प्रतिष्ठा भाग २

प्रतिष्ठा भाग २ –

“प्रज्ञा… पटकन सगळे समान सॅकमध्ये भर आणि सॅक पाठीला अडकव…“ असे म्हणत प्रशांत घाईघाईत खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू आपल्या सॅकमध्ये भरू लागला. प्रज्ञाला मात्र काहीच समजेना. पण तिनेही सगळया गोष्टी आपल्या सॅकमध्ये भरल्या आणि सॅक खांद्याला अडकवली.

“अरे पण झाले काय?” सॅक खांद्याला अडकवत तिने विचारले.

“समोरून ४/५ माकडं येत आहेत. आणि त्यांनी जर आपल्या सॅक हिसकावून घेतल्या तर आपल्याला दोन दिवस इथे रहाणे शक्य होणार नाही.” त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसून येत होती. तेवढ्यात त्याला जवळच एक काठी पडलेली दिसली. त्याने ती उचलून प्रज्ञाकडे दिली आणि आता येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायला तो सिद्ध झाला.

माकडांचा कळप आता बराच जवळ आला होता. समोर माणसे दिसताच आपल्याला नक्कीच खायला मिळेल म्हणून तो कळप त्यांच्याच दिशेने जरा जोरात येऊ लागला. माकडांचा आवाज किंवा वास बहुतेक त्या कुत्र्याला आला असावा कारण इतका वेळ कोपऱ्यात बसलेल्या कुत्र्याचे कान टवकारले गेले आणि ते लगेच दारात येऊन उभे राहिले. माकडे जशी काही फुटांवर आली तसे त्या कुत्र्याच्या आवाजात घरघर स्पष्ट ऐकू येवू लागली. त्याची शेपटी जोरजोरात हलत होती पण त्या हालचालीमध्ये फक्त आक्रमकता दिसत होती. त्याचे डोळे मोठे झाले, जबडा उघडला गेला. जबड्यातील सुळे एकदम हिंस्र दिसू लागले आणि त्याने जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. त्या कुत्र्याचा तो अवतार पाहून माकडांचा कळप काही वेळ आहे तिथेच थबकला. पण शेवटी अन्न मिळवायचे तर त्यासाठी संघर्ष करावाच लागतो. हळूहळू माकडांनीही दात विचकून कुत्र्याला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु केला. कुत्रा मात्र आपली जागा सोडायला तयार नव्हता त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दाराकडे तसेच झारोक्यांकडे आपला मार्चा वळवला. प्रज्ञा तर अगदीच घाबरून गेली होती.

“प्रज्ञा… कोपऱ्याच्या बाजूला जा… म्हणजे मग किमान माकडे फक्त समोरूनच येवू शकतील आणि आपल्याला त्यांना हाकलता येणे शक्य होऊ शकेल.” प्रशांतने कोपऱ्याच्या दिशेने सरकत प्रज्ञाला म्हटले. प्रज्ञा जशी कोपऱ्याच्या बाजूला वळली, एका मध्यम आकाराच्या माकडाने तिच्या पाठीशी लटकवलेल्या सॅकवर उडी घेतली. बेसावध क्षणी झालेल्या माकडाच्या हल्ल्याने प्रज्ञाचा तोल गेला. जर वेळीच प्रसंगावधान राखून प्रशांतने तिला सावरले नसते तर मात्र तिचे डोके दगडाच्या भिंतीवर आपटून मोठा अनर्थ घडला असता. तोल जात असताना प्रज्ञाच्या तोंडून जी किंकाळी बाहेर पडली त्यामुळे ते माकड घाबरून जरा मागे झाले. त्याचा दुसरा परिणाम असा झाला की दारात उभ्या राहिलेल्या कुत्र्याने आपली जागा सोडली आणि त्याने त्या माकडावर झेप घेतली. त्या माकडासाठी कुत्र्याने केलेला हा हल्ला अनपेक्षित होता. अनपेक्षितपणे झालेल्या हल्ल्या सरशी ते माकड चीची करत एकदम उडी मारून वरच्या झरोक्यात जावून बसले. पण दार मोकळे झाल्यामुळे बाहेरील दोन माकडे लगेच पाठोपाठ आत आली. त्याच बरोबर बाजूच्या दारातूनही दोन माकडांनी त्या ठिकाणी प्रवेश केला.

आता मात्र वेळ आणीबाणीची होती. एकेक क्षण त्यांना मोठा वाटत होता. प्रशांतला स्वतःसोबतच प्रज्ञाचेही रक्षण करायचे होते. त्याने तिच्या हातातील काठी आपल्या हातात घेवून तिला मागे सारले. माकडे त्याच्या जवळ जात तसा तो त्यांना काठीने घाबरवण्याचा प्रयत्न करत होता. त्यांच्या बरोबरचं कुत्रंही आता अगदी तयारीत इकडून तिकडे फिरत होतं. ज्या ज्या वेळेस माकडांनी सॅक हिसकावण्यासाठी प्रयत्न केला; प्रत्येक वेळेस कुत्र्याने त्यांना हुसकावून लावले. १०/१५ मिनिट प्रयत्न करून देखील आपल्याला काही खायला मिळणार नाही हे लक्षात येताच माकडाचा कळप हळूहळू मागे सरकला. आणि मग दारातून बाहेर पडला. हळूहळू त्यांचा आवाज येणे कमी कमी होत बंद झाले आणि दोघांनी सुटकेचा श्वास सोडला. अर्थात माकडे निघून गेल्या नंतरही त्यांनी १५/२० मिनिटे आपली जागा सोडली नव्हती. काही वेळातच ते कुत्रं दारातून बाहेर पडलं. त्याने त्या इमारतीला एक पूर्ण चक्कर मारली आणि आत येवून एका कोपऱ्यात जाऊन बसलं.

“प्रज्ञा… माकडे गेली वाटतं. त्या कुत्र्यानं ज्या अर्थी बसून घेतलं म्हणजे किमान आता तरी ती गेली असावीत. आता इथेच आपल्याला राहावे लागणार आहे. जर अशा प्राण्यांपासून स्वतःला वाचवायचे असेल तर आपल्याला इथेच शेकोटी करून बसावे लागणार. जाळ दिसला तर असे प्राणी जवळ येत नाही असे मी ऐकले आहे. चल… आधी बाहेर काही वाळलेले गवत किंवा लाकडे मिळतात का ते पाहू. रात्रभर आपल्याला ती पेटत ठेवावी लागणार आहे.” प्रशांतने बोलायला सुरुवात केली. प्रज्ञाची बाहेर पडण्याची खरे तर हिंमतच होत नव्हती, पण प्रशांत म्हणत होता तेही काही खोटे नव्हते. शेवटी नाईलाज म्हणून तीही त्याच्या बरोबर बाहेर पडली. आता मात्र सूर्य अगदीच मावळतीला आला होता. बाहेर पडलेले पिवळे ऊन त्या प्रदेशाची शोभा वाढवत होते. तसे त्यांना वाळलेली लाकडे गोळा करण्यासाठी लांब मात्र जावे लागले नाही. पावसाळ्यात उगवलेल्या पण आता वाळून गेलेल्या अनेक वेली सगळीकडे विखुरलेल्या होत्या. क्षणाचाही विलंब न लावता प्रशांतने त्या उपटायला सुरुवात केली.

“चल गं…! आटप पटकन…!! जितक्या होतील तितक्या आपण आत घेवून जाऊ म्हणजे मग आपल्याला रात्री अपरात्री बाहेर पडण्याची गरज पडणार नाही.” एकीकडे काम करता करता त्याने प्रज्ञाला सूचना केली. काही वेळातच त्यांनी मुबलक जळणाचा साठा केला आणि दोघेही बाहेर येऊन मावळतीचा सूर्य न्याहाळीत बसले. हळूहळू पिवळा दिसणारा सूर्य लाल होऊ लागला. आकाशात पक्षांचे थवे घरट्याकडे जात असलेले दिसू लागले. हिरवट पिवळसर दिसणारे दूरवरील डोंगर काळे दिसू लागले आणि जसा सूर्य दिसेनासा झाला तसा हवेतील गारवा वाढला. आधी मस्त वाटणारे वारे त्यांच्या अंगाला झोंबू लागले तसे ते उठले आणि त्यांनी आत जावून शेकोटी पेटवली. त्या गारव्यात मिळणारी शेकोटीची ऊब मनावरील ताण बराचसा कमी करत होती.

“प्रशांत… आज रात्री माझ्या घरी किती गोंधळ उडेल? कधी कधी तर मला वाटतं आपण हे चूक करतो आहोत.” प्रज्ञाने बोलायला सुरुवात केली.

“हो…! ते तर आहेच. पण आता आपण काय करू शकतो? याचा विचार आपण याआधीही अनेकदा केला आहे ना?” अर्थात तो तरी काय बोलणार. कुठेतरी त्याच्याही मनात हाच विचार घोंघावत होता.

“मला तर आईची काळजी वाटते रे… तिने ह्या गोष्टी मनाला लावून घेतल्या तर?” शून्यात पाहत प्रज्ञा बोलत होती. अर्थात तिच्या या प्रश्नांवर प्रशांतकडे काहीही उत्तर नव्हते. जी अवस्था तिची होती, काहीशी तशीच अवस्था प्रशांतचीही होती. फक्त तो बोलून दाखवत नव्हता इतकेच.

“पण मला काय वाटते… हे मोठे लोकं आपला का विचार करत नाहीत? शेवटी जन्मभर आपल्यालाच राहायचे असते ना?” प्रज्ञाचे प्रश्न काही संपत नव्हते.

“अगं… त्यांच्या ठिकाणी ते बरोबरच असतात. प्रत्येक आई बापाला आपल्या मुलांचं भलं व्हावं हेच वाटत असतं…!” समजावणीच्या स्वरात तो म्हणाला.

“हो…!!! पण आपल्याला काही कळत नाही असे त्यांना का वाटते? बरे काही बोलायचा अवकाश… कधी भांडण करून, कधी अबोला धरून तर कधी आक्रस्ताळेपणा करून ते आपल्याला कोंडीत पकडायचा प्रयत्न करतात. आणि त्याचा काही उपयोग होत नाही असे लक्षात आले की मग सुरु होते इमोशनल ब्लॅकमेल.” ती अगदी वैतागून बोलत होती.

“अं… हो…!!!” तो जरी हो म्हणाला असला तरी त्याच्या मनात मात्र इतरच विचार चालू आहेत हे प्रज्ञाला जाणवलं.

“अरे… नुसतं हो काय? मी म्हणतेय त्यात काही खोटं आहे का?”

“नाही गं…! तू म्हणते त्यात काहीच खोटं नाही. पण माझ्या मनात मात्र जरा वेगळे विचार चालू आहेत. त्याचंच जास्त टेन्शन आलंय मला.”

“कसले विचार?”

“प्रज्ञा, माझे मन यासाठी घाबरते आहे की आपण तर इकडे पळून आलो. पण तुझ्या भावाने माझ्या घरी जावून जर काही इश्यू केला तर? एकतर अशा परिस्थितीत इतर लोकंही त्यात हात धुवून घेतात.” त्याच्या मनात आलेले विचार अगदीच अनाठायी नव्हते. या आधीही अशा अनेक घटना घडलेल्या होत्या. प्रशांतच्या प्रत्येक वाक्याबरोबर प्रज्ञाची भीती वाढतच होती. पण किमान या क्षणाला तरी ते काळजी करण्याशिवाय इतर काहीच करू शकत नव्हते.

क्रमशः

मिलिंद जोशी, नाशिक…

भाग १ लिंक

Leave a comment