फेसबुकच नामकरण –
स्थळ :- मार्क झुक्याच घर
सोफ्यावर झुक्याचा सासरा आणि बायकोचा मामा बसलाय, खाली फरशीवर सासू आणि मामी बसलिये…बायको डोळे वासून लसूण सोलतिये…
सासरा ( चश्मा नाकावर घेऊन बटणाचा मोबाईल बघत ) जावाय ह्यात यिशुची गाणी द्या भरून, तिचं तिचं ऐकू ऐकू कटाळा आलाय.. मिम्री फुल आसन तर जून टाका उडवून..
झुक्या – ( बायकोकडे बघत ) हा आणा ईकड मी सांगतो कुणालातरी…
बायको (फरशीवर जोरात लसूण आपटत ) हा..तुम्हाला गड्डा आलाय..सांगा कुणाला तरी गाणी भराय…गावाची काम सांगा ह्या माणसाला.. छाताड वर करून जाईन…पण आप्पान एक काम सांगितलं तर ह्यो दुसऱ्याला सांगतोय…
मामी ( पदर घेत ) राणे अस बोलत्यात का ? नीट बोलत जा नवऱ्यासंग…
बायको – ( मनगटाने लसूण चेंबवत ) काय नीट बोलू मामे…आपल्याला इचारल नाय काय नाय…कंपनीचं नाव बदलून मोकळा झाला ह्यो…आता काय कप्पाळ हाणून घ्यु का ??
सासरा ( मिशीचा चहा पुसत ) आग पण कायतरी इचाराणी नाव बदललं आसन…उगा कोण कापण सोन्याची कुंबडी.. तुमि बोला पावन..
मामा ( गुडघा खाजवत ) हा..पण मला बी राणीचं बरोबर वाटतंय…अस अचानक नाव बदलल्यावर कस जमन..घरात चार लोकासणी इचाराव..चर्च च्या फादर च्या कानावर टाकावं… बगा कंपनी त्यांची…संसार त्यांचा…आपल्याला काय…उगा रानीमूळ आपुन आलोय नायतर काय ए आपलं इथ…
झुक्या – माज ठरल्याल..आणि आता नाव बदलून बी पैशेच येणारेत..उलट चार पैशे जास्तच येतेन..पण कमी नाय…
सासरा – तुमि ठरवलं ना.. मग आसन बरोबर…जाऊद्या… हौद्या मनासारखं..पण आमाला एकदा ईचारल तर मान दिल्यासारख व्हइन बाकी काय नाय…
बायको ( लसणाच्या पाकळ्या फुकत ) हौद्या की मी कुठ नाय म्हंते…पण मी नाय ह्रानार या माणसासंग..मला घिऊन चला…मी कशीबी राहीन माझं मी…
मामी – आस बोलू नी राणे…तुझ्या मामासंग मी ४० वर्ष काल्डी …आग डाटाचा धंदा ए त्यांना व्हत आसन खालीवर…घ्यायचं सांभाळून…
मामा – काय नाव ठुलय आता ? आण कस करायचं ठरवलंय…
झुक्या ( टिव्ही रिमोट च्या ढुंगणावर फटका मारत ) मेटा ठुलय..पण पुडच नाय ठरवल…ठरलं की सांगतो…
सासू ( राणीला जवळ घेत ) माझी पोरगी… लै हाल कडेलाव… जातेन ग माय हे बी दिवस…हे ठेव लाखभर बीट कोईन… आदिनडीला लागले तर.. निगतो आमी
झुक्या – जिऊन जावा मामी… सयपाक झाला आसन…
बायको ( तटकन उठून ) हा.. माजा बाप करत हुता सैपाक… तुमि नाव बदलुस्तोर…चांगल चालल व्हत…डाटा चोरायचे इकायचे..पैशे कमवायचे…काय आवदासा सुचली आसन या माणसाला… वाटूळ झालं माज…
मामा ( चप्पल घालत ) येतो आमी काळजी घ्या…लै नका वडातान करू काय लागलं तर सांगा…नाव बघा परत तेच ठुता आल तर..
सासरा ( झुक्याचा हात धरून ) तेवढं मोबाईल च बगा..जमलं तर द्या गाणी भरून…घाई नाय पण बगा…
मनोज शिंगुस्ते