माझे विद्यापीठ –
नारायण सुर्वे हे मराठीतले प्रख्यात कवी. अस्सल जीवनानुभव सांगणारा हा कवी. तळागाळातल्या माणसांची दुःखं, त्यांच्या जगण्याची होरपळ त्यांनी आपल्या शब्दांतून प्रकट केली. त्यांचं स्वतःचं आयुष्य प्रचंड वेदनेतून आकारास आलं. त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या माझे विद्यापीठ लेखनात उमटलं.
मुंबईतील चिंचपोकळीत एका कापड गिरणीसमोर असलेल्या रस्त्यावर गंगाराम सुर्वे या गिरणी कामगारास जन्मदात्रीनं सोडून दिलेलं अर्भक सापडलं. त्यांनी ते घरी आणलं. पत्नी काशीबाई सुर्वे यांनी या अनाथ जीवाला पोटच्या मुलासारखे प्रेम दिले. सुर्वे दांपत्यानं त्याचं नाव नारायण ठेवलं. नारायण सुर्वेंच्या आयुष्याची कहाणी ही अशी.
रस्त्यावर सापडलेला हा कोवळा जीव पुढं मराठीतला ख्यातनाम कवी बनला. इतकेच काय, पद्मश्री पुरस्कारासह कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार यासह कित्येक गोैरव क्षण त्यांच्या वाट्याला आले. साहित्य क्षेत्रातलं मानाचं समजलं जाणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना लाभलं.
नारायण सुर्वे यांनी जगण्यातल्या खडतरतेच्या साऱ्या वाटा पाहिल्या, अनुभविल्या, शब्दांत उतरविल्या. त्यांनी फूटपाथवर काम केलं. हाॅटेलात कपबशा विसळल्या. कापड गिरणीत बिगारी म्हणून काम केलं. प्राथमिक शाळेत ते शिपाई झाले. अखेर हा प्रवास नगरपालिकेत शिक्षकाच्या नोकरीपर्यंत पोचला. नारायण सुर्वे यांमोजकं लिहिलं. मात्र ते वेचक ठरलं. वेधक बनलं. दर्जेदार मानलं गेलं. 1966 मध्ये त्यांचा ‘माझे विद्यापीठ’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. तो गाजला. शासनाच्या पुरस्काराची मोहोर त्यावर उमटली.
नारायण सुर्वे या नावाशी माझाही आठवक्षण आहेच. ‘डीएड’च्या दिवसांत साताऱ्यातील साहित्य संमेलनात मी त्यांना पाहिलं. उंचेपुरे, जाड फ्रेमचा चष्मा, साधासा पेहराव, गर्दीतला एखादा सामान्य माणूस भासावा असं व्यक्तिमत्त्व. कुठला थाटमाट नाही, की कसला रूबाब नाही. संमेलनाच्या मंडपाबाहेर नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्याशी ते बोलत होते.
मी अन् माझा मित्र बराच काळ तिथं रेंगाळत राहिलो. त्यांना पाहात, निरखत राहिलो. त्यांच्याशी काही बोलावं, हे धारिष्टदेखील तेव्हा अंगी उतरलं नव्हतं. त्या काळी ना मोबाईलचं जग होतं, ना कॅमेऱ्याची दुनिया होती. मात्र 27 वर्षांपूर्वी मनानं टिपून ठेवलेली त्यांची प्रतिमा आजही एका कप्प्यात खोलवरच आहे. अगदी जशीच्या तशीच!
पुस्तकाचं नाव। माझे विद्यापीठ
कवी। नारायण सुर्वे
प्रकाशन। पाॅप्युलर प्रकाशन
पृष्ठसंख्या। 75
किंमत। 85 /- रुपये
सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा