गैरसमज आणि वेदना

bhampak-banner

गैरसमज आणि वेदना –

आपल्या बदल होणारा गैरसमज, हा खूप वेदनादायी असतो. वास्तव वेगळे असते, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विकृत बनला की गैरसमज होतो.

आपल्या स्वतःला ज्यावेळी समजते की आपल्या बद्दल गैरसमज झालेला आहे, त्यावेळी गैरसमज दूर करण्याचा आपण कितीही प्रयत्न केला आणि तो कितीही प्रामाणिक असला, तरी गैरसमज करून घेणाऱ्या व्यक्तीची मानसिकता समजून घेण्याची नसते. त्यामुळे उलट अशा प्रयत्नांचा आपल्याला त्रासच होतो.

आपल्या बद्दल आणि आपल्या कृतीबद्दल, वक्तव्याबद्दल समोरच्याने काय अर्थ काढावा ? हे आपल्या हातात नसते. समोरच्या व्यक्तीचा भाव आपल्याबद्दल पूर्वग्रहदूषित असेल, तर आपल्या कोणत्याही चांगल्या कृतीचा अर्थ त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार गैरच निघतो. आपण स्वतःला विचारून आणि तपासून पहावे, त्या कृतीत, वक्तव्यात आपण निर्दोष असू, तर त्याचा काहीही अर्थ निघो, आपण बिनधास्त असावे.

गैरसमज करुन घेणारी व्यक्ती, जर जवळचा मित्र असेल, तर त्याच्या इतके आपले आणि त्याचे दुसरे दुर्दैव नसते. मित्रांजवळ बोलताना आणि वागताना आपण सर्वात जास्त मनमोकळेपणाने, निर्धास्तपणे आणि विश्वासाने बोलत असतो. बहुतांशी आपली मैत्री एक तर्फी असते , हे अनुभवानेच कळत असते.

ज्याला आपण मित्र समजतो, कदाचित त्याला आपल्याबरोबर टाईमपास करायचा असतो किंवा ती त्यावेळची त्याची गरज असते. त्यात आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम नाटकी असते. अशा मित्र नसलेल्या व्यक्तीला आपण मित्र मानत असलो, तर ती आपली गंभीर चूक असते आणि ही चूक लक्षात येताच आपल्याला खूप पश्चात्ताप होतो.

स्वतःला जगापेक्षा वेगळे, महान, प्रतिष्ठित समजणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात मित्राचे स्थान गरजेपुरतेच असते. अशी व्यक्ती कोणाचाही, कधीही खरा मित्र बनू शकत नाही. उगीचच त्या व्यक्तीला दिला जाणारा बहुमान, हा कधीकधी लाचार असतो किंवा नाईलाज असतो. अशा बहूमानात कोणाचेही प्रेम नसते.

मित्र होण्यासाठी आपल्या जीवनातील सगळ्या पातळ्या सोडून देऊन समतेत यावे लागते. हे समतेत येणे देवत्वा इतके महान आहे आणि अशी महानता फार क्वचित लोकांकडे असते . अशा महान व्यक्तीसी आपली मैत्री असेल तर आपल्या इतके भाग्यवान दुसरे कोणी नाही. दुर्दैवाने आपल्या जीवनात अशा व्यक्तींची संख्या खूप नगण्य असते .

बहुतेक स्वतःला मोठे समजणारी माणसे, ही वृत्तीने खूप छोटी असतात. आपला मित्र मोठा आहे, याचा प्रत्येक मित्राला अभिमान वाटत असतो, परंतु मोठा मित्र आतून किती छोटा आहे ? याचा अनुभव आपल्याबद्दल ज्या वेळी त्याचा गैरसमज होतो त्याच वेळी कळतो.

वास्तविक त्याचा तो गैरसमज नसतो, तर त्याचा तो स्वभाव असतो. आपण त्याला खूप जवळचा मानतो, हा आपलाच गैरसमज असतो. ज्या वेळी आपला समजलेला माणूस परका आहे, हे तो स्वतः सिद्ध करतो, त्यावेळी आपला प्रचंड अपेक्षाभंग होतो. ही अपेक्षाभंगाची वेदना खूप तीव्र असते आणि दुर्दैवाने ती आपल्या स्वतःला एकट्यालाच भोगावी आणि सहन करावी लागते.

अनुभवातून आलेले शहाणपण हेच आहे, की मैत्री बरोबरीच्या माणसांशी करावी किंवा आपल्याला मित्र होण्यासाठी सर्वांच्या बरोबर येण्याची कला असावी. आयुष्यात मोठ्या माणसांना मित्र बनवण्याच्या आणि ठरविण्याच्या फंदात पडू नका कारण यात फक्त अपेक्षाभंग, गैरसमज, पश्चात्ताप आणि सहन न होणारी लाचारी पदरी पडते.

जी माणसे स्वाभिमानी असतात, ती एकटे राहणे पसंत करतात, परंतु _अशा मैत्रीसाठी नालायक असलेल्या माणसाला खेटायला जात नाहीत, हेच खरे शहाणपण आहे. कोणी कितीही मोठा असला, तरी निरपेक्ष वृत्तीने जवळ येणारा मित्र, त्याच्यावर निरपेक्ष आणि निर्मळ प्रेम करतोय, हे त्याला कधीच समजतच नाही.

डॉ आसबे ल.म.

Leave a comment