मानसिक स्थैर्य | Mental Stability

bhampak-banner

मानसिक स्थैर्य –

सुखात आणि दुःखात आपली मानसिकता स्थिर ठेवणे अतिशय अवघड आहे, त्यातही सुखापेक्षा दुःखात ती खूप अवघड आहे. जीवनात आपल्या कर्मा प्रमाणे सुख आणि दुःख येत असते. या सुख-दुःखाच्या लाटा पाण्यावर येणाऱ्या तरंगा प्रमाणे असतात म्हणून त्या कधीच स्थिर नसतात. मूळ पाण्याचे स्वरूप हे स्थिर असते, आपली मानसिक अवस्था ही अशी पाण्याप्रमाणे स्थिर असते, परंतु सुखदुःखाच्या लाटात ती हेलकावे खात असते.मानसिक स्थैर्य.

विश्व माऊली ज्ञानदेव म्हणतात,
सुखी संतोषा न यावे l दुःखी विशदा न भजावे ll
आणि लाभालाभ न धरावे l मना माजी ll

ही गोष्ट साधने शिवाय जीवनात साध्य होत नाही, म्हणून जीवनामध्ये आपला धर्म कोणताही असूद्यात, साधना असणे आवश्यक आहे. आपल्या ओळखीची, शेजारची आणि नात्यातील माणसे धडाधड मारायला लागली, अशा अवस्थेत मानसिक अवस्थेला स्थिर ठेवणे सर्वात अवघड आहे.

प्रत्येकजण स्वतःला धीर देतोय, परंतु मन घाबरलेले आहे. अशा घाबरलेल्या मनाला भक्कम बनवायचे असेल तर या मार्गावर यावेच लागते. माणसाला बिनधास्त व्हायचे असेल, तर मनातून भय संपायला हवे. निर्भयता विकत घेता येत नाही आणि ती कोणाकडून उसनीही घेता येत नाही, हे सर्वात मोठे दुर्दैव आहे, निर्भयता स्वतःलाच कमवावी लागते.

आपल्याला भगवंताच्या कृपेचे कवच असावे, असे प्रत्येकाला वाटते, परंतु खरोखरच त्याचे कवच आहे याची खात्री आपल्याला वाटत नाही. त्याच्या अस्तित्वाची आपल्याला खात्री नसते म्हणून त्याची जाणीव होण्यासाठी श्रीगुरुकृपेची गरज आहे.

आपल्याला त्याची आस लागावी, आसेचे रूपांतर हव्यासात व्हावे आणि हव्यासाचे रूपांतर ध्यासात व्हावे. आस लागते त्या वेळी इच्छा निर्माण होते, हव्यास निर्माण होतो त्यावेळी आपण त्यासाठी अट्टाहास करू लागतो आणि अट्टहासाची परिणीती ही ध्यासात होत असते. ध्यास लागताच जीवनाचे अंतिम ध्येय ठरते आणि हे साध्य झाल्याशिवाय राहत नाही. या प्रवासातून गेल्याशिवाय मानसिक स्थैर्य अशक्य आहे.

आज आपल्या प्रत्येकाला अशा मानसिक स्थैर्याची गरज आहे.

देखे अखंडित प्रसन्नता l आथी जेथ चित्ता ll तेथे रिघणे नाही समस्ता l संसार दुःखा ll

संसारातील कोणत्याही दुःखावर उपाय हा संसारात नसून तो परमार्थात आहे, फक्त तो शुद्धतेने करता आला पाहिजे.

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment