मनी हाईस्ट भाग ५ | नियोजन

मनी हाइस्ट मराठी भाग १ २ ३ ४ ५ ६ ७

मनी हाईस्ट भाग ५ | नियोजन –

अकोला (चप्पलच तुटलेलं हूक काडीने बसवत… नाशिकला ) लै परेशानी झाली राव…पटापट हालचाल करायला पाहिजे हे प्लॅनिंग करत बसलो तर कधी व्हायचा शॉट ?

नाशिक – (दाताने ऊस सोलत) नाय नाय …त्यांच्या त्यांच्या पद्धतीने होऊदे..आपण बोलाय जायचो आणि त्यांना येगळं वाटायचं…हुशार माणसानं गप राहावं…

अकोला – आयचा गुर्जी…आज सगळा सोक्ष मोक्ष लावूनच टाकू.. ह्याच्या माग हिंडायला जन्म झालाय का आपला ?..गप झोम्याटो ला ऑर्ड्री मारायचो..मधी मधी पाकीट फुडून खायचो…सगळं बंद झालं…ती बघ मुंबै..कुड निघली ही पावडर लाऊन…मुंबापुरी…

नाशिक – आयच्या…ते बघ माघ धाराशिव पण येतंय…कायतरी शॉट आहे यांचा..थांब ह्यांचं मुडू..अय मुंबाय  कुड निघाली ???

मुंबई – अरे तुम्ही इकडे आहे होय…तिथं गुरुजी ढूंढ रे ना तुम लोगो को…

अकोला – हा व्हय..ते छोडो वो धाराशिव तुम्हारा पाठलाग कर रहा है… हरामखोर माणूस है वो…लै चाभरा है..सांभाळ के रहो उस्से

मुंबई – अरे…नाही भाऊ…वो हम रेंज चेक करे.. जिओ का नया सिम लाया ना..

अकोला – (डोळे ओलावून ) भाऊ ???  भाऊ आहे का मी तुजा…(तोंड वाकडं करून रडायला लागतो )

नाशिक – च्यायच.. आशिक चल ए गुर्जी वाट बघतय…लागलं इवळायाला…चल..लै पुरी आहेत हिच्या कुड नादी लागतो… मुंबईचा मेळ नसतो लागत कुणाला..

अकोला – ( डोळे पुसून शेंबूड ओढत..)खर लव नाय राव…जगात…आता फक्त करियर वर आणि जिम वर फोकस बाकी गेलं..ह्याच्यावर…चल..

गुर्जी फळ्यावर काहीतरी लिहीत…आले का सगळे ??

पुणे – ( बाकरवडी मधली शेव एक एक करून खात ) हो..आपण करूया सुरू…

गुर्जी – कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्याचे परिणाम समजून घेतले पाहिजेत, म्हणजेच या चोरीचे परिणाम काय होतील…सगळ्यात आधी आपण जी बँक लुटणार आहे ती आहे भरवस्तीत..दिवसाढवळ्या आपण तिथं घुसणार …

नाशिक – एक मिनिट..आपण पैशे किती लुटणार..म्हणजे प्रत्यकी किती एतील ? कस ए त्या हीशोबान तयारी करायला..

गुर्जी – तुमच्या कोमल मेंदूला कोणताही ताण देऊ नका सगळी तयारी मी केलेली आहे.. तरी माझ्या अंदाजे प्रत्येकाला येवढे पैसे मिळतील की आमदारकीला पडलात तरी ताठ कणा घेऊन ४-५ वेळा खासदारकी लढवाल…

धाराशिव – म्हणजे नेमके किती ??? माझा आजा आमदारकीला उभा राहिलेला…तर म्हातारीच्या बांगड्या इकुन तर इलेक्शन मारल.. चुलत्यान तर शेव आणि भिळीवर केलं इलेक्शन…आत्याचा नवरा पण…

नाशिक – अय राजकुमार.. दम घे…ह्यातलं कोण निवडून आल्याल का ?

धाराशिव – कोण नाय…

नाशिक – उठ भाडखाव..लांब बस… निव्वाळ बाताड ए..

गुर्जी – झालं असेल तर पुढं सांगू ?…आपण सगळे वेगवेगळ्या वाहनाने बँकेच्या गेट वर जाणार…पैकी धाराशिव आणि मुंबई एका गाडीत असतील…

अकोला शेळपाटल्या तोंडाने नाशिक कडे पाहतो

नाशिक – गुरजी !! ह्या अकोला आणि मुंबईला एकत्र जाऊद्या मी आणि धाराशिव जातो एकत्र…

धाराशिव – आर तुला काय उरावर घेऊ का… गुर्जी काय येडय का कायतरी इच्चार करूनच आम्ही जुडी जुळवली आसन ना.. व्हय का नाय मुंबै ????

अकोला शर्टच्या बाहिने नाक पुसत… जाऊदे नाशिक नियतीच्या हेच मनात आसन त आपण काय करू शकतो..

आपण जाऊ यांना जाऊदे… दैवा पुढं काय चालणार..

धाराशिव – हा जावा जावा…आले लगी मुंबैला हेज्या संग् जाऊद्या वाल…

गुर्जी एक चप्पल शोधायला टेबल खाली वाकतात आणि तिथूनच सांगतात… मुंबै तू पुण्यासोबत रहा…बाकी धाराशिव तू माझ्या गाडीत चल…मी सोडतो..

धाराशिव – नगो नगो…मी जाईन तर मुंबै सकट नायतर जातो माझा माझा उस्तोडी ला..घाला तुमची…

पुणे – अरे त्या मुंबई ची ईच्छा आहे ना माझ्यासोबत यायची तुम्ही का खोडा घालताय ???

अकोला – पण ती कवा म्हणली मला पुण्यासंग जायचयं…हे गुर्जाड च पचाकलय… ती जाईन त माझ्या संग नाहीतर मी बी नाय येत…

पुणे – काय हरामखोर माणसं आहात तुम्ही…एका मुलीसाठी भांडताय … ती माझ्यासोबत आली तरच हे काम होईल अन्यथा आमचा राम राम घ्यावा…

नाशिक – तुम्ही सगळे गप घाला…आणि भांडू नगा…मी न्हेतो तिला ..पण तुम्ही शांत बसा…निस्ती किर किर किर किर…

गुरजी ( चश्मा काढून टेबल वर ठेवतो ) एकाचा जरी आवाज आला ना आता…तर याद राखा…लाज वाटायला पाहिजे एकटी मुलगी आणि तिच्यासाठी सगळे भांडताय..ही चोरी म्हणजे काय मस्करी चा विषय आहे का ?????? जमत असेल तर सांगा नाहीतर मी दुसरी माणस पाहतो…उद्या मला तुमचा निर्णय कळवा…तो पर्यंत मुंबई तू माझ्यासोबत रहा… नीच प्रवृत्तीचे कुठले…शी…

क्रमशः

मनोज शिंगुस्ते

Leave a comment