कर्मभोग भाग १८

कर्मभोग भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

कर्मभोग भाग १८ ( अंतिम भाग )

“स्वामी.., रेवाला शिक्षा करू नका हो…” मनालीने स्वामींना विनंती केली.

“मुली, मी रेवाला शिक्षा करण्यासाठी नाही तर तिचं भलं करण्यासाठी आलो आहे. चल…” असे म्हणत स्वामी आत आले. रेवाला बांधणारे स्वामी हेच आहेत हे प्रियाने ताडले आणि तिने त्यांचे पाय धरले.

“स्वामी..! माझ्या ताईला सोडा हो. तिची काहीच चूक नाही. हवे तर तिच्या ऐवजी मला शिक्षा करा…”

“मुली, ऊठ..! स्वतःच्या कर्माचे भोग स्वतःलाच भोगावे लागतात.” तिला उठवत स्वामी म्हणाले आणि त्यांनी रेवाकडे नजर वळवली.

“मुली..!!! तुझ्या मनातील सुडाची भावना सोडून दे. सुडाची भावना फक्त घात करते. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही.” त्यांनी रेवाला समजावण्याचा प्रयत्न केला.

“नाही… तुम्ही माझ्या मध्ये येऊ नका… मी याला असा सोडणार नाही. आज जर हा सुटला तर उद्या इतर मुलींचा घात करायला हा मागेपुढे पाहणार नाही. सोडा मला..! सोडा..!!!” रेवा चवताळून म्हणाली.

“मुली शांत हो… कुणीच कर्मभोगापासून अलिप्त नाही… प्रत्येकाला तो भोगावाच लागतो. कर्मभोगापासून त्रिदेव सुद्धा सुटले नाहीत तर याची काय कथा? याला याच्या पापाची शिक्षा जरूर मिळेल. पण त्यासाठी तू तुझा पुढचा प्रवास दुष्कर करू नकोस. याने जे केले ती एक वृत्ती आहे. आणि माणूस मेला म्हणून वृत्ती मरत नाही. त्यासाठी हा पर्याय नाही. एक लक्षात ठेव, आग विझवण्यासाठी कधीच आगीचा वापर केला जात नाही. त्यासाठी शीतल पाणीच लागते. याने एक पाप केले आणि त्याचा सूड म्हणून आपण दुसरे पाप करणे योग्य नाही. आज तू याला मारशील, त्याने तुला क्षणिक समाधानही मिळेल, पण उद्या परत असाच एखादा माणूस तयार होणार नाही याची काही खात्री आहे का? मग अशा किती जणांना तू मारू शकशील? आणि फक्त अशा लोकांना मारण्यासाठीच तू या पिशाच्य योनीत खितपत पडणार? हे फक्त इतरांना अवलक्षण व्हावं म्हणून स्वतःचं नाक कापून घेण्यासारखं आहे. याचा नीट विचार कर.”

“हो ताई… ही सुडाची भावना सोडून दयावीस असेच मलाही वाटते.” प्रियाने स्वामीच्या बोलण्याला दुजोरा दिला.

“प्रिया… तुलाही असेच वाटते? ठीक आहे. पण एक लक्षात ठेव, मी जरी याला तसे सोडत असले तरी मी याला माफ केलेले नाही. करणारही नाही.” काहीसे शांत होत रेवा म्हणाली.

“हाहाहा… हाहाहा… हाहाहा…” संदिपचा स्वर वातावरणात घुमला. तो मोठमोठ्याने हसायला लागला. सगळ्यांनी त्याच्याकडे पहिले. त्याच्या डोळ्यात आता वेडाची झाक दिसू लागली होती. तो तसाच पळत सुटला आणि त्याने समोर असलेल्या भिंतीवर डोके आपटून घेतले. मनाली तिथे धावत जाईपर्यंत त्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागली आणि तो भोवळ येऊन खाली पडला.

“मुली…!!!” स्वामी आपल्याशी बोलत आहेत असे लक्षात आल्यावर मनालीने त्यांच्याकडे पाहिले.

“तू जेव्हा माझ्याकडून दुसरा आशिर्वाद मागून घेतलास त्यावेळेस मी तुला म्हटले होते. कधी कधी मागून घेतलेला आशिर्वाद हा शाप ठरू शकतो. ते यासाठीच. तुझा नवरा बिलकुल मारणार नाही. पण ज्या ज्या वेळेस तो शुद्धीवर येईल त्या त्या वेळेस अगदी थोडा वेळ तो ठीक असेल त्यानंतर परत त्याला असाच झटका येईल आणि तो आपल्या शरीराला त्रास देण्याचा प्रयत्न करेल. हे सगळे तुला त्याची बायको म्हणून फक्त सहन करावे लागेल. अगतिकपणे…” स्वामींच्या बोलण्यातील धग आता मनालीला जाणवू लागली.

हळूहळू रेवाला आपली सगळी बंधने सुटत आहेत असे लक्षात आले. तिने लगेच स्वामींच्या समोर जाऊन त्यांना प्रणाम केला.

“मुली, खूप सोसलं आहेस तू. पण काही गोष्टी या पूर्वकर्मामुळे आपल्या वाट्याला येत असतात. त्यासाठीच आपले कर्म नेहमी चांगले ठेवावे. असो. तुला मी आता पुढची गती देत आहे. या पिशाच्य योनीतून तुझी सुटका करून.”

“स्वामीजी..! मला प्रियाला आणि मनालीला काही सांगायचंय…” असे म्हणून तिने स्वामींची परवानगी घेतली.

“प्रिया… तुझा आणि माझा कोणताही रक्ताचा संबंध नसताना देखील तू माझी लहान बहिण बनलीस, काकांनी माझ्यासाठी सगळे अर्जित पुण्य पणाला लावले आणि वडिल मुलीसाठी काय करू शकतात हे दाखवून दिले. इतके दिवस मला आईवडील, भावंडे नाहीत याचे खूप वाईट वाटायचे. पण आज मात्र मी हे सगळे नाते माझ्या बरोबर घेवून जाणार आहे. आज मला लहान बहीणही आहे आणि आईवडीलही.” बोलता बोलता तिचे डोळे भरून आले. प्रियाच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहू लागल्या. नंतर ती मनाली समोर आली.

“मनाली, मी तुझी अपराधी आहे. कारण माझ्या या सुडाने तुझा संपूर्ण संसार उध्वस्त झाला. याबद्दल मी तुझी माफी मागते. मला क्षमा कर…!!!” रेवाने मनालीपुढे हात जोडले. तिचे हात लगेचच मनालीने आपल्या हातात घेतले.

“नाही रेवा, माफी मागायची काहीच गरज नाही. स्त्रीचा अपमान करणाऱ्या प्रत्येक राक्षसाचा अंत झालाच पाहिजे. मग तो आपल्याला अगदी जवळचा असला तरी.”

नंतर प्रियाला जवळ बोलावत रेवाने दोघींकडे पाहत म्हटले.

“तुम्हा दोघींना माझी विनंती आहे. स्वामींनी सांगितले तसे स्त्रीवर अत्याचार करणे ही एक प्रवृत्ती आहे आणि आता त्याविरुद्ध उभं राहण्याची गरज आहे. तुम्हा दोघींना जितके शक्य होईल तितके लहान मुलांना संस्कारित करण्यासाठी कार्य करा. स्त्री आणि पुरुष हे समान नाही तर एकमेकांना पूरक आहेत, हे लहान मुलांप्रमाणेच त्यांच्या पालकांवरही ठसवा. आपल्याच घरात स्त्री आणि पुरुष यांच्यात दुजाभाव मुलांना दिसला तर ते हेच शिकणार. जितकी मोकळीक मुलाला असेल तितकीच मुलीला देखील द्या. आणि जितकी बंधने मुलीवर असतील तितकीच मुलावर देखील टाका. ज्यामुळे लहानपणा पासूनच मुलगा आणि मुलगी यात मुलांना फरक वाटणार नाही. बऱ्याच वेळेस पुरुष स्त्रीवर अत्याचार करतो ते तिच्यावर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी. आणि हीच गोष्ट तुम्हाला सगळ्यांना पटवून द्यावी लागणार आहे. सांगा. करालं ना इतकं माझ्यासाठी?” आणि दोघींनीही होकार दर्शवला.

“चला… येते मी…” असे म्हणत ती स्वामींपुढे जावून उभी राहिली. स्वामींनी आपल्या झोळीत हात घातला. त्यातून थोडीशी विभूती आपल्या हातावर घेतली. त्याची मुठ वळून तो हात आपल्या उजव्या छातीकडे नेला आणि डोळे मिटून मंत्र म्हणायला सुरुवात केली. मंत्र पूर्ण झाल्यावर त्यांनी हात पुढे घेऊन वळलेली मुठ सोडली. वाऱ्याच्या झुळूकेबरोबर हळूहळू ती विभूती उडत होती आणि त्याच बरोबर रेवाचा देह अनंतात विलीन होत होता. पण जातांना मात्र तिच्या चेहऱ्यावर एक स्मित होते. समाधानाचे स्मित. आणि प्रिया? तिच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. सगळ्यात जवळच्या व्यक्तीच्या वियोगाचे.

समाप्त

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a comment