प्रतिष्ठा भाग १०

प्रतिष्ठा भाग १० –

“पण एक सांगू का? तो एक रागाचा क्षण माझ्या आयुष्यात सगळ्यात वाईट होता. त्यावेळेस त्यांनी मारलेल्या आरोळ्या माझ्या मनाला शांतता देऊन गेल्या असे वाटले पण ती शांतता फक्त त्यावेळेपुरतीच होती. आता लोकांना मी शांत जरी दिसत असलो तरी त्या आरोळ्या माझ्या स्मरणातून जराही गेलेल्या नाहीत. बरे अशी गोष्ट घडल्यावर रागाचा भर उतरायला काहीच वेळ लागत नाही. अगदी काही तासातच आपण भानावर येतो आणि नंतर चालू होतो तो आपला नरकवास. ज्या बहिणीने आपल्याला लहानपणा पासून साथ दिली, आपल्या बाजूने नेहमी उभी राहिली त्या बहिणीच्या सुखापेक्षा आपल्याला आपला क्षणाचा राग मोठा वाटला याची बोच जन्मभर आपला पिच्छा पुरवते. जी बहिण आपल्याला रक्षाबंधनाला राखी बांधून माझं रक्षण कर असं हक्काने सांगते, जी बहिण आपल्याला भाऊबीजेला आपलं आयुष्य वाढावं म्हणून ओवाळते तीच बहिण आपल्याला घाबरून आपल्यापासून लपत फिरते यापेक्षा मोठी नामुष्की कोणती असू शकेल? ज्या दिवशी मी हे कृत्य केलं त्या दिवसापासून मी एकदाही सुखाने झोपू शकलेलो नाही.

एकतर मनात सतत तेच विचार येतात. फक्त झोप यावी यासाठी मी सतत काम करतो. किमान शरीर थकले म्हणून तरी झोप लागेल या आशेने. झोप लागते पण त्यामुळे स्वप्न पडतात. सुरवातीला आम्ही लहान असतो, माझी बहिण माझ्यासाठी सगळ्यांशी भांडत असते, माझ्यासाठी स्वतःचा खाऊ काढून ठेवत असते. खूप छान वाटते हे सर्व पाहताना आणि पुढच्याच क्षणी तिच्यासमोर मी उभा असतो. हातात पिस्तुल घेतलेला. तिचा चेहरा घाबरलेला असतो, तिचा नवरा मला समजवण्यासाठी माझ्या बाजूने पुढे येतो आणि माझा चेहरा जास्तच हिंस्र बनतो. हातातले पिस्तुल आग ओतते. माझ्या बहिणीचा नवरा एक जीवघेणी आरोळी ठोकतो. माझ्या बहिणीचे डोळे मोठे झालेले असतात. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसलेला नसतो. तेवढ्यात तिची सासू घरातून बाहेर येते. मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून मोठ्याने टाहो फोडते. मी घाबरतो आणि त्यातच चाप ओढला जातो.

एक हृद्यद्रावक किंकाळी फोडून तीही खाली पडते आणि मग तिची होणारी हालचाल बंद होते. या नवीन गोष्टीने भानावर आलेली माझी बहिण संतापते. माझ्या अंगावर धावते आणि परत एकदा पिस्तुल आग ओकते. आधी तर तिच्या काहीच लक्षात येत नाही पण जशा वेदना वाढतात तिच्या तोंडून ‘आईऽऽऽ‘ हा एकच शब्द बाहेर पडतो. आता तिचा चेहरा क्षणाक्षणाला बदलत जातो. तिच्या डोळ्यात संतापाची जागा वेदना घेते आणि नंतर ते डोळे मिटतात… कायमचे… गेल्या अनेक वर्षापासून मी फक्त हे एकच स्वप्न पाहतो आहे. कित्येक वेळेस मी ‘ताई’ म्हणून ओरडून उठतो.” दिलीप बोलत होता. काही वेळापुर्वीच्या त्याच्या निविर्कार चेहऱ्यावर आता वेदना स्पष्ट दिसत होत्या. बहुतेक पहिल्यांदाच त्यांने आपले मन असे मोकळे केले होते. इतक्यात वेटर प्लेट घेऊन आला तसा दिलीप भानावर आला. सचिनला तर काय बोलावे हे देखील सुचत नव्हते.

“आता तुला वाटत असेल हे इतके सगळे असून देखील मी तुला मदत करायला कसा तयार झालो?”

“अं…” भारावलेल्या अवस्थेतच सचिन असल्यामुळे त्याच्या तोंडून काही शब्द फुटेना. तेवढ्यात त्यांची जेवणाची ऑर्डर घेऊन दुसरा वेटर आला.

“चल… आधी हात धुवून येऊ…” म्हणत दिलीप उठला आणि वॉशबेसीनकडे चालू लागला.

दिलीप जागेवर येऊन बसला तरी सचिन मात्र आपल्या जागेवरच बसलेला होता.

“अरे हात तर धुवून ये…” सचिनला हलवत दिलीप म्हणाला.

“अं… हं…” म्हणत सचिन उठला. पण त्याच्या मनात खूपच खळबळ माजलेली आहे हे दिलीपने जाणले.

“हं… आता ऐक… हे मी तुला आधी सांगणार नव्हतो. पण तुझ्या मनात चाललेली चलबिचल पाहून तुला खरे सांगतो आहे. मीही याच परिस्थितीतून गेलो आहे. मी तुला मदत करायला आलो ते तुला या सगळ्यापासून बाजूला काढण्यासाठी. तुझ्या बहिणीला मारण्यासाठी नाही. जेव्हा जेलमध्ये तू मला सगळे सांगत होतास त्याच वेळेस मला तुझ्या ठिकाणी काही वर्षांपूर्वीचा मी दिसत होतो. जी गत माझी आहे ती तुझी होऊ नये यासाठीच मी तुला मदत करण्याचे कबूल केले. बरं मला एक सांग… तुझ्या बहिणीने जर इतर जातीतल्या मुलाशी लग्न केले तर तुझ्या जीवनात अशी कोणती वाईट गोष्ट घडणार आहे? शेवटी मुलीला पुढील आयुष्यभर ज्याच्या बरोबर राहायचे आहे त्या बाबतीत तरी तिला निवडीचे स्वातंत्र्य असावे की नाही? आता हेच पहा ना… हि अक्कल मला आली कधी तर वेळ निघून गेल्यावर…” दिलीप जेवता जेवता सचिनला समजावत होता.

“तुमी म्हनताय ते पटतंय… पन तिनं असं केल्यावर समाजात काय इज्जत ऱ्हाईल?”

“तुला हे बोलण्याचा अधिकार काय?”

“अधिकार काय म्हंजी? आमच्या आख्ख्या खानदानात कुनी ह्ये असले थेरं केले न्हाईत.” दिलीपचा प्रश्न ऐकून सचिन परत भडकला.

“माझ्या मित्रा… पण तुमच्या खानदानात कुणी जेलची वारीही केली नसेल ना? आणि तुझ्या खानदानात कुणी स्वतःच्या बहिणीला जीवे मारले आहे का? खानदानाची इज्जत काय फक्त पोरीने दुसऱ्या जातीत लग्न केले म्हणूनच कमी होते का?” दिलीपने प्रश्नांचा भडीमारच केला. अर्थात यातील एकाही प्रश्नांचे उत्तर सचिनला देता येण्यासारखे नव्हते.

“हे बघ… तुझ्या आईचा, वडिलांचा विचार कर. आपल्या पोटच्या पोराने आपल्या पोरीचा खून केला आणि स्वतः जेलमध्ये गेला हे सांगताना त्यांना काय वाटेल? त्यांना तुला सुख देता येत नसेल तर किमान हे दुःख तरी का द्यावेस?” दिलीप बोलत होता आणि सचिन ऐकत होता. कुठेतरी त्याच्या मनालाही हे पटत होते. जेवण झाले आणि दोघे गाडीत येऊन बसले.

“चाचा… गाडी परत घ्या…” सचिनने ड्रायव्हरला गाडी वळवायला सांगितली.

“अरे… गाडी परत कशासाठी?” दिलीपने गोंधळून विचारले.

“मंग… आता काय करायचं तितं जाऊन?”

“काय करायचं म्हणजे? त्यांना परत घेऊन यायचं.”

“म्हंजी… त्यांना पाटलाच्या ताब्यात द्यायचं? नाई जमनार ते…” सचिन गोंधळला.

“मी कुठे म्हणालो त्यांना पाटलाच्या ताब्यात द्यायचे म्हणून? पण त्यांना तिकडे घेऊन जायचे ते या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी. आज आपण नाही गेलो तरी पाटील दुसऱ्या कुणाकडून हे काम करून घेईल. आणि तेच मला नको आहे. मी परत जाण्यापूर्वीच मला हे केलेच पाहिजे. माझ्यावर विश्वास ठेव…” दिलीपने समजावून सांगायचा प्रयत्न केला.

“पन…”

“आता तू हे सगळे माझ्यावर सोड. मी एका बहिणीचा परिवार उध्वस्त केला आहे. आता दुसऱ्या बहिणीची ती गत कदापि होऊ देणार नाही. फक्त यासाठीच तर मी बाहेर आलो आहे.” असे म्हणत दिलीपने गाडी पुणतांब्याच्या दिशेने घेण्यास चाचाला सांगितले. तासभरात ते पुणतांब्यात होते.

“ओ भाऊ… जाधव वस्ती कुठंय?” सचिनने पानटपरीवर उभ्या असलेल्या माणसाला विचारले.

“जाधव वस्ती ना? असं करा… असंच पुढं जावा… मंग येक डाव्या हाताला छोटा फाटा लागन. त्याने आत जायचं. चार मैलावर जाधव वस्ती हाये. पन तुमी कोन त्यांचे? अन आता त्ये तितं नाई गावात ऱ्हातेत.” त्याने पत्ता सांगितला.

“मी त्यांच्या पोराचा मित्र हाये… नितीनचा… त्यानंच शेत पहायला बोलावलं आमाला.” सचिनने वेळ मारून नेली आणि चाचाला गाडी पुढे घ्यायला सांगितली. १५ मिनिटात ते वस्तीवर पोहोचले. दुपारच्या वेळेस कोण आले असेल हे पाहण्यासाठी प्रशांत आणि प्रज्ञा बाहेर आले. गाडीतून सचिनला उतरताना पाहून प्रज्ञाच्या काळजाचा ठोकाच चुकला. या आधी पोलीस देखील वेळेवर आले होते, जोडीला शेरू होता. पण आता? यावेळेस एक गोष्ट मात्र तिला वेगळी वाटली. यावेळेस सचिन फक्त एका व्यक्तीला बरोबर घेवून आला होता. या व्यक्तीला तिने याआधी कधीही पाहिलेले नव्हते. त्यांना पाहताच ती प्रशांतच्या मागे झाली. इतक्या वेळात सचिन आणि दिलीप त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. सगळेच अगदी गप्पं होते. वातावरणात एक प्रकारचा तणाव आलेला प्रत्येकालाच जाणवत होता.

“ताई… कशी आहेस?” सचिनने सुरुवात केली. त्याच्या प्रश्नांवर उत्तर द्यावे किंवा देऊ नये याचा विचार तिच्या मनात चालू झाला.

“तू… तू का आलास इथे?” शेवटी तिने त्याला हिंमत करून विचारलेच.

“तुमाला घरी न्यायला…” सचिनने उत्तर दिले.

“नाही… मी नाही येणार तुझ्या बरोबर…” तिने ठामपणे सांगितले आणि परत सगळे गप्पं झाले.

“आम्ही आत येवू का?” वातावरणातील तणाव काहीसा कमी व्हावा यासाठी दिलीपने सुरुवात केली. आता नाही कसे म्हणायचे म्हणून मग प्रशांतने त्यांना आत बोलावले. दोघेही आत जावून पलंगावर बसले.

“प्रज्ञा… दोघांना पाणी घेवून ये…” प्रशांतने प्रज्ञाला दोघांसाठी पाणी आणायला सांगितले. प्रज्ञा आत जाताच दिलीपने स्वतःची ओळख सचिनचा नवीन मित्र अशीच करून दिली. प्रज्ञा पाणी घेवून बाहेर आली. दोघांनी पाण्याचे ग्लास तोंडाला लावले मात्र आणि बाहेर २/३ बाईक थांबल्याचा आवाज आला. कोण आले म्हणून प्रज्ञा बाहेर पाहायला जातच होती तेवढ्यात दारात नितीनचे आजोबा, वडील आणि अजून ३ जण आत आले. त्यांना दारात पाहताच प्रज्ञाच्या जीवात जीव आला.

“आजोबा… तुम्ही? आणि असे अचानक?” प्रज्ञाने काहीशा आनंदाने आणि काहीशा आश्चर्याने विचारले.

“हा पोरी… तुमच्याकडं पावने आल्याचं आप्पानं येवून सांगितलं म्हनून आलो त्यास्नी भेटाया…” आळीपाळीने दिलीप आणि सचिनकडे पहात आजोबा उत्तरले. तेवढ्यात प्रशांतने तिथेच ठेवलेली एक चटई सगळ्यांना बसण्यासाठी अंथरली. नितीनचे आजोबा, रामभाऊ आणि एकजण यांनी लगेच त्यावर बैठक मांडली पण दोन जण मात्र दारातच उभे राहिले.

“हा या पोरीचा भाऊ…” सचिनकडे इशारा करत दिलीप उत्तरला.

“हा… म्हंजी त्योच का… पोलिसांनी पकडलेला?” काहीशा खोचकपणे आजोबांनी विचारले.

“हो… तोच…”

“मंग आता हितं कायला आला?” आजोबांचा पुढचा प्रश्न.

“या दोघांना घरी न्यायला.” अगदी निर्विकारपणे दिलीपनं उत्तर दिलं.

“नाई… याच्यासंग तर आमी पोरीला पाठीवनार नाई…” आजोबा मानेनं नकार देत बोलले.

“ठीक आहे… मग तुम्ही पण चला बरोबर… मग तर काही प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला?” दिलीपच्या या उत्तरावर आजोबा तरी काय बोलणार?

“असं करा… चार दिस ऱ्हावू द्या पोरास्नी हितं… मंग येतील कि त्ये?” आजोबांनी परत विषयाला फाटा फोडायचा प्रयत्न केला. मग थोडा वेळ विचार करून दिलीपने सुरुवात केली.

“आजोबा… तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात. माझा मित्र त्याच्या बहिणीशी या आधी जसा वागला होता ते पाहिले तर तुमच्या जागी मी असतो तरी मी हेच केलं असतं. पण आता मी काय सांगतो ते समजून घ्या. हा प्रॉब्लेम आता फक्त घरघुती राहिलेला नाही. अनेक जण यात स्वतःचा फायदा पहात आहेत. मी काय चार दिवसांनी निघून जाईल. पण त्यानंतर हे दोघे असे किती दिवस लपून राहणार? कधी ना कधी यांना बाहेर पडावेच लागणार. त्यावेळेस मग ना तुम्ही यांना वाचवण्यासाठी असणार, ना मी. त्यामुळे हे प्रकरण जितक्या लवकर मिटेल तितके या दोघांच्या दृष्टीने चांगले आहे. मी तुम्हाला वचन देतो पाहिजे तर, या दोघांच्या केसाला देखील धक्का लागणार नाही. आणि मी तर म्हणतो तुम्ही सगळेच चला. जितके जण यांच्या बाजूने असतील तितका आपला प्रभाव तिथे जास्त पडेल.” दिलीपने आता नवीन पेच टाकला.

“ठीके… आमी समदेच येतो तुमच्यासंग…” थोडा वेळ विचार करून आजोबांनी होकार दिला.

“रामभाऊ… आपली गाडी काढ… ह्ये पोरं आपल्या गाडीत असतीन अन आपले मानसं पावन्यांच्या गाडीत…” रामभाऊकडं पाहत आजोबां उठले. काही वेळातच सगळ्यांनी पुणतांबा सोडले होते.

 

क्रमशःप्रतिष्ठा भाग १०.

मिलिंद जोशी, नाशिक…

भाग ९ लिंक –

Leave a comment