प्रेम

By Bhampak Lifestyle Laxman Asbe 2 Min Read
bhampak-banner

प्रेम –

प्रेम हा बोलण्याचा, सांगण्याचा आणि ऐकण्याचा विषय नाही, तर तो अनुभवण्याचा विषय आहे.

एखादी व्यक्ती माझे तुझ्यावर प्रेम आहे ! असे म्हणते, त्यावेळी ती एकतर त्या व्यक्तीची गरज असते किंवा ते फक्त आकर्षण असते, त्यात प्रेम शून्य असते.

थोडक्यात प्रेम हा अंतःकरणाचा आणि चित्ताचा विषय आहे, तेथे शब्द निरूपयोगी असतात आणि भावना प्रधान असते. वैवाहिक जीवनात प्रेम हा ऊर्जेचा स्त्रोत आहे, त्याच्याविना जीवन अचेतन आणि निरस आहे. वैवाहिक जीवनात सुरुवातीला आकर्षण असते, त्यानंतरचा प्रवास ही गरज असते आणि मग त्याचे रूपांतर परिपक्व प्रेमात होत असते आणि हा प्रवास असाच व्हायला हवा .

दाम्पत्यामध्ये ही प्रेमाची परिपक्वता नसेल, तर त्यांच्यात अविश्वास असतो. ज्या पती पत्नीला एकमेकांबद्दल विश्र्वासच नसतो ,ते जीवन दोघांसाठीही नरकच बनलेले असते . अशी नरकात राहणारी माणसे फक्त शरिराने एकत्र रहात असतात. विकृतीने आकर्षण निर्माण होणे , नैसर्गिक आहे कारण हा वासनेचा प्रभाव असतो, याला कोणीही सामान्य माणूस अपवाद नसतो.

शुद्ध प्रेमच याला आवरू शकते, म्हणून वैवाहिक जीवनात आकर्षण आणि गरज याचे रूपांतर प्रेमात होणे नितांत गरजेचे असते. आपल्या प्रेमाचा कोणताही पुरावा द्यावा लागत नाही, ते कधी दिसतही नाही, परंतु त्याचा परिणाम दिसल्याशिवाय राहात नाही .

वासना ही शरिराची भूक आहे आणि प्रेम ही हृदयाची, अंतःकरणाची भूक आहे, जी शेवटच्या श्वासापर्यंत फक्त सुख आणि समाधानच देते. ज्यांच्या संसारात प्रेम प्रधान आहे, तो संसार खरा राजा राणीचा आहे,मग घरात कितीही दारिद्रय असू द्यात. ज्या संसारात प्रेमाचा अभाव आहे , तो संसार कितीही श्रीमंत असला तरी तो खरा भिकारी आहे.

Leave a comment