प्रतिष्ठा भाग ८

प्रतिष्ठा भाग ८ –

“यादव… त्या पोरात काही फरक पडलाय का?” सब. इन्स्पेक्टर दराडेंनी हवलदार यादवला विचारले.

“काय फरक पडणार साहेब? कोपऱ्यात बसतो अन काहीतरी विचार करतो. काय माहित काय बेत शिजतोय त्याच्या डोक्यात… शांत दिसला तरी त्यानं कायतरी ठरवलं असावं असं मला वाटतं.” यादवनं उत्तर दिलं.

“अस्सं… ठीक आहे… त्याला असं एकटं ठेवून उपयोग नाही म्हणजे. आज मी बोलतो साहेबांशी. याला ४ दिवस सेन्ट्रल जेलला हलवू. तिथले जीवन आणि तिथल्या कामात त्याच्या डोक्यातून हे विचार निघून जावू शकतात. काय वाटतंय तुम्हाला?” त्यांनी यादवला विचारलं.

“साहेब… याचा फायदा ही होऊ शकतो आणि तोटा ही. काही वेळेस मग लोकं निर्ढावतात सुद्धा…”

“हो… हेही खरंय. पण असे इथे राहूनही त्याच्यात काही फरक पडत नाहीये. तुम्हाला सांगू… मला याच्या वडिलांचा चेहरा आठवला की खरंच वाईट वाटतं. एका बाजूला पोरगं आणि दुसरीकडे पोरगी… कधी कधी वाटतं… पुढं चालून माझी तर अशी गत होणार नाही ना?” हे बोलताना दराडे कुठेतरी हरवल्यासारखे वाटले. शेवटी कोणत्याही अधिकारावर असले तरी माणूसच तेही. पण लगेच त्यांनी स्वतःला सावरले आणि टेबलावरील फोन स्वतःकडे ओढून बोलायला सुरुवात केली.

काही वेळातच सचिनची रवानगी नाशिक सेन्ट्रल जेलला झाली. सेन्ट्रल जेलचे वातावरण अगदी भिन्न होते. आता पर्यंत त्याने सेन्ट्रल जेल फक्त बाहेरून पाहिलेले होते, पण आज तो तिथल्या अधिकाऱ्यासमोर उभा होता. जेल अधिकाऱ्याने त्याची जुजबी माहिती आपल्याकडे टिपून घेतली. हे सोपस्कार चालू असताना सचिनचे विचारचक्र मात्र सतत फिरत होते. आपल्या आख्य्या खानदानात कुणी पोलीस स्टेशनची पायरी चढलेले आपल्याला कधी माहिती झाले नाही आणि आपण फक्त पोलीस स्टेशनच नाही तर नाशिक सेन्ट्रल जेलची वारी करून आलो आहोत? काही काळासाठी त्याला स्वतःचाच राग आला. कुठेतरी त्यांचे मन त्याला खात होते. समाज काय म्हणेल या एका भीतीपोटी आपण आज इथे उभे आहोत, आता आपला समाज काय म्हणेल? त्याच्या मनातील विचार एकसारखे बदलत होते. त्याचे एक मन त्याला आपण खूप चुकीचे वागलो हे सांगत होते तर दुसरे मन त्याला आपण करतोय तेच बरोबर आहे हे समजावण्याचा प्रयत्न करत होते.

त्याला आता स्वतंत्र खोली देण्यात आली होती. त्याच्या अंगावर कैद्यांचा गणवेश चढवला गेला होता. थोडक्यात आता तो तिथला एक कैदी बनला होता. पण काही वेळच. त्यानंतर त्याला त्याच्या खोलीतून बाहेर अंगणात बोलावले गेले. तिथे सगळ्या कैद्यांना रांगेत उभे करण्यात आले. सगळ्यांची हजेरी घेण्यात आली आणि मग एका रांगेत त्यांना तिथून बाहेर नेण्यात आले. आता इथून आपल्याला कुठे नेले जात असावे याचाच विचार सचिनच्या मनात येत होता. शेवटी त्याने त्याच्या पुढे उभे असलेल्या एका कैद्याला विचारलेच.

“आता कुठं चाल्लो आपन?”

“शेतावर…” त्याने उत्तर दिले.

“शेतावर? कोनाच्या? कशाला?” सचिनने आश्चर्याने विचारले.

“हितं ऱ्हायचं तर काम करावं लागतं आपल्याला… आता आपन कामावरच जातोय… तू नवीन हाय वाटतं? समजंल एकेक गोष्ट…” असे सांगत त्याने स्वतःची ओळख करून दिली.

दोन दिवसात सचिन तिथे बराच रुळला. दिवस कसा निघून जात होता त्याला समजत देखील नव्हते. तिथल्या काही कैद्यांशी त्याच्या ओळखीही झाल्या. या दोन दिवसात त्याने लोकांचे इतके वेगवेगळे स्वभाव पाहिले जितके या आधी कधीच त्याला पाहायला मिळाले नव्हते. प्रत्येक कैद्याचा गुन्हा वेगळा, व्यक्तित्व वेगळे, परिस्थिती वेगळी आणि स्वभावही वेगळे. अनेक कैद्यांकडे पाहिल्यावर तर त्यांच्या वाऱ्यालाही थांबू नये असे त्याला वाटायचे. पण तिथे एक कैदी असाही होता जो सहसा बोलत नव्हता. बोलला तरी खूप कमी बोलायचा. काम असेल तेवढेच त्याचे बोलणे. सचिनला त्याच्याकडे पाहून एक प्रकारचे कुतूहल वाटत होते. सचिनच्या मनात नेहमी येत होते की याने असा कोणता गुन्हा केला असेल ज्यामुळे तो इथे आला आहे? कारण ज्याच्या नाकावरची माशी हलत नाही तो काय गुन्हा करू शकतो?

नेहमीप्रमाणे आजही ते शेतावर आले होते. जेवणाच्या सुट्टी नंतर थोडी विश्रांती घेत असताना सुद्धा त्याच्या मनात त्या कैद्याबद्दलच विचार चालू होता. तेवढ्यात त्याच्या नवीन मित्राचा खांद्यावर हात पडला.

“काय रे… काय इचार करू ऱ्हायला?” त्याच्या मित्राने विचारले.

“अबे… हा जो समोर काम करून ऱ्हायला ना… त्याच्या बद्दल विचार करतोय.” समोरच्या कैद्याकडे बोट दाखवत त्याने सांगितले.

“हा… त्यो… दुखी आत्मा !!!” त्याचा मित्र बोलून गेला.

“दुखी आत्मा?”

“हां रे भो… हितं त्याला सगळे दुखी आत्मा म्हन्तात. एकटाच बसतो. लैच डेंजर माणूस हाये…” मित्राने माहिती पुरवली.

“डेंजर म्हंजे?”

“अरे… त्यानं त्याच्या सक्क्या भैनीचा अन तिच्या नवऱ्याचा मर्डर केलाय. तिनं दुसऱ्या जातीच्या पोराशी लग्न केलं म्हनून… आता जो आपल्याच भैनीला मारू शकतो तो डेंजर नाई का?” मित्र सांगत होता आणि सचिनला आता त्या कैद्याच्या ठिकाणी आपणच उभे आहोत असे वाटत होते. दोन दिवसात जो विचार त्याच्या मनात एकदाही आला नव्हता तो विचार परत त्याच्या मनात थैमान घालत होता. आता कसेही करून या कैद्याशी मैत्री करावी आणि आपला उद्देश सफल करण्यासाठी याची मदत घ्यावी असे त्याचे मन त्याला सांगू लागले. तो तसाच उठला आणि समोरच्या कैद्याकडे गेला.

“मी सचिन देशमुख…” त्या कैद्यासमोर आपला हात पुढे करत त्याने ओळख करून देण्याचा प्रयत्न केला.

“मग मी काय करू?” त्या कैद्याने सचिनकडे न्याहाळत प्रश्न केला. त्याच्या या प्रश्नावर सचिन थोडा घोटाळला.

“जास काय नाय… मला मदत करा…” सचिनने ताडकन उत्तर दिले.

“कसली मदत? अन मी का करू?” त्याचा पुढचा प्रश्न…

“माझं ऐकून घ्या अन मंग ठरवा…”

“चल बोल…” त्याने सचिनचे म्हणणे ऐकून घेण्याचे ठरवले. नंतर सचिन एकेक गोष्ट सांगत होता आणि तो कैदी फक्त ऐकत होता. इतर कैद्यांना मात्र त्यांचे काय बोलणे चालू आहे हे काही समजत नव्हते पण त्या कैद्याच्या चेहऱ्यावरील सतत बदलणारे भाव पाहून काहीतरी विशेष गोष्ट असावी असे त्यांचे मत बनले.

“ठीके… पण मी असा इथे… मी कशी मदत करणार?” सचिनचे सगळे सांगून झाल्यावर त्या कैद्याने प्रश्न विचारला. खरं तर आता सचिनला सुद्धा हा प्रश्न पडला होता.

“हा… त्ये पन हाये. मी इथून भायेर गेल्यावर इचार करतो अन येऊन भेटतो तुमाला. फक्त तुमी मला मदत कराल की नाई येवढ सांगा…” सचिनने त्याला विचारले.

“ठीके… करीन मदत मी… अन आता मला काम करू दे. जा तू तुज्या कामाला…” असे म्हणत तो कैदी स्वतःच्या कामाला लागला सुद्धा. लवकरच आपण आपल्या उद्देशात सफल होणार म्हणून सचिनचे डोळे चमकू लागले.

—————————

“पाटील… आवो पाटील…” वाड्याच्या बाहेरूनच भिवानं पाटलाला हाक मारली.

“काय रे? कामून माह्या नावानं शंख करू ऱ्हायला?” ओसरीतील झोपाळ्यावर बसल्या बसल्या पाटील ओरडला. पाटलाचा आवाज ऐकताच भिवा दारातून आत आला. पाटलाची आज्ञा न घेताच त्यानं ओसरीवर आपलं बुड टेकवलं.

“आवो पाटील… इसरला का काय? आठ दिस झाले ना…” त्याने पाटलाला आठवण करून दिली.

“मायला तुज्या… मला वाटलं, म्याच आपल्या समाजाचा इचार करतो…” मिश्किलपणे हसत पाटील बोलला.

“ह्या ह्या ह्या… पाटील… तुमी म्होटी मानसं… म्हनून समाजाचा इचार करतेत… आमी ल्हान… आमी आदी पोटाचा इचार करतो…” भिवानं हसत हसत उत्तर दिलं. त्यावर पाटीलही मनसोक्त हसला.

“ठीकाय… बोलीव पंचायत…” पाटलानं परवानगी दिली आणि लगोलग भिवा बाहेर पडला.

थोड्याच वेळात परत एकदा पाटलाच्या वाड्यासमोर पंचायत बसली. देशमुखांनाही बोलावण्यात आलं होतं. आजही देशमुख मान खाली घालून उभे होते. त्यांच्याकड एक कटाक्ष टाकत पाटलानं बोलायला सुरुवात केली.

“तर मंडळी… आज देशमुखाला वक्त देवून आठ दिस झालं पन देशमुखानं दंडाची रक्कम पंचायतीला दिली नाई. म्हनून त्यांना जवर ते ती रक्कम भरत नाई तवर जातभायेर करन्यात येत हाये. त्यांना समाजाच्या कोन्च्याही कारेक्रमाला हजर ऱ्हाता येनार नाई. जर कुनी त्यांना या वक्ताला बोलीवलं तर त्येला सुद्दा जातभायेर केलं जाईल.” एवढे बोलून पाटील खाली बसला. देशमुखांकडे बोलण्यासारखे काही नव्हतेच त्यामुळे त्यांनी त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता आपल्या घरचा रस्ता धरला.

पंचायतीचे कामकाज उरकल्यावर पाटलानं आपल्या जवळच्या लोकांना मात्र वाड्यावर थांबून घेतलं.

“बोला पाटील…” आपल्याला का थांबायला सांगितलं असावं याचा काही उलगडा न झाल्याने एका पंचाने विचारलं.

“आपल्याला आजूक येक गोष्ट करायची हाये… देशमुखाच्या पोराला सोडवाया पायजेल… त्येच बोलन्यासाठी समद्यांना थांबून घेतलं म्या…” पाटील एकदम मुद्द्यावर आला.

“देशमुखाच्या पोराला सोडवायचा? कायाला? तितं पैशे द्यावे लागतेत. त्ये कोन देनार?” पाटलाला काय अवदसा आठवली या अविर्भावात भिवानं प्रश्नांचा भडीमार केला.

“मायला तुज्या… तुज्याकडं पैशे मागितले का बेन्या?” पाटील तडकलाच.

“आवं… तसं नाई पाटील… कामून रागं भरतेत माह्यावर? तुमी इचार केलाच असन ह्ये काय ठाव नाय व्ह्य मला?” पाटलाला भडकलेला पाहून भिवा गडबडला. भिवाची ती अवस्था पाहून बाकी कुणी काही बोलण्याचा प्रयत्नही केला नाही.

“ह्ये पहा… काई येळेला डोस्क्याचा उपेग बी करावा लाग्तो. आपन देशमुखाला जातभायेर केलं पन त्यानं काय व्हतंय? या गावात समदे काय आपल्या समाजाचे हायेत व्हय? म्हनून देशमुखाला जास काय फरक पडनार नाई. आनी म्हनुनच आपल्याला येवढच करून नाई चालनार. आदी आपन त्याच्या पोराला त्याच्या इरुद्ध हुबा करायचा. त्या पोराला मदी घालून त्याच्या पोरीला हितं आनायचं. मंग देशमुखाला सांगायचं… काय करतो? पोरीचा जीव घ्येतो की त्या बदल्यात दंड भरतो? आता त्यो पोरीचा जीव थोडाच घील? म्हंजी आपल्याला त्याच्याकून आजूक पैशे घ्येता येतीन.” पाटलानं आपला प्लॅन सांगितला.

“पाटील… पन आपन देशमुखाकडून पैशे मागितले हायेत ना? मग ह्ये लचांड कशाला?” एका पंचाने विचारले.

“अरे बाबा… त्येच त सांगून ऱ्हायलो. त्याच्या पोराला मदी घ्येतलं तर आपल्यावर जास काय येनार नाई… जसं मागल्या येळी झालं. जेल मधी कोन ग्येला? त्याचाच पोरगा. आता बी तसंच करायचं. ह्या ह्या ह्या…” पाटील हसत हसत म्हणाला आणि सगळ्यांना त्याचा हा बेत चांगलाच पसंत पडला.

“पन मंग त्याच्याकून नंतर किती पैशे मागाया पायजेल?” भिवानं विचारलं.

“मागू की तीन लाख रूपे…” पाटलानं आकडा सांगितला.

“आवं पाटील… जास मागा की… डबल मागा…” पाटलानं सांगितलेला आडका ऐकून भिवाला हाव सुटली.

“ह्ये बेनं काय सुदरायचं नाई… येक नंबरचा जिंदाड…” भिवाकडं हसत पहात पाटील म्हणाला आणि डोकं खाजवत भिवा कसनुसं हसला.

“ह्ये पघ, मानसानं आपला फायदा पघायचा ऱ्हातो… जास पैशे मागितले आनी त्ये देशमुखाला नाय दयेता आले मंग? त्यो काय करन? पोरीचा जीव घील… पन त्येचा आपल्याला काय फायदा? त्योबी जाईल जेलमधी… मंग ग्येलेका समदे पैशे? तवा… आदी मानुस किती देऊ शकल ह्ये पाहूनच दंड करावा लाग्तो…” पाटलानं आता भिवाला नीट समजावून सांगितलं.

“आयला… पाटील… काय भारी डोस्कं हाय तुमचं… मानलं तुमाला…” भिवानं पाटलाची स्तुति केली.

“घुसलं ना टकुर्यात… मंग आता येक करायचं… गावच्या दोनचार लोकास्नी बरुबर घ्ये आनी त्या देशमुखाच्या पोराला सोडीव. येकदा का त्यो हितं आला मंग त्याला बरुबर घेऊन त्या पोरीचा माग काढा. लाग कामाला…” पाटलानं भिवाला आज्ञा केली आणि भिवा तिथून निघाला.

दुपार उलटते न उलटते तोच पाटलाच्या दारात भिवा सचिनसह उभा होता.

“पाटील… पायलं का कोन आलाय?” भिवानं बाहेरूनच हाक दिली.

“अरे… सचिन… ये रे पोरा…” सचिनकडे अगदी आपुलकीने पहात पाटलानं त्यांना आत बोलावलं.

“अरारारा… लई खराब झालास बग…” आपल्या आवाजात काळजी पुरेपूर भरलेली आहे असे दाखवत पाटील म्हणाला.

“भिवा सांगत व्हता… आमच्या घराला जातभायेर केलंय?” काहीशा रागातच सचिननं विचारलं.

“ह्ये बग पोरा… काई येळेला करावं लाग्तं. आन पंचायतीचा न्याय त्यो… समद्यांना सारका… आता ह्येच पघ… चार दिसापासून पोलीस स्टेशनात फेऱ्या मारू ऱ्हायले ह्ये पोरं… पन त्यो कोन इनसपेक्टर… दाद लागू देइना… मंग आज त्याच्या वरल्या सायबाला फोन क्येला तवा तुला सोडला… मायला… इसरलोच की… ह्ये आपन उद्या बोलू हितचं… आता हायेस तसा घरी जा… तुजी आई वाट बगत बसली असनं…” उसना मानभावीपणा आवाजात आणत पाटलानं सचिनला घरी पाठवलं आणि मग मनातल्या मनात पुढचे बेत आखायला सुरुवात केली.

क्रमशःप्रतिष्ठा भाग ८.

मिलिंद जोशी, नाशिक…

भाग ७ लिंक –

Leave a comment