प्रतिष्ठा भाग १ –
उन्हं कलायला सुरुवात झाली होती. सूर्य मावळतीकडे चालला होता आणि तशातच एक जोडपे काहीशा भेदरलेल्या चेहऱ्याने पट्टागड चढत होते. त्यांचे वय अंदाजे २० च्या आसपास असावे. दोघांच्याही पाठीला कॉलेजच्या सॅक अडकविलेल्या होत्या. त्यात किमान दोन दिवसाचे दोघांना पुरेल इतके खाण्याचे पदार्थ, पाण्याच्या बाटल्या, वापरातील कपडे आणि काही गरजेच्या वस्तू ठेवलेल्या होत्या. त्यांनी गड चढायला जशी सुरुवात केली तसं त्यांच्या मागोमाग एक कुत्रंही गड चढत होतं. बहुतेक त्यांच्याकडून आपल्याला काही खायला मिळेल असं त्याला वाटत असावं. आधी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं पण ते थोडे थांबले की कुत्रंही थोड्या अंतरावर थांबत होतं आणि त्यांनी परत चालायला सुरुवात केली की तेही त्यांच्यापासून थोडं पुढे पुढे चालत होतं. चालता चालता मध्येच ते त्यांच्या पायात येई. तो जरी त्या कुत्र्याकडे दुर्लक्ष करत होता तरी, ती मात्र मनातून घाबरत होती.(प्रतिष्ठा भाग १)
“ए… हाड… हाड…” तिने त्या कुत्र्याला घालवण्याचा प्रयत्न केला. एकतर तिला अशी चढण चढण्याची सवय नव्हती. त्यात अनेक पायऱ्या तुटलेल्या, मध्येच कमी अधिक उंचीच्या आणि अंगावर येणाऱ्या. पाठीला ओझे आणि पायात घुटमळत चाललेले कुत्रे. ती पुरती वैतागली आणि तो सगळा शीण तिने त्या कुत्र्यावर काढण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला. तिचा आवाज ऐकून तो थोडासा थांबला.
“अगं, कशाला हाकलतेस त्याला? त्याला काहीतरी खायला मिळेल म्हणून ते मागे येत असेल. तू नको घाबरू.” तिला समजावण्याच्या स्वरात तो म्हणाला.
“म्हणे नको घाबरू…! तुला काय जातंय बोलायला? एकतर मला हे कुत्रं मांजरं बिलकुल आवडत नाहीत. त्यातून हे कुत्रं माझ्या पायात येतंय सारखं. मला पायऱ्या चढतानाही त्रास होतोय.” ती काहीशी वैतागलीच आणि खाली वाकत त्या कुत्र्याला हाकलण्यासाठी एखादा लहानसा दगड शोधू लागली. ती खाली वाकली तसे कुत्रे तिच्यापासून चार फुट लांब पळाले. तिचा तो अवतार आणि ते घाबरलेलं कुत्रं पाहून त्याला त्याही स्थितीत हसू आलं.
“प्रज्ञा…! तू अशी वैतागतेस ना, त्यावेळेस खरंच खूप छान दिसतेस…!!!” तिच्याकडे पहात तो हसत म्हणाला आणि मग तिलाही हसू आले. दोघांच्याही मनावरील ताण काही प्रमाणात कमी झालेला वाटला.
“अरे पण पहा ना…! ते कुत्रं, आपण थांबलो तर तेही थांबलं.” तिने त्यांच्या पासून थोड्या दूर उभ्या शेपटी हलवणाऱ्या कुत्र्याकडे बोट दाखवत म्हटलं.
“अगं, त्याला वाटत असेल, आपण त्याला काही खायला देऊ म्हणून… त्याला कुठे माहिती आहे आपली परिस्थिती?” तिला समजावत असतानाच तो परत गंभीर झाला. त्याच्या चेहऱ्यावर ते तिला स्पष्ट दिसलं.
“पण मी काय म्हणते, हे असं आपण किती दिवस लपणार? त्याऐवजी पोलिसांची मदत घेतली तर?” तिनं चाचरत विचारलं पण त्यानं त्यावर काहीच उत्तर दिलं नाही.
“अरे काही तरी बोल…!” तो काहीच बोलत नाही हे पाहून ती म्हणाली.
“काय बोलू मी आताच? हा विचार माझ्याही मनात आला होता पण इतर शक्यताही लक्षात घ्यायला हव्या ना? जाऊ दे… आधी आपल्यासाठी निवारा शोधू आणि मग यावर सविस्तर विचार करू…!!!” तिच्याकडे काहीसं दुर्लक्ष करत तो पुढच्या पायऱ्या चढू लागला. तो जास्त काही बोलत नाहीये हे पाहून मग तीही काही न बोलता त्याच्या मागोमाग चालू लागली. थोड्याच वेळात त्यांना दोन गुहा दिसल्या. दोन्ही गुहेला दरवाजा बसवण्यात येवून त्याला कुलूप लावलेलं होतं. पहिल्या गुहेत लक्ष्मणगिरी महाराजांची समाधी होती, तर दुसऱ्या गुहेत गावाचा आयुर्वेदिक दवाखाना. नुकताच पावसाळा संपला होता त्यामुळे गवत बरेचशे वाळले होते पण इतर काही मोठी झुडपे मात्र आपला हिरवेपणा टिकवून होती. ठिकठिकाणी जंगली फुलझाडांचे पिक आलेले होते. त्यावरील पिवळी फुले वाऱ्याच्या प्रवाहानुसार डोलत होती. खाली पिवळसर गवत, मध्येच काही तपकिरी झालेली आणि वाळत चाललेली रोपे आणि त्यातच काही त्यापेक्षा थोडे मोठे पण हिरवट झाडं. झाडांवरील लाल, पिवळी फुलं, वर निळं आकाश; सगळंच दृश्य अगदी आल्हाददायक वाटत होतं. निसर्गाने केलेली ही रंगांची उधळण प्रज्ञा अगदी भान हरखून आपल्या डोळ्यात साठवून घेत होती. पण त्यामुळे तिचा वेग काहीसा मंदावला.
“प्रशांत…!!! आजूबाजूला बघ तरी, किती सुंदर निसर्ग आहे ते.” काहीसं थांबून प्रज्ञा म्हणाली.
“अगं निसर्ग उद्या पाहू… अजून राहण्यासाठी योग्य अशी जागा शोधायची आहे. पाय उचल पटपट…” तिच्याकडे न पाहताच प्रशांत म्हणाला आणि तिने परत तुटलेल्या पायऱ्या एकेक करत चढायला सुरुवात केली. काही वेळातच ते पट्टाई देवीच्या गुहेतील मंदिरासमोर पोहोचले. मंदिराची गुहा त्यांना राहण्यासाठी तशी योग्य होती. पण मंदिर म्हटले की तिथे लोकांचे येणेजाणे चालू राहील, आणि त्याचा गावात बोभाटा झाला तर त्यांना नंतर प्रॉब्लेम होईल हा विचार करून प्रशांतने तिथे राहण्याचा विचार मनातून काढून टाकला. दोघांनीही देवीचे मनोभावे दर्शन घेतले आणि परत ते गड चढू लागले. आता ते गडावरील अंबरखाना इमारतीजवळ आले. हा अंबरखाना म्हणजे पूर्वीचा राजवाडा. साक्षात शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही इमारत पूर्णतः काळ्या दगडात बांधलेली होती. त्याच्या समोर मोकळे पटांगण होते, आजूबाजूने गडाचे विस्तीर्ण पठार होते, थोड्या अंतरावर पाण्याच्या टाक्या होत्या. ज्याचा पिण्याच्या पाण्यासाठीही उपयोग होण्यासारखा होता. एकूणच दोन तीन दिवस तिथे रहाणे त्यांना सर्वार्थाने सोयीचे होते. त्यामुळेच दोघांनीही एकमताने तिथेच राहायचा निर्णय घेतला.
“प्रशांत…!!! आपण इथे राहायचे म्हणतोय, पण रात्री काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना?” प्रज्ञाने प्रश्न उपस्थित केला.
“कसला प्रॉब्लेम?”
“अरे म्हणजे पहा, इतका निर्जन भाग… काही विंचू काटा असेल तर? किंवा जंगली जनावरं असतील तर?”
“अगं… मी जितकी माहिती काढली आहे त्यानुसार असे काही इथे नसणार. किमान या आधी असे कुणाबाबत झालेले माझ्या माहितीत नाही. पण तरीही आपण शेजारी शेकोटी पेटवून ठेवू म्हणजे तिथे सहसा असे प्राणी येणार नाहीत.” प्रशांतने तिच्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न केला.
“आणि एक विचार कर… ज्या ठिकाणी स्वतः शिवाजी महाराज १७ दिवस विश्राम करण्यासाठी राहिले तिथे राहण्याचे भाग्य आपल्याला मिळते आहे हेच काय कमी आहे का?” खरं तर यावेळेस तो तिच्याऐवजी स्वतःच्या मनालाच जास्त समजावतो आहे असे कुठेतरी प्रज्ञाला वाटून गेले.
“हो रे…! खरे आहे… पण तरीही मन घाबरतेच ना? एकतर या इमारतीला दारेही नाहीत.” तिच्या मनातील काळजी काही संपत नव्हती.
“तू मनातून ही भीती काढून टाक पाहू… आता जे होईल त्याला दोघेही निभावून नेऊ…!!” तिला धीर देण्याच्या उद्देशाने तो म्हणाला खरा पण हा प्रश्न त्याच्याही मनात या आधीच आलेला होता.
“ए…!!! आता काहीतरी खाण्याचे काढ बाई बॅगमधून. खूप भूक लागली आहे मला.” खाण्याचा विषय काढून त्याने दोघांच्याही मनातील विचार आहे तिथेच थांबवण्याचा प्रयत्न केला. तसे दोघांनाही भूक लागलेली होतीच. तिने तिची बॅग उघडली, त्यातून काही खाण्याचे पदार्थ बाहेर काढले आणि दोघांनी त्यावर आडवा हात मारला. थोडे पोटात गेल्यावर दोघांनाही तरतरी वाटू लागली. आता तिने त्या वास्तूचे निरीक्षण करायला सुरुवात केली आणि तिला एका कोपऱ्यात अगदी गुपचूप बसलेले, त्यांच्या बरोबर आलेले कुत्रे दिसले. अगदी केविलवाण्या दृष्टीने ते त्या दोघांकडेच पहात होते. त्याची ती नजर तिला खूपच हेलावून गेली. तिने लगेचच आपल्यापासून थोडे दूर आपल्याकडील काही खाद्यपदार्थ ठेवले आणि तोंडाने यु यु करत त्या कुत्र्याला बोलावले. काही क्षणातच ते कुत्रे जवळ आले. तिने त्याला खायला टाकलेले खाद्यपदार्थ काही वेळातच त्याने संपवले आणि परत आपल्या आधीच्या जागी गुपचूप जावून बसले. यावेळेस मात्र प्रज्ञाला त्या कुत्र्याची गंमत वाटली. प्रशांतच्या डोक्यातून मात्र प्रज्ञाने उपस्थित केलेले प्रश्न जाता जात नव्हते. तो आपला त्याच विचारात एकटक दारातून बाहेर पाहत होता आणि तेवढ्यात त्याला पहिले संकट जवळ येताना दिसले.
क्रमशः- प्रतिष्ठा भाग १.
मिलिंद जोशी, नाशिक…