पैंजण | Painjan

By Bhampak Story Sameer Khan 21 Min Read
पैंजण | Painjan

पैंजण –

(कथेतील सर्व पात्रे काल्पनिक असून वास्तवतेशी त्याचा काहीएक संबंध नाही. काही गोष्टी मानवी आवाक्याबाहेर असतात. विज्ञान कितीही प्रगत झाला असला तरी ईश्वरी शक्तिपुढे तो थिटाच आहे. त्याचप्रमाणे जशा ईश्वरी शक्ति असतात तशाच काही अतृप्त आत्मे ही असतात. यावर ऊगाच विनाकारण वाद घालत बसू नये.)

भक्कम चिरेबंदी आयताकार वाडा,चौफेर असणारी तटबंदी. त्या तटबंदीला साजेसा तेवढाच भक्कम अस्सल सागवानी व पितळी  सिंहाक्रृती आकार असलेल्या कड्यांचा, दहा -पंधरा  फुटी ऊंचीचा, नक्क्षीदार दरवाजा .त्यातूनच ऊघडणारा एक छोटा दरवाजा .दरवाजावरच देवळीत विराजमान विलोभनीय बैठी गणेशमूर्ती ,आजूबाजूला असलेले दगडात कोरलेले दोन सिंह मध्यभागी एक कमळ असलेली ती “राजमुद्रा”व महीरपींची ती आकर्षक रचना,वाड्याची वास्तू बघणारास आपसूकच अदबीने ऊभा राहण्यास भाग पाडणारी!! दरवाजा ओलांडून पुढे आल्यास दोन्ही बाजूला तटबंदीच्या भिंतीतच असणार्या कमानी, पहारेकर्यांची व्यवस्था ,तेथूनच तटबंदीवर जाणार्‍या पायर्‍या, डाव्या हातास असणारा डेरेदार वड,जवळच असणारे कुलस्वामिनी चे मंदीर, दगडी पायर्‍या वर चढून गेल्यावर गर्भग्रृहात असणारी देवीची प्रसन्न मूर्ती, काही अंतर चालून गेल्यावर समोर असणारी वाड्याची दुमजली मुख्य ईमारत, लाकडी तुळळ्या,महीरपी ,प्रत्येक खांबावर कोरलेला देखणा मोर, लाकडी कमळ चोचीत धरलेला, सज्जे, खिडक्या, चौखटी वर असणारी लाकडात कोरलेली वेलं डोळे दिपवून टाकत होत्या. उजव्या बाजूला असलेली मोठी बारव,लिंबाचे झाडं व प्रत्येक ठिकाणी स्पष्टपणे दिसणारी तेच दोन सिंह व मध्यभागी एक कमळ असलेली ती राजमुद्रा!!

वाड्याच्या मुख्य ईमारतीत आत प्रवेश केल्यावर असणारा भव्य दिव्य चौक, ऊभ्या खाबांची रचना असणारा .पुढे चालून गेल्यावर एका क्रमाने असणारा दिवाणखाना, माजघर, भांडारगृह, स्वयंपाकघर, देवघर व लाकडी जिन्याखाली असणारे एका कोपऱ्यात बाळंतिण खोली. वाड्यात मंद, थंड जाणवणारा नैसर्गिक गारवा, वाड्याप्रमाणेच काहीसा गूढ,अनाकलनीय!!वाड्याची भव्यता गतवैभवाची साक्ष देणारी, कित्येक पिढ्यांचा वारसा जपणारी ,त्याच्या अंगाखांद्यावर खेळत मोठे झालेल्या व ईथेच वाढून, कर्तृत्व गाजवून काळाच्या पडद्याआड लुप्त झालेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या खुणा मिरवणारा हा वाडा…हळू हळू दाटणारा गडद अंधार, त्या अंधारात भयाण वाटणारा तो वाडा, ओरडत टीवटीवाट करणारी टिटवी, देवळात जोरजोरात घणाणणारी घंटा, कुणासतरी फरफटत ओढत आणण्याचा तो आवाज, सोडा ऽऽऽ सोडा मला चा आर्त नाजूक आवाज, लांबसडक केस, किणकिणणारा हिरवा चुडा, पैंजणाची छन् छन् अन् एक जोरदार प्रहार.. खच् च्ऽऽक् आणि रक्ताचा पडलेला सडा…..

“आऽऽऽऽऽऽ….. “जोरदार किंकाळी मारत घामाने चिंब भिजून गेलेला समीर धडपडून ऊठून बसला. मागोमाग सर्वच धावत त्याच्या खोलीकडे धावले. आई, बाबा, काका, काकू, नेहा त्याची चुलत बहीण सर्वच त्याभोवती जमले..

“आई हे स्वप्न मला वेडा बनवून सोडणार, कुणीतरी सांगातरी आहे तरी काय हे? कुणाचा आहे तो वाडा? मलाच का दिसतो स्वप्नात? ते दोन सिंह ती मुद्रा ,तिथला गारठा, तो चूडा ,ते पैंजण, तो रक्ताचा सडा माझा थरकाप उडवून देतात.. ”

समीरच्या वडीलांनी डोळ्यांनीच पाटलीनबाईंना ईशारा करून त्यास शांत करण्यास सांगितले त्यासरशी त्या समीरकडे जाऊन त्याच्या पाठीवर हात फिरवून त्यास शांत करू लागल्या.

“शांत हो बाळा,ऊद्याच आपण डॉक्टर कडे जाऊ व येतांना बुवांनाही याबाबत सांगू आता तू झोप शांत “.

कसेबसे त्यास समजावत सर्व तेथून बाहेर पडले. गेली पंधरा दिवस समीर शांत झोपूच शकला नव्हता. नुकताच शिक्षण पूर्ण करून समीर नोकरीस लागला होता. समीर पाटील. पूर्वपार चालत आलेली पाटीलकी, तेविशीतला देखणा, राजबिंडा ,गोरापान, कमावलेले शरीर, रुंद छाती, मजबूत मनगट त्यावर असलेली केसांची लव,बोलके पाणीदार डोळे, दाट भुवया, गुलाबीकंच ओठावर पाटलास शोभणारी भरगच्च दाट मिशी ,कोणीही प्रथम पाहील्यास पहातच राहील असे देखणे रूप. घरात लक्ष्मी पाणी भरत असूनही याने स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी जीवतोड मेहनत घेऊन व फस्ट क्लास ने पास होऊन एका चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर रूजू झाला होता. समीर पहिल्यांदाच  आईबाबांना भेटण्यासाठी काही दिवसांची रजा काढून पुण्यात घरी परतला होता. मात्र दुसर्‍याच दिवसापासून पडणाऱ्या या स्वप्नांमुळे तो हैराण झाला होता. झोप न झाल्याने आलेला थकवा, जागरण यामुळे सुट्टी ही त्याने वाढवून घेतली होती.

थोरले पाटील अस्वस्थपणे येरझर्या घालत होते.

“आज 30 वर्ष झाली ती रांडीची मरूनही आमचा पिच्छा सोडण्यास तयार न्हाई,त्यापरीस आम्ही पिढीजात वाडा सोडला, आमचं गाव, जहागीरीवर पाणी सोडलं या हितं लांब येऊन लावारीसगत पडलो. तरी आता ह्यो भोग कशापायी? जे काय झालं त्यात माझा कायबी वाटा नव्हता, जे केलं ते आबांनी.. त्याची शिक्षा कधीच त्यांचा जीव गमवून भोगलीये त्यांनी, माझ्या सम्यानं काय बिघडवलंय तीच? पोरगं दोन दिवस हितं सुखानं झोपला न्हाई, पर जी घटना माझ्यासोबत झाली तीच हुबेहूब सम्याला स्वप्नात दिसतीया यात नक्कीच “तिचा”च हात हाय. अचानक असं तिनं माझं अतित सर्वांसमोर आणलया. ऊद्याच याचा सोक्षमोक्ष लावयास हवा. ” मनाशीच चाललेला त्यांचा संवाद पाटलीनबाईंच्या आवाजाने भंगला.

“म्या काय म्हणते लै रात झालीया.. आता झोपा तुमी, समीरबी झोपलाय आता, नगा काळजी करू आई अंबाबाई सर्व ठीक करील ”

“तुम्ही झोपा, म्या बसतो घडीभर ”

बसल्या बसल्या गतकाळात ते हरवून गेले .पूर्वपार चालत आलेली पाटीलकी ,मोठी जहागीरी, खानदानी वाडा, आता जरी काळ बदललेला असला तरी पूर्वजांची पुण्याई व दबदब्यामुळे पंचक्रोशीत प्रसिद्ध असामी ,थोरल्या पाटलांचे वडील आबासाहेब. आबासाहेबांचा दरारा खूप , वाड्यात पूर्वीप्रमाणे नसली तरी पन्नासएक माणसांचा राबता. त्यात नोकरचाकर ते काही आप्तांचा राबता होता. त्यात सर्व प्रकारची माणसं, शेतावर काम करणाऱ्या पासून ते वाड्यात राबणाऱ्या घरगडीपर्यंत! वाड्यातल्या मंदिराची व्यवस्था पाहणार्या स्वतंत्र बुवा पर्यंत खुप मोठा डोलारा दिमाखात चालला होता. आई अंबाबाई ची मूर्ती पाटलाच्या कित्येक पिढ्यांपासून पुजत आलेली. वाड्याची दारे सर्वांसाठी नेहमीच खुली असायची. नवरात्रात वाडा नऊ दिवस गर्दीने फुलून जाई. आईच्याच कृपेने वाड्यातून सोन्याचा धूर निघत होता.

अशाच एका नवरात्रात आलेल्या जोगतीनीची व थोरल्या पाटलाची नजरानजर झाली. थोरलं पाटील ऐन जवानीत मुसमुसलेलं, त्या जोगतीची गोरीपान काया, हिरवाकंच चुडा, लांबसडक कमरेपर्यंत रूळणारे केस,चाफेकळी नाक, त्यात गुलाबी ओठावर रूळणारी नथ, मासोळी डोळ्यात काजळ, भरगच्च माळलेला गजरा, चापून चोपून नेसलेला शालू, चालताना येणारा “पैंजणाचा”मोहक आवाज!! कुणीही पहाव पहातच रहाव असं देखण रुप. ती दर्शन घेऊन आली तरी पाटील तिथंच रेंगाळत ऊभा. पाठमोरी ती निघाली त्यामागोमाग थोरलं पाटीलही निघाले. ब्रम्हचर्याचे पक्के पालन करणारे व आजवर कुणाशीही “संग “न केलेले थोरलं पाटील आज एका जोगतीसाठी देहभान हरपून त्यामागोमाग चालत होते. त्यात ती स्री जोगतीन असल्याचाही काही फरक पडत नव्हता कारण अप्सरा ही फिकी वाटेल असं देखणं रूप होत ते. वाडा कधीच मागे पडला होता, आतापर्यंत तीला ही कळून चुकले होते की काय होणार आहे. झपझप पाऊल टाकत ती लगबगीनं निघाली होती. आतापर्यंत अशा बर्याच जणांपासून तीने स्वतःचा बचाव केला होता मात्र आज गाठ पाटलाशी होती. गावची वेस ओलांडत असताना नेमकं पाटलाने त्याची वाट अडवली. भिलेली जिव ती आणखीच अर्धमेली झाली.

“भिऊ नकोस, मी काहीही करणार न्हाई, मात्र तू माझ्या काळजात रूतलीस. जर तुझीही ईच्छा असंल तर.. ”

पाटलाचे हे बोल तीला अनपेक्षित होते. आज आपल्या चिंध्या होणार या विचारात असणारी ती ,पाटलाच्या या बोलण्याने त्तीची भिती कुठल्या कुठे पळून गेली .आता ती पाटलास निरखून पाहू लागली. लाल मातीत कमावलेले शरीर, मजबूत ऊंच अंगकाठी,सावळे शरीर, झुबकेदार मिशा  त्याहीपेक्षा तो सुसंस्कृत पणा!! अशीही हिर्यासारखी माणसं असतात तर.. मनोमन ती थोरल्या पाटलावर भाळली गेली.

“हं, पर नवरात्रात न्हाई, म्या ईथच असते , पांदी ओलांडून पलीकडं झोपडं हाय माझं, गावात नविन आलोया, हे समदं मला ठाव न्हाय, पर आपलं बोलणं म्या तोडणार न्हाय, असंबी आमची बिशाद काय आपल्याम्होरं? ” बारीक आवाजात ती बोलली.

“आपलं नाव काय? ”

“रमा”

“हं, म्या वाट पाहीन, आबा नसल्यावर वाड्यावर या.. ”

म्हणत थोरलं पाटील त्याच्या जवळ गेले… . मोगर्याचा तो बेधुंद गंध मन वेडावत होता…..तो हळूच मागे सरला. “पैंजणाची “छुम छुम झाली, बांगड्या किणकिणल्या आणि पाटलाचे गरम श्वास तीस जाणवू लागले… दोघांचीही धडधड वाढली आणि………..

टण्… टण् जवळच्या मंदिरात वाजत असलेल्या घंटेने थोरल्या पाटलास जागं आली.रात्री सम्याच्या काळजीने ते बाहेर व्हरांड्यात खुर्चिवरच झोपले होते. एक कटाक्ष त्यांनी खिडकीतून समीरकडे टाकला, समीर गाढ झोपलेला पाहून त्यांना समाधान वाटले. आता लगबगीनं ऊठून मनाशी काहीतरी ठरवून ते ऊठले. आज 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा ते आपल्या वाड्यावर  कोल्हापूरला जाणार होते. आवराआवर करून पाटलीनबाईंना जास्त काही न बोलता ते निघाले, बुवाकडे जाणार असल्याचे ईतकच मोघम बोलून ते निघाले.पाटलीनबाईंना मुद्दाम त्यांनी बरोबर येऊ दिले नाही. ईतक्या वर्ष जपलेलं ते “गुपित”त्यांना ऊघड करणं परवडणारे नव्हते. ड्रायव्हर ने गाडी काढली व ते कोल्हापूर ला रवाना झाले. पुणे ते कोल्हापूर च्या प्रवासात कितीतरी आठवणी पाटलाच्या मनावर तरळत होत्या. रम्य बालपण ते यौवन. वाडा, जहागीरी, तो मान, सन्मान, गत ऐश्वर्य व आबा.. नकळत डोळे पाणावले पाटलांचे.. आज 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा ते आपल्या गावी परतले होते. कोल्हापुरने आता कात टाकली होती. आधुनिकतेच्या खुणा आपल्या अंगाखांद्यावर मिरवतानाच जुन्या वैभवाची चिन्हेही तितकीच जपली होती. त्यापैकीच एक असलेल्या व शहराची अराध्यदैवत आईअंबाबाईच्या महाद्वारातून आत शिरताच पाटील नतमस्तक झाले .एखाद्या लेकराने खूप दिवसांनी आईस भेटावे व तिच्या कुशीत शिरावे अशी काहीशी गत पाटलांची झाली. नकळत अश्रूंचा अभिषेक आईच्या पायास झाला.

।।  सर्वमंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोःस्तुते।। विधीवत पूजा करून पाटील भरल्या डोळ्यांनी आईस साकडे घालत होते. बुवा येण्यास अजून अवकाश होता. अजूनही वाड्यावर जाण्यास त्यांचे मन धजावत नव्हते. बुवा एकदाचे आल्यास काय तो सोक्षमोक्ष लागेल या विचाराने पाटलाच्या डोक्यात काहूर माजले होते. त्यांना आता वाड्याची ओढ लागली होती पण भितीने त्यांचे मन धजावत नव्हते. बराच वेळ झाला तरी अजून बुवा आले कसे नाही हाच विचार ते करत असताना नेमकं सेवेकरी निरोप घेऊन आला.

“सरकार, आपणास बुवांनी थेट वाड्यावरच बोलावले आहे. सकाळपासूनच ते तिथेच आहेत. ”

पाटलांना काहीसं आश्चर्य वाटलं कारण बुवा येथेच महालक्ष्मी मंदिरात भेटणार होते. मात्र अचानक असे ते वाड्यावर कसे? पाटलांची कार वाड्याच्या दिशेने रवाना झाली.

मुख्य रस्त्यावर येताच लांबूनच वाडा दिसू लागला. आसपासचा परिसर सिमेंटच्या जंगलाने व्यापला असला तरी अजूनही  तटबंदीच्या आत वाडा त्याच दिमाखात ऊभा होता. पाटील कारमधून खाली ऊतरताच काही जुणी जाणती मंडळी त्यांच्या भोवती जमा झाली. काही पदस्पर्श करत होती तर काही हात जोडून अभिवादन!! पाटलांची छाती अभिमानाने फुलून आली. सर्वात जेष्ठ असलेली व्यक्ती पंत सोडून बाकी सर्व इतरत्र पांगले. पाटलांनी त्यांचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतला. त्यांनी त्यांना गळ्याशी कवटाळले. जमलेल्या लोकांची कुजबूज पाटलांचे मन पोखरत होती. मनाच्या जुन्या जखमांची खपली निघून ती जखम पुन्हा भळभळती झाली होती.

बुवा सकाळीच वाड्यावर हजर होते याची खबर कुणालाच नव्हती. अगदी पंतानाही नव्हती. कारण मुख्य दरवाजा बंदच होता. गुप्त भुयारी रस्त्याने बुवा वाड्यातल्या मंदिरात हजर होते. वाडा जरी बंद असला तरी वाड्यातल्या मंदिराची दिवाबत्तीची सोय ती ही काही ठराविक दिवशीच अशाप्रकारे केली गेली होती. त्यानंतर बुवांनाही ते ऊघडण्याची मुभा नव्हती.

तटबंदीची बर्याच ठिकाणी पडझड झाली होती. अवतीभवती रान माजले होते. ठिकठिकाणी वटवाघळे लटकलेली होती. मधमाश्यांचे मोठमोठे छत्ते मुख्य दरवाजा जवळच होते. कोळ्याचे मोठमोठे जाळे वाड्याची भेसूरता आपखीच वाढवत होते. मुख्य दरवाजाला असलेला जूना कुलुप मोठ्या किल्लीने  पाटलांनी खोलला.

वादळवारा,ऊन,पावसाने घट्ट रूतलेला तो दरवाजा काही केल्या ऊघडेना. अखेर पाच सहा माणसांनी जोरात ढकलत हिसका देत तो ऊघडला.जोरात करकर आवाज करत तो ऊघडला. काही पारवे फडफडत ऊडाली. पाटलांनी आत पाऊल टाकले. खाली वाकत तिथली चिमूटभर माती कपाळावर लावत हात जोडून वंदन केले. जमलेले लोक आता आत घुसण्याचा प्रयत्न करत होते मात्र पाटलांसमोर कुणाची हिंमत होत नव्हती. फक्त पंत व पाटील आणि पाटलांचा ड्रायव्हर वगळता कुणासही आत येण्यास मज्जाव होता. मुख्य द्वार पुन्हा करकरत बंद केले गेले. डाव्या हातास असणारा डेरेदार वड आता अक्राळविक्राळ भासत होता. पारंब्याचेही स्वतंत्र वृक्ष तयार झाले होते. त्याची गडद काळी छाया वातावरण आणखी गंभीर बनवत होती. पाटलांच्या पायातल्या कोल्हापुरी चपलांचा करकर आवाज चालताना स्पष्ट पणे ऐकू येत होता. मंदीराकडे आता ते जात होते. मंदीराच्या चिरा निखळल्या होत्या. दगडी पायर्‍या भग्न अवस्थेत होत्या. एक एक पाऊल जपून टाकावे लागत होते. गतकाळात पंचक्रोशीत लौकीक असलेल्या मंदीराची अशी अवस्था पाहून पाटील कुठंनं कुठं स्वतः ला दोषी ठरवत होते. पाटलांनी मंदीराच्या आत पाऊल टाकले .पाठोपाठ पंत व ड्रायव्हर ही आले. पंत आत बुवांना पाहून विस्मयचकित झाले मात्र त्यांनी काही विचारले नाही.

भगवे वस्त्र, पांढरी दाढी, कपाळावर टिळा, सरळ नाक व तेजस्वी तेजःपुंज चेहरा बुवांचे आध्यात्मिक व्यक्तिमत्व स्पष्ट करत होता.

“जगदंब।। ”

“प्रणाम महाराज”

“आपणास न सांगताच मला इथं याव लागलं पाटील, मी अनुष्ठान करण्यासाठी इथं हजर झालो, आपल्या ईथे वाड्यात पाऊल टाकण्यापूर्वी हे करणे गरजेचे होते. गत काही दिवसांपासून समीरबरोबर सुरू असलेल्या या स्वप्नांचा खेळ नक्कीच साधारण नाही. मला अशा काही शक्तींची अनुभूती होत आहे की, जीला कसल्यातरी वस्तूचा लोभ असावा, किंवा कुणाची प्रतिक्षा… ”

बुवांच्या या बोलण्याने गार वातावरणातही पाटलास घाम फुटला. मात्र पुढच्याच क्षणी खंबीर मनाने मनाशी काहीतरी ठरवून पाटील पुढचं ऐकू लागले.

“काहीतरी असं की ज्याच्या वचनाच्या बंधनात ती शक्ती अटकून आहे. अथवा तीस कसलीतरी प्रतिक्षा आहे. मी आपल्या वडीलांपासून आपल्या सेवेत आहे, आमचे पूर्वजही आपल्या पूर्वजांच्या सेवेत होते. मात्र त्या जोगतीच्या मृत्यू शिवाय कसलाही कलंक या वाड्यावर नाही, त्याचे प्रायश्चित्त आबासाहेबांनी कधीच आपला जिव गमावून पूर्ण केलंय,   देवीच्या दागिन्यांची चोरी करून ती पळताना पडून तिचा मृत्यू झाला होता असंच शेवटी माहीत पडलं होतं. तरीही अजूनही तिस कसली प्रतिक्षा आहे आई अंबाबाईसच ठाऊक… हा अनुष्ठानाचा दोरा आपली रक्षा करेल. हा दोरा समीरलाही बांधावा,आई तुमची रक्षा करेल.. ”

सर्व माहिती असूनही की तीने कसलीच चोरी केली नव्हती, पाटलाचे व तीचे प्रणयाराधन सुरू असतानाच आबांनी रंगेहाथ पकडले होते व रागाच्या भरात तिथेच त्याची हत्या केली होती व हे बिंग कुठे फुटू नये म्हणून ही चोरीची अफवा पसरवली गेली होती. आबासाहेबांचा दरारा व पोहोचमुळे हत्येला अपघाताचे स्वरूप देऊन आबासाहेब शिक्षेतून वाचले होते मात्र पुढच्याच काही महीन्यात आबांचाही त्याच वाड्याच्या वरच्या मजल्यावरून अनपेक्षितरित्या पडून दगडावर आपटून मृत्यू झाला होता हे सत्य सांगण्यास पाटलांची जिभ धजावत नव्हती. तरीही त्यांना कळून चुकले की आता या प्रसंगातून कसे सुटावे.. ..”

बुवांचे आशीर्वाद घेऊन व पंत व ड्रायव्हर ला पुढे पाठवून पाटील तडक वाड्याच्या मुख्य ईमारतीत आत शिरले. ठिकठिकाणी भग्न तरीही ताठ मानेने ऊभी असणारी ती वास्तू आता मात्र पाटलास भयभीत करत नव्हती. नेमके ते “त्या”खोलीत आले जिथे त्यांची व तीची शेवटची भेट घडली होती. खोलीत पुसटसा प्रकाश होता. खोलीच्या छताचे वासे काही ठिकाणी तुटलेले होते. कुबट वास तेथे भरून राहिला होता. वटवाघळे, पारव्यांनी आपले बस्तान तेथे बसवले होते. काहीतरी शोधत पाटील एका ठिकाणी येऊन थबकले… होय.. हेच.. हेच तर शोधत होते ते… “पैंजण” । भरगच्च बारीक घुंगरांचे पैंजण.. हीच भेट तर देणार होते ते त्यादिवशी.. तीच्या गोर्या पायात चांदीची पैंजण घालणार होते ते.. होय.. हेच तर वचन दिले होते त्यांनी!! एक दिवसासाठी का होईना रमेस पाटलीनबाईचा दर्जा देण्याचे वचन!! कितीतरी बेधुंद रात्री तीच्या झोपड्यात त्यांनी घालवल्या होत्या मात्र पाटलांनी कितीदातरी बोलावूनही तीने वाड्यावर पाऊल ठेवले नव्हते. कारण एकच होते आबासाहेब!! त्यादिवशी पाटील खुप खुश होते. खास “पैंजण”त्यांनी सोनाराकडून घडवून आणले होते. त्यांना यत्किंचितही कल्पना नव्हती की, हेच पैंजण त्यांच् रमेचा घात करणार आहे. आबासाहेब कामानिमित्त सातार्याला गेले होते. तर इतर मंडळी शेतात.. वाडा जवळ जवळ रिकामाच होता. नववधूप्रमाणे सजून तीला वाड्यावर आणून आपण आणलेली प्रेमाची पहीली भेट ते तिला  देणार होते. क्षणभरासाठी का होईना “पाटलिनबाईं”चा तोरा ते तिला मिरवून तृप्त होणार होते. तिलाही त्यांचा आग्रह मोडवला नाही. हिरवा शालू नेसून हिरवा चुडा लेऊन श्रृंगार करून ती वाड्यावर हजर झाली होती. चेहरा कुणासही न दिसू देता डोईभर पदर घेऊन ती पाटलाच्या खोलीत शिरली होती. तिला अस पाहून देहभान हरपून पाटील व ती एकजिव झाले होते. पाटलांनी आपल्या हाताने तिच्या पायात ते पैंजण घातले होते. काळवेळ विसरून ते तृप्त झालेले दोन जिव ओठांचा मधूरसपान करत असताना नेमकं दारावर थाप पडली. थपथप थपथप…. कोण हाय विचारूस्तोवर एक जोरदार लाथ मारून दरवाजा तोडला गेला. दोघांनाही स्वतःस सावरण्यास वेळच मिळाला नाही. घरभर पडलेला मोगरा, बाजूला पडलेला शालू तर ऊघडा पाटील.. समोर फक्त आबासाहेब.. सणसणीत चपराक पाटलास लगावली गेली.. आबांचे डोळे आग ओकत होते. त्या जोगतीचे(रमेची) लांबसडक केस ओढत  फरफटत आबांनी गच्चीवर आणले होते. वाडा रिकामाच असल्याने याची कोणालाच काही खबर नव्हती. “सोडा.. सोडा मला “चा बारीक आर्त हाक ती मारत होती. पाटील पाया पडून विनवण्या करत होता..आबाच्या जोरदार लाथेच्या प्रहाराने पाटील कळवळले होते. हाती असलेली छडीतून आबासाहेबांनी गुप्ती बाहेर काढली.. तिला मारताना पाटलाने हात मध्ये टाकला… कच्चा कऽऽऽ

रक्ताचा सडा पडला.. पाटलाचा हात जखमी झाला होता.. काही थेंब रमेच्या तोंडावरही पडले.. काही कळण्याच्या आत पाटील सावरण्यापूर्वीच आबासाहेबांनी त्या जोगतीस गच्चीवरून खाली दगडावर ढकलून दिले… तडफडत तिचा मृत्यू झाला. डोळे मात्र सताड ऊघडेच.. कसलीतरी प्रतिक्षा करणारे….. अगदी कालपरवा घडल्यासारखा पूर्ण प्रसंग पाटलाच्या डोळ्यासमोर जिवंत झाला. दोन टपोरे अश्रू त्या काळ्या पडलेल्या “पैंजणा”वर पडले. तिला  ओढत नेत असताना एकच पैंजण तीच्या पायातून गळून ईथं पडला होता. जो आज पाटलास घावला होता.

“जिंदगीभर म्या भितीतच जगलो रमे.. आधी आबाच्या मग लोकांच्या मग अब्रूच्या भितीत…. .. म्या कधीच तुला लोकांसमोर स्विकारण्याची धमक दाखवली न्हाय, तसं म्या करूच शकत नव्हतो.. खानदानाच्या अब्रूला बट्टा जो लागला असता.. तू मात्र माझ्यासाठी कधीच बट्टा नव्हती, प्रेम कधी अनैतिक असूच शकत न्हाय….श्रीमंतांनी श्रीमंतावरच प्रेम करावे व गरीबांनी गरीबावरच ही अलिखित चौखट कुणी आखून दिली या समाजाला? ही चौखट ओलांडणे माझ्या जितेपणी तरी शक्य नव्हते हा एकच अपराध माझ्या हातून घडलाय त्याची शिक्षा माझ्या लेकरास्नी माझ्या सम्याला देऊ नगंस.. तुझा अपराधी म्या हाय व तूझ्या समोर हाय.. म्याच तूला आग्रह करून वाड्यावर आणलं पण आई अंबाबाई साक्षी हाय माझ्या मनात कधीच असा ईचार नव्हता की तूझ्या जिवास काही बरंवाईट व्हावा, कसं कुणास ठावूक आबास्नी ठाव झालं हुतं म्या “पैंजणाचं”जोड आणलंया .पर कुणासाठी हे हितं आल्यावर त्यांना ठावं झालं जे घडलं ते रागात.. आपलं पोरगं.. पाटलाचं पोरगं एका जोगतीशी.. भिक्षुकी शी संग करतूयं हेच त्यांच्या कल्पनेबाहेर हुतं, म्या पाटलाचा पोर असल्याची शिक्षा तू भोगलीस, मला माफी दे.. मला माफी दे… जितेपणी समाजाच्या भितीनं अडणारा मी मेल्यावर तूझ्याचकडं नक्की येईन ” म्हणत पाटील ओक्साबोक्शी रडू लागले..

मंदसा मोगर्याचा सुवास दरवळल्याचा भास पाटलास झाला. दोन क्षणांसाठी खिडकीचे कवाडं हलली गेली. काहीतरी वेगळं मोकळं झाल्याची अनुभूती पाटलास आली.

शांत वातावरणात समाधान भरले गेले. रमेची 30 वर्षांची प्रतिक्षा आज संपली होती. दिलेलं वचन पूर्ण झालं होतं.

संध्याकाळच्या ऊतरतीच्या ऊन्हात वाड्यास आज नवचैतन्य प्राप्त झाले होते. ईतक्या वर्षांचे मळभ आज हटले होते. आज खर्या अर्थाने वाड्याची वास्तू शांत झाली होती. भरल्या मनाने मात्र समाधानाने पाटलांनी परतीची वाट धरली व कार पुण्याच्या दिशेने रवाना झाली.

।। समाप्त।।

समीर खान

Leave a comment