मी कशी अशी?

By Bhampak Articles 8 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

मी कशी अशी?

” बघ आजसुद्धा गुळ चिरून डब्यात भरायला विसरली ही सरला परवापासून दोनतीन वेळा सांगितलं तरी काही म्हणून लक्षात रहात नाही हिच्या. परवा ओटा न धुताच निघून गेली घाईघाईने पोराचा फोन आला म्हणून. पोळ्यांचा तर काय उजेडच आहे. कधी कच्च्या, कधी करपलेल्या, कधी अगदी एवढ्याश्या कधी जाड जाड रोटले. कामात अगदी लक्ष म्हणून नाही हिचं. काढून टाक म्हणून किती वेळा सांगितलं पण तुला काही आहे का त्याचं? कसं चालवून घेतेस देव जाणे. मी तर एक दिवस असं चालू दिलं नसतं ”

15/20 दिवसांसाठी मुलाकडे रहायला आलेल्या सासुबाईंचा तोंडपट्टा चालू होता. ” आणि ती भैरी एक. आज काय सासरकडचं लग्न, उद्या काय माहेरकडचं मयत, एवढ्यातल्या एवढ्यात दोन दांड्या झाल्या तिच्या. बरं आल्यावर तरी धड काम करेल? एवढीशी ती मेली भांडी ती सुद्धा नीट घासत नाही आणि कपडे तर काय मशीनमध्ये धुतेय म्हणून तरी  जरा बरे निघतात पण आज एक कपडा इथे तर उद्या तिथे वाळत घालायचा आणि जरा झाडशील, झटकशील कि नाही? नुसती रडगाणी गाऊन पैसे मात्र बरोब्बर उकळता येतात तिला. मी नसतं हो असं खपवून घेतलं ”

उमा शांतपणे सगळं ऐकत एकीकडे आपली कामं भराभरा उरकत होती. मुलांचे आणि आपल्या दोघांचे डबे भरायचे, मुलांचे गृहपाठ, त्यांचे कपडे, नवऱ्याची चहाची मागणी, टॉवेल दे, रुमाल दे, एकीकडे आपली तयारी, आजच्या एका मोठ्या मीटिंगची पूर्ण अरेंजमेंट करायची होती तिला. एक ना दोन, सासुबाईंची बडबड ऐकायला वेळ कुठे होता तिला? तरी पण त्यातल्या त्यात त्यांची औषधे, पथ्याचं जेवण यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष्य होत नव्हतं तिचं.

स्वतः काही न करता नुसत्या बायकोच्या चुका काढत बसायचं आणि हुकूम सोडत बसायचं एवढंच करणारा नवरा, अभ्यासात काय कशातच अजिबात गती नसणारा मुलगा, आणि बऱ्यापैकी हुशार पण आईच्या कष्टांची अजिबात जाणीव नसलेली आणि घरात इकडची काडी तिकडे न करणारी मुलगी या सगळ्यांच्या कात्रीत सापडलेली सरला. पैशासाठी स्वयंपाकाची भारंभार कामं घेऊन ठेवल्यामुळे सतत घाईत असलेली आणि त्यामुळे थोड्या चुका होतात तिच्याकडून, कधी कधी विसरतेही काही गोष्टी कामाच्या धांदलीत. पण तरी सदा हसतमुख.. कधी काही बोललं  गेलं तर राग पण येत नाही तिला.. उलटून बोलणं नाही, हे नको का समजून घ्यायला?

भैरि म्हणजे भैरवी. नवरा ऍक्सीडेन्टमध्ये वयाच्या चोवीस पंचविसाव्या वर्षीच गेला आईबापांचा आधार नाही, दोन मुलं पदरात. त्यांना वाढवत, त्यांच्या हौशी भागवत मिळेल ते काम धडाडीने करणारी. स्वतः सुद्धा थोडीशी शिकलेली, मुलांना जास्तीत जास्त शिकवण्यासाठी धडपडणारी, नवरा लवकर गेला तरी सासरच्यांना धरून ठेवणारी भैरि. थोड्या जास्त दांड्या होतात तिच्या पण आल्यावर धडाधड कामं उरकणारी. एक दिवस सगळी रामकहाणी सांगितली होती तिने. आणि सुतळीच्या तोड्याला म्हणतात तसं हात लावत नाही ती. तिच्याकडे किल्लीच असते दिलेली. आज बारातेरा वर्षं काम करत्येय ती. तिला कसं काढणार? थोडं आपण पण समजून नको का घ्यायला?

सगळं आटपून कंपनीची बस गाठल्यावर मात्र डोळे मिटून शांत बसली उमा. तेव्हा हे सगळे विचार येत होते तिच्या मनात. सासूबाईंचं काय जातंय म्हणायला या माणसांना काढून टाक म्हणून? गावाकडे मिळतात माणसं पण इथे शहरात, विश्वासू माणसं मिळवायची आणि टिकवायची म्हणजे थोड्या तडजोडी कराव्याच लागतात.. हे कोण समजावून सांगणार त्यांना?

केबिनमध्ये येऊन बसली उमा. अगदी तिला हवा तसा चहा करून आणून देणाऱ्या गोपाळचा पत्ता नव्हता अजून. त्याच्या ऐवजी दुसऱ्याच एका पोऱ्याने आणून दिलेला चहा कसातरी प्यायली ती. यापेक्षा मशीनचा चहा बरा असं वाटून गेलं तिला पण मॅडमना मशीनचा चहा आवडत नाही हे माहिती असणाऱ्या नितीननेच बहुतेक लगेच या मुलाला चहा घेऊन पाठवला असावा. “एवढ्यातल्या एवढ्यात गोपाळचा हा तिसरा चौथा लेट.” शोभा कुरबुरलीच तेवढ्यात. दीड महिन्याचा प्री मॅच्युअर मुलगा, आजारी आणि अशक्त बाळंतीण बायको, या गोपाळच्या अडचणी कुणी विचारातच घेत नव्हतं. तो तरी काय करील बिचारा?

शैला अजूनही मिटींगच्या तयारीतच गुंतली होती. खरंतर ही तयारी तिने कालच करणं अपेक्षित होतं पण नुकतंच लग्न ठरलेली बिचारी आईवेगळी पोर. त्यात नवरा लग्न झाल्या झाल्या बोटीवर जायचा होता. आत्ताच जरा त्याच्याबरोबर फिरायची संधी होती त्यामुळे काल लवकर घरी गेलेली. पण आज लवकर यायला हवं होतं तिने. नसेल जमलं. विरारहुन उभ्याने येते बिचारी. लवकरची लोकल नसणार मिळाली..

मंजिरीताईंची फाईल तर तिलाच बघायला लागणार होती. जेमतेम बारावी शिकलेल्या पण पंचेचाळिशीतही सौंदर्य राखून असणाऱ्या मंजिरीताई. रूपाच्या बळावर आयआयटीयन नवरा पटकावलेल्या पण कमनशिबी. अवघ्या बेचाळिसाव्या वर्षी दोन मुलं पदरात टाकून नवरा ऍक्सीडेन्टमध्ये गेला. कंपनीने अनुकंपा म्हणून जॉब तरी दिला पण कुठचंच काम जमत नव्हतं त्यांना. त्यांचीही उमाला फार दया यायची. त्यामुळे त्यांनातर सांभाळून घ्यायचीच ती.

हुश्श! झाली बाई मीटिंग एकदाची. नाही म्हटलं तरी दोन दिवस या मीटिंगचं टेन्शन होतंच तिला. पण मीटिंग छान झाली बॉसने कौतुक करत आणखी थोडं काम वाढवून दिलं. सगळं झालं.. डोक्यावरचं ओझं उतरलं. घरी येताना एकदम फ्रेश मूड होता तिचा. पण सासूबाईंचा सकाळचा सरला आणि भैरीवरचा राग गेला नव्हता.. महेश  आल्यावर त्यालाही सांगून झालं त्यांचं. वर ही काहीच बोलत नाही त्यांना म्हणून उमाची तक्रार सुद्धा करून झाली त्याच्याजवळ.

आता महेश काय आत्ता ओळखत होता का उमेला? गेल्या सतरा वर्षात तिच्या स्वभावाचा कोपरान  कोपरा माहिती होता त्याला. आईला काहीतरी थातुरमातुर उत्तर देऊन शांत केलं त्यानं. खोलीत आल्यावर आधी मीटिंगची चौकशी करून झाली. पण नंतर मात्र त्याला राहवलं नाही. “आई इतकं बोलत होती तरी तू इतकी कशी गं शांत राहतेस? नसेल जमत तर जा म्हणावं गावी आता ” “अरे अरे असं काय म्हणतोस? आई आहे ती तुझी. आणि गावात खोतीणबाईंना उलटून बोलायची टाप आहे का कुणाची म्हणून तशीच सवय झाल्ये बोलायची. दुसरं काय?”

उमा मात्र विचार करत होती.’मी अशी कशी?’ तिच्या मैत्रिणी पण तिला चिडवायच्या हिच्या डोक्यावर बर्फाची एक लादी देवाने कायमचीच बसवून ठेवल्ये म्हणून..

पण उमाला मनोमन माहिती होतं आपल्या स्वभावाचं मूळ. तिचे बाबा असेच होते. आई तर त्यांना तुकारामच म्हणायची. वाडीत पडलेले नारळ खुश्शाल चुलत काका घेऊन जायचे, कधी कधी तर थोडे खाली लागलेले फणस, आंबेही नेण्यापर्यंत त्यांची मजल जायची पण आई काही सांगायला आली तर म्हणायचे अगं, तसं नाही केलं तर खातील काय बिचारे? आईने हौसेने बागेत लावलेली फुलं कोणी नेली तरी म्हणायचे, “अगं त्यांचा काय नि आपला काय देव एकच ना? आणि तू करत्येयस कि बक्कळ फुलांचे हार. शेवग्याच्या शेंगा, पपई, पेरू कोणी नेले ते आईला बरोब्बर माहिती असायचं पण बाबांना सांगायची सोय नाही.”तुला किती हवंय ते सांग. मी आणून देतो “.. याच्यावर बिचारी ती तरी काय बोलणार? काका धाकटा भाऊ असून सुद्धा दादाला उलटून बोलायचा कधी कधी पण आई कधी काही म्हणाली कि म्हणायचे त्याचा स्वभावच तसा आहे त्याला काय करणार? मोलकरणीने काही बेअकलीपणा  केला आणि आई काही बोलली कि म्हणायचे ” अगं एवढी अक्कल असती तर ती मोलकरीण कशाला झाली असती? तुझ्यासारखी वकिलीणबाई म्हणून नसती का मिरवली? आई कपाळाला हात लावायची.

सकाळी कामाच्या गडबडीत परत सासूबाईंचा आरडाओरडा ऐकू आला म्हणून बघितलं उमाने तर सासुबाई शऱूला म्हणत होत्या अगं काल आणलेली नवी बाहुली त्या स्वरिटलीला काय देऊन टाकलीस? आणि शर्वरी आज्जीला समजावत होती अगं तिच्याकडे नाहीये तशी माझ्याकडे अगदी तश्शा दोन आहेत आणि त्यांचे फ्रॉक खूप छान आहेत.

उमाला खुद्कन हसु आलं…

अपर्णा केतकर, आगाशी

Leave a comment