नळीचे दिवस !
एरवी नदीकडं कधी जाणं घडत नाही. नदीची सहजी आठवणही होत नाही. जगण्याचा वेगच इतका अफाट अन् अचाट, की त्याच्यापुढं आता जणू कशाचाच टिकाव लागत नाही. सुट्टीत काल संध्याकाळी आपसूकच पाय नदीकडं वळले. पोरवयातल्या कितीतरी आठवणी तिच्यापाशी रेंगाळेल्या होत्या. उरमोडी ही आम्हां भरतगावकरांची नदीमाय. नदीला माय संबोधणं यातच अापलं तिच्याशी असलेलं नातं कळतं.नळीचे दिवस त्यासाठी आणखी शब्द हवेतच कशाला?
हायवेवरुन पश्चिमेकडं सरळ तोंड केलं, की पुढची वाट नदीकडं जाते. नदी ओलांडली, की मग नळी. खरं तर नळी म्हटलं तर फारसा अर्थबोधही होणार नाही. मात्र नळी शब्द ऐकिवात नाही, नळी माहित नाही असा माणूस गावात विरळाच. नळी म्हणजे झऱ्याचं वाहतं पाणी घेऊन जाणारा मार्ग. कदाचित कुणी म्हणेल हा काय सांगण्याचा, लिहिण्याचा विषय?
अर्थात नळीचं माहात्म्य मोठं.
नळीचा आधारही मोठा. म्हणजे त्याकाळी उन्हाळ्यात नदी आटेल, मात्र नळी अखंड वाहातच राहणार. ही नळी म्हणजे तनामनाला थंडाई देणारी आमची जिव्हाळ्याची जागा. अंगाची लाही होत असताना जावं अन् थेट नळीखाली उभं राहावं. अगदी मनसोक्त, मनमुराद. कितीही वेळ. रखरखीत उन्हातलं सुख म्हणजेच जणू ती नळी.
त्याकाळी नदीकडंला असलेलं मोकळं शेत म्हणजे आमचं क्रिकेटचं ‘लाॅर्डस’. खेळून, दमूनभागून झालं, की पहिली आठवण नळीची. तिच्याभोवती करंजाची झाडं. करंजाच्या पानात ‘लाइफबाॅय’ गुंडाळेला. ‘सोप बाॅक्स’ हा शब्द तेव्हा अस्तित्वात यायचा होता. दिवसभर नदीकाठानं वणवण भटकून बादलीभर जमा झालेल्या खेकडे- माशांचा रटरटीत रस्सा तिथंच तीन दगडांच्या चुलीवर बनायचा. भुर्रकन ओढायचा तोही नळीच्या साक्षीनं!
आता जसं जगाचं रुप पालटलं,
तसं नळीचंही. अलीकडं उरमोडीवर खूप मोठा बंधारा उभा राहिला आहे. दूरवर विस्तीर्ण पाणीच पाणी. नव्या पिढीचा तो ‘फोटोसेशन पाॅईंट’. पण त्या चित्रात नळी आता कुठंही दिसत नाही. तिची धारच जणू आता लुप्त झाली आहे. दिसेनाशी बनली आहे. मुलं आता घरी ‘शाॅवर’खाली उभी राहतात. तरीही मनानं, शरीरानं कोरडी भासतात. आमचा नळीचा ‘शाॅवर’ मात्र आजही तनामनाला चिंब करुन सोडतो, हेच खरं!
सुनील शेडगे । नागठाणे ता. सातारा