प्रतिष्ठा भाग ३

प्रतिष्ठा भाग ३ –

“पाटील…! आवं पाटील…!! भायेर या…!!!” धापा टाकतच भिवा पाटलाच्या वाड्यात शिरला. पाटलाचा वाडा अगदी प्रशस्त होता. सगळे दगडी बांधकाम. वाड्याचे दारही अगदी प्रशस्त आणि रुंद. सांजेगावात जी काही चार दोन मोठी घरं होती त्यातील एक घर म्हणजे हा वाडा. दाराच्या बाजूलाच पायातल्या चपला काढत भिवाने ओसरीवर फतकल मारली.

“आवं काय करून ऱ्हायले वो… या की भायेर…!!!” भिवाने पुन्हा आरोळी दिली आणि पाटील लगबगीनं हात पुसत बाहेर आला.

“काय रे…!!! काय झालं? कशापायी येवढा धावत आलास?” ओसरीत टांगलेल्या मोठ्या झोपाळ्यावर बसत पाटलाने विचारले.

“आवं… एक बातमी हाये…!” आवाज अगदी हळू करत भिवाने सुरुवात केली.

“आपला देशमुख न्हाई का.., त्याची ती पोर…! गेली की पळून…” एक डोळा थोडा लहान करत आणि गालातल्या गालात हसत भिवानं उत्तर दिलं.

“पळून ग्येली? अशी कशी पळून ग्येली? नीट समजन असं सांग की लेका…” खरं तर पाटील या बातमीनं चांगलाच खुश झाला, पण चेहऱ्यावर कोणतेही भाव येवू न देता त्याने भिवाला हुकूमच फर्मावला.

“आवं… त्येच तर सांगून ऱ्हायलोयना म्या… आताच मला दगडू म्हनत व्हता… त्या पोरीचा कुनी यार हाये… कालेजातला… त्याचाच हात धरून पळून गेली हाय ती.” भिवाला पाटलाचा हुकुम मिळण्याचा अवकाश होता मात्र.

“अरारा…!!! नाकं कापलं तिनं… तिच्या बापाचं बी, गावाचं बी अन समद्या समाजाचं बी…!!!” एकतर बऱ्याच दिवसानं पाटलाला नवीन खाद्य मिळालं होतं.

“हाय कोन त्यो? म्हंजी आतला हाये कि भायेरचा?” पाटलानं मुद्द्यालाच हात घातला. यातील आतला आणि बाहेरचा यामागील त्याचा हेतू त्या मुलाची जात विचारण्याचा होता.

“न्हाई… आतला न्हाई… भायेरचाच हाय… त्यो बी खालचा…” भिवाने फक्त बोलण्याचा अवकाश आणि पाटलाचे डोळे चमकू लागले. बऱ्याच दिवसा पासून त्याला समाजात असलेले स्वतःचे महत्व कमी होतेय असे वाटू लागले होते. आणि ही त्याच्यासाठी अगदी सुवर्णसंधी होती. ही संधी कशीही करून साधायचीच याची त्याने मनाशी पक्की तयारी केली. आणि मग भिवाकडून इतर सगळी माहिती तो अगदी मन लावून काढून घेऊ लागला.

सकाळ झाली तशी पाटलाच्या वाड्यासमोरचे आंगण लोकांनी फुलून गेलं होतं. वाड्यासमोरच पंचांसाठी पाच खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. काहीशा जवळजवळ आणि अर्धगोलाकार. त्यावर पाटील आणि अजून दोन पंच सगळ्यांच्या आधीच विराजमान झालेले होते. समोरच्या वाळूत काही लोकं फतकल मारून बसलेले होते. एका बाजूला दोनचार जणांच्या घोळक्यात प्रज्ञाचे वडील, भाऊ आणि एक चुलता मान खाली घालून बोलत उभे होते. बाकी जमलेल्या लोकांमध्ये कुजबुज पिकली होती. थोड्याच वेळात उरलेले दोघेही पंच आले आणि ते खुर्चीवर बसतात न बसतात तोच पंचायतीचे काम चालू करण्याचा इशारा करण्यात आला. इतर पांगलेल्या लोकांनीही आपापली जागा घेतली. काही तरुण वर्ग बसलेल्या घोळक्याच्या बाजूने उभा राहिला आणि प्रज्ञाचा भाऊ सचिन आणि तिचे वडील पंचांच्या खुर्च्यांच्या एका बाजूला मान खाली घालून उभे राहिले.

“देशमुख…, पंचायत कामून बोलीवली ह्ये ठावं हाय नव्हं तुमाला?” पाटलानं सुरुवात केली.

खाली घातलेल्या मानेनंच देशमुखांनी होकार दिला. यावेळेस त्यांना तोंड वर करण्याचीही लाज वाटत होती.

“तुमाला काई सांगायचंय?” अगदी उदारतेचा आवं आणत पाटलानं पुढचा प्रश्न केला. खरं तर देशमुख काहीच बोलू शकणार नाही, हे पाटील मनातून चांगलेच ओळखून होता.

“कोन… हाय कोन त्यो?” पाटील प्रश्न विचारत होता त्यामुळे बाकी पंचांनी शांत राहण्याचेच धोरण यावेळी स्वीकारले होते. तसे ते फक्त नावालाच पंच होते. सगळा अमल पाटलाचाच चालत होता.

“नाई… जास्त काई म्हाईत नाई.” देशमुखने कसेतरी तोंड उघडले.

“आरं काय खुळा का काय तू? तुही पोर कालेजात शिकाया जाते का असले गुन उधळाया जाते?” पाटलानं पहिला डंख मारला. देशमुख नुसते ऐकत होते. पाटलाच्या या वाक्याचा आलेला राग सचिनच्या चेहऱ्यावर पाटलाला अगदी स्पष्टपणे दिसला.

“बरं… तुजं येक ठीक हाये… बाकीच्या कामात नाय म्हाईत होत घरातलं… पण तुजा ह्यो पोरगा… त्याला बी समजलं नाय व्हय?” हा तर पाटलानं सचिनवर जाणूनबुजून केलेला प्रहार होता. पण बहुतेक देशमुखानं पोराला आधीच गप्पं राहण्यासाठी सांगितलं असावं. शेवटी दोघंही काहीच बोलत नाहीत हे पाहून पाटलानं आपला मोर्चा जमलेल्या लोकांकडं वळवला.

“तर मंडळी… समद्यांना म्हाईत हाये न्हवं… आपन पंचायत कामून बोलावली हाये? काल आपल्या गावच्या देशमुखाच्या पोरीनं आपल्या समाजाला काळं फासलं. येवढ्या चांगल्या समाजात जल्म घेवून तिनं त्याचा समदा इस्कोट क्येला. बरं तिनं जर आपल्यातला कुनी पायला असता तर समदा समाज तिच्यासाठी हुबा रायला असता. पन तिनं शोधला कोन? तर भायेरचा. आपल्याहून खालचा. ज्या लोकास्नी आपन दारात येवू देत न्हाई, त्याला तिनं घरात घेतला. आदी घरात घेतला अन आता ग्येली त्याचा हात धरून पळून. छ्या छ्या छ्या…!!! लैच वंगाळं काम क्येलं. तर मंडळी.., आता तुमीच सांगा… असं जर आपल्या समाजातल्या पोरी श्यान खाया लागल्या तर काई वर्सानं औषदाला सुदिक आपल्या समाजाचा मानुस ऱ्हाणार हाय का?” लोकांची कुजबुज काय चालू आहे यासाठी पाटलाने थोडा बोलण्याला आराम दिला. लोकांचे मत त्यांच्या चेहऱ्यावरून काय आहे याचा काहीसा अंदाज घेतला आणि पुढे सुरुवात केली.

“असं बगा… आपल्या समाजाचा एक मान हाये. इतर समाज्याची मानसं आपल्याकडं बगतात. आपल्या रिती, परंपरा, आपलं कुळ… समद लैच भारी. पन या पोरीनं आपल्याला लाज आनली. मान खाली घालाया लावली. माही पोरगी असती तर म्या आदी तिचा जीव घेतला असता अन मंग सोता जीव दिला असता…” हे वाक्य बोलत असताना पाटील देशमुखच्या चेहऱ्याकडं पहात होता. प्रत्येक वाक्यावर जोर देऊन ते जमलेल्या लोकांवर ठसवण्याचा त्याचा प्रयत्न सफल होताना दिसत होता.

“म्या समदी गोष्ट सांगितली हाये… आपल्या समाजानं आजपोतूर कुनावर बी अन्याय क्येलेला न्हाई. कुनाला हटकून तरास दिलेला न्हाई. समदा गोडीगुलाबीचा मामला. पन… या आपल्या समाज्याच्या प्रतीष्टेला कुनी दावनीला बांदनार असंल तर त्ये खपून घेनार बी न्हाई…. या समद्याचा इचार करून पंचांनी न्याय करावा.” इतकं बोलून पाटलानं आटोपतं घेतलं. पण एकीकडे त्याने डोळ्यानेच भिवाला खुणावलं होतं. भिवानेही मग तात्याला बोट टोचलं तसा तात्या काय ते समजला.

“म्या म्हनतो, अशा मानसांना आपल्यात ठीवायलाच नाय पायजेल. देशमुखाच्या कुटुंबाला जात भायेर करा अन मोकळं व्हां… काय?” तात्याचे वाक्य संपते न संपते तोच देशमुखांनी मान वर केली. एक केविलवाणा कटाक्ष त्याच्याकडे टाकला. तात्याची मान जरी खाली असली तरी त्याचं लक्ष मात्र पाटलाकडे होतं. देशमुखांनी जेव्हा पाटलाकडे पाहिलं त्यावेळेस पाटील गालातल्या गालात खुदकन हसत होता. एवढ्या वरूनच देशमुखांनी आता आपल्याला कोणत्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे हे ताडलं.

“तात्या… जरा सबुरीनं घे.” इतर चार पंचांपैकी एका पंच म्हणाला.

“आवो… समाज बुडायची पाळी आली… आता आनिक कुड्वर सबुरीनं घ्यायाचं?” एक म्हातारा तावातावाने पुढे आला.

“मायला तिच्या… तिनं आदी तर सांगायचं… आमी काय मेलो व्हतो? एका वर्सात पाळना हलला असता…” एकाने गर्दीतून आवाज दिला आणि प्रज्ञाच्या भावाचा संयमाचा बांध फुटला.

“ए… कोण XXXX बोलला रे? xxxx असे मैदानात या ना…” सचिनचा चेहरा रागानं लाल झाला. त्याने आवाजाच्या दिशेने बोलायला आणि जायला सुरुवात केली पण त्या दिशेने लगेचच ८/१० जण पुढे आले. शेवटी देशमुखांनी त्याला मागे ओढले. एकूणच वातावरण पुरते तापलेले पाहून पाटील खुर्चीतून उठून उभा राहिला.

“ए… पोराहो… चला मागं व्हा… आपली पंचायत कुनावरबी अन्याय होवू देनार नाई… अन हिथ समदे न्याय करायलाच आले हायेत. तवां गुमान मागं सरा…” पाटील जरी तोंडाने एक बोलत होता तरी त्याची देहबोली मात्र वेगळेच सांगून जात होती.

“तर मंडळी… आज्चा इषय समद्यांना म्हाईत हाये. देशमूखाला सुदिक त्याच्या पोरीनं आपल्या समाजाला फसलेलं काळं कबुल हाये. आता आमी पंच १० मिंट खलबत करून ठरीवतो फूडं काय करायचं ते… तवर जरा गुमानं घ्या…” लोकांना शांत राहण्याचा इशारा करत पाटील खाली बसला आणि मग पाचही पंच आपापसात कुजबुजत चर्चा करू लागले.

क्रमशः

मिलिंद जोशी, नाशिक…

भाग २ लिंक

Leave a comment