उग्रनरसिंह/लक्ष्मीनरसिंह व  बदावीलिंग/जलकुंडेश्वर, हंपी

By Bhampak Travel 3 Min Read

उग्रनरसिंह/लक्ष्मीनरसिंह व  बदावीलिंग/जलकुंडेश्वर, हंपी –

नरसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो.

हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागताना म्हणले होते की “तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे.”

या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नर-सिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकशिपूला नृसिंहाने न दिवसा, न रात्री तर संध्याकाळी (सूर्यास्ताच्या वेळी);. न घरात न बाहेर, तर घराच्या दरवाज्यात उंबऱ्यावर मृत्यू दिला. ना शस्त्र ना अस्त्र, तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकशिपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला. म्हणजे राक्षसी जगात जर मान ताठ ठेवून जगायचं असेल तर नृसिंहाची बुद्धिमत्ता आणि पराक्रम हवा ही त्या दैवतामागची प्रेरणा असावी.

तसं पाहिलं तर हरिहर-बुक्क शिवाचे उपासक. विरूपाक्ष हे त्यांचे कुलदैवत होतं. पण त्यानंतरची तिन्ही घराणी ही वैष्णव होती. नृसिंह हे त्यांचं दैवत होतं

हंपी येथील लक्ष्मी नरसिंह (उग्र नरसिंह ) हे ६.७ मीटर/२२ फूट उंचीचे भव्य शिल्प मूर्तिकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. नरसिंहाच्या मूर्तीखाली शिलालेख असून ती १५२८ मध्ये कृष्णदेवरायाने एकसंध दगडात खोदून घेतली.   विष्णूचा अर्धमानवी व अर्धसिंहाचे तोंड असलेला अवतार, सात तोंडी आदिशेषावर स्थानापन्न झालेला तर एका मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. मूर्तीची तोडफोड अशी विचित्र झालेली आहे की लक्ष्मीचे फक्त हातच कमरेभोवती दिसतात. मूर्ती वर मोठे डोळे व पांच मुखाचा फणा असलेला नाग आहे , फण्याच्या वरच्या बाजूला किर्तीमुख आहे . मूर्तीचे डोळेही खोबणीतून बाहेर आल्यासारखे असल्याने तसेच तोंडातुन बाहेर आलेले सुळे उग्र भासतात . डोक्यावर सुंदर मुकुट आहे. 1980 च्या दशकात पुरातत्व खात्याने उत्खननानंतर पुतळ्याचे अनेक तुकडे पुतळ्याच्या जीर्णोद्धार व पुनर्बांधणीस वापरले. तथापि उर्वरीत जीर्णोद्धार करण्याबाबत कोर्टाच्या स्थगितीचा आदेश होता अशी ऐकीव माहिती आहे आणि त्यामुळे लक्ष्मी तिच्या नरसिंहच्या मांडीवर जागा घेण्यास परत दिसून आली नाही. तर आजतागायत तो ‘उग्र’ नरसिंह रूपातच  राहिला आहे. १९०० च्या आसपास हा पुतळा कसा दिसत होता आणि आज कसा दिसत आहे हे दर्शविणारा कोलाज येथे दिला आहे.

या मूर्तीच्या बाजूला तीन मीटर लांबीचे व १० फूट उंच एकसंघ दगडातून कोरलेले शिवलिंग आहे. त्यास बदव लिंग, बदावीलिंग किंवा जलकुंडेश्वर म्हणतात. शिवलिंगावर कोरीव काम करून भगवान शिवाचे तीन डोळे रेखाटले आहेत. मंदिरात पाणी भरलेले असते. विजय नगर साम्राज्य किती  वैभवशाली होते याचे हे एक उदाहरण आहे, कारण एवढे उत्तम शिल्प येथील एका गरीब स्त्री ने बांधल्याचे सांगण्यात येते .मंदिर जरी एक छोट आणि रचना साधी आहे, तरी हे दर्शनीय स्थळ आहे

Leave a comment