाले.

“साली… फार उद्या मारत होतीस ना? त्यावेळेस ही तू आमचे काही वाकडे करू शकली नाहीस आणि आताही काही वाकडे करू शकणार नाहीस…” संदिपच्या अंगात आता चांगलाच जोर आला होता.

“संद्या… च्यायला हिचे… आपल्याला शिक्षा करायला आली होती. त्यावेळेस आमचे ऐकले असते तर तुला राणी बनवून ठेवले असते. तिघांची… ह्या ह्या ह्या…” निलेश संदिपला टाळी देत म्हणाला.

“आयला निल्या, आज ही आली. उद्या त्या आल्या तर?” संदिप निलेशकडे पहात उपरोधिक स्वरात म्हणाला.

“तर? अरे तर काय. जशी ही आता आपल्या घरात शोभेची बाहुली बनली, तशा त्या दोघीही दुसऱ्या दोन कोपऱ्यात उभ्या राहतील… येणाऱ्या जाणाऱ्यांचं मनोरंजन करत…” निलेशने संदिपच्या बोलण्यावर कोटी करत म्हटले. मनाली संदिपचा आणि त्याच्या मित्राचा असा किळसवाणा चेहरा पहिल्यांदाच पहात होती. त्यांचे हे रूप पाहून ती चांगलीच भडकली.

“तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर कसे काय उतरलात?” संदिपच्या समोर जावून त्याच्याकडे पहात ती उद्गारली.

“मनाली… बरं झालं… मी देवाचे आभार मानते. त्याने या दोघांचा खरा चेहरा तुझ्यासमोर आणला.” एकीकडे सुटण्याची धडपड करत रेवा म्हणाली.

“हो हो हो वहिनी… अहो संदिप नवरा आहे तुमचा… म्हणजे पती. आणि पती परमेश्वर असतो…” उपरोधिक स्वरात निलेश म्हणाला आणि आपण रेवाला बांधून चूक केली असे मनालीचे एक मन तिला सांगू लागले. ‘मुली तू मला धर्म संकटात टाकलेस…’ या स्वामींच्या वाक्याचा अर्थ आता तिच्या लक्षात येत होता.

आपल्या आश्रमात ध्यान करत बसलेल्या स्वामींनी आज नेहमीच्या वेळेआधीच आपली समाधी सोडली होती. तिकडे रेवा बांधली गेली आहे हे त्यांना ध्यानातच समजले होते. कुणाशीही काहीही न बोलता त्यांनी आपली झोळी, चिमटा उचलला आणि ते झपाझप पावले टाकत आश्रमातून बाहेर पडले.

रेवा बांधली गेले हे जसे स्वामींना समजले होते तसेच ते अजून एका व्यक्तीलाही समजले होते… गुरूंना.

“प्रिया.., रेवा संकटात आहे. तिला आपली गरज आहे.” त्यांनी प्रियाला सांगितले.

“ताई आणि संकटात?” प्रियाने काळजीच्या स्वरात विचारले.

“हो… ती बांधली गेली आहे. मला वाटते कुणीतरी सिद्ध पुरुषाने तिला बांधले आहे.” असे म्हणत त्यांनी ध्यान लावण्याची तयारी सुरु केली.

“ती त्या संदिपच्या घरी आहे. प्रिया.., तू आताच साताऱ्याला निघ. मी हे नाही सांगू शकत की तुझ्या जाण्याचा कितपत उपयोग होईल, पण किमान आता तरी मी तिला या बंधनातून सोडवतो. पण त्यानंतर मात्र माझी सगळी शक्ती संपलेली असेल. मी तिला सोडवण्यासाठी आता पर्यतचे सगळे पुण्य पणाला लावणार आहे. तू लगेच निघ…” त्यांनी प्रियाला सांगितले आणि ते लगेच देवापुढे जाऊन ध्यानाला बसले.

रेवाला आता आपली बंधने हळूहळू तुटत आहेत याची जाणीव झाली आणि तिचा चेहरा खुलू लागला. काही वेळातच ती त्या बंधनातून पूर्ण मोकळी झाली. ती बंधनातून सुटलेली पाहताच संदिप आणि निलेशची पाचावर धारण बसली. असे कसे झाले हे मनालीला समजेना. स्वामींनी आपल्याला विभूती दिली होती. त्यानुसार रेवा बांधलीही गेली होती. पण ती यातून मोकळी कशी झाली याचाच विचार करत असतानाच रेवा तिच्या समोर येऊन उभी राहिली. रेवाला समोर पाहताच मनाली चांगलीच घाबरली.

“मनाली, घाबरू नकोस…! माझा तुझ्यावर अजूनही राग नाही. तुझ्या जागी मी असते तर पतीला वाचवण्यासाठी मीही हेच केले असते. पण यामुळे तुझ्यासमोर तुझ्या नवऱ्याचा खरा चेहरा आला हे खूप चांगले झाले. या संदिपने माझ्याशी प्रेमाचे नाटक केले. माझ्याशी लग्न केले आणि मग मला त्याच्या या मित्रांच्या हवाली करायला निघाला. म्हणून मला आत्महत्या करावी लागली. माझी आबरू वाचावी म्हणून. आणि हेच नाही तर माझ्यानंतरही यांनी अजून दोन जणींना असेच फसवले. आता तूच सांग. मी यांना कसे माफ करू?” हे ऐकत असताना मनालीच्या चेहऱ्यावर आपल्या नवऱ्याबद्दलची घृणा वाढत चालली होती. काय बोलावे हेच तिला सुचत नव्हते. तिची ही स्थिती पाहून रेवाने तिच्या खांद्यावर काहीसे थोपटले आणि आपला मोर्चा संदिप आणि निलेश यांच्याकडे वळवला.

दोघेही तिच्यापुढे गुडघे टेकवून बसले होते. दोघांच्याही चेहऱ्यावर भीती पूर्णपणे दिसत होती. दोघेही आपल्या कृत्याची तिच्याकडे क्षमा मागत होते आणि ती मात्र त्यांना क्षमा करण्याच्या तयारीत नव्हती.

“निलेश.., चल तुला माझे ते प्रसिद्ध रूप दाखवते. हाहाहा…” निलेशकडे पाहत रेवा उद्गारली आणि निलेश पूर्ण भारावला गेला. आता त्याला इतर काहीच समजत नव्हते. जे जे रेवा बोलत होती, निलेश कळसूत्री बाहुली असल्याप्रमाणे वागत होता.

“संदिप… तुझा हा मित्र किती धाडसी निघाला हे तुला सांगायला मी आता उद्याच येईल हं… तो पर्यंत तू निवांत झोप घे. मग उद्या… तू, मी, आणि भंडारदऱ्याचे रिसोर्ट. हाहाहा…” असे म्हणत ती दाराकडे चालू लागली. तिच्या मागे निलेशही चालू लागला. मनाली अगदी दगड होऊन घडणाऱ्या गोष्टी फक्त पाहत होती. आणि संदीप? त्याने परत मोठ्याने रडायला सुरुवात केली होती. पण यावेळेस मात्र त्याला धीर देण्यास कुणीही आले नाही. अगदी जवळच बसलेली मनाली देखील.

क्रमशः

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a comment