माणदेशी माणसं | Mandeshi Manase Book

By Bhampak Book Review Sunil Shedage 2 Min Read
माणदेशी माणसं | Mandeshi Manase Book

माणदेशी माणसं –

व्यंकटेश माडगूळकर म्हणजे बहुविध पैलूंनी सजलेलं कर्तृत्व. साहित्यिक म्हणून त्यांची मोठी ख्याती होती. अर्थात त्यापलीकडं जात एक उत्तम चित्रकार, निसर्गात रमणारा यात्री, शिकारीचा छंदिष्ट अशी त्यांची विविधांगी रुपंही प्रसिद्ध होती. तात्यासाहेब या आदरार्थी नावाची त्यांची ओळख सर्वपरिचित होती. रुढार्थानं ते फारसे शिकले नव्हते. मात्र प्रयत्नानं, परिश्रमानं त्यांनी इंग्रजी भाषेवरही आपलं प्रभुत्व संपादन केलं होतं. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ते  साहित्य अकादमी पुरस्कार हा त्यांचा प्रवास त्यांच्या मोठेपणाचा द्योतक ठरणारा होता.माणदेशी माणसं.

तात्यासाहेबांच्या नावाशी जसं ‘बनगरवाडी’ हे नाव चिकटलेलं होतं, तसंच ‘माणदेशी माणसं’ही. तात्यासाहेबांचं बालपण माणदेशात गेलं. तिथल्या वास्तव्यात त्यांनी पाहिलेल्या, अनुभवलेल्या, टिपलेल्या व्यक्तींची मने अन् नमुने यांचा संगम म्हणजे ‘माणदेशी माणसं’. उल्लेखनीय म्हणजे वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षी त्यांनी हा सारा शब्दप्रपंच केला. हे सारं लेखन आधी ‘मोैज’ या साप्ताहिकात प्रसिद्ध झालं. नंतरच्या काळात म्हणजेच 1949 मध्ये ते पुस्तक रुपानं प्रसिद्ध झालं.

आज जवळपास सत्तरेक वर्षाच्या काळाचा प्रदीर्घ पट उलटूनही या ‘माणदेशी माणसां’चा जिवंतपणा कायम आहे. खेड्यातलं जगणं, बलुतेदारी, बोली भाषा, दारिद्रय, समस्यांचं चक्र, त्यातूनही जगण्याचा उमेद, आशावाद, स्वतःच्या आयुष्याचं निराळेपण घेऊन ही व्यक्तिचित्रं या पुस्तकात वावरतात. तात्यासाहेबांच्या शैलीदार लेखनातून वाचकांच्या नजरेपुढं जिवंत होतात.

पुस्तकात एकूण 16 व्यक्तिचित्रं आहेत. त्यातलं कुणी आपल्याला हसवतं, कुणी रडवतं. कुणी अंतर्मुख बनवतं. कुणी जगण्याचं नवं तत्त्वज्ञान सांगतं. काळानुरूप माणसाच्या जगण्यात, वागण्यात, राहण्यात, बोलण्यात कमालीचा बदल झालाही असेल. मात्र स्वभाव प्रकृती, प्रवृत्ती तीच आहे.

‘माणदेशी माणसं’ हे मराठी साहित्यातलं अक्षरवैभव आहे. त्याला मातीचा गंध आहे. माणुसकीचा दरवळ आहे. अगदी सहज, साध्या शब्दांत रेखाटलेली ही शब्दचित्रं वाचकांना एका पिढीचं, परंपरेचं, संस्कृतीचं दर्शन घडवितात. त्यामुळंच ती आजही हवीहवीशी वाटतात.

पुस्तकाचं नाव। माणदेशी माणसं
लेखक। व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशन। मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या। 128
किंमत। 125 /- रुपये

सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा

Leave a comment