पडघवली | Padghavali Book

By Bhampak Book Review Sunil Shedage 2 Min Read
पडघवली | Padghavali Book

पडघवली –

‘पडघवली’ हे कोकणच्या निसर्गरम्य पटावर रेखाटलेलं सुंदर चित्र. पडघवलीही ‘कादंबरी’ नव्हे, तर ते एका नष्ट होऊ घातलेल्या खेड्याचं शब्दचित्र आहे. ‘पडघवली’ ही मराठी प्रादेशिक कादंबरीच्या विकासक्रमातील एक महत्त्वाची  कादंबरी मानली जाते. गो. नी. दांडेकर यांच्यासारख्या तपस्वी, ऋषितुल्य तितक्याच कलंदर व्यक्तिमत्त्वानं ती शब्दबद्ध केली आहे.

‘गोनिदां’नी विपुल लेखन केलं. म्हणजे जवळपास 50 वर्षे ते लिहित राहिले. कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णनं, धार्मिक, पोैराणिक असे बहुतेक सारे साहित्य प्रकार त्यांनी लीलया हाताळले.

पवनाकाठचा धोंडी, जैत रे जैत, शितू, माचीवरचा बुधा, पूर्णामायची लेकरं, कुणा एकाची स्मरणगाथा यासारखी गाजलेली साहित्यसंपदा ही ‘गोनिदां’चीच. त्यांच्या पुस्तकांवर चित्रपट आले. पुस्तकांचे हिंदी, सिंधी, गुजराती या भाषांत अनुवाद झाले. रेखीव अन् विविधरूपी निसर्गदर्शन, प्रादेशिक बोलींचा वापर, नाट्यपूर्ण घटनांची निर्मिती, ठसठशीत स्त्री-चित्रण हे ‘पडघवली’चं वैशिष्ट्यं. कथाविषयाची वेगळी हाताळणी अन् समूहचित्रणामुळंही ती वाचकांच्या लक्षात राहते.

‘पडघवली’ सर्व मरगळ आलेल्या खेड्यांची प्रतिनिधी आहे, असं ‘गोनिदा’ मानतात. हे शब्दचित्र  व्यथित मनोभूमीतून निर्माण झालेलं आहे. वाचक आपल्या जीर्णशीर्ण कोसळू पाहाणार्‍या खेड्यातील घरकुलांकडे वळतील, अशी अपेक्षाही यानिमित्तानं ते व्यक्त करतात.

सध्याच्या काळात ओस पडणारी खेडी, ढासळत चाललेली समाजव्यवस्था, मूल्यांचा होणारा ऱ्हास, उदध्वस्त होत चाललेली ग्रामसंस्कृती पाहिली, की ‘गोनिदा’नी 1955 मध्ये साकारलेली ‘पडघवलीकाळावर नजर ठेवणारी होती, हे नक्कीच!

पुस्तकाचं नाव। पडघवली
लेखक। गो. नी. दांडेकर
प्रकाशन। मृण्मयी प्रकाशन
पृष्ठसंख्या। 256
किंमत। 300 /- रुपये

सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा

Leave a comment