प्रतिष्ठा भाग १२ –
पाटलाची सरसी होते आहे असे दिसताच नितीनचे आजोबा पुढे आले.
“पन मी काय म्हन्तो… ह्यो मानुस काय खोटं बोलू ऱ्हायला? पंचायत दंड घ्येते तर त्येचा आपल्या जातीसाठी कसा उपेग केला जातो ह्ये समद्यास्नी म्हाईत नगं का?” आजोबांनी दिलीपचा मुद्दा लावून धरला.
“मायला त्याच्या… आता ह्ये आनिक कोन म्हणायचं?” पाटील चक्रावलाच.
“म्या देशमुखाचा चुलता हाय…” आजोबांनी थाप मारली.
“अगागा… ह्यो देशमुख त लैच भारी निगाला… कुनी म्हन्तं देशमुख माहा चुलता… अन कुनी म्हन्तं म्या देशमुखाचा चुलता… अन ह्ये समदं झालं, त्ये बी येका रात्रीत?” पाटील पुरता उखडला.
“वो बाबा… तुमच्या नातीनं काय क्येलं त्ये ठावं हाय न्हवं?” बसलेल्या लोकांपैकी एक पोरगा म्हणाला.
“काय क्येलं?” त्याच्याकडे पाहत आजोबांनी विचारलं.
“जातीला काळं फासलं… ह्ये समदं गावं म्हनू ऱ्हायलं…” तो पोरगा आढ्यतेनं म्हणाला.
“तुह्या आज्याचं नावं काय रं?” आजोबांनी प्रश्न विचारला.
“म्हादबा…”
“अन त्यांच्या आज्याचं?” आजोबांनी पुढचा प्रश्न विचारला आणि तो विचार करू लागला.
“आरं… सोताच्या खापर पंज्याचं नांव म्हाईत नाई, आजूक नीट मिसरूड फुटलं नाई आनी जातीच्या गप्पा करतोस व्हयं रं?” आजोबा कडाडले.
“ओ बाबा… त्याला कामून बोलू ऱ्हायले? तुमच्या नातीनं श्यान खाल्लं ते खाल्लं अन तुमी आमाला शिकू ऱ्हायले व्हयं?” बसलेल्यांपैकी एकजण म्हणाला.
“हा… शिकू ऱ्हायलो… तुमी असं येड्यावानी कायबी बोलू ऱ्हायला… मंग मला तुमाला शिकवावंचं लागंन ना?” आजोबांनी आता मोर्चा या नवीन व्यक्तीकडे वळवला.
“आमी काय येड्यावानी बोल्लो?”
“मला सांग… तू रामाला देव मानतो का?”
“हा… पन त्याचं काय हितं?”
“मंग त्यानं शीतेशी लगीन क्येलं ह्ये बी ठाव आसंल?”
“हा… ठाव हाय…”
“मंग मला सांग… ती त त्या राज्याला शेतात गावली… तिची आय कोन त्ये बी म्हाईत नाई… मंग तिची जात कंची रं? अन ह्ये त्या रामाच्या गुरुनं बी त्याला सांगितलं न्हाई?” आजोबांनी मुळावरच घाव घातला. त्यांच्या या प्रश्नांवर कोण काय उत्तर देणार?
“आरं बोला की… तुमी समदे त लई इद्वान लागून ग्येले ना?” आजोबांच्या या प्रश्नांनी जमलेल्या व्यक्तींमध्ये दोन गट पडले. त्यांची कुजबुज वाढली.
“असं हाये… पुरान काळात कंच्याच जाती न्हवत्या. वरनं व्हते… चार… बामन, शत्रीय, वैश्य अन शुद्र. अन ह्ये समदे समान व्हते. कुनी ल्हान न्हाई कुनी म्होटा न्हाई. तुमी ज्ये काम करनार त्यो तुमचा वरनं. लोकांना देवाच्या, धरमाच्या गोश्टी सांगनार, चांगलं वाईट सांगनार, शिक्शन देनार त्यो बामन, म्हंजी रुशी. जो समद्यांचं रक्षन करनार, न्याय करनार त्यो शत्रीय, जो लोकास्नी कर्ज देनार, वस्तू इकनार त्यो वैश्य अन जो लोकांची सेवा करनार त्यो झाला शुद्र. नंतर मंग आपला बाप ज्ये काम करतो त्येच पोरगं ल्हान असल्यापासून पहाया लागलं. अन ज्ये तुमी ल्हान असल्यापासून पाहता त्ये करायला तुमाला सोप्पं जातं म्हनून मंग जी गोश्ट आज्जा करायचा तीच बापानं बी क्येली आन पोरगं बी त्येच कराया लागलं. म्हंजी जे आदी करमावर व्हतं त्ये जल्मावर आलं. मंग त्यात बी येगयेगळे परकार… त्यानं बनल्या जाती. जो मातीची भांडी बनवन त्यो झाला कुम्हार, जो दागिने बनवन त्यो झाला सोनार अशा… आता मला सांगा, कुडं देवानं लिवलंय का जातीतच लगीन क्येलं पायजेल म्हनून?” आजोबां बोलत होते आणि लोकं ऐकत होते.
“आता वाल्मिक रुशी तर समद्यास्नी म्हाईत हायेत ना? रामाचे गुरु व्हते… ते जल्माने शुद्र व्हते पन करमाने रुशी झाले. रामाचे उजूक येक गुरु… विश्वामित्र… जल्माने शत्रीय व्हते… त्यांनी काई वर्स राज्य बी क्येलं. अन नंतर ते रुशी झाले. त्या येळेला रामनं जात पायली का? मंग आता मला सांगा… तुमाला जास कळतं का रामाला? बरं कृस्नाला सुदिक तुमी देव म्हंता ना? त्याची बी मंदिर हायेत. त्यानं बी रुक्मीनीशी असंच पळून जावून लगीन लावलं. तवा तिचा भाऊ बी असाच पेटला व्हता… पन नंतर त्यानंबी भैनीला माफ क्येलंचं ना? देवानं ह्ये समदं कामून क्येलं? त्याला म्हाईत व्हतं… कलयुग येनार हाय… लोकं येड्यावानी वागनार हायेत. मंग त्यांना कुनीतरी सांगाया पायजेल, काय कराया पायजेल, काय नाय ते… म्हनून त्यांनी लगीन करताना जात पायली नाई.” आजोबा एकेक गोष्ट बोलत होते आणि कुणाकडेच त्याचे खंडन नव्हते. आजोबा शांत बसले तेंव्हा काहीवेळ सगळ्यांमध्ये शांतता पसरली.
“ह्या भिवानं मला खुनी म्हटलं… हो… मी आहेच खुनी… पण मी कुणाचा आणि का खून केला हे देखील सांगतो.” परत एकदा दिलीपने आपल्या हाती सूत्र घेतली.
“काही वर्षांपूर्वी माझ्या बहिणीनेही असेच इतर जातीत लग्न केले. तो मुलगा स्वभावाने खरंच चांगलाच होता. पण मला मात्र जातीची प्रतिष्ठा जास्त महत्वाची वाटत होती. एकतर आपल्या बहिणीने इतर जातीत लग्न केले याचा राग आणि मग आमच्या गावातील असेच काहीजण पुढे आले. तिने जातीला काळे कसे फासले, आपल्या जातीची प्रतिष्ठा कशी धुळीला मिळवली हे अशा गोष्टी सांगून त्यांनी माझ्या रागात जास्तीच भर घालती. त्याच आवेशात मी माझ्या बहिणीचे घर गाठले. जो समोर आला त्याला गोळ्या घातल्या. ते काय म्हणताहेत हे देखील ऐकण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो. ज्या वेळेस मी भानावर आलो त्यावेळेस वेळ निघून गेली होती. माझ्या बहिणीच्या सुखी संसाराची माझ्याच हातानी मी राखरांगोळी केली होती. तसाच पोलिसांच्या स्वाधीन झालो. जातीचा टेंभा मिरवणारे आणि मला अभिमान शिकवणारे कुणीही केसच्या वेळेस हजर नव्हते. जे हजर होते ते माझ्याकडे एखादा राक्षस पाहावा अशा पद्धतीने पहात होते. इतकेच काय पण जेलमधील इतर कैदीही माझ्याशी नीट वागत नव्हते. त्यांच्या मते जो बहिणीचा खून करू शकतो त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? तसे त्यांच्या बोलण्यात काय खोटे होते? म्हणून मग मी तिथे देखील सगळ्यांपासून वेगळा राहू लागलो. त्याच काळात हा सचिन तिथे आला. त्याच्या एकंदर बोलण्यावरून तोही त्याच परिस्थितीमधून जात होता ज्यातून मी पूर्वी गेलो होतो. म्हणून त्याने जेव्हा मला मदत करशील का असे विचारले… मी होकार दिला. तो बाहेर आल्यानंतर त्याने या पाटलाच्या मदतीने मला बाहेर आणले. पाटलाने मला याच बोलीवर मदत केली की, मी देशमुखाच्या पोरीला आणि तिच्या नवऱ्याला इथे घेवून येईल. काल त्या दोघांना आणायच्या आधी आम्ही पाटलाच्याच वाड्यावर जमलो होतो. पण नंतर मी त्याच्या म्हणण्या प्रमाणे त्या दोघांना त्याच्या हवाली केले नाही म्हणून आज तो आणि त्याचे माणसं मला खुनी म्हणत आहेत. मी जर त्यां पोरांना या पाटलाच्या हवाली केले असते तर याने काय केले असते हे देवालाच माहित. आता मला सांगा… तुम्हालाही मुलं आहेत. उद्या समजा त्यांनी असे केले तर? त्यांना देखील तुम्ही जीवे मारणार? का तर फक्त प्रतिष्ठा… घरात खायला नसते आणि प्रतिष्ठा महत्वाची? आता निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.” दिलीपने आपली बाजू मांडली. सगळे स्तब्ध होऊन ऐकत होते. काही वेळ शांततेच गेल्यावर हळूहळू कुजबुज वाढू लागली.
“मंडळी… धा मिनटात आमी इचार करून आमचे मत सांगतो.” असे म्हणत पंच उठले. आता पंच काय निर्णय देतात याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले होते. हे दहा पंधरा मिनिटं देशमुखांना अगदी युगांप्रमाणे वाटत होते. शेवटी पंच जागेवर आले.
“मंडळी… देशमुखाचे चुलते जे बोल्ले आनीक या दिलीपनं ज्ये सांगितलं त्याचा इचार क्येला त उद्या आपली पोरं बी अशा गोस्टी करनार न्हाईत हे म्हंता येनार न्हाई. तशेच आपल्या जातीच्या इकासासाटी आतापोतूर आपन कायपन क्येलं न्हाई ह्येबी नाकार्ता येत न्हाई. म्हनून पंचांनी असा निर्नय घेतला हाये की आपली ही जात पंचायत बर्खास्त करून त्या ऐवजी येक सोसायटी बनवायची. अन ही सोसायटी आपल्या जातीच्या पोरांना कामधंद्यासाटी कर्ज दील. जातीच्या इकासाची कामं करंन, पन कुनालाच जातभायेर क्येलं जानार न्हाई. दुसऱ्या जातीत लगीन क्येलं म्हनून कुनालाबी दंड क्येला जानार न्हाई… ही आपली जात पंचायत आमी बर्खास्त करन्याची घोषना करतो…” असे म्हणून सगळे पंच उठले. देशमुखांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वहात होता. सगळे घरी निघाले तसा दिलीप पाटलाजवळ गेला.
“पाटील… तुम्हाला गरज नाही, पण तरीही एक फुकटचा सल्ला देतो. आता तुमचं शरीर तुम्हाला साथ देतंय पण काही वर्षांनी ते थकंल… त्यावेळेस माणसाला पैशाची नाही तर कुणाच्या तरी आधाराची गरज लागते. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही लोकांना आज मदत केली तर उद्या हेच लोकं तुमचा आधार बनतील. याचा एकदा विचार करा.” दिलीपनं सल्ला दिला. पाटलाच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनात काय चालले आहे याचा मात्र अंदाज बांधता येत नव्हता. तशी गरजही दिलीपला वाटत नव्हती.
काही वेळातच ते सगळे देशमुखांच्या घरी पोहोचले. देशमुखांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहूनच प्रज्ञाच्या आईचा जीव भांड्यात पडला. पुढील बराच वेळ कोण काय बोलले, पंचायत बरखास्त कशी झाली हे राहून राहून देशमुख सांगत होते. त्यादिवशीच नितीनचे आजोबा घरी जायला निघाले पण यावेळेस देशमुखांनी त्यांना एक दिवस थांबून घेतले. सगळ्यांच्या तोंडी दिलीपचे कौतुक होते. दिलीप मात्र अगदी निर्विकार होता. जसे काही घडलेच नाही अशा पद्धतीने. आता उरलेले काही दिवस तरी त्याला त्याच्या गावी जावून यायचे होते.
दुसऱ्या दिवशी आजोबा आणि दिलीप बरोबरच निघाले… आपापल्या गावी जाण्यासाठी.
“दिलीप भाऊ… तुमचे आभार कशे मानावे ह्येच समजून नाई ऱ्हायलं… तुमी नसते त काय झालं असतं माझ्या हातनं…” अगदी निरोपाची वेळ आली त्यावेळेस सचिन म्हणाला. दिलीपने त्याचा हात हातात घेतला.
“अरे उलट आभार तर मी मानले पाहिजेत तुझे. याला दोन कारणं आहेत. एक म्हणजे काल मला इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा अगदी शांत झोप लागली. ते जे स्वप्न मला सारखे दिसत होते ते काल मला अजिबात पडले नाही. आणि दुसरे कारण म्हणजे माझी शिक्षा भोगून आल्यावर काय करायचे हे काल मला समजले. आता माझे ध्येय फक्त एकच… जात पंचायत निर्मुलन… आणि त्यासाठी मला तुझी मदत लागेल. करशील ना?”
“मंग… आता तुमच्यासंग तुमचा ह्यो मित्र पन असनार…” सचिन म्हणाला. अर्थात दिलीपला देखील याची खात्री होतीच…
समाप्त…
मिलिंद जोशी, नाशिक…
भाग ११ लिंक