माफिया | Mafia

bhampak-banner

माफिया –

जेथे कमी कष्टात आणि बुद्धीचा वापर न करता जास्त पैसे मिळतात, तेथे माफिया तयार होतात. आज जेथे पैसा आहे, तेथे माफियांचे राज्य आहे. याला कोणतेही क्षेत्र अपवाद राहिलेले नाही. या जगामध्ये दादागिरी, लुटमार, भ्रष्टाचार यांची मक्तेदारी प्रचंड प्रमाणात आहे. प्रशासनाचा वचक आणि कायद्याचा धाक कमी झाला की गुंडगिरी आपोआप वाढते. सर्वसामान्य माणसे माफियांच्या भानगडीत पडत नाहीत, त्यामुळे या लोकांचे जाळे आपोआप वाढत जाते. राजकारणामध्ये मनी आणि मसल पॉवर नेहमीच वापरले जाते. त्यामुळे अशा माफियांना राजकीय आश्रय मिळतो.

कोणताही गुंड, माफिया राजकीय आश्रयाशिवाय वाढू आणि टिकू शकत नाही. राजकीय लोकांच्या प्रभावासाठी अशा लोकांचा वापर सर्रास केला जातो. एखादा गुंड किंवा माफिया तुरुंगातून शिक्षा भोगून सुटून आला की त्याची जंगी मिरवणूक काढली जाते, रॅली काढली जाते. हातात लाठ्या-काठ्या आणि शस्त्रे घेऊन भर रस्त्यातून या मिरवणुकीने पुन्हा दहशत पसरविले जाते. पूर्वी एखादा समाजसेवक, देशभक्त समाजासाठी किंवा देशासाठी तुरुंगात गेला आणि शिक्षा भोगून आला, तर समाज त्याला देव समजत होता. त्यांची मिरवणूक काढली जात होती आणि जाहीर सत्कार केले जात होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या त्यागाला आणि भोगलेल्या यातनांना सलाम केला जात होता. त्यामुळे त्यागाला प्रतिष्ठा होती.

आजच्या मिरवणुका आणि रॅली पाहिली, की किळस येते कारण यात भोगाला, दादागिरीला आणि दहशतीला प्रतिष्ठा दिली जात आहे. सर्वात जास्त हे घातक आहे. पूर्वी गुन्हेगारी आणि गुंडगिरीला पाप समजले जात होते, त्यामुळे अशा पापी माणसांची दहशत असली तरी, अशा माणसांना समाजात कधीही प्रतिष्ठा दिली जात नव्हती.

आज माफिया किंवा गुंड यांना समाजात दिली जाणारी प्रतिष्ठा, हा एक तरुण पिढीचा आकर्षणाचा विषय झालेला आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. आजच्या तरुणांना समाजसेवक किंवा देशभक्त होण्याऐवजी डॉन होऊ वाटते, ही सामाजिक अधोगती आहे.

आपण जास्तीत जास्त उग्र आणि भीतीदायक कसे दिसू , याच्यासाठी आजचा तरुण अट्टाहास करताना दिसत आहे. या भारताने अनेक परकीय शक्तींची गुलामगिरी अनुभवलेली आहे, त्या गुलामगीरीच्या वेदना आणि चटके ताजे आहेत. स्वतंत्र भारत कितीही प्रगत झाला आणि जागतिक महासत्ता झाला तरी, अशा माफियांचा आणि गुंडांचा पुन्हा गुलाम होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment