स्वच्छंदी जीवन

By Team Bhampak Articles Laxman Asbe Lifestyle 2 Min Read
ट्रेकिंग

Nobodies | स्वच्छंदी जीवन –

स्वच्छंदी जीवन- इज्जतीत जगायला कोणत्याही माणसाला आवडते . मला इज्जत देऊ नका असे म्हणणारा माणूस एकतर वेडा असतो किंवा महात्मा असतो. आपण शहाणी सामान्य माणसे आहोत, त्यामुळे आपल्याला इज्जतीची गरज आहे. कोणत्याही समारंभात , कार्यक्रमात आपल्याला सहभागी व्हायला आवडते, त्यातही त्याठिकाणी इज्जत मिळणार असेल तर ते जास्तच आवडते .
ही आपल्या सर्वांच्या आवडीची इज्जत आपल्या मानसिकतेवर खूप परिणाम करते, त्याचा परिणाम कार्यक्रम चांगला का वाईट ? यापासून ते आपल्याला आनंद मिळाला का त्रास झाला ? इथपर्यंत पोहोचतो .

एखाद्याच्या लग्नात आपला उल्लेख झाला नाही किंवा सत्कार झाला नाही , तर लग्नातच थयथयाट करणारी कितीतरी माणसे आपल्याला पहायला मिळतात . आपली कोणी दखलच घेतली नाही तर आपल्या आत असाच थयथयाट चालू असतो, काहींचा व्यक्त असतो तर
काहींचा अव्यक्त असतो , पण कार्यक्रमातून बाहेर पडताना हा थयथयाट बदला घेण्याची प्रतिज्ञा करायला भाग पाडतो .
ही इज्जत न दिसणारी , पण भयानक परिणाम करणारी आहे . हीचा उगम स्वतःला काहीतरी वेगळे ( somebody ) समजण्यातून होतो . हे स्वतःला काहीतरी समजणे म्हणजे उपाधी किंवा कल्पना असते आणि याला आपण घट्ट चिकटलेलो असतो, नव्हे यांना घेऊनच आपण समाजात फिरत असतो, त्याच्यापेक्षा आपण या कल्पना आणि उपाधी सतत समोर नाचवून समाजाचे लक्ष त्याकडे वेधन्याचा प्रयत्न करत असतो.

अधिकारी डॉक्टर महाराज पुढारी , नेता पदाधिकारी समाजसेवक कार्यकर्ता , बागाईतदार पंडीत कलाकार इत्यादी आणि अनेक बरेचकाही या सगळ्या उपाधी इज्जती शिवाय जिवंत ठेवता येत नाहीत . हे ओझे घेऊनच आपण आयुष्यभर फिरत असतो .
हो ! हे ओझेच आहे ! कारण आपल्या डोक्यावर घेतले तर इज्जत मागत असते आणि दुसऱ्याच्या डोक्यावर दिले तर ती त्याच्यावर बळजबरीच असते, कोठेही असू द्यात हे ओझेच ठरते .

एकदा हे ओझे फेकून देऊन पहा आणि आपण कोणीही नाही ( Nobodies ) या अवस्थेत येऊन पहा किती मोकळे मोकळे वाटतेय ते .
हे खरे स्वच्छंदी जीवन आहे , असा स्वच्छंदी माणूस कोठेही आणि कसाही असू द्यात तो कायम समाधानी आणि आनंदी असतो.

– डॉ. आसबे ल.म.

Leave a comment