इथे ओशाळला मृत्यू

bhampak-banner

इथे ओशाळला मृत्यू –

प्रत्येक माणसाला वाटतं माझं सगळं व्यवस्थित झाल्यावर मी समाजसेवा करीन, देशसेवा करीन, परोपकार, पुण्य आणि परमार्थ करीन. दुर्दैवाने त्याला वाटते तसे मरेपर्यंत व्यवस्थित होतच नाही, म्हणून हे केलेले संकल्प कधीही पूर्णत्वास जात नाहीत. जीवनात मृत्यू अटळ आहे, हे प्रत्येकाला माहीत असते, परंतु कोणालाच आज आणि आत्ता मृत्यू नको असतो. जी व्यक्ती आपला मृत्यु आत्ताही होऊ शकतो, यावर विश्वास ठेवते, ती व्यक्ती आपल्या हातात असलेल्या आणि जिवंत असलेल्या क्षणाचे सोने करते.

माणसाची जशी वृत्ती असेल, तसे त्याच्या हातून घडत असते. महारथी कर्ण मृत्यूपूर्वी आपल्या तोंडात असणाऱ्या सोन्याच्या दाताचे दान करून गेला. त्यासाठी त्या व्यक्तीला आपल्या तोंडावर त्याने दगड मारून तो दात तोडून घेऊन जाण्यास सांगितले.

दुर्योधनाने मृत्यूपूर्वी अश्वत्थामास सेनापती नेमले आणि त्याच्याकरवी द्रौपदीच्या पाच पुत्रांचा, पांडवांच्या उरलेल्या सेनेचा आणि पर्यायाने कुरुवंशाचा घात केला. गर्भात असणारा परिक्षित सुद्धा त्यातून सुटला नाही, श्रीकृष्ण कृपेने तो वाचला.

जिवंत असताना सत्कर्म करणाऱ्या माणसालाच मृत्युसमयी सत्कर्म सुचते.* आयुष्यभर पैसा पैसा करत संसार करणाऱ्या माणसाला मृत्यूसमयी संसाराची चिंता आणि काळजी लागलेली असते. जीवनाचा भरवसा कोणालाही, कधीही नसतो, हे वास्तव आज अगदी स्पष्टपणे अनुभवाने जाणवत आहे. आपलेही मरण अटळ आहे, परंतु मृत्यूपूर्वी आपल्या हातून काहीतरी चांगले घडावे असा संकल्प आजही चांगल्या माणसाच्या हातून घडत आहे आणि त्याप्रमाणे मृत्यूपूर्वी काही चांगले काम करून काही सदाचारी, परोपकारी, त्यागी आणि वैरागी माणसे देह ठेवत आहेत. आज या माणसांमुळेच भारताची वैराग्याला आणि त्यागाला प्राधान्य देणारी संस्कृती जिवंत आहे.

संघ स्वयंसेवक नारायण दाभाडकर वय वर्ष 85 यांना कोरोना झाला. ते दवाखान्यात भरती झाले, ऑक्सिजन चालू होता. एक चाळीस वर्षाची तरुणी आपल्या नवऱ्याला ऑक्सिजन बेड मिळत नाही, तो कोणीतरी पुरवावा म्हणून धाय कोलमडून रडत होती आणि विनवणी करून प्रत्येकाचे पाय धरत होती. नारायण दाभाडकर या व्यक्तीने ते पाहिले आणि डॉक्टरांना विनंती केली की

“माझे जगून झालेले आहे, त्या मुलीचा नवरा तरुण आहे, तो जगला पाहिजे ! माझा ऑक्सिजन बेड काढा आणि त्याला द्या !”

दाभाडकरांच्याच्या कुटुंबीयांनी त्याला विरोध केला, परंतु दाभाडकरांनी ते ऐकले नाही. दवाखान्यातील कायदेशीर कागदपत्रे पूर्ण केली आणि त्या व्यक्तीला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ऑक्सिजन बेड दिला. ऑक्सिजन अभावी नारायण दाभाडे यांची प्राणज्योत मालवली. हे मरण नाही तर पवित्र बलिदान आहे !

मरतानाही आपण ठरवले, तर खरोखरच काहीतरी चांगले करू शकतो. आज नारायण दाभाडकरांचा प्राण जात असताना मृत्यूही ओशाळला असेल आणि प्राण घेऊन जाणारे यमदूतसुद्धा त्यांच्यासमोर नतमस्तक झाले असतील.

मरण माझे मरोनि गेले l मज केले अमर ll आज ना उद्या मरण तर येणारच आहे, परंतु भगवंता मरताना नारायण दाभाडकर होण्याची सद्बुद्धी मला दे !

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment