कर्मभोग भाग १७ –
स्वामी संदिपच्या घरी पोहोचले तो पर्यंत निलेशला रेवा घेऊनही गेली होती. घराचे दार सताड उघडे होते. संदिपने टाहो फोडलेला होता आणि मनाली तिथेच एका बाजूला दगड होऊन बसलेली होती.
“अलख निरंजन…” स्वामींनी आवाज दिला.
स्वामींना पाहताच तिने धावत जाऊन त्यांचे पाय धरले.
“स्वामी… स्वामी… मी चुकले… मी खरंच चुकले. तुमच्या वाक्याचा अर्थ आज मला समजला आहे आणि कुठेतरी माझ्या नवऱ्याच्या पापात मीही सहभागी होत आहे की काय याची बोच मला छळते आहे. आता ज्या ज्या वेळेस मी माझ्या नवऱ्याकडे पाहील, त्या त्या वेळेस मला फक्त हेच जाचत राहील.” अगदी तुच्छतेने आपल्या नवऱ्याकडे पहात ती म्हणाली.
“मुली, प्रत्येक स्त्री आपला संसार वाचावा यासाठी जितका होईल तितका प्रयत्न करते. तुही तेच केलेस, त्यात तुझी काहीच चूक नाही. पण आता इथे थांबून तसा काहीच उपयोग नाही. ती बंधनातून सुटली हेही मला लगेचच समजले होते, पण तरी मी इथे आलो कारण ती उद्या परत इथे येईल. तुझ्या नवऱ्याला मारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. पण तिला याच गोष्टीपासून मला परावृत्त करायचे आहे.” मनालीची समजूत काढत स्वामींनी आपल्या झोळीत हात घातला. त्यातून काही विभूती हातात घेऊन मंत्र म्हटला आणि सगळ्या खोलीभर उधळली.
“मुली, उद्या ती इथे आल्यानंतर परत बंदिस्त होईल. पण आता तिला कुणीही सोडवू शकणार नाही. मी येईलच परत…” तिला धीर देत स्वामी म्हणाले.
“तुला जर जिवंत राहायचे असेल तर घराबाहेर पडू नकोस. नाहीतर मीच काय कुणीही तुला तिच्यापासून वाचवू शकणार नाही.” संदिपकडे एक तुच्छ कटाक्ष टाकत स्वामी म्हणाले आणि अलख निरंजनचा घोष करत ते बाहेर पडले.
मनालीने त्यानंतर संदिपशी पूर्ण अबोला धरला. संपूर्ण घरात भयाण शांतता पसरली होती. दोघांपैकी कुणीही टीव्ही लावण्याच्याही फंदात पडले नव्हते. दोघेही आपापल्या विचारात मग्न होते. एक प्रकारचा तणाव सगळ्या खोलीत भरून राहिला होता. रेवाने आता इथे येऊ नये असेच मनालीला वाटत होते, तर रेवा इथे आल्यावर स्वामीकडून तिचा नाश व्हावा, आणि आपण कायमसाठी मुक्त व्हावे असे संदिपला वाटत होते. यात रात्र कधी झाली हे दोघांनाही समजले नाही. रात्रीचे जेवण घेण्याची देखील कुणाला इच्छा नव्हती. संदिप तर सोफ्यावरून उठला सुद्धा नाही. मनाली मात्र रात्र वाढली तशी आपल्या बेडरूममध्ये आली, पण तिच्या डोळ्यावर अजिबात झोप नव्हती. तिच्या डोळ्यासमोर कधी संदिप तर कधी तिची मुलगी सोनू येत होते. तर कधी रेवाचा तो मोहक चेहरा येत होता. रेवाचा चेहरा आठवला की तिचे मन अपराधी भावनेने भरत होते. ज्या रेवाला तिने बांधले होते त्या रेवाने बंधनमुक्त झाल्यावरही तिच्याबद्दल कोणताही राग व्यक्त केला नव्हता. यातूनच रेवाच्या स्वभावातील चांगलेपणा मनालीला जाणवला होता. आणि उद्या रेवा आल्यावर परत बांधली जाणार आणि तिचा बदला पूर्ण होण्याच्या आधीच स्वामी तिचा नाश करणार याचे तिला राहून राहून दुःख वाटत होते. या विचारात कधी झोप लागली हे तिचे तिलाच समजले नाही.
दुसरा दिवस उजाडला. दोघांच्या मनावरील ताण अजूनही कमी झालेला नव्हता. तसा एक दोनदा संदिपने मनालीशी बोलण्याचा प्रयत्नही केला, पण त्याला मनालीकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्याला बाहेरही पडता येत नव्हते. कारण जो पर्यंत आपण घरात आहोत, सुरक्षित आहोत. हे त्याला चांगलेच उमजले होते.
दारावरची बेल वाजली. इतक्या सकाळी कोण आले असेल? मनाली विचार करत होती. रेवा तर नसेल? कारण सगळ्यात पहिल्यांदा रेवा अशीच बेल वाजवून घरात आली होती. संदिपनेही बेलचा आवाज ऐकला होता पण त्याला दार उघडण्याचे धारिष्ट्य झाले नाही. शेवटी मनालीने जाऊन दार उघडले. दारात प्रिया उभी होती. मनालीने आधी ओळखलेच नाही त्यामुळे ती फक्त प्रियाकडे पाहत राहिली, तिच्या चेहऱ्यावरील अनोळखी भाव प्रियाला लगेच जाणवले.
“मला ओळखलं का? मी प्रिया, आपण १०/१२ दिवसांपूर्वी भेटलो होतो.” प्रियाने मनालीला आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. अर्थात मनालीलाही हे आठवले होते, पण घरातले वातावरण पाहता तिला दारातूनच परत पाठवावे या उद्देशाने ती दारातच उभी राहिली.
“हो…! ओळखलं…” तिनं उत्तर दिलं. पण हे म्हणताना तिच्या चेहऱ्यावर असलेलं टेन्शन प्रियाला लगेच जाणवलं.
“मी आत येऊ का?” मनाली आपल्याला बहुतेक दारातूनच कटवायच्या विचारात आहे असे पाहून प्रियाने विचारले.
“अं…! हो… हो..! येना…!!!” आता मात्र ही घरात आल्याशिवाय राहणार नाही हे जाणून ती दारातून बाजूला होत म्हणाली.
“असं करू, आपण माझ्या बेडरूम मध्येच बसू.” बाहेरच्या सोफ्यावर संदिप बसला होता. त्याच्याशी ओळख करून देणे नको म्हणून मनाली प्रियाला म्हणाली आणि प्रियाही संदिपकडे पूर्ण दुर्लक्ष करत मनालीच्या मागोमाग बेडरूम मध्ये शिरली.
“बोल प्रिया..! आज इकडे कशी?” आपण अगदी मोकळेपणाने बोलतो आहोत असे भासवत मनालीने विचारले.
“मी भेटायला आले आहे…” प्रियाने अगदी मोघम उत्तर दिले.
“भेटायला?” मनाली पूर्ण गोंधळली.
“हो..! मला माहिती नाही मी जे सांगणार आहे त्यावर तू कशी रीअॅक्ट होशील… पण… मी रेवाला भेटायला आले आहे.” मनालीने प्रियाचे शब्द ऐकले आणि परत तिचे विचारचक्र सुरु झाले. आपल्या नवऱ्याने हिला सुद्धा फसवले तर नसेल? किंवा ही सुद्धा रेवा सारखी? हा विचार आला आणि ती मनातून कचरली. पण लगेच तिने स्वतःला सावरले.
“रेवाला? तुला कसे माहित ती इथे येणार आहे म्हणून? तू सुद्धा..?” प्रश्न विचारत असतानाच मनाली थांबली, पुढचे बोलणे अर्धवट टाकून जागेवरून उठू लागली. तिची ही स्थिती लक्षात यायला प्रियाला बिलकुल वेळ लागला नाही. तिला त्याही परिस्थितीत हसू आले.
“ए..! नाही… नाही… मी जिवंतच आहे…” मनालीचा हात धरत प्रिया म्हणाली.
“पण मग तुला रेवाबद्दल कसे माहिती? आणि ती इथेच येणार हे तुला कुणी सांगितले?”
“हे मला माझ्या वडिलांनी सांगितले. आणि काल तू जे रेवाला बांधले होतेस त्या वेळेस तिची सुटकाही त्यांनीच केली.” आणि मग एकेक करत प्रियाने मनालीला सगळे सांगून टाकले. अगदी रेवाची गाठ कशी पडली, तिने कशी मदत केली इथ पासून ते या क्षणापर्यंत. त्यांचे बोलणे चालू होते इतक्यात त्यांना बाहेर रेवाचा आवाज ऐकू आला.
“संदिप..! बघ, आले मी तुला न्यायला. आणि हो. तुझ्या त्या मित्राने, तो रहात असलेल्या इमारतीवरून उडी मारली. बिचारा… जागच्या जागी गेला. आता आपणही जाऊ… चल… तयारी करून ठेवली आहेस ना?” असे म्हणत ती संदिपच्या जवळ जसजशी जाऊ लागली तसतशी तिला आपण बांधले जात आहोत अशी जाणीव होऊ लागली. तेवढ्यात मनाली आणि प्रिया बाहेरच्या खोलीत आल्या. रेवा बांधली गेली तरी कधीही मोकळी होऊ शकते हे संदिपने आदल्या दिवशीच अनुभवले असल्यामुळे तो मात्र भीतीने थरथरत होता.
“ताई…” प्रिया रेवाच्या दिशेने धावतच गेली.
“प्रिया.., अगं तुला इथे यायची काय गरज होती? मी येणारच होते की तिकडे…” प्रियाला पाहताच रेवा उद्गारली. आणि तेवढ्यात बाहेर ‘अलख निरंजन’ चा गजर ऐकू आला. मनाली दाराकडे गेली. बाहेर स्वामी उभे होते. तिने धावत जावून त्यांचे पाय पकडले.
क्रमशःकर्मभोग भाग १७,कर्मभोग भाग १७.
मिलिंद जोशी, नाशिक…