प्रतिष्ठा भाग ६

प्रतिष्ठा भाग ६ –

संध्याकाळच्या सुमारास देशमुखांच्या घरचा फोन खणाणला. आपल्या मुलीचा फोन असेल असा अंदाज करून देशमुखांनी तत्काळ फोन उचलला.

“हेल्लो… देशमुखांचाच नंबर आहे ना हा?” पलीकडून आवाज आला.

“हो… मी देशमुख बोलतोय.” देशमुखांनी उत्तर दिले.

“मी सब. इन्स्पेक्टर दराडे बोलतोय, सरकारवाडा पोलीस स्टेशनमधून…” दराडेंनी आपली ओळख करून दिली. पोलीस स्टेशन मधून फोन म्हटल्या बरोबर देशमुखांच्या छातीत धस्स झालं. काय बोलावे हेच त्यांना सुचेना. बरे आता आपल्याला कोणती बातमी मिळणार हेही समजेना. पोलीस स्टेशन मधून ज्या अर्थी फोन आला त्या अर्थी बातमी खचितच चांगली नसणार याचा त्यांनी अंदाज बांधला, मन कठोर केलं पण यात काहीसा वेळ गेला होता. पलीकडून तेवढ्या वेळात किमान ३/४ वेळेस हेल्लो… हेल्लो ऐकू आले होते.

“हां… बोला सायेब…” स्वतःवर नियंत्रण मिळवत देशमुख उत्तरले.

“आम्ही तुमच्या मुलाला, सचिन देशमुख याला ताब्यात घेतले आहे. तुम्ही इथे स्टेशनला आलात तर बाकी गोष्टी बोलू…” इतके बोलून फोन कट झाला. देशमुखांवर तर आता आभाळच कोसळले. एकतर मुलगी न सांगता पळून गेली. अर्थात पळून गेली की तिला कुणी पळवले हेही नीटसे समजले नव्हते. त्यात आता रागारागात बाहेर पडलेल्या पोराला पोलिसांनी ताब्यात घेतले. जी थोडीफार इज्जत उरलेली होती तीही मुलाने धुळीस मिळवली. देशमुखांना तर आता सगळे घर आपल्या भोवती फिरते आहे असा भास होऊ लागला.

“अहो… कुनाचा होता फोन?” आतल्या खोलीतून बाहेर येत त्यांच्या पत्नीने विचारले. देशमुख मात्र कोणतेच उत्तर देण्याच्या स्थितीत नव्हते.

“काय म्हनतेय मी? कुनाचा फोन होता?” देशमुखांना हलवत परत त्यांनी प्रश्न केला.

“पोलिसांचा…” अगदी आतल्या आवाजात त्यांनी उत्तर दिले.

“पोलिसांचा? अरे देवा… काय म्हनत होते?”

“त्यांनी आपल्या सचिनला पकडलंय… बाकी तिथं गेल्यावर समजंल…” इतके बोलून त्यांनी स्वतःला सावरले.

“देव काय परीक्षा पाहू ऱ्हायला काय म्हाईत… मी जावून येतो…” असे म्हणत त्यांनी कपडे करायला सुरवात केली आणि काही वेळातच ते घराबाहेर पडले.

ते जेव्हा पोलीस स्टेशनला हजर झाले त्यावेळेस सब. इन्स्पेक्टर दराडे तिथेच बसलेले होते. देशमुखांनी आपली ओळख करून दिली.

“या…! बसा…!!” दराडेंनी त्यांना समोर बसायला सांगितले.

“सायेब… कुठाय माझा मुलगा? काय केलं त्यानं?” देशमुखांनी डायरेक्ट विषयालाच हात घातला.

“हो.. हो… आधी पाणी प्या…!” दराडेंनी पाण्याचा ग्लास देशमुखांसमोर धरला. देशमुखांच्या घशाला कोरड पडलेली असल्याने त्यांनीही आधी पाणी पिवून घसा ओला केला आणि मग अधिरतेने दराडेंकडे पाहू लागले.

“सॉरी तुम्हाला असे बोलवावे लागले, पण काही वेळेस आम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतात.” दराडेंनी सुरुवात केली.

“तुमच्या मुलाला आम्ही पट्टागडावर अटक केली आहे. तुमच्या गावातील अजूनही काही जणांना त्याच्या बरोबरच ताब्यात घेतले आहे. सामाजिक सलोखा बिघडवणे, धमकी देणे, व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणे असा त्याच्यावर आरोप आहे.” एकेक गोष्ट दराडे अगदी तोलून मापून सांगत होते.

“पट्टागड? कुठं हाये ह्ये ठिकान आणि हा तिकडं कामून गेल्ता?” एकतर पट्टागड हे नाव त्यांनी यापूर्वी ऐकल्याचे त्यांना आठवत नव्हते.

“तुमच्या मुलीला म्हणजे प्रज्ञाला बळजबरीने आणण्यासाठी तुमचा मुलगा तुमच्या गावातील काही जणांना घेवून तिथे गेला होता. आणि त्याच वेळेस आम्ही त्याला ताब्यात घेतले.”

“प्रज्ञा? ती सापडली का? कुठे आहे ती? कशी आहे? ती ठीक तर आहे ना? तो मुलगाही तिच्या बरोबर आहे का?” प्रज्ञाचे नांव ऐकताच देशमुखांनी प्रश्नांची सरबत्ती चालू केली.

“हो… तुमची मुलगी ठीक आहे, अगदी व्यवस्थित. तो मुलगा आणि ती दोघेही लग्न करत आहेत. दोघेही सज्ञान असल्यामुळे आम्ही त्यात काहीच करू शकत नाही. मी जेव्हा त्या दोघांना भेटलो, त्यावेळेस तो मुलगा मला खरंच चांगला वाटला. अर्थात आता ते तिथून दुसरीकडे जाणार आहेत. पण कुठे ते मात्र मला नीटसे सांगितले नाही.” एका दमात सगळे सांगायचा दराडेंनी प्रयत्न केला. आपली मुलगी सुरक्षित आहे हेच मुळी देशमुखांना मोठा दिलासा देणारे होते.

“सायेब.., मला माझ्या पोराला घरी नेता येईल?” जरासे मन तळ्यावर आल्यावर देशमुखांनी प्रश्न केला.

“खरं सांगायचं तर सध्याची त्याची मानसिकता पाहता चार सहा दिवस त्याला इथेच राहू द्यावे. जर त्याला आता बाहेर सोडले तर तो परत तुमच्या मुलीला अपाय करण्याचा धोका आहे. काही वेळेस जसा वेळ जातो तसा माणसाचा राग कमी होऊ शकतो.” दराडेंनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले. तो सकाळी ज्या रागात बाहेर पडला होता त्यावरून देशमुखांनाही त्यात तथ्य वाटले.

“ठीक आहे सायेब… पण मी आता मुलाला भेटू शकतो का?” त्यांनी हताशपणे विचारले.

“हो… यादव… यांना त्या पोराकडे घेवून जा…” दराडेंनी हवलदाराला फर्मावले.

सरकारवाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत एका कोपऱ्यात सचिन डोक्याला हात लावून बसलेला होता. अशा प्रकारे सचिनला हवालातमध्ये बसलेले पाहून देशमुखांच्या डोळ्यात पाणी तरळले. गेल्या दोन तीन दिवसात देशमुखांनी अशा गोष्टी अनुभवल्या होत्या ज्यांचा त्यांनी कधी स्वप्नात देखील विचार केलेला नव्हता.

“सचिन…” हळू आवाजात त्यांनी सचिनला हाक मारली… त्यांचा आवाज येताक्षणी सचिनने वर पाहिले. आपल्या वडिलांना तिथे पाहून तो लगेच दाराजवळ आला. पण त्याला काय बोलावे हेच सुचेना.

“सचिन… अरे काय केलेस हे?”

“बाबा… अजून तर काईच केले नाई… आता करणार हाये. इथून सुटल्या बरोबर…” सचिनच्या चेहरा परत एकदा रागाने लाल झाला.

“आज तुमच्या पोरीनं मला इथं आनलं… आता मी तिला दुसरीकडं पाठीवतो की नाई ते बगाच तुमी… कायमचीच…” सचिनच्या अंगाची लाही लाही होत होती. काय बोलावं हेच मुळी देशमुखांना समजेना.

“अरे… तुजी बहीने ती… हे तर ध्यानात घे…” शेवटी कसेतरी देशमुखांनी त्याला समजावयाचा प्रयत्न केला.

“नाई… आता ती मला मेली… असली बहीन असन्यापेक्षा नसलेली बरी…” त्याचा तो राग पाहून देशमुखांना सब. इन्स्पेक्टर दराडेंचे शब्द आठवले.

“पोलीस म्हनतात… ३/४ दिवस तुला इथंच राहावं लागन…” त्यांनी विषय बदलण्याचा प्रयत्न केला.

“राहीन ना… ३/४ दिवस काय… तीन चार वर्ष राहीन इथं. पन जवा बाहेर यीन तवा मी हाय नी ती पोरगी हाय… आता तुमी जा घरी… आनी आता मीच यीन घरी… तुमी इकडं नका येवू… जा…” सचिनने देशमुखांना जायला सांगितले आणि स्वतः बाकी काही न बोलता आपल्या जागेवर जावून बसला. शेवटी खाली मान घालून देशमुख वळले. ते बाहेर पडले तोच त्यांना दराडे भेटले.

“भेटले का मुलाला?” त्यांनी देशमुखांना प्रश्न केला.

“हो… भेटलो…” अगदी त्रोटक उत्तर देत देशमुख इतर काही न बोलता पुढे निघाले. त्यांच्या जाणाऱ्या आकृतीकडे एकवार दराडेंनी पाहिले. एका हताश बापाची ही अवस्था पाहून दराडेंचे मनही हेलावले.

घरी आल्या आल्या प्रज्ञाच्या आईने त्यांना अधिरतेने विचारले. एकीकडे तिची नजर आपल्या मुलालाही शोधत होती.

“काय हो… काय झालं… सचिनला आनलं नाई का?”

“नाई… पोलीस म्हनतात, अजून ४/५ दिवस ठेवनार त्याला तिथं…” देशमुखांनी कपडे बदलत उत्तर दिले.

“का? काय केलय त्यानं?” तिने अधिरतेने विचारले आणि देशमुखांनी एकेक करत सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या. अगदी काहीही हातचे राखून न ठेवता. आपली पोरगी सकुशल आहे याचा त्या माउलीला आनंद झाला पण आपलाच मुलगा तिच्या जीवावर उठला आहे हे समजताच तिच्या जीवाचे पाणी झाले.

“पोरं जवा ल्हान होती… चांगलं होतं नाई?” शून्यात पाहत देशमुख म्हणाले.

“आता ते मोठे झाले. त्यांना समजू लागलं. काई गोष्टी ज्या तुला आनी मलापन समजल्या न्हाई त्या गोष्टीबी त्यांना समजू लागल्या. पोरीला तिचं आयुष्य महत्वाचं. पोराला त्याची प्रतिष्टा महत्वाची. आपल्याला काय कळतं यातलं? तुला सांगतो… आज मी ज्याला भेटलो… तो आपला पोरगा नाई. ज्याला तू जन्म दिलास आनी ज्याला मी अंगाखांद्यावर खेळवला तो तर कधी असा न्हवता. जी पोरगी उचलत नसताना पन त्याला कड्यावर घेवून हिंडायची… तिच्याच जीवावर हा आज उठला? आज मला असं वाटतंय… आपल्याला पोरगं नसतं झालं तर बरं झालं असतं…” अगदी हताशपणे देशमुख म्हणाले आणि त्यांच्या बायकोच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.

क्रमशःप्रतिष्ठा भाग ६.

मिलिंद जोशी, नाशिक…

भाग ५ लिंक

Leave a comment