प्रतिष्ठा भाग ७

प्रतिष्ठा भाग ७ –

संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सर्वजण पुणतांब्याला पोहोचले. पुणतांबा हे गांव तसे अगदीच लहान. त्यातून तिथे दहा दहा तासाचे विजेचे लोडशेडिंग, त्यामुळे सर्वजण नितीनच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या घरचे सगळे जण बाहेरच अंगणात निवांत बसले होते. तसे नितीनने आधीच ते येणार असल्याचे कळवले होते. प्रज्ञा गाडीतून उतरल्या बरोबर नितीनची लहान बहिण पुढे आली आणि तिने प्रज्ञाचे स्वागत केले. प्रज्ञाचा पाय घरात पडतो न पडतो तोच लाईट आली.

“लक्ष्मिच्या पावलानं आली गं बाई…” नितीनची आई म्हणाली. त्यांच्या या एका वाक्यानेच प्रज्ञाला अगदी आपल्या घरी आल्यासारखे वाटले. नवीन लोकं कसे असतील? आपण घरून पळून आलो आहोत हे समजल्यावर आपल्याशी कसे वागतील हाच फक्त विचार येताना तिच्या मनात चालू होता. पण त्या सगळ्या शंका नितीनच्या आईच्या वाक्याने फोल ठरल्या होत्या.

“ये पोराहो… आधी हातपाय धुन घ्या…” नितीनच्या आजोबांनी आदेशच दिला.

थोड्याच वेळात जेवण उरकून नितीनचे दोघे मित्र लगोलग घरी निघाले. सगळी आवरासावर झाल्यावर नितीनच्या आजोबांनी नितीन, प्रशांत आणि प्रज्ञाला बोलावून घेतले. घरातील इतर सगळे सुद्धा तिथे जमा झाले होते.

“कारे पोरा… या पोरीला आनलंय तू, पन कायम साथ देनारेस का तिला?” त्यांनी प्रशांतला प्रश्न विचारला.

“हो आजोबा…”

“पघ हं… आधी समदं ग्वाड वाटतं अन नंतर भान्नं व्हयला लाग्तेत.”

“नाही आजोबा… मी कायम तिच्या बरोबरच राहील.”

“काय गं पोरी… याच्याशी लगीन करायचं म्हनू ऱ्हायलीस… पन ह्ये सोपं न्हाई… म्हाईत हाय न्हवं?” त्यांनी प्रज्ञाला प्रश्न केला.

“हो… माहिती आहे मला…” प्रज्ञाने उत्तर दिले.

“अन ह्यो नित्या सांगत व्हता… तुमी एका जातीचे न्हाईत म्हनून… खरंय का?”

“हो… आजोबा…” प्रशांतने उत्तर दिले.

“मंग येक ध्यानात ठिवा… दोघांनाबी समजुतीनं घ्यावं लागन. समजुतीनं घेतलं तर समदं यवस्थित व्हतंय…”

“रामभाऊ… उद्याच बापू भटजीला सांगून याचं लगीन संकरापूडं लावून देऊ… काय?” आपल्या मुलाला त्यांनी आपला निर्णय सांगितला.

दुसऱ्या दिवशी दुपारीच त्यांचे लग्न शंकराच्या मंदिरात नितीनच्या घरच्यांनी लावून दिले. हिंदू धर्माप्रमाणे मुलीचे कन्यादान नितीनच्या वडिलांनी केले. हिंदू पद्धतीने आधीच लग्न लावल्यामुळे आता त्यांना विवाह नोंदणी करणे खूप सोपे झाले होते.

“पोरी… तुज्या आईबापाला फोन करून लगीन केल्याचं सांग. अन जास काय बोलाया लागले तर म्या बोलन त्यांच्याशी…. अन पोरा… तू बी तुज्या घरच्यांना सांगून दे… काय?” लग्न झाल्यावर नितीनच्या आजोबांनी दोघांनाही आपापल्या घरी कळवायला सांगितले. त्याप्रमाणे प्रज्ञाने आपल्या घरी फोन केला. फोन तिच्या वडिलांनी उचलला.

“हेल्लो… बाबा…” बोलताना तिचा आवाज जरा कापरा झाला.

“प्रज्ञा!… हायेस कुठे? ठीक हायेस ना?” तिच्या वडिलांनी काहीशा काळजी मिश्रित आनंदाने विचारले.

“हो… बाबा… मी ठीक आहे. आज आम्ही लग्न केलंय.” प्रज्ञाने काहीसे घाबरत सांगितले. यावर काय बोलावे हेच तिच्या वडिलांना समजेना.

“बाबा… काहीतरी बोला ना… मला माहिती आहे तुम्हाला मी दुखावलंय… पण बाबा…” प्रज्ञा मध्येच बोलायचे थांबली.

“प्रज्ञा… काय बोलू मी? आता बोलून काय उपयोग हाये का?” काहीशा नाराजीच्या स्वरात देशमुख बोलले.

“बाबा… लवकरच आम्ही तुमचा आशीर्वाद घ्यायला येऊ.” प्रज्ञा हे बोलली मात्र आणि देशमुखांच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याला लगेचच पाटलाच्या वाड्यावर भरलेली जात पंचायत आठवली, सचिनचा संतापलेला चेहरा आठवला, सब. इन्स्पेक्टर दराडेंचे बोल आठवले आणि त्यांचे शरीर थरथर कापू लागले.

“नाई… नाई प्रज्ञा… इकडं येवू नको… जितकं व्हईल तितकं लांब जा इथनं…” त्यांनी घाईघाईने सांगितले.

“बाबा???”

“पोरी… तुज्यावर आमचा राग नाई. पन इकडं तुमी आले तर ते लोकं काय करतीन सांगता येत नाई. जिथं तुजा भाऊ तुज्या जीवाचा दुश्मन बनलाय तिथं बाकीच्यांचं काय? अन परत फोन पन करू नको लवकर… आनी काळजी घे…” त्यांनी घाबरत सांगितले आणि फोन कट केला. प्रज्ञाला त्यांच्या आवाजात भरलेली भीती अगदी स्पष्ट जाणवत होती.

फोन झाल्यानंतर प्रज्ञामध्ये झालेला बदल नितीनच्या आजोबांच्या लक्षात आल्यावाचून राहिला नाही.

“काय गं पोरी? काय झालं?” त्यांनी प्रज्ञाला विचारलं आणि प्रज्ञाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. फोनवर झालेलं सगळं संभाषण तिने आजोबांच्या कानावर घातलं.

“पोरी… मला वाटलंच… सावर सोताला… ही तर सुरवाते… आता तुमाला दोघांनाबी हे अशे प्राब्लेम लैच येतीन. पन घाबरायचं नाई. आनी काई दिस तुमी आपल्या वस्तीवर जाऊन ऱ्हावा. तितं कुनीच नायी येनार. येकदा थोडं शांत झालं का मंग जा घरी… चल डोळं पूस…” प्रज्ञाला धीर देत आजोबा म्हणाले.

प्रज्ञाने डोळे पुसले पण ही तर फक्त सुरुवात होती… येणाऱ्या वादळाची चाहूल मात्र…

दुसऱ्या दिवशी आजोबा पोरांना घेवून वस्तीवर गेले. नितीनचे शेतातले घर पुणतांबा गावापासून ४/५ किलोमीटर अंतरावर असावे, पण खराब रस्ता आणि निर्जन भाग यामुळे ते प्रज्ञाला आहे त्यापेक्षा जास्त लांब वाटले.

नितीनचे शेतातले घर तसे खूप मोठे नव्हते. साधारणपणे दोन खोल्या. घराच्या एका भिंतीला लागून एक उसाच्या चिपाडाने शाकारलेली दार नसलेली खोली होती. बहुतेक आधी तो गोठा असावा. घरासमोर शेणाने सारवलेले अंगण आणि त्याच्या समोर एक छोटेसे महादेवाचे मंदिर. मंदिराच्या शेजारी कठडा आणि मोठा परीघ असलेली विहीर होती. विहिरीपासून अगदीच थोड्या अंतरावर पाच आंब्याची झाडे एका ओळीत लावलेली होती. तिथूनच पुढे काही अंतरावरून शेत चालू होत होते. दोन दिवसांपूर्वीच ऊस तोडणी झाली असल्यामुळे शेतात सगळीकडे वाळलेले पाचट पडलेले होते. तिथून पुढे अगदी दूर दूर पर्यंत इतर कोणतीच घरे नव्हती. तो सगळा निर्जन भाग पाहून प्रज्ञाला गडावरील वास्तव्याची आठवण झाली. प्रज्ञाच्या चेहऱ्यावरील भाव नितीनच्या लक्षात आले.

“काय प्रज्ञा? ठीक आहे का घर… गरीबाचे?” नितीनने हसतच प्रज्ञाला विचारले.

“ठीक आहे का? महाल आहे. दोन दिवस आम्ही कसे राहिलो त्या ठिकाणी हे आमचे आम्हाला माहित. गडावर तर न नीट झोपायला जागा ना जेवायला काही. त्याच्याशी तुलना केली तर हा राजवाडा आहे.” प्रज्ञाने हसत उत्तर दिले. पण एकंदरीतच इतक्या निर्जन प्रदेशाची तिला भीती वाटत होती.

“आजोबा… एक प्रश्न विचारू?” शेवटी न राहवून तिने नितीनच्या आजोबांना विचारले.

“इचार की पोरी… येक काय धा प्रश्न इचार…”

“इथे तर दूर दूर पर्यंत कुणी नाही… मग चोरांची भीती नाही का इथे?” तिने विचारले. तिच्या प्रश्नामागील रोख मात्र त्यांच्या लक्षात आल्यावाचून राहिला नाही.

“पोरी… अगं या जगामंदी समद्यांनाचं अडचनीचा सामना कराया लाग्तो. त्येच तर जीवन हाय. आता तू चोरांचं इचारतेस तर आमी चोरांना न्हाई निसर्गाला जास्त भ्येतो. चोर आपल्याला कायतरी ठिवतो तरी मागं… पन निसर्ग येकदा का कोपला… काय बी ठीवत नाई.” अगदी विषण्णतेने आजोबा बोलून गेले पण लगेचच त्यांना आपण जरा जास्तच बोलून गेलो असे वाटले. एकतर भीतीमुळे पोरीनं आपल्याला प्रश्न विचारला आणि आपण वेगळेच बोलून बसलो याचे त्यांना कुठेतरी भान आले.

“नाई गं बाई… हितं चोर येत न्हाईत. एकतर त्यांना हितं कायबी मिळत नाई अन शेतात पिकं नस्तीन तर त्यांना लपाया जागा बी न्हाई. कशाला येतील ते मरायला? घाबरू नगंस… कोनबी येनार नाई हितं…” आजोबांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.

काही वेळाने प्रज्ञा आणि प्रशांतला वस्तीवर ठेवून नितीन आणि त्याचे आजोबा घरी निघून आले.

“प्रशांत… दोन दिवस किती छान वाटत होतं नाही? खूप माणसं होते आजूबाजूला. आणि आता… परत तेच एकटेपण…” प्रज्ञाने सुरुवात केली.

“हो… खरंय…”

“आपल्या बरोबर शेरूनं यायला हवं होतं नाही? दोन दिवसात किती जीव लावला होता त्यानं आपल्याला.”

“हो… पण शेवटी ते गावठी कुत्रं. ते आपल्या बरोबर येणं तसही शक्यच नव्हतं.” त्याने उत्तर दिलं.

“अरे पण का?” तिने गोंधळून विचारलं.

“अगं माणूस काय किंवा कुत्रं काय… बाहेरच्या कुणाला ते आपल्यात सहजासहजी सामील करून घेत नाहीत.” प्रज्ञाला त्याच्या बोलण्यातील खोच लगेचच समजून आली.

“प्रशांत… अरे पण दोन दिवसांच्या सहवासात ते कुत्रं आपल्याला इतकं जवळचं वाटू लागलं आणि ज्याला मी अंगाखांद्यावर खेळवलं तो माझा पाठचा भाऊ आपल्या जीवावर उठलाय… खरंच का आपण इतकं भयंकर कृत्य केलंय? आपल्याला आपल्या मनाचा विचार करण्याचा काहीच अधिकार नाही का? शेवटी कायम स्वरूपी आपल्यालाच एकत्र राहायचं आहे मग त्यात आपली आवड नको का विचारात घ्यायला?” प्रज्ञा एकामागून एक प्रश्न त्याला विचारत होती. त्याला म्हणण्यापेक्षा ते सगळे प्रश्न ती स्वतःच्या मनालाच विचारत होती असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

“प्रज्ञा… जास्त विचार नको करूस… इतर प्राण्यांमध्ये न आढळणारा एक गुण माणसात खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळेच हे सगळे प्रश्न उपस्थित होतात.” त्याने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला.

“कोणता गुण?” गोंधळून तिने विचारले…

“अभिमान… हा एक गुण असा आहे की जोपर्यंत तो एका ठराविक मर्यादेत असतो तो माणसाला मोठे करतो, पण जसजसा तो वाढत जातो तसतसा माणूस छोटा होत जातो.” प्रशांतने सांगितले.

“बरे अभिमान शिरल्यावर माणसाचे इतर सगळे गुण हळूहळू मागे पडू लागतात. त्यावेळेस मग त्याला स्तुती करणारे मित्र आणि खरे बोलणारे शत्रू वाटू लागतात. इतकेच काय पण त्याचे आई, वडील, भाऊ, बहिण हे रक्ताचे नाते सुद्धा फोल वाटू लागतात. आणि ज्यावेळेस त्याला आपली चूक कळून येते त्यावेळेस बऱ्याचदा त्याच्या हातात काहीही उरलेले नसते.” प्रशांत बोलत होता आणि प्रज्ञा ऐकत होती.

“मला तर आता भीती वाटू लागली आहे… माहिती नाही यापुढे आई बाबांना मला भेटता येईल की नाही याचे…” प्रज्ञाने मनातली भीती बोलून दाखवली. तिच्या चेहऱ्यावर ही भीती पुरेपूर दिसून येत होती. तिच्या चेहऱ्याकडे पाहून आता प्रशांतला उगाचच अपराधी वाटू लागले. एकतर तिला धीर द्यायचे सोडून त्याने नकळतपणे आपल्या बोलण्यातून तिची भीती वाढवली होती.

“अगं… तू कशाला जास्त काळजी करतेस? माणसामध्ये जसा अभिमान हा एक गुण आहे तसाच अजून एक गुण आहे… प्रेम… आणि हाच एक गुण असा आहे की तो या अभिमान गुणावर देखील मात करण्याची शक्ती बाळगून आहे. फक्त त्यासाठी थोडा वेळ जावू द्यावा लागतो. मला खात्री आहे. तुझा भाऊही नक्कीच एक दिवस आपल्या बाजूने उभा असेल. फक्त त्यासाठी आपल्याला थोडी वाट पहावी लागेल. चल आता, मनातील सगळ्या शंका काढून टाक… इतर अनेक विषय आहेत आपल्याला गप्पा मारायला.” असे म्हणत त्याने विषय बदलला आणि लवकरच त्याचा परिणाम प्रज्ञाच्या चेहऱ्यावर दिसू लागला. तिच्या चेहऱ्यावरील ताणताणाव कुठल्या कुठे पळून गेला होता.

 

क्रमशःप्रतिष्ठा भाग ७.

मिलिंद जोशी, नाशिक…

भाग ६ लिंक

Leave a comment