मराठी सिनेमा कसा बनतो ??
झी सिनेमा वर सैराट लागलेला असताना जो म्हणतो ” निस्ती गाणी हुती मन पिच्चर चाल्ला, नायतर काय नव्त त्यात ” बास तोच आपला डायरेक्टर.
आता डायरेक्टर रानात जातो आणि फुलस्केप वहीची पाहिली ९ पान फाडतो,आधी पण एक स्टोरी लिहिता लिहिता राहिलेली असते. आता पान फाडली की नवीन वही तयार. बँकेच्या पासबुक च्या पिशवीतून तो एक पेन काढतो आणि स्टोरी लिहायला घेतो.
कास्ट :-
प्राथमिक शाळेतील स्टोरी असल्याने खाकी चड्डी पांढरा सदरा घातलेला हिरो, निळा फ्रॉक घातलेली हिरोईन आणि हिरोचा एक जाड आणि एक दात वाकडे असलेला मित्र. हिरो थोडा सावळा आणि हिरोईन थोडी गोरीच.
म्युजिक :-
एक आदर्श शिंदेच गाणं घ्यायचं १००% चालतंय, विलन च्या एन्ट्री साठी एक उडत्या चालीच गाणं त्याचे लिरिक्स
“लै लै साधा आमचा दादा,
घोडा लावतो,
ठोक्यात पाडतो
जो लागला नादा
आमचा दादा दादा दादा ”
लोकेशन :-
विहिर, जिथं बाजूला बायका कपडे धूत असाव्या.
गावातला पार, जिथं म्हातारे गप्पा मारत असावेत.
प्राथमिक शाळा, जिला व्हरांडा असावा.
एक बंगला ( विलनच घर ).
प्लॉट :-
गरीब हिरो शाळेत जाताना त्याला हिरोईन दिसणार, त्याचे मित्र त्याला चिडवणार. हिरॉईन दुर्लक्ष करणार, हिरो घरी जाणार आणि केस विंचरत एकतर्फी गाणं लागणार. पुढे हिरोईन च्या बापाला कळणार तो कुतुस्तोर हिरो ला तुडवणार, पण हिरोईन ला तिची मैत्रीण सांगणार की तो किती चांगला आहे आणि तू नसताना त्याने दळण आणून दिलं तुझ्या आईला, हिरोईन ला पश्र्चाताप होणार आणि शेतामध्ये, झाडाझुुपात, टाकीवर, बस मध्ये सगळीकडे हिरो हिरोईन ची २-३ गाणी होणार.हिरोईन च्या सांगण्यावर हिरो शहरात जाणार लै मेहनत करणार, ७ महिन्यात तो वॉचमन, वेटर, रिक्षावाला, गवंडी, शेतमजूर हमाली इत्यादी सगळी काम करणार आणि चिक्कार पैसा कमवून परत गावी येणार पण त्या वाकड्या दात वाल्यासोबत तीच लग्न झालेलं असणार.
फिल्म प्रोडक्शन :-
डायरेक्ट चां एक मित्र आहे जो ठोके पाटलाच्या पोरासोबत बारीला असतो मग त्याच्या ओळखीने पाटलासोबत मीटिंग सेट होते. डायरेक्टर सांगतो लै झालं २०-२२ लाख रुपये खर्च येईल गाणे शूटिंग, रिलीज, मार्केटिंग सगळं पकडुन. माझ्याकडं ५ आहेत बाकी तुम्ही लावा तुमच्याच बंगल्यावर शूटिंग करू.
प्रोड्युसर ठोके पाटलाच्या पोराला हिरो म्हणून घेतलं जात. मधल्या म्यूचल मित्राला पण एक रोल मिळतो, या आधी १९९८ मध्ये एका फिल्म मध्ये एकदम साईड चां रोल केलेल्या ॲक्टरला विलन चां रोल मिळतो जो कायम हिंदी बोलत असतो, या सगळ्यात त्यालाच सगळं माहिती अस्त.
शूटिंग सुरू होते पहिल्याच आठवड्यात डी.ओ.पी हिरोईन ला पटवतो. पण शूटिंग मुळे दोघं लग्न नाही करत इकडे आदर्श शिंदे काय यांचा कॉल उचलत नाही.
एडिटरने ३०० पेक्षा जास्त लग्नाच्या व्हिडिओ एडिट केलेल्या असतात म्हणून तो सांगेल तस शूट सुरू होत. फिल्म १०% शूट करून पूर्ण होते.
मार्केटिंग साठी पुण्याला निर्माता आणि डायरेक्टर येतात आणि बस, मुतारी आणि रिक्षांवर सिनेमाचं पोस्टर लावणाऱ्या मार्केटिंग कंपनी सोबत मीटिंग करून त्यांना चेक देऊन जातात.
पुण्याच्या आसपास एखाद्या रिसॉर्ट वर गाण्याचं शूटिंग होत, फाईटिंग सीन्स साठी पंजाबी फाईट मास्टर आणला जातो तो ५० वर्षांपासून महाराष्ट्रात राहतोय. इकडे डिओपी आणि हिरोईन पावसाळ्यात कोणाला न सांगता टायगर पॉइंट ला फिरायला जातात. तिकड डायरेक्टरला ठोके पाटील गोठयात बांधून ठेवतो. सुदैवानं हिरोईन परत येते मात्र डायरेक्टर ला याचा राग येतो.
आता ४०% शूटिंग पूर्ण झालेलं असताना पाटलांचे सगळे पैसे संपतात, ठोके पाटिल रोड टच ६ एकर विकून टाकतात आणि पैसे आणतात, तोवर डायरेक्टर गावी शेती घेतो आणि घरवरचे पत्रे काढून स्लॅब टाकून घेतो. असच १ वर्ष संपत आणि डायरेक्टर ला कळत की रिलीज करायला पण पैशे लागतात तसा निरोप तो पाटलाना देतो पाटील कचाकच आई बहिनीवरून डायरेक्टर ला शिव्या देतो पण एवढा खर्च झालाय म्हणून पै पाहुण्या कडून अजुन पैसे घेतो, आणि शूटिंग पूर्ण होत प्रमोशन पूर्वीच डी ओ पी हिरोईन ला पळवून नेतो आणि लग्नच करून येतो.
सिनेमा पूर्ण महाराष्ट्रभर २३ थिएटर्स ना रिलीज होतो. चला हवा येऊद्या ला टीम जाऊन येते, यूट्यूब वर गाण्यांना ४-४ मिलियन व्ह्यूज येतात,येवढं करून पण १ कोटी ७० लाख खर्च करून बनवलेला सिनेमा ६७ हजार रुपये गल्ला करून समाप्त होतो.
मनोज शिंगुस्ते
लेखक मराठी चित्रपट मंडळाच्या अध्यक्षाच्या मुलाचे मित्र आहेत.