प्रतिष्ठा भाग ४

प्रतिष्ठा भाग ४ –

सगळ्यांचे कान आता पाटील काय सांगतो याकडे लागले होते. पंधरा एक मिनिटाने पाटील बोलायला उभा राहिला.

“तर मंडळी… पंचांचा न्याय झालाय… देशमुखाच्या पोरीनं देशमुखालाच नाय तर समद्या समाजाला काळं फासलं हाय म्हनून तिला अन त्या पोराला… दोघांलाबी हिथ आनून त्यांचा न्याय केला जाईल. तसंच देशमुखांनं बी आपल्या पोरीवर यवस्थित संसकार केले न्हाई म्हनून समद्या समाजाला मान खाली घालाया लागली. म्हनून त्याला बी रूपे ५०,०००/- दंड पंचायतीत भरावा लागन. ह्यो त्याने येत्या आठ दिसात भराया पायजेल. नायतर त्याच्या कुटुंबाला त्ये जवर दंड भरत नाई तवर जातभायेर क्येले जाईल. त्या पोरीला अन पोराला हिथ आनायची जबाबदारी बी देशमुखाची आसन. जर चार दिसात त्याने त्यांना आनले न्हाई तर त्येला अन त्येच्या कुटुंबाला जवर त्ये पोरं हिथ आनले जात नाईत तवर जातभायेर क्येले जाईल. त्या पोरास्नी आनन्यासाठी जर देशमुखाला गरज असल तर समद्या समाजानं मदत करावी. आता फूडची पंचायत कधी बसल ते समद्यांना नंतर सांगन्यात येईल…” इतके बोलून पाटलानं पंचायत आटोपती घेतली.

देशमुख जेव्हा घरी आले त्यावेळेस त्यांची मानसिक स्थिती काहीही बोलण्याची नव्हतीच. प्रज्ञाच्या आईने नवऱ्याच्या चेहऱ्यावरूनच काय ते ओळखले आणि आपला मोर्चा आपल्या मुलाकडे वळवला.

“कारे… काय झालं?”

“काय होणारे? आपल्याला पंचायतीत ५०,०००/- दंड भरावा लागनारे… येत्या ८ दिवसात… नाहीतर मंग आपण जातभायेर. अन तुज्या त्या पोरीला अन त्या हरामखोराला चार दिवसात आणायला सांगितलंय. आणि नाही आणलं तर परत तेच… जातभायेर…!!!” सचिन तावातावानं बोलत होता. खरं तर इतक्या लोकांसमोर झालेला अपमान त्याला पचनी पडत नव्हता.

“आता जर ताई असती ना… शप्पथ सांगतो… जीव घेतला असता मी तिचा…” सचिन आपल्या आईकडे पहात म्हणाला.

“अरे पण…”

“मला काय ऐकायचं नाही… ताईनं जे केलंय ते लई वाईट केलंय. सध्या मला फक्त माझा आणि बाबांचा झालेला अपमान दिसून ऱ्हायलाय. बस… आता काई बोलू नको…” तो असे बोलत असताना त्याची लहान बहिण बाहेर आली. त्याने एक जळजळीत नजर तिच्यावर टाकली.

“तुजे काही बाहेर असले धंदे नाहीयेत ना? असले तर तुझाही जीव घ्यायला मी मागंपुढ पाहणार नाही… आधीच सांगून ठेवतो.” त्याच्या लहान बहिणीला उद्देशून तो म्हणाला. खरं तर इतर वेळेस तिने त्याला उत्तर दिलेही असते, पण आजचा त्याचा एकूणच राग पाहता ती काहीच बोलू शकली नाही. पण तिच्या डोळ्यात आलेले पाणी तिच्या आईच्या नजरेतून बिलकुल सुटले नाही.

“अहो.. मी काय म्हन्ते… काहीतरी बोला ना… काय झालं तिथं?” प्रज्ञाच्या आईने देशमुखांना हलवत विचारले.

“काई नाई गं… समद संपलं… आतापोतूरची समदी इज्जत पोरीनं पायदळी तुडीवली. अन आता जर ती पोरगी सापडली नाई तर आपल्या ह्या पोरीला अन आपल्याला समद्याचा त्रास व्हणार. अन जर ती हातात गावली या लोकांच्या तर तिला ह्ये राक्षस काय करतील याचा नेम नाय. आता इकडं आड अन तिकडं हिर अशी गत झालीय बघ आपली.” अगदी हताश होत देशमुख बोलले. हे ऐकून तर प्रज्ञाच्या आईचाही बांध फुटला. शेवटी म्हणतात ना… आणीबाणीच्या स्थितीत पुरुषापेक्षा स्त्री जास्त कणखर ठरते त्याप्रमाणे तिने आपले अश्रू आवरले.

“चला… आधी दोन घास खावून घ्या… जा गं आधी जेवनाचं बघ.” नवऱ्याला जागेवरून उठवत आणि मुलीला स्वयंपाकघरात पाठवत ती म्हणाली.

“नाई… मला भूक नाई… समदी मेली… आता कसलं जेवन अन कसलं काय…” देशमुखांच्या प्रत्येक वाक्यात सगळं संपल्याची भावना पुरेपूर दिसत होती.

“आवं असं हातपाय गाळून कसं चालंल? आधी खावून घ्या. मंग इचार करू बाकी… चला आधी… उठा…” अगदी अनिच्छेनेच देशमुख उठले.

“सचिन… आधी जेवून घे रे बाबा…” प्रज्ञाच्या आईने सचिनला आवाज दिला. थोड्या वेळात सचिनही आला. अगदी तणावाच्या वातावरणातच सगळ्यांची जेवणं आटोपली. हातावर पाणी पडते न पडते तोच सचिनने कोनाड्यात ठेवलेली गाडीची किल्ली उचलली आणि तो रागारागातच बाहेर पडला.

“ज्योती… ताईला फोन लाव…” आपल्या पोराला असे रागारागात बाहेर जाताना पाहून प्रज्ञाच्या आईने ज्योतीला म्हणजे प्रज्ञाच्या लहान बहिणीला सांगितले.

“अगं तिचा फोन रेंज मध्ये नाहीये… मी प्रयत्न करते आहे पण रिंग जात नाहीये…” परत एकदा फोन करण्याचा ज्योतीने प्रयत्न केला पण यावेळेसही तिला तेच ऐकू आले.

दिवसभरात सचिननं माहिती काढण्याचा बराच प्रयत्न केला. पण कुठूनच त्याला कसलीच माहिती मिळू शकली नाही. तो संध्याकाळी गावात येत असतानाच त्याला पाटलाने गाठले.

“ए पोरा… सचिन…” पाटलानं आवाज दिला. अगदी नाखुशीनच सचिन थांबला.

“हां… काये?” सचिनच्या आवाजात पाटलाच्या संदर्भातील नाराजी स्पष्टपणे दिसत होती.

“आरं… माजं उल्शिक ऐकशीन का?” अगदी मानभावीपणाने पाटलाने प्रश्न केला.

“हां… पाटील… आता फक्त तुमचंच तर ऐकायचं आहे… बोला… काय बोलायचं ते बोला…”

“आरं… तू काय परका हाय व्हय? समदे आपलेच हायेत. पन आता तूच सांग… चुकीला चूकचं म्हणाया पायजेल ना? आपल्या समाजाचा इचार आपन नाई तर कुनी करायचा?” पाटील अगदी गोडीत बोलत होता आणि सचिन फक्त ऐकून घेत होता.

“हे पघ… तुज्या बद्दल, देशमुखाबद्दल मला लई वाईट वाटतं… म्या अन देशमुख याच गावात ल्हानाचे मोठे झालो. म्हंजी म्या तर तुज्या चुलत्यासारखाचं.” सचिनचा चेहरा अजूनही निर्विकार दिसत होता. हे त्याच्या चेहऱ्यावरून पाटलाच्या लक्षात आलं.

“अर्रर्र… माह्या ध्यानातच नाय आलं बग… चल आदी वाड्यावर जाऊ. तिथं समद बोलू. हिथ उगाच लोकांले फुकटचा तमाशा कामून दावायचा?” असे म्हणत त्याने सचिनला आपल्या वाड्यावर आणले. वाड्यावर आधीच ३/४ जण पाटलाची वाट पहात थांबले होते. थोड्याच वेळात तिथे बाटल्या आणल्या गेल्या, अजून ४ टाळके जमले आणि मग पद्धतशीरपणे सचिनचे माइंडवॉश चालू झाले. आधीच मनात धुमसणारा राग, त्यातून सकाळी सगळ्या गावासमोर आणि समाजासमोर झालेला अपमान याने त्याचे डोके बधीर झाले होते. उरली सुरली कसर पाटलाने पाजलेल्या दारूने भरून काढली.

सचिन घरी आला तो पूर्ण तर्र होऊनच. आल्या आल्या तो आपल्या रूम मध्ये निघून गेला. खाणे आणि पिणे तर त्याचे पाटलाच्या वाड्यावर झालेच होते. इकडे पाटलाने सचिनची पाठ वळताच इतर मंडळींना आपला हेतू सांगितला.

“हे पहा… उद्या त्या देशमुखाच्या पोराला बरुबर घ्या. त्या पोरीच्या कालेजात जावून त्या पोरीचा अन त्या पोराचा काय सुगावा लागतो का ते पहा अन हातात गावले रे गावले… हिथ आना त्याना… मंग म्या बगतो काय करायचं ते… हां… पन त्या देशमुखाच्या पोरादेखत त्याच्या भैनीला काय बोलायचं नाय…. समजलं?” पाटलाने सगळ्यांना आधीच ताकीद दिली आणि मग वाटी लावले.

———————-

सकाळी सकाळी प्रज्ञाला पक्षांच्या फडफडाटाने जाग आली. तिने किलकिल्या डोळ्यांनी पाहिले तेंव्हा शेकोटी जवळपास विझलेली होती.

“प्रशांत…” तिने आळसटलेल्या स्वरात आवाज दिला, पण काहीही उत्तर आले नाही. परत एकदा तिने आवाज दिल्यावरही उत्तर येत नाही म्हटल्यावर ती धडपडत उठली. उठल्या बरोबर तिने चहुबाजूला एक नजर टाकली. तिथे ना प्रशांत होता ना ते कुत्रे. इतकेच काय पण प्रशांतची सॅकसुद्धा तिला कुठे दिसली नाही. आता मात्र तिच्या मनात चलबिचल चालू झाली. हा कुठे गेला असेल? काही विपरीत तर घडले नसेल ना? जर काही असे घडले असेल तर आपल्याला इतकी गाढ झोप कशी लागली? एक ना दोन… अनेक प्रश्न तिच्या मनात गोळा होऊ लागले. शेवटी तिने स्वतःच त्याला शोधायला जाण्याचा निर्णय घेतला आणि अंथरलेली चादर आपल्या सॅकमध्ये ठेवून आणि अंगावरील चादर आपल्या भोवती गुंधाळून ती बाहेर पडली.

पूर्व दिशेला सूर्याचा लालगोळा हळू हळू वर चढत होता. बाहेरची बोचरी हवा अंगाला झोंबत होती. पक्षांचा किलबिलाट चालू झाला होता. तिने चहुबाजूला एक नजर टाकली. सगळीकडे सामसूम पसरलेली होती. आता मात्र तीच्या मनात भीती दाटून यायला लागली आणि तिने मोठ्याने हाक दिली…

“प्रशांत… प्रशांत…” हाक देताना तीच्या डोळ्यात पाणी भरून आले होते. पण तेवढ्यात तिला प्रशांतचा दिलेला प्रतिसाद ऐकू आला आणि तिच्या जीवात जीव आला. काही क्षणातच तिला पाठीला सॅक अडकवलेला प्रशांत आणि त्याच्या बरोबर ते कुत्रे येताना दिसले. क्षणाचाही विलंब न करता ती धावत जावून त्याला बिलगली. प्रशांतला मात्र काहीच समजले नाही. तिचा जोरजोरात होणारा श्वासोच्छवास ती घाबरली असल्याचे सूचित करत होता.

“ए… प्रज्ञा… काय झाले? इतकी घाबरलीस का?” थोडा वेळ जाऊ दिल्यावर तिला आपल्यापासून थोडे दूर करत प्रशांतने विचारले.

“कुठे गेला होतास मला सोडून?”

“अगं… इथेच तर होतो… मी कसा जाईल तुला एकटीला सोडून कुठे?”

“अरे मी उठले तर तू नाही आणि तुझी सॅकही नाही… मग मनात नाही नाहीते विचार आले माझ्या…”

“अगं तुला चांगली झोप लागली होती म्हणून नाही उठवले. आणि परत माकडे आली तर सॅक घेवून पळून जावू नयेत म्हणून मी माझी सॅक बरोबर घेतली.”

“पण आता कुठेही जायचे असेल तर मला घेतल्याशिवाय जायचे नाही.” तिने काहीसा दमच भरला.

“बरं बाई… चुकलं… आता नाही मी कुठे एकटा जाणार… ओके?” स्वतःचे कान पकडण्याचे नाटक करत गालातल्या गालात हसत प्रशांत म्हणाला.

“प्रशांत… अजून किती दिवस आपल्याला असे फिरावे लागणार आहे?” तिने त्याला परत नेहमीचाच प्रश्न विचारला.

“अगं आज मी दुपारी नित्याला फोन करून विचारतो. तो आपली त्याच्या शेतातल्या घरी सोय करणार आहे. सध्या दोन दिवस त्यांची शेतीची कामे चालू होती म्हणून आपल्याला इकडे यावे लागले नाहीतर तिकडेच जाणार होतो आपण. आज जर त्यांचे काम संपले असेल तर आजच तिकडे जाऊ. चालेल ना?” प्रशांतने समजावणीच्या सुरात उत्तर दिले.

“ठीक आहे… कालचा दिवस राहिलो तसा अजून एक दिवस… पण त्यापेक्षा जास्त राहणे नाही झेपणार मला…” तिच्या सुरात नाराजी पूर्णपणे दिसत होती.

“हो गं बाई… आजच सगळे समजून जाईल… नको काळजी करू तू.”

इकडे सचिन गावातील काही जणांना बरोबर घेवून प्रज्ञाची काही माहिती मिळते का हे पाहण्यासाठी परत तिच्या कॉलेजमध्ये आला होता. त्याला आज कॉलेजमध्ये नव्याने काही गोष्टी समजल्या होत्या. प्रज्ञाचा तो मित्र कोण, किती दिवसांपासून त्यांचे सुत जुळले आहे, त्याचे कोण कोण मित्र यात सामील आहेत याचीही माहिती त्याला मिळाली होती आणि त्यामुळेच त्याने प्रशांतला मदत करणाऱ्या मित्राला, नितीनला गाठले.

नितीन भोवती १०/१२ जणांचा गराडा पडला. तसा नितीन मनातून घाबरला. पण तरीही त्याने ते तोंडावर दिसू द्यायचे नाही हे पक्के ठरवले.

“तूच कारे तो? ज्याने माझ्या बहिणीला पळून जायला मदत केली? आणि कुठंय तो प्रशांत?” सचिनने त्याला प्रश्न केला. खरं तर सचिनचा चेहरा आणि बोलणे यांचा एकमेकांशी नीटसा मेळ लागत नव्हता. चेहऱ्यावर भयानक राग आलेला दिसत होता पण प्रश्न विचारताना मात्र त्याने खूपच सौम्यपणा धारण केलेला होता.

“कोण तुझी बहिण? कोण प्रशांत?” नितीनने प्रतिप्रश्न केला.

“मायला त्याच्या… हितं सगळे सांगू ऱ्हायले… यानं त्यांना मदत केली… अन हा म्हनतोय… कोन ती, अन कोन प्रशांत…” सचिन बरोबर आलेल्यांपैकी एकजण म्हणाला आणि सचिनचा चेहरा अजूनच तापला.

“ए xxx, इचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नीट द्यायचं… कामून मार खायचे कामं करून ऱ्हायला?” दुसरा एकजण नितीनला उद्देशून म्हणाला.

“हे पहा… तुझी बहीण कोण हे मला कसं माहित? मी तर तुलाही आजच पाहतोय.” उसने आवसान आणून नितीनने उत्तर दिले.

“हंग अस्सं… लै भारी… सच्या… ह्ये बेणं काय तसं समजायचं नाय…” एकजण जरा पुढे येत नितीनकडे रागाने पहात म्हणाला पण त्यांच्यातल्या दुसऱ्या एकाने त्याला मागे खेचले. तेवढ्यात नितीनचा मोबाईल वाजला.

“च्यायला… पोराकडं मोबैल बी हाय की… उचल रे बेण्या… आमाला बी कळू दे… कुनाला तुजी आठवन आली ते…” आणखी एकजण नितीनच्या जवळ जात म्हणाला. नितीनने खिश्यातून मोबाईल काढायचा आवकाश सचिननं तो लगेच हिसकावून घेतला. त्याच्या स्क्रीनवर नजर टाकली. त्यावर प्रशांतचे नांव दिसत होते. त्याने लगेच सगळ्यांना गप्प बसण्याचा इशारा केला आणि फोन रिसीव्ह केला.

“हेल्लो… नित्या…” पलीकडून आवाज आला.

“मी त्याचा मित्र बोलतोय… नित्या आताच बाहेर गेलाय. फोन इथंच विसरून… काही सांगायचंय का त्याला?” सचिनने जितके होईल तितक्या सौम्य आवाजात सांगितले.

“नाही… मी नंतर करेल त्याला फोन…” प्रशांतने उत्तर दिले.

“ठीके… पण कुनाचा फोन आला होता म्हनून सांगू?”

“प्रशांतचा फोन होता इतके सांगितले तरी चालेल.” प्रशांतने बाकी काही सांगितले नाही.

“प्रशांत? बरं बरं… सांगतो त्याला आता…” इतके बोलून सचिनने फोन कट केला आणि आपला मोर्चा नितीनकडे वळवला.

“आता बोल रे… xxxx वळखत न्हवता ना त्याला… मंग त्याचा फोन कसा आला तुला?” अगदी शांतपणे सचिनने नितीनला विचारले आणि तो काही उत्तर देणार त्याच्या आतच त्याच्या कानाखाली खणखणीत आवाज काढला. नितीनच्या डोळ्यापुढे अक्षरशः काजवे चमकले. एकतर हा फटका त्याला पूर्ण अनपेक्षित होता. चार ते पाच मिनिटातच त्याचा गाल सुजून आला. त्याला ज्यावेळेस काय घडले हे समजले तोपर्यंत सचिन परत काही झालेच नाही या अविर्भावात उभा राहिलेला होता. नितीनने आजूबाजूला पाहिले तोपर्यंत त्याच्या भोवती हळूहळू गर्दी जमू लागली होती. आता इतक्या गर्दीतून वाट काढून पळून जाणेही त्याला शक्य होऊ शकणार नव्हते.

“चल… आता तूच आमाला त्यांच्याकडं घेवून जायचयं… अन ध्यानात ठेव… जर जास्त हुशारी केली तर तू काय जित्ता ऱ्हानार नाहीस…” नितीनची गचांडी पकडून सचिनने त्याला दम दिला.

“चला रे…! बसा गाडीत…!! आपल्याला गाईड मिळालाय… आता बरोबर त्यांच्या इथं जावून पोचू आपन…” इतर पोरांना गाडीत बसण्याचा इशारा करत सचिनने नितीनला गाडीत कोंबले.

क्रमशः

मिलिंद जोशी, नाशिक…

भाग ३ लिंक

Leave a comment