प्रतिष्ठा भाग ११ –
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास देशमुखांच्या घरासमोर दोन गाड्या उभ्या राहिल्या. या वेळेस कोण आले असेल हे पहाण्यासाठी देशमुख बाहेर आले. गाडीतून प्रज्ञाला उतरताना पाहून आधी त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद झालेला दिसला पण जेव्हा त्यांनी दुसऱ्या गाडीतून सचिनला उतरताना पाहिले त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर एक भीतीची छटा स्पष्ट दिसू लागली. तितक्यात प्रज्ञाची आई देखील बाहेर आली. तिला पाहताच प्रज्ञा धावतच तिच्याकडे गेली.
“प्रज्ञा… तू?” तिच्या आईच्या तोंडून आश्चर्याचे उद्गार बाहेर पडले. पण त्यापुढे तिला काहीच बोलता येईना. तिच्या डोळ्यातून अपोआप पाणी वाहू लागले. इतक्यात इतर मंडळीही खाली उतरली. प्रशांतने सगळ्यात आधी जावून दोघांना नमस्कार केला. प्रज्ञा बरोबर आलेला हाच मुलगा तिचा नवरा असणार यात त्या दोघांनाही काहीच संशय उरला नाही.
“आजोबा… ही माझी आई आणि हे माझे वडील…” आनंदाचा भर जरा कमी झाल्यावर प्रज्ञाने ओळख करून दिली.
“नमस्कार…” प्रज्ञाच्या वडिलांनी आजोबांचे स्वागत केले आणि त्यांना घरात बोलावले. इकडे प्रज्ञा आई बरोबर स्वयंपाकघरात गेली. प्रज्ञाला पाहून तिच्या लहान बहिणीलाही खूप आनंद झाला.
“आई… सचिन इतका बदलला कसा? आणि त्याच्या बरोबर तो त्याचा मित्र कोण आहे?” इतका वेळ मनात घोळत असलेला प्रश्न तिने आईला विचारलाच.
“सचिनचा कोन मित्र? आमाला काईच नाई म्हाईत…” प्रज्ञाच्या आईने गोंधळून विचारले.
“अग तो नाही का सचिन बरोबरच आहे सध्या… तो मित्र… बोलून तर खूप सभ्य वाटतो आहे. पण या आधी मी कधीच त्याला पाहिलेले नाही.” तिने आईला विचारले पण प्रज्ञा प्रमाणेच प्रज्ञाची आई सुद्धा त्या व्यक्तीला प्रथमच पहात होती.
इतर चहा पाणी होते न होते तोच बाहेरून भिवाचा आवाज आला.
“सचिन… पाटलानं बोलीवलंय… आसंन तसा…” त्याने काहीशा हुकमी आवाजात निरोप दिला.
“सचिन… चल जरा पाटलाला भेटून येऊ…” म्हणत दिलीप उठला. त्याला तसे उठलेले पाहताच देशमुखही त्यांच्या बरोबर जायला निघाले.
“काका… आम्ही दोघं जावून येतो. तुम्ही इथेच थांबा.” म्हणत सचिनला बरोबर घेत दिलीप बाहेर पडला.
वाड्याच्या पडवीतील झोपाळ्यावर पाटील बसला होता. सचिन आणि दिलीपला आत येताना पाहून बसल्या जागेवरूनच त्याने त्यांचे स्वागत केले.
“या पावनं… संभरावर पाच वर्स आविष्य बगा तुमाला… आता तुमचाच इचार करीत व्हतो…” एकीकडे त्यांचे स्वागत करताना पाटलाची नजर पोरं दिसतात का ते शोधत होती.
“आं… आवं ती पोरं कुठं हैती? दिसून नाई ऱ्हायले…” आपल्याला आश्चर्य वाटते आहे असे दाखवत पाटलाने विचारले.
“ती पोरं त्यांच्या घरी आहेत पाटील…” अगदी निर्विकारपणे दिलीपने उत्तर दिले.
“त्यांच्या घरी? पन तुमी तर म्हनला होता ना… सांच्याला ती तुमच्या म्होरं ऱ्हातील म्हनून… त्याचं काय?” काहीशा गुश्श्यात पाटलाने विचारले.
“हो… म्हणालो होतो… अजूनही म्हणतो… देशमुखच्या घरी चला… त्यांना तुमच्या समोर उभे करतो…” पाटलाच्या बोलण्याचा आपल्यावर काहीच परिणाम झालेला नाही असे दाखवत दिलीपने शांतपणे उत्तर दिले. त्याच्या या अगदी थंड उत्तराने पाटलाचे पित्त खवळले.
“ये बेन्या… तुला म्या जेलमधून काढला हाय… माह्याशी गेम खेळू नगंस, म्हागात पडंल.” पाटील पुरता पेटला.
“पाटील… ह्या धमक्या मला देऊ नका… असल्या धमक्यांना मी भिक घालत नाही.” परत अगदी थंडपणे दिलीपने उत्तर दिले.
“आयला तुज्या… कुनापुडं बोलू ऱ्हायला तू?” पाटलाच्या शेजारी उभा असलेला भिवा दिलीपच्या अंगावर धावत म्हणाला. जसा तो जवळ आला तसे दिलीपच्या हातात पिस्तुल दिसू लागले. ते पाहताच तो अर्ध्यातच थांबला.
“ए माकडा… तुझी वटवट बंद कर… कारण मी केली तर ती कायमची असेल… समजलं? आणि तसेही आता मला जेलचे जीवन मानवले आहे. त्यात अजून १४ वर्ष वाढली तरी मला काही प्रॉब्लेम नाही.” आता मात्र दिलीपच्या आवाजात एक प्रकारची हुकुमत होती. दिलीपचा तो अवतार पाहून पाटीलही मनातून चरकला.
“अवो पावनं… जरा सबुरीनं घ्या… नाई पन आपलं ठरलं व्हतं… मी तुमाला भायेर काडलं त्याचं असं पांग फेडता व्हय? शोबतं का तुमास्नी?” नरमाईच्या सुरात पाटलानं विचारलं.
“पाटील तुम्ही मला बाहेर आणलं ते मी तुमचं काम करावं म्हणून… म्हणजे तो एक व्यवहार झाला. आणि व्यवहार म्हटल्यावर त्यात कधी कधी तोटाही होतोच की. काय?” काहीसे हसत दिलीप म्हणाला आणि पाटलाचा पारा चढला.
“लै बोल्लास… आता उद्याच्याला समजन… पाटील काय हाय ते… सकाळच्याला पंचायत बोलीवतो अन तुमास्नी तुमची जागा दाखिवतो…” पाटील चरफडत बोलला.
“बसं… इतकंच? पण हेही लक्षात ठेवा, उद्या मी माझ्या ह्या खेळण्याला बरोबर घेवून येणार आहे. मला बोलायला आडवलं तर मी तुमचं तोंड कायमचं बंद करील. आणि या आधीच संगितले आहे मी… मला जेलचे जीवन जास्तच मानवते म्हणून…” आपल्या हातातील पिस्तुल पाटलाला मुद्दाम दाखवत आपल्या कमरेला खोचले आणि मग सचिनला घेऊन तो बाहेर पडला. दोघं घरी आले तेंव्हा सगळेजण तिथे काय झाले हे ऐकायला उत्सुक झाले होते.
“सचिन… पाटलाने कशाला बोलीवलं होतं?” देशमुखांनी अधिरतेनं विचारलं.
“काई नाई… त्येच… उद्या परत पंचायत बोलीवली हाये…” सचिनने उत्तर दिले. ते ऐकून परत एकदा वातावरण गंभीर झाले. त्यांच्या चेहऱ्यावर परत चिंतेचे सावट दिसू लागले.
“काका… तुम्ही काही काळजी करू नका. प्रज्ञा जशी सचिनची बहिण तशीच माझीही बहीणच आहे. आता तिच्या किंवा प्रशांतच्या केसालाही धक्का लावायची कुणाची हिंमत होणार नाही. आणि उद्या तिथे तुम्ही काहीच बोलू नका. जे बोलायचे ते मी बोलेल. आता तुम्ही निश्चिंत राहा.” दिलीपचा प्रत्येक शब्द देशमुखांना आश्वासक वाटला. प्रज्ञाला तर आता दिलीप हा एखादा देवदूत असावा असेच वाटू लागले. ज्या भावापासून ती लपत होती तोच भाऊ तिला घ्यायला आला होता. आईच्या म्हणण्याप्रमाणे सचिनचे वागणे सकाळ पर्यंत अगदीच विचित्र होते पण संध्याकाळी मात्र तो पूर्णपणे नॉर्मल वाटत होता. पाटलाकडेही सचिनसोबत तोच गेला होता. उद्याही मीच सगळे बोलेल असे सांगत होता. आपल्या आणि प्रशांतच्या केसालाही आता कुणी धक्का लावू शकणार नाही याची खात्रीही देत होता. आणि इतके सगळे असूनही त्याचा चेहरा अगदी निर्विकार दिसत होता.
रात्रीची जेवणं झाली. रामभाऊ आणि त्यांच्या बरोबर आलेले लोकं घरी जायला निघाले. प्रज्ञाने मात्र आजोबांना मुद्दाम थांबून घेतले होते. प्रज्ञाची आणि नितीनच्या आजोबांची ओळख फक्त चार दिवसांपूर्वीची पण या चार दिवसात तिला ते आई वडिलांइतकेच जवळचे वाटू लागले होते. देशमुख जरी चेहऱ्यावर आलेले टेंशन दिसू देत नव्हते तरी आज त्यांना झोप येणे मुश्कील होते.
दुसरा दिवस उजाडला. आज परत पाटलाच्या वाड्यासमोर पंचायत भरली. सगळे जण वाड्यावर हजर झाले. देशमुख, सचिन, दिलीप यांच्या बरोबर नितीनचे आजोबाही त्या ठिकाणी आले. दिलीपला पाहताच पाटलाचे माथे ठणकले. जर काही गडबड झालीच तर ती फक्त या एका माणसामुळे होऊ शकते हे त्याने पुरेपूर ओळखले. कसे ही करून याला इथून बाहेर काढणे गरजेचे होते पण ते कसे करावे हेच त्याच्या लक्षात येत नव्हते. बरे त्याने दिलेला गर्भित इशाराही पाटील विसरला नव्हता. सगळे पंच आले तसे पंचायतीचे कामकाज सुरु केले गेले. नेहमी प्रमाणे सुरुवात पाटलानेच केली.
“तर मंडळी, आपन देशमुखाला आदीच जातभायेर केले हाये. पन अजून त्यो सुदारला नाई, आता तर त्याने त्याच्या पोरीला अन त्या पोरालाबी घरात घेतलंय. म्हनून त्याच्यावर बहिष्कार टाकला जात हाये. आता त्याच्या घरातील कुनाशीबी कोनच्या बी परकारचा संबंध ठिवला तर त्यास्नी बी जातभायेर केले जाईल. आपल्याला कुनावर अन्याय करायचा नाई. जर देशमुखाला काई बोलायचं असन तर त्ये आताच बोलावं.” असं म्हणत पाटील खाली बसला.
“मला बोलायचं आहे.” दिलीप पुढे आला.
“नाई… भायेरच्या मानसाला काई बोलायचा अधिकार नाई…” त्यांच्यातील एका पंचाने लगेच त्याला हरकत घेतली.
“कोण म्हणतो मी बाहेरचा आहे म्हणून?” पाटलाकडे जळजळीत नजरेनं पाहत दिलीपने विचारले.
“म्या म्हनतो…” भिवा पुढे येत म्हणाला.
“तुला काय माहित माझी जात? तू काय माझं जात प्रमाणपत्र आणलंय का?” काहीसे हसतच दिलीप म्हणाला.
“नाई.. पन या आधी कुनीच तुमाला हितं पायलं नाई.” एक पंच म्हणाला.
“आता तुमच्या एखाद्या पुतण्याला इथल्या काही लोकांनी पाहिलं नाही म्हणजे काय तो तुमचा पुतण्या नाही? सचिनची आई माझी मावशी आहे म्हणजे देशमुख माझे काकाच झाले ना?” दिलीपने टाकलेल्या गुगलीवर कुणाकडेच उत्तर नव्हते. शेवटी इतर तीन पंचांनी त्याला बोलायची परवानगी दिली.
“मला सगळ्यांना फक्त काही प्रश्न विचारायचे आहेत. कारण मलाही आपल्या जातीचा तितकाच अभिमान आहे जितका तुम्हा सर्वांना आहे आणि म्हणूनच मला तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो.” दिलीपने सुरुवात केली.
“काय ते इचार पटकन…” एक पंच वैतागून म्हणाला.
“आपल्या जातीचा फायदा, आपले लोकं जातीत राहिल्याने होणार कि जातीतून बाहेर गेल्याने होणार?” दिलीपने प्रश्न विचारला.
“आपल्या जातीत ऱ्हायल्यानीच हुईल की..” बसलेल्या व्यक्तींमधून एकाने उत्तर दिले.
“तर मग एक चूक केली म्हणून तुम्ही देशमुखाच्या आख्ख्या खानदानाला बाहेर काढून जातीचा कोणता फायदा करत आहात?” दिलीपने उपस्थित केलेल्या मुद्द्यावर काय बोलावे हेच कुणाला समजेना.
“ए… तू कुनीबी असंना… पंचायतीफुडं बोलायचा अधिकार नाई तुला… चल निघ… पंचायतीचा न्याय झालाय…” पाटील चवताळला.
“पाटील… मी तुम्हाला प्रश्न विचारला नाही… जातीतल्या सगळ्यांना विचारला आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारतो… तुम्ही तर जातीच्या भल्यासाठी आपल्याच जातीतील लोकांकडून दंड म्हणून हजारोंनी रुपये घेतले आहेत. पण आपल्याच जातीतील लोकांना व्यवसायासाठी पैशाची काही मदत केली आहे का? आणि जर नसेल तर मग त्या पैशाचे काय करता?” पाटलाचा आवाज ऐकून दिलीपने आता मोर्चा पाटलाकडे वळवला.
“त्या पैशाचं आमी काय बी करू… तू कोन इचारनारा?” पाटील एकदम भडकलाच.
“पाटील इतकं चिडण्यासारखं काय आहे त्यात? मी एक साधा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर द्या आणि व्हा मोकळे.” दिलीप अगदी शांतपणे बोलला.
“हा.. हा.. पाटील… आमाला बी म्हाईत जालं पायजेल.” आधी ज्यांनी असा दंड भरला होता त्यातील काही जणांनी दिलीपचा प्रश्न लावून धरला. आता मात्र बाजी पुरती पाटलावर उलटली. असे काही होईल याचा अंदाज पाटलाने आधीच बांधला होता त्यामुळे त्याने समोरच उभ्या असलेल्या भिवाला नजरेने खुणावले.
“आरं माह्या कर्मा… कलयुग आलं रं… देवमानुस पाटील वाईट ठरला अन ह्यो खुनी मानुस भला ठरला…” भिवानं स्वतःची छाती पिटून घेत मोठमोठ्यानं ओरडायला सुरवात केली.
“भिव्या… कामून गागू ऱ्हायला? समद्यास्नी समजंन असं बोल…” एक पंच उखडलाच.
“दादा… आवं… गागु नकू त काय करू? ह्यो… ह्यो… खुनी मानुस देवमानसाला सवाल करू ऱ्हायला अन ह्ये आपलेच मानसं याला हाकून द्यायचं त त्याला साथ दिवू ऱ्हायले…” हळूहळू भिवाच्या नौटंकीचा परिणामही इतरांवर दिसू लागला. लोकांना परक्या दिलीपपेक्षा पाटील जवळचा वाटणारच. पाटील मात्र नजर खाली करून गालातल्या गालात हसत होता.
क्रमशःप्रतिष्ठा भाग ११.
मिलिंद जोशी, नाशिक…
भाग १० लिंक