कथा बोन्सायची –
सबा… माझी बालमैत्रिण .मी सागर. सबा व सागर मोहल्ल्यातली पक्की दुकडी. बालमित्र ही व्याख्या खुपच तोडकी वाटते त्यासाठी. कदाचित त्या ही पेक्षा काहीतरी जास्त. आवडीनिवडी मध्ये कमालिचा फरक. मला चिंचा आवडायच्या. तिला आंबा. मला शिरखुरमा तर तिला पुरणपोळी. म्हणतात ना माणसाला आपल्यापेक्षा ईतरांच्याच गोष्टी जास्त आवडतात. त्या तशा आवडू नये हे माणूस मोठा झाल्यावर शिकतो पण मी नाही शिकू शकलो कधीच. हो पण वागायचं नक्कीच शिकलो. कमीतकमी त्या दिवशी तरी. ९ वर्षांनी भेटत होतो आम्ही.आरतीचं लग्न होतं. मुंबईत राहून यंत्रवत गोष्टी आपसूकच शिकतो म्हणा माणूस. घड्याळाच्या काट्यावर पळत राहणं, गरजेपुरतं नातं ठेवणं , तोंडदेखलं गोड बोलणं आणखी काय काय..
त्या दिवशी मी असाच काहीसा वागलो तिच्याशी. काय करणार? अण्णांची सक्त ताकीद होती. तिला भेटायचं नाही म्हणून. तरीही मी भेटलो. अण्णांनी पाहीलं. मी पटकन तिथून निसटलो. अण्णांना ती अजिबात आवडायची नाही. माझी मैत्रीण म्हणून तर नक्कीच नाही. तिच्या काकांचं घर आमच्या घराला लागूनच होतं. त्यांच्याशेजारी सबाचं. अण्णांची व सबाच्या काकांची कायम भांडणं व्हायची. अण्णा कायम चिडचिड करायचे यावरून. कदाचित म्हणूनच ती त्यांना पसंत नसावी. सबाचे वडीलही प्रत्यक्ष भांडणात नसले तरी त्यांच्या भावाला समजावू तर शकले असते ना. पण या फंदात ते कधीच पडले नाही. आत्या मुंबईत होती. अण्णांच्या नोकरीच्या बदलीचाही काही अडसर नव्हता. आमच्या त्या घरास चांगली किंमत ही मिळाली.तडकाफडकी सरळ अण्णांनी बिऱ्हाड मुंबईत हलवलं. काय होतंय मला काही कळलचं नाही. त्यात ती सबा तिकडे तिच्या मामूकडे निघून गेलेली. मला जाताना भेटलीही नाही. नाकावर राग पहिल्यापासूनच आहे तिच्या.
लग्नात मी अण्णांना पाहून सटकलो आणि ही बावळट कधी पसार झाली कळलचं नाही. वाटलंच मला तिला नक्की राग आला असणार. कमालिची हेकेखोर आहे ती. पहिल्यापासूनच. आपलं तेच खरं. नंतर वेळच भेटला नाही. तिच्याकडे जाण्यासाठी. Flat घेतलाय म्हणे बाईसाहेबांनी आणि ते ही ईतक्या लांब. परतीचे तिकीट तयार होते आमचे. काय करणार? अम्मीला भेटलो तिच्या. सरळ स्वभाव. तीच माया. राहून राहून वाटत होतं landline fone number द्यावा. पण नाही दिला. असंही काय साध्य झालं असतं? काही नाती एका विशिष्ट वळणावर सोडून द्यावी लागतात. तिच्या गोड आठवणी गिरवत जो आनंद मिळेल तेच काय आपले नशिब. आज ईतक्या वर्षांनी ती क्वचितच आठवते. या मुंबईच्या कोलाहलात कुणाला वेळ आहे कुणास आठवायला? अण्णांचा आता काही धाक नाही पण वेळ योग्य नाही. म्हणतात ना की दुनिया गोल है.. असेल योग तर नक्कीच भेटेल तिला. दोन गुद्दे ही टाकेन तिला.
वाचकमित्र बोन्साय वाचून अक्षरशः गहिवरून गेले. तशा कमेंट ही आल्या. एखाद्या कथेशी वाचकांचं एकरूप होणं हेच त्या कथेचं यश असतं. त्याचबरोबर हा प्रश्न की, सागर असा का वागला असावा? वरील लेखप्रपंच त्यासाठीच. लाडक्या वाचकमित्रांसाठी. खरंतर एखादी कथा एखादा लेखक (मी लेखक नाहीये, ग्रुपसाठी तर नक्कीच नाही. ते मानाचे हारतुरे मला नकोच. ईथल्या वाचकांच्या प्रेमाखातरच मी फक्त आली लहर तर एखाद्या कथेतून व्यक्त होतो. असो.) लिहीतो त्यामागे बर्याच उलथापालथी असतात. डोक्यातला भुंगा ती कथा पूर्ण केल्याशिवाय तो शांत होत नाही.
नेट वर भटकत असताना नेमकं ‘चौकट राजा ‘हा चित्रपट पाहिला. लहान असताना हा चित्रपट पाहिला होता. मुन्नी व नंदू यांच्या निखळ मैत्री वर आधारलेला अप्रतिम चित्रपट. त्यात दाखवलेलं ते आंब्याचं बोन्साय .नंदू त्या बोन्सायसारखाचं बालपणात झालेल्या अपघातात मेंदूने लहानचं राहीलेला. बालपणातचं अटकलेला. लहानपणी पाहिलेला हा चित्रपट आता प्रौढपणात वेगळा गहन अर्थ सांगून गेला. त्यात ते गाणं.. ‘एक झोका, एक झोका.. ‘ते संगीत मनात खोलवर रूतत होतं. ठरवलं. या थीमवर आधारीत कथा लिहीनच. पण कोणतीही ऊचलेगीरी न करता. मी कधीच कोणतीही ऊचलेगीरी आजवर केलेली नाही. करणारही नाही. ज्यावेळी अशी गरज पडेल त्यादिवशी मी थांबणेच पसंत करेन. काहीही सुचत नव्हतं. बोन्साय कथेचं नाव ठरलं होतं. पाकिजा, पैंजण, पायरी, पळवाट ….ह्या योगायोगाने प ने असणार्या माझ्या कथा. माझ्या कथेचं नावं कथानुरूपच असतं. योगायोग असा की त्यांची नावं प ने आली. न ठरवता. पहिल्यांदाच प ची बाराखडी पार केली .बोन्साय शिवाय ईतर नाव कथेला न्याय देऊच शकलं नसतं. असो.
काहीच सुचत नव्हतं. अगदी दोन चार ओळी लिहिल्या होत्या. नकळत ‘ती’आठवली आणि कथा लिहिण्यास सुरूवात केली. तिच्या आठवणी होत्याच. त्यांचं ते अचानक मोहल्ला सोडून जाणं वगैरे.तिचे बाबा प्रत्यक्षात असेच होते. त्यांना माझं त्यांच्याघरी गेलेलं अजिबात आवडत नसे. चौकट राजा चं गारूड होतचं. कथासूत्र पक्कं झालं मनात. आणि कथा लिहून पूर्ण झाली.
आपलाच समीर खान