कृष्ण मंदीर, हंपी

By Bhampak Travel 3 Min Read

कृष्ण मंदीर, हंपी –

‘कृष्णदेवराय किंवा कृष्णदेवराया  हा विजयनगर साम्राज्यावर राज्य केलेल्या तुळुवा राजघराण्यातील तिसरा राजा’, वयाच्या एकविसाव्या वर्षी इ.स. १५०९ साली हा सिंहासनावर बसला व पुढे  इ.स. १५२९ पर्यंत राज्य केले. कृष्णा-तुंगभद्रा अंतर्वेदीतील प्रदेश, रायचूर (१५१२), गुलबर्गा, बीदर हे भाग जिंकून घेतले. त्याने महंमूदशाहास पुन्हा गादीवर बसविले व यवन-राज्य-स्थापनाचार्य ही पदवी धारण केली.

ओडिशावर आक्रमण करून त्याने राजा गजपतीचाही पराभव केला होता. त्याने त्यानंतर  महाराजाधिराज, सिंहासनाधीश्वर इत्यादी पदव्या धारण केल्या होत्या. ‘कृष्णदेवरायाने जमीनसुधारणा करून मुबलक पाणीपुरवठ्यासाठी धरणे व पाटबंधारे बांधले होते’.कृष्णदेवराय स्वतः कवी व पंडित होता. त्याने तेलुगू व संस्कृत भाषेत अनेक काव्यग्रंथ रचले.कृष्णदेवराय हा विद्वानांचा आश्रयदाता होता व त्याच्या दरबारात अष्टदिग्गज नामक आठ पंडित होते. त्याने कित्येक विद्वान, कवी, संत, महंत, साधू इत्यादींनी उदार आश्रय दिला. शूर योद्धा, मुत्सद्दी, न्यायप्रिय प्रशासक आणि विद्येचा भोक्ता म्हणून ओळखला जातो.

ओडिशावर निर्णायक विजय मिळवल्या नंतर विजयनगर सम्राट कृष्णदेवराय याने इ.स. १५१३ मध्ये विजयाचे प्रतीक म्हणून हंपी मध्ये कृष्ण मंदिर बांधले. या मंदिरात एक शीला लेख असून त्यावर ओडिशाच्या विजयाचे वर्णन व या मंदिराच्या बाबतीत माहिती आहे. पूर्वेकडील गोपुरावर या ओडिशाच्या युद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत. तसेच या गोपुराच्या भिंतीवर कोरलेले विष्णूचे दशावतार अप्रतिम आहेत. याच बरोबर महाभारत व रामायणातील प्रसंग देखील आहेत.

गोपुर, गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप तेथील खांब, त्यावरील अनेक शिल्पकाम बघत बसावे असेच आहेत. मंदिराच्या छतावर सुंदर नक्षीकाम असून ते आवर्जून पाहावे. या मंदिरात कृष्णदेवराय याने १६ फेब्रुवारी १५१५ रोजी उदयगिरी ओडिशा मधून आणलेल्या बाळ कृष्णाची अप्रतिम मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती, असा उल्लेख शिलालेखात आहे . मात्र सध्या ही मूर्ती चेन्नई इथल्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहे.

मंदिराच्या परिसरात एक गरुड मंडप व विविध छोटी मंदिरे आहेत. येथील खांबावर अनेक देव प्रतिमा व प्रसंग कोरलेली आहेत. हंपी येथील इतर मंदिराप्रमाणेच या ही मंदीरात व्याल प्रतिमा मोठया प्रमाणात असून यावर माझी लवकरच स्वतंत्र फेसबुक पोस्ट येईल. या मंदिरात श्रीकृष्णाच्या संदर्भात कोरलेली प्रसंग व विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत.

…….क्रमशः

सविस्तर माहिती करिता जरूर वाचा :
१) वैभवशाली विजयनगर साम्राज्य – एन. शहाजी
२) विजयनगर हृदयस्थ साम्राज्य – डाॅ. अस्मिता हवालदार
३) मराठी विश्वकोश
४) सफर हंपी बदामाची – श्री आशुतोष बापट
५) A Forgotten Empire ( Vijayanagar ) – Robert Sewell

Leave a comment