प्रतिष्ठा भाग ५

प्रतिष्ठा भाग ५ –

“कारे… अजून कसा आला नाही तुझ्या मित्राचा फोन?” प्रज्ञाने प्रशांतला विचारले.

“अगं विसरला असेल बहुतेक. थांब परत त्याला फोन करून पाहतो.” असे म्हणत प्रशांतने परत एकदा नितीनला फोन लावला. यावेळेस मात्र त्याचा फोन रेंजमध्ये नव्हता. आता मात्र त्याला सुद्धा जरा काळजी वाटू लागली. तो नितीनच्या सगळ्या मित्रांना ओळखत होता पण यावेळेस नितीनचा फोन ज्याने उचलला होता तो आवाज मात्र त्याच्या ओळखीचा नव्हता. त्याचे मन थोडे साशंक झाले.

“कारे… लागत नाहीये का फोन?” प्रज्ञाने काळजीने विचारले.

“नाही गं… त्याचा फोन रेंजमध्ये नाहीये. असो… तू नको काळजी करूस… थोड्या वेळाने परत करेल फोन.” असे बोलत असताना त्याने बाहेर नजर टाकली. दूरवर काही लोकांचा समूह त्यांना येताना दिसला.

“प्रज्ञा… कुणीतरी गड पहायला येत आहेत बहुतेक.” तो प्रज्ञाला म्हणाला. जसजसे लोकांचा समूह जवळ आला तसा त्याला त्यांच्या बरोबर त्याचा मित्र नितीन येत असलेला दिसला. आधी त्याला नितीन कुणा मित्रांना घेवून त्यांच्या मदतीला आला आहे असे वाटले. पण जेव्हा त्यांच्यात प्रज्ञाचा भाऊही त्याला दिसला तेव्हा त्याच्या लक्षात सगळा प्रकार आला. आता मात्र त्याची पाचावर धारण बसली.

“प्रज्ञा… आपण पकडले गेलो. तुझा भाऊ येतोय मुलांना घेवून… आता सांगता येत नाही काय होईल ते…” त्याने घाबरतच प्रज्ञाला सांगितले. ज्या भावाला पाहताच प्रज्ञाला आनंद व्हायचा आज त्याला पाहूनच ती कधी नव्हे इतकी घाबरली होती. बरे ते इतक्या जवळ आले होते कि त्यांना कुठे पळून जाणे देखील शक्य होणार नव्हते.

काही वेळातच प्रज्ञा आणि प्रशांतच्या समोर प्रज्ञाचा भाऊ उभा होता.

“ताई… आज तुला ताई म्हनायची सुद्धा लाज वाटून ऱ्हायली मला. जे तू केलंय ना, त्याने आपल्या घरादाराला मान खाली घालण्याची पाळी आलीये.” सचिनने सुरुवात केली.

“का? मी काहीच चुकीचं केलं नाहीये… माझं प्रशांतवर प्रेम आहे. आम्ही लग्न करणार आहोत. मी याबद्दल आधी बाबांना आणि आईला सांगितले होते. पण त्यांनी नकार दिला. का तर हा आपल्या जातीचा नाही म्हणून. पण मी नाही मानत जातपात.” खरं तर इतकं बोलण्याची आपल्यात हिंमत कशी आली हेच मुळी तिला समजले नाही.

“ए… गप… तुजी फालतू बडबड ऐकायची नाईये मला… आधी घरी चल अन आई बाबांना सांग काय सांगायचं ते.” चेहऱ्यावर पसरलेला राग काहीसा नियंत्रणात आणत सचिन तिच्या बाजूला सरकला. तो आपल्या बाजूला येतोय हे पाहताच ती प्रशांतच्या मागे झाली.

“ए… मागे सरक… ती माझ्या बरोबर आलेली आहे. सध्या तिची जबाबदारी माझ्यावर आहे.” तिला एका हाताने मागे करत प्रशांत पुढे आला. त्याला तसा पुढे आलेला पाहून सचिन काहीसा थांबला. त्याने एकदा मागे आपल्या बरोबर आलेल्या पोरांकडे पाहिले आणि पुढे होऊन एक सणसणीत फटका प्रशांतच्या तोंडावर मारला.

“मायला याच्या… साला स्वतःचं रक्षन नाय करू शकत अन चालला माझ्या बहिनीची जबाबदारी घ्यायला…” हसत हसत सचिन म्हणाला आणि त्याच्या हसण्यात इतर सगळे सामील झाले. प्रशांतला बसलेला फटका इतका जबरदस्त होता की त्याच्या नाकातून एकदम रक्त येवू लागले. त्याला जर वेळीच प्रज्ञाने पकडले नसते तर तो खालीच पडला असता.

“सचिन… तू जा इथून… मी नाही येणार… आणि परत त्याच्या अंगाला हात लावशील तर याद राख…” प्रशांतच्या नाकातून आलेले रक्त पाहून प्रज्ञा भडकली आणि तिने सचिनला जोर लावून ढकलण्याचा प्रयत्न केला.

“ताई… गुमान दोघंबी माह्या बरोबर चला… नाहीतर मी विसरून जाईन तू माझी मोठी बहिन हायेस ते… एकदा का तुम्हा दोघांना बाबांच्या हवाली केली की मग त्यांचा प्रश्न त्यांनी काय करायचं ते.”

“नाही येणार मी…”

“नाई येणार? पाहतो ना कशी नाई येत ते… ए… पकडा रे या हरामखोराला अन तुडवा…” सगळे जणू कधी सचिन आपल्याला सांगतो आहे याची वाटत पहात होते. लगेच तिघे चौघे पुढे झाले आणि ते आता प्रशांतवर हात टाकणार तेवढ्यात त्यांच्यातील एकावर कुत्र्याने झेप घेतली. हे कुत्रे कुठून आले हेच आधी कुणाला समजले नाही. कुत्र्याने केलेला हल्ला इतरांनाही अनपेक्षित होता त्यामुळे बाकी जण जे पुढे सरसावले होते, एकदम मागे झाले. प्रज्ञाला त्याही परिस्थितीत त्या कुत्र्याचे कौतुक वाटले. आज ही दुसरी वेळ होती, या कुत्र्याने खाल्लेल्या अन्नाला जागून आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना मदत केली होती. पुढे झालेला मुलगा कुत्र्याचे दात हातावर लागल्याने आपल्या दुसऱ्या हातात जखमी झालेला हात धरून बाजूला झाला. ते कुत्रेही आता आपले दात दाखवत जोरजोरात गुरगुरत होते. फक्त काही क्षण मध्ये गेले आणि त्या लोकांपैकी एकाने तिथे पडलेला जरासा मोठा दगड उचलून कुत्र्याला मारला. तो जोराचा फटका बसल्यामुळे कुत्रे क्याव करत थोडे मागे सरले आणि पुढच्याच क्षणी ज्याने त्याला दगड मारला होता त्याच्यावर त्याने झेप घेतली. हे होते न होते तोच सचिनने प्रज्ञाचा हात धरला आणि तिला ओढायला सुरुवात केली. प्रशांत देखील आता सरसावला होता. आता जे होईल ते होईल असा विचार करून त्याने त्या मुलांच्या घोळक्यात घुसून हातपाय चालवायला सुरुवात केली. त्याचे पाहून नितीनही प्रशांतच्या मदतीला पुढे सरसावला. पण कितीही झाले तरी ८/१० जणांच्या घोळक्यापुढे दोघांचा टिकाव तो काय लागणार? हळूहळू त्यांचा प्रतिकार कमी होऊ लागला.

“खबरदार… कुणी जागचे हालाल तर…” थोड्या दूरवरून आवाज आला. चार हवलदार आणि प्रशांतचे दोन मित्र यांच्या सोबत सब. इन्स्पेक्टर दराडे हातात पिस्तुल घेवून उभे होते.

“आयला… पोलीस?” एकजण इतरांना थांबवत ओरडला आणि लगेचच त्याने वाट फुटेल तिकडे पळायला सुरुवात केली. प्रज्ञाच्या चेहऱ्यावर तर अगदी देव भेटल्याचा आनंद झाला. तिने सचिनच्या हातातून आपला हात सोडवून घेतला आणि पोलिसांकडे धाव घेतली.

“घाबरू नका ताई… आता तुम्हाला कुणीच काहीही करू शकत नाही.” सब. इन्स्पेक्टर दराडे पुढे येत म्हणाले.

“हवालदार… पोरांना ताब्यात घ्या…” दराडेंनी हवालदारांना हुकुम केला. सचिनसह ३/४ जण फक्त हाती लागले. बाकीच्यांनी केव्हाच तिथून पोबारा केला होता.

“प्रज्ञा… हे तू चांगलं केलं नाई… मी तुला तसा सोडनार नाही. आजपासून तू मला मेली. अन तुला खरं मेलेलं पाहिल तेवाच मला बरं वाटल.” सगळी बाजू आपल्यावर उलटली हे पाहून सचिनचा जळफळाट झाला. त्याचे वाक्य संपते न संपते तोच दराडेंनी त्याच्या एक सणसणीत कानाखाली खेचली. एक जळजळीत नजर दराडेंवर टाकत सचिन पुढे झाला.

“xxx… पाहतोस काय असा? चार दिवस आता तुला माझाच पाहुणचार घ्यायचाय… चल नीघ…” दराडेंनी सचिनला तंबी दिली.

“आता तुम्ही कुठे राहणार आहात?” दराडेंनी प्रशांतला विचारले.

“आता यांची आम्ही आमच्या शेतावर सोय केली आहे. आजच त्यांना तिकडे घेवून जातो आम्ही.” प्रशांतच्या आधीच नितीनने उत्तर दिले.

“ठीक आहे… पण एक सांगतो… तुमचे लग्न झाले नसेल तर जितके लवकर शक्य होईल, लग्न करून घ्या. म्हणजे मग पुढचे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीत. आणि काहीही गरज लागली तर मला सांगा…” इतके सांगून त्यांनी रजा घेतली.

“अरे पण पोलिसांना तुम्ही कसे काय आणले?” सगळे शांत झाल्यावर प्रशांतने विचारले.

“अरे… ज्यावेळेस सगळ्यांनी नित्याला गाठले त्यावेळेस आम्हीपण तिथेच होतो. त्याच वेळेस नित्याने आम्हाला इशारा केला होता. नित्याला त्या पोरांनी गाडीत घातले तसे आम्ही योग्याला फोन केला. त्याने त्याच्या भावाला सांगितले. हा इन्स्पेक्टर योग्याचा भाऊ आहे. त्यामुळे तो लगेच आमच्या बरोबर निघाला आणि आम्ही इकडे आलो… चला… आम्ही बरोबर गाडी घेवून आलो आहोत. आता तुम्हाला तिकडे सोडून रात्री परत यायचे आहे.” प्रशांतच्या मित्राने अगदी सगळे काय कसे घडले ते व्यवस्थित सांगितले.

“प्रशांत… आपण आपल्या बरोबर शेरूला घ्यायचे का?” प्रज्ञाने विचारले.

“शेरू? कोण शेरू?”

“अरे ते कुत्रं नाही का… त्याचं नावं मी शेरू ठेवलं आहे. त्याने आपल्याला नेहमी मदत केली आहे.” प्रज्ञाने उत्तर दिले.

“ठीक आहे पण ते येईल का?”

“पाहू की प्रयत्न करून… आले तर ठीकच ना?”

“ठीक आहे… चला आधी इथून तर निघू…” असे म्हणत प्रशांतने आपली सॅक पाठीला लावली. कुत्र्याला बरोबर घेतले आणि ते पट्टागड उतरू लागले.

क्रमशः

मिलिंद जोशी, नाशिक…

भाग ४ लिंक

Leave a comment