पान | Paan

By Bhampak Foods 1 Min Read
पान | Paan

पान –

काय आहे नं मला खाण्याची खोड भारी, त्यामुळे हे असं होतं. मध्यंतरी ते ब्लू टी बद्दल वाचलं होतं, त्यामुळे गोकर्ण चे रोप आणून, कारल्याच्या वेला प्रमाणे कर गं सुने, लाव गं सुने करून फुलं आल्यावर केला एकदाचा ब्लू टी. तसं आता मघई पानांचं झालं ब्वा. आणलं होतं रोप हौसेने, दहादा खात्री करून घेतली होती भैय्या इस्को ऊन चालताय ना? हा मॅडम चाललाय चाललाय म्हणून घेतलं पान रोप.

शान से छानशा कुंडीत लावून बाल्कनी मध्ये ठेवलं. बाकी रोपं आनंदात दिसत होती, हे मात्र हिरमुसलेलं. पानं अगदी दुष्काळी दिसायला लागली जरा अभ्यास केला, ह्याचं काय करायचं ह्याचा.

मग रुसलेल्या घरातल्या लहानग्याला कसं बाजूला विश्वासात घेऊन आपण पटवतो, तसं ह्याला बाजूला घेऊन सावलीत ठेवलं. रोज ऊन त्यावर येऊ लागलं की त्यावर टॉवेल घालायचा. कायम माती ओलसर असेल असं बघायचं! भलतीच नाजूका आहे ही. पण सगळ्या रोजच्या खटाटोपाचा चांगला परिणाम झाला. पानांचा रंग बदलला, रोपाने छान जोर धरला.आणि मग मला चेव चढला.

विडा होईल अशा घरातल्या सगळ्या जिन्नस गोळा केल्या आणि पहिला करून विडा. भातुकलीतील ही भांडी पितांबरीने चमकवली. मग हा फोटोचा प्रपंच आणि मग छान रसोत्पत्ती केली.

पु. लं च्या पानवाल्याची आठवण न आली तर नवल. त्यांना ऐकले आणि केलेल्या ह्या सगळ्या खटाटोपाचे सार्थक झाले!

©सायली थिटे

Leave a Comment